शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
2
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
3
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
4
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
5
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
6
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
7
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
8
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
9
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
10
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
11
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
12
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
13
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
14
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
15
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
16
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
17
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
18
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
19
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका

पूर येणारच..

By admin | Published: August 12, 2016 5:55 PM

नद्यांची पात्रं आक्रसताहेत. पाणी सामावून घेण्याची त्यांची क्षमता कमी होते आहे. पाण्याचे प्रवाह बुजवून नदी, नाले, ओढे यांच्या पात्रात मोठमोठी बांधकामे उभी आहेत.

 - अभिजित घोरपडे

नद्यांची पात्रं आक्रसताहेत. पाणी सामावून घेण्याची त्यांची क्षमता कमी होते आहे. पाण्याचे प्रवाह बुजवून नदी, नाले, ओढे यांच्या पात्रात मोठमोठी बांधकामे उभी आहेत. जमिनीच्या प्रत्येक तुकड्याचा वापर बांधकामासाठी करण्याची स्पर्धा लागली आहे. पावसाचे पाणी किंवा धरणातून नदीच्या पात्रात सोडलेले पाणी वस्त्यांमध्ये नाही, तर मग कुठे जाणार?आपण नद्यांवर अतिक्रमणे करतो आणि पुराचे पाणी घरात आले म्हणून नंतर बोंब मारतो..मोसमी पावसाची अनेक वैशिष्ट्यं. यापैकी एकाचा अनुभव नुकताच उभ्या महाराष्ट्राने घेतला. अपुऱ्या पावसाचे चित्र मोजून काही दिवसांत पालटू शकते. बंगालच्या उपसागरात योग्य ठिकाणी कमी दाबाचे एखादे क्षेत्र निर्माण व्हायचा अवकाश... बस्स, आपली चिंता मिटली म्हणून समजायचे. मागच्या आठ-पंधरा दिवसांत महाराष्ट्रात नेमके हेच घडले. ओरिसा-बंगालच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले, ते आतमध्ये सरकले आणि महाराष्ट्राच्या सर्व भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. सह्याद्रीच्या घाटमाथ्यांवर तर तो इतका कोसळला की, धरणांची पातळी वेगाने वाढली. केवळ आठवडाभरात राज्यातील धरणांमध्ये तब्बल सव्वादोनशे अब्ज घनफूट (टीएमसी) इतक्या पाण्याची भर पडली. राज्यातील दोन सर्वांत मोठी धरणे -उजनी आणि कोयना - संपूर्णपणे भरावी इतकं हे पाणी! त्यामुळे राज्यातील एकूण धरणसाठा समाधानकारक असा ६५ टक्क्यांवर पोहोचला. पाठोपाठ दुसऱ्या एका कमी दाबाच्या क्षेत्राने त्यात भर टाकली. त्यामुळे अनेक धरणांमधून पाणी सोडावे लागले. परिणामी, अनेक नद्या दुथडी भरून वाहिल्या. जागोजागी पूरही आले.पण आॅगस्ट महिना उजाडण्यापूर्वी राज्यात अस्वस्थता होती. पावसाचे दोन महिने संपले, तरी अपेक्षित पाऊस पडला नव्हता. खरंतर हवामान विभागाने या वर्षासाठी १०६ टक्के पावसाचा अंदाज दिला. महाराष्ट्रासह पश्चिम भारतात चांगल्या पावसाची शक्यता आहे. असे असूनही जुलैमध्ये समाधानकारक पाऊस झाला नाही. एरवी जुलैच्या अखेरपर्यंत सह्याद्रीच्या घाटातील (विशेषत: पुणे आणि नाशिक विभागातील) धरणे बऱ्यापैकी भरलेली असतात. त्यातून पाणी सोडून द्यायला सुरुवातही झालेली असते. पण यावेळी राज्यातील धरणांमधील पाणीसाठा ४०-४२ टक्क्यांच्या आसपासच रेंगाळला होता. पावसाची आणि धरणांमधील पाणीसाठ्याची तूट भरून निघेल का, अशी काळजी व्यक्त केली जात होती. पावसाने तीनेक आठवड्यांची उघडिप दिल्यामुळे त्यात भरच पडली होती. आधीची दोन वर्षे अपुऱ्या पावसाची आणि आता ही स्थिती! जुलै महिन्याची अखेर अशी चिंतेत गेली. मात्र, आॅगस्टने हात दिला आणि स्थिती पूर्णपणे पालटली. महाराष्ट्रातील पाऊस आणि धरणांमधील पाणीसाठा यांचे काही ठोकताळे आहेत. विशेषत: कोल्हापूरपासून ते नाशिकपर्यंत सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या धरणांसाठी. त्यानुसार, १५ जुलैच्या आसपास धरणे भरायला सुरुवात होते. १५ आॅगस्टपर्यंत बहुतांश धरणे भरून पाणी सोडायला सुरुवात होते. त्यानंतरचा पाऊस हा खालच्या बाजूला असलेल्या उजनी, जायकवाडी यासारख्या मोठ्या धरणांना पाणी पुरवण्यासाठी उपयुक्त ठरतो. हे वेळापत्रक प्रत्यक्षात आले तर त्या वर्षीचा पाऊस सामान्य म्हणायचा. या निकषावर या वर्षीचा पाऊस चांगलाच आहे. पण असा चांगला पाऊसही आपल्याला पेलवत नाही.का?.. ते गेल्या पंधरा दिवसांत आपण पाहिलेच. आधी पाऊस पडत नव्हता म्हणून ओरड केली जात होती. यावेळी पावसाने भरभरून दिलं, तरी आम्हाला त्रास. नाशिक, कोल्हापूर, कोकण तसेच, विदर्भात अनेक ठिकाणांना पुराने वेढले. आर्थिक नुकसान, गैरसोय, मनुष्यहानी, प्रचंड ओरड आणि पुढे काही दिवस त्याचा परिणाम... हे चित्र यावेळीही पाहायला मिळाले. महाडजवळील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेने तर प्रशासनाच्या बेफिकिरीची जगभर ओळख करून दिली. देशासह जगभरातील बीबीसीसह अनेक प्रसिद्धिमाध्यमांनी या घटनेची आणि आपल्या पुराच्या घटनांची दखल घेतली. यानिमित्ताने सुरू झालेली चर्चा मात्र वेगळ्याच वळणावर चालली आहे. या संदर्भात नागरिकांनी आणि माध्यमांनी वस्तुनिष्ठ राहणे गरजेचे आहे. कारण आता कोणत्याही दुर्घटनेला अपवादात्मक घटनेचा आणि विशेषत: हवामानबदलाचा रंग देण्याची घाई केली जाते. खेदाची बाब अशी की, हे करताना तो हवामानबदलाचा परिणाम आहे का, याचा वस्तुनिष्ठ विचारही केला जात नाही.सावित्री नदीला आलेला पूर आणि महाडजवळील ब्रिटिशकालीन पूल कोसळणे या घटनेच्या निमित्ताने याची चर्चा करावी लागेल. पूल पडला ही दु:खदच घटना. पण त्याला जबाबदार कोण?... यंत्रणेतील त्रुटी, बेफिकिरी की निसर्ग? ‘यंत्रणेतील त्रुटी म्हणजे माणूस’ आणि ‘निसर्ग म्हणजे पाऊस’ यांच्यापैकी कोणावर तरी ही जबाबदारी टाकावी लागेल. अनेकांनी ही जबाबदारी मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसावर टाकण्याचा प्रयत्न केला. जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, महाबळेश्वरमध्ये दोन दिवसांमध्ये (४८ तासांत) ८०० मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे पूल पडल्याचे सांगितले. तिथे दोन दिवसांत ८०० मिलिमीटर पाऊस पडला, हे वास्तवच आहे. पण महाबळेश्वरला दोन दिवसांत इतका पाऊस पडणे ही अपवादात्मक घटना नाही. हवामान विभागाकडे असलेल्या उच्चांकी पावसाच्या आकड्यांनुसार, महाबळेश्वर येथे ११ आॅगस्ट २००८ या दिवशी २४ तासांत ४९१ मिलिमीटर इतकी उच्चांकी नोंद झाली आहे. आणि असा सलग दोन-चार दिवस पावसाचा जोर कायम राहणे हेही या ठिकाणासाठी नवे नाही. आणखी खोलात जायचे तर महाडजवळील पूल २ आॅगस्टच्या मध्यरात्री केव्हातरी पडला. आणि ८०० मिलिमीटर पावसाची नोंद आहे ती ३ आॅगस्टच्या सकाळी ८.३० पर्यंतची. म्हणजे मध्यरात्रीनंतर आठेक तास पडलेल्या पावसाचा पूल कोसळण्याशी संबंध नाही. तो पावसाचा आकडा ८०० मधून वजा करावा लागेल. याचा अर्थ सलग सहाशे-सातशे मिलिमीटरच्या पावसामुळे पूल पडत असेल, तर महाबळेश्वरात उगम पावणाऱ्या नद्यांवरील सर्वच पूल पडायला हवेत.ही इतकी सविस्तर मांडणी करण्याचे कारण असे की, आपण विनाकारण या घटनांशी ‘बादरायण संबंध’ लावतो. त्यात हवामानबदलाचा संबंध दाखवण्याचा मोह तर आवरतच नाही. हवामानबदल हे वास्तव आहे. ते नाकारण्याचे कारणच नाही, पण म्हणून सगळीकडेच त्याचा संबंध जोडणे सर्वत: चुकीचे आहे. या दृष्टीनेच आता पुराच्या इतर घटनांकडे पाहावे लागेल. आता होतेय असे की, आपण नद्यांवर अतिक्रमणे करतो आणि आमच्या घरात पुराचे पाणी आले म्हणून बोंब मारतो.महाराष्ट्रातील नद्यांची पाहणी केली असता एक बाब ठळकपणे दिसते, ती म्हणजे- आता नद्यांची पाणी सामावून घेण्याची क्षमता कमी झाली आहे. त्या पूर्वी जितके पाणी सामावून घ्यायच्या, तितके आता सामावून घेऊ शकत नाहीत. हे पूर्वी म्हणजे कधी? पंचवीस-तीस वर्षांपासून आजपर्यंत हा बदल वेगाने सुरूच आहे. त्यामुळे या दृष्टीने १९९० हे वर्षही पूर्वीचे ठरते आणि कालची तारीखसुद्धा! याचे मुख्य कारण- आपणच नद्यांची पात्रं आक्रसून टाकली आहेत. एक तर अनेक नद्या, ओढे आणि नैसर्गिक प्रवाहांची पात्रे अरुंद केली आहेत. त्यामुळे पूर्वी मोठे असलेले प्रवाह आता लहान बनले आणि एखाद्या नाल्याप्रमाणे अंग चोरून वाहत आहेत. अनेक लहान प्रवाह तर पूर्णपणे बुजवून टाकण्यात आले आहेत. त्यांच्यावर बांधकामे झाली आहेत, मोठाल्या इमारती उभ्या आहेत. हे एवढेच करून आपण थांबलेलो नाही. जी पात्रं शिल्लक ठेवलीत, त्यातसुद्धा आपण घुसखोरी केली आहे. नदी, ओढे यांच्या पात्रात रस्ते, घरे, व्यापारी संकुले उभी आहेत. मुंबईच्या मिठी नदीचा गळा कसा आवळण्यात आला, याची चर्चा तिथे २६ जुलै २००५ रोजी आलेल्या प्रलयाच्या निमित्ताने झाली. पण अशा मिठी राज्यभर आहेत. त्यांच्यावर विविध प्रकारची अतिक्रमणे आहेत. घरे, बांधकामे, पात्रात भराव टाकून काढलेल्या शेतजमिनी ही अतिक्रमणे ठळकपणे दिसून येतात.याच्या पलीकडेही आपण अनेक व्यवस्था उद्ध्वस्त करून टाकल्या आहेत. सांगली शहरातील ‘ओत’ आणि मुंबईतील ‘अ‍ॅब्झॉर्बिंग पाँड’ ही याची प्रातिनिधिक उदाहरणे. सांगलीत कृष्णा नदीला वाढणारे पाणी सामावून घेण्याचे काम तेथील ‘ओत’ करायचे. ‘ओत’ म्हणजे मोठ्या आकाराचे नैसर्गिक खड्डे. नदीचे पाणी वाढले की हे ओत भरले जायचे. त्यांच्यामुळे पाण्याला वस्त्यांमध्ये शिरण्यापूर्वी थांबण्यासाठी जागा सापडायची. तेवढ्या दिवसभराच्या काळात पाणी ओसरले तर पाणी वस्त्यांमध्ये न शिरता पुढे निघून जायचे. हेच काम मुंबईत मिठी नदीच्या काठावर असलेले ‘अ‍ॅब्झॉर्बिंग पाँड’ करायचे. पण आता या दोन्ही गोष्टी काळाच्या पडद्याआड घालवण्यात आल्या. बरं, त्यांना पर्याय काय?.. तर त्या नावानेही बोंब. जमिनीच्या प्रत्येक तुकड्याचा वापर फक्त आणि फक्त बांधकामासाठी करण्याची स्पर्धा लागल्यावर आणखी काय होणार? आयते मिळालेले नैसर्गिक प्रवाह घशात घालण्यात आले. हीच अवस्था गावोगावच्या पाणथळ जागा, तळी, तलाव, पाणंद, ओढे-नाले यांची. हे इथपर्यंतच थांबले नाही, तर गवताळ माळराने, गावोगावची गायराने या जमिनी पडीक म्हणून वेगवेगळ्या कारणांसाठी वापरल्या गेल्या... शेवटी जमीन वापरातून या सर्व गोष्टी काढून घेतल्यावर मागे उरते काय? पावसाळ्यात पडणारे पाणी आणि आपली घरे-बांधकामे! मग पावसाचे पाणी किंवा धरणातून नदीच्या पात्रात सोडलेले पाणी वस्त्यांमध्ये शिरणार नाही, तर मग जाईल कुठे?आणि अशा प्रकारे वस्तीत येणाऱ्या पाण्याला पूर म्हणून आपण ओरड करणार असू, तर असे पूर दरवर्षी येणारच. त्यासाठी अतिवृष्टी वगैरे होण्याची अजिबात आवश्यकता नाही. पण हे समजून न घेता इतरांकडे बोट दाखवू लागलो तर आपणाला कोणी माफ करू शकणार नाही. पावसाच्या वर्तनात चढ-उतार असतातच. हवामानबदलामुळे त्यात वाढ होणार असेल तर त्याच्याआड दडून भागणार नाही. त्याऐवजी त्यातून मार्ग काढण्यासाठी आपल्या नैसर्गिक व्यवस्था अधिक भक्कम कशा राहतील, याची तजवीज करावी लागेल. पण ते न करता नुसतेच हवामानबदलाकडे बोट दाखवत राहिलो तर आपण करंटे ठरू. पाऊस नसताना आणि असतानाही आपली गैरसोय. याचा अर्थ एवढाच की त्या देणाऱ्याचे हात हजारो आहेत, पण बदललेल्या काळात आपली झोळीच दुबळी झालीय. मग तो देणारा तरी काय करेल! निदान आपण गमावून बसलेली क्षमता तरी मान्य करा, पण ते सोडून पुन्हा आपल्या चुकाही त्याच्याच माथी मारायच्या!हा कुठला न्याय?