शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

फुलांना आस स्वातंत्र्याची..

By admin | Published: September 24, 2016 8:26 PM

पूर्वी कास पठारावर गाड्या भरून पोरं यायची. निष्पाप कोवळी फुलं तुडवत धिंगाणा घातला जायचा. अतिरेक झाल्यानंतर वनखात्यानं कोट्यवधी रुपये खर्चून कैक किलोमीटर दूरपर्यंत लोखंडी जाळी बसवली. तिकिटाची रक्कम वाढवली, तरीही पर्यटकांची संख्या कमी झालेली नाही. निसर्गाच्या रक्षणासाठी इथल्या पर्यटकांच्या संख्येला रोक लावायचा तरी कसा, हा इथला मोठा प्रश्न आहे.

सचिन जवळकोटे
 
साताऱ्याचा बोगदा तसा ऐतिहासिक. दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेला. त्याकाळी पुण्यातून दक्षिण भारतात जाण्यासाठी एकमेव रस्ता बोगद्यातून गेलेला. याच ठिकाणाहून सज्जनगड अन् ठोसेघरला जाण्याची सोय, तर जागतिक वारसा स्थळ म्हणून परिचित झालेल्या कास पठाराची ‘एण्ट्री’ही इथूनच. 
गेल्या काही वर्षांपासून हा अरुंद रस्ता भलताच गजबजून गेलाय. सण नाही. वार नाही. उजाडला दिवस की शेकडो गाड्या सुसाट धावू लागतात. यवतेश्वर घाटातून कास पठाराकडे झेपावू पाहतात. तीन-तीन किलोमीटरच्या रांगा.. तरीही प्रत्येकाला हौस अशा गर्दीत घुसण्याची. ‘ट्रॅफिक जाम’मधून कशीबशी वाट काढत वरपर्यंत पोहोचण्याची. 
आठशेपेक्षाही जास्त वेगवेगळ्या प्रजातींच्या दुर्मीळ फुलांना सामावून घेणारं हे पठार तसं काही वर्षांपूर्वी अडगळीतच पडलेलं. मात्र, चार वर्षांपूर्वी ‘जागतिक वारसा स्थळा’त नोंद झाली अन् इथल्या पर्वतरांगांचं नशीबच पालटलं.. म्हणूनच बदलत्या युगाची बदलती चाहूल टिपण्यासाठी आम्हीही वर निघालो.
इथल्या डोंगरांवर वर्षानुवर्षे जनावरं चारणारा चव्हाणांचा नाम्या ‘यवतेश्वर’जवळ भेटला. तो सांगत होता, ‘धा वरसापुरवी म्या सकाळपास्नं संध्याकाळपत्तूर इथं फिरलो तरीबी येक डोस्कं दिसायचं नाय. दिसलाच तर बिबट्या नाय तर रानगवा. वरती यायला रस्ताबी न्हवता तवा. येष्टीचीबी मारामार. आमीच कवा तर म्हैन्यातनं येकदा बाजार आणायला खाली उतरत व्हतू.’ 
नाम्या बोलत असताना त्याच्या बाजूनं पाच-पंचवीस वाहनं सर्रऽऽकन घासून गेली. एकेकाळी सायकल दिसली तरीही दचकणाऱ्या त्याच्या म्हशींना म्हणे आता पवनचक्की कंटेनरसारख्या भल्यामोठ्या धुडाचीही सवय झालीय. म्हणूनच की काय शेजारून हजारो वाहनं गेली तरीही ढुंकूनही न पाहणारी त्याची ही बायजा म्हैस निवांतपणे चरण्यात दंग होती. 
‘रोज एवढी शहरी मंडळी काम-धंदा सोडून इथं नेमकं काय बघायला येतात?’ - हा यक्षप्रश्नही अनेक स्थानिकांच्या नजरेतून सातत्यानं जाणवत गेलेला. पिढ्यान्पिढ्या इथली फुलं बघणाऱ्या लोकांना वाटायचं ‘यात काय ते वेगळेपण?’ पण एवढं मात्र साऱ्यांच्या नीट लक्षात आलेलं की, ‘या फुलांमुळं हा आपला भाग जगासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलाय. आपण कुणीतरी वेगळे आहोत!’ 
‘यवतेश्वर’चा डोंगर ओलांडून ‘पेट्री’कडं जाताना मध्येच एक छोटीशी खिंड लागते. डाव्या बाजूला उरमोडी धरणाचा अथांग जलाशय, तर उजव्या बाजूला कण्हेर धरणाचं दूरपर्यंत पसरलेलं पाणी. मधल्या पठारातून एक डांबरी रस्ता सरळसोट गेलेला. त्याच्या बाजूला उमललेली लाल-गुलाबी फुलं..
या ठिकाणी ‘गो-कार्टिंग’सारखा वेगळा प्रयोग करणारे प्रवीण कुलकर्णी नवीनच माहिती देत होते.. ‘फुलांचा सिझन तसा फक्त सप्टेंबर महिन्यातच. तोही फक्त वीस-पंचवीस दिवसांचा. तरीही वर्षभर इकडे येणाऱ्या मंडळींची संख्या वरचेवर वाढतच चाललीय. उन्हाळ्यात तर इथले सारेच डोंगर पार बोडके असतात. तरीही हजारो पर्यटकांच्या गाड्या इथं दरीला खेटून उभ्या असतात; कारण इथं मे महिन्याच्या भर दुपारी उन्हातही वातावरण अगदी थंडगार असतं. आल्हाददायक असतं.’
‘पेट्री’ ओलांडून जसंजसं पुढं जाऊ लागतो, तसतसा वातावरणातला बदल स्पष्टपणे जाणवतो. गाडीतला ‘एसी’ बंद करून खिडक्यांच्या काचा मोकळ्या करण्यात किती मजा असते, हे कळू लागलं. थोडंसं पुढं आल्यावर ‘नवरा-नवरीचा डोंगर’ दिसू लागला. या परिसरातील स्थानिक ग्रामस्थ म्हणे लग्न झाल्यानंतर इथं येऊन दोन दगडांची पूजा करतात. मगच संसाराला लागतात. सारं आयुष्य निसर्गालाच अर्पण करणाऱ्या इथल्या मंडळींची कहाणी खरंच विलक्षणीय. 
याच ठिकाणी पर्यटकांच्या राहण्या-खाण्याची सोय करणारे संपत जाधव माहिती देत होते.. ‘फुलांमुळं इथलं पठार जगप्रसिद्ध झालं असलं तरीही हा परिसर संपूर्ण वर्षभरासाठीच पिकनिक स्पॉट बनलाय. सहा-सहा महिने अगोदर आॅनलाइन बुकिंग करणाऱ्या पर्यटकांची संख्या वरचेवर वाढतच चाललीय. आजपर्यंत केवळ मुंबई अन पुण्याकडचीच मंडळी जास्त यायची; परंतु आता मराठवाडा, विदर्भ अन् गुजरातकडचा पर्यटकही पठार हुडकत हुडकत इथं येतो. प्रत्येकालाच फुलांचं आकर्षण असलं तरीही इथल्या हिरव्यागार डोंगरदऱ्यांनीच साऱ्यांना वेड लावलंय.’
‘नवरा-नवरीचा डोंगर’ ओलांडून थोडंसं पुढं गेलं की सुरू होते कंपाऊंडची जाळी. जवळपास तीन किलोमीटरपेक्षाही जास्त लांबीची ही जाळी म्हणजेही एक मानवनिर्मित चमत्कार.. अन् आतल्या पठारावरची फुलं म्हणजे निसर्गनिर्मित चमत्कार. मुख्य प्रवेशद्वाराजवळ दहा-बारा ग्रामस्थ शिटी वाजवून प्रत्येक गाडी अडविण्यात दंग. एकजण पैसे घेतोय, दुसरा तिकीट फाडतोय, तिसरा गाडीला दिशा दाखवतोय. पोलीस खात्यालाही लाजवेल इतक्या शिस्तबद्धरीत्या चाललेलं काम पाहून अचंबा वाटला. 
एकाला छेडलं, तेव्हा तिथला म्होरक्या बोलू लागला. नाव विष्णू कीर्दत.. ‘आजपर्यंत या पठारावर कुणीही यायचं. कार घेऊन थेट गवतात शिरायचं. यांना ना कुणाचं बंधन, ना कुणाची आडकाठी. यामुळं पठाराचं खूप नुकसान झालं. अनेक दुर्मीळ जाती नष्ट झाल्या. त्यामुळंच फॉरेस्ट विभागाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं एक स्थानिक गावकऱ्यांनी कमिटी तयार केलीय. प्रत्येक पर्यटकाला तिकीट आकारतोय. कार पार्किंग अन् कॅमेऱ्यासाठीही पैसे घेतोय. हा सारा पैसा इथल्या गावांच्या विकासासाठीच वापरणार असल्यानं गावकरीही रोज इमाने-इतबारे इथं ड्यूटी बजावताहेत.’ 
विकासासाठी पर्यटकांकडून पैसे घेण्याची कल्पना चांगली असली तरी तिकिटाचे आकडे ऐकताच डोळे विस्फारण्याची वेळ आली. फुलं बघण्यासाठी एका व्यक्तीला म्हणे शंभर रुपये. वाहन पार्किंगसाठी पन्नास, तर कॅमेरा घेऊन आत जाण्यासाठीही पुन्हा शंभर रुपये. बापरे बाप.. गेल्या वर्षीपेक्षा यंदा दुप्पट आकारणी या ‘कास वन समिती’नं सुरू केलेली. 
‘एवढ्या लांबून येणाऱ्या पर्यटकांसाठी जिझीया कर लावताय की काय?’ या प्रश्नावर उपवनसंरक्षक अनिल अंजनकर गालातल्या गालात हसले.. ‘खूप विचार करून आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतलाय. या दुर्र्मीळ फुलांचं अस्तित्व कायमस्वरूपी टिकवायचं असेल तर सर्वप्रथम इथला मानवी हस्तक्षेप थांबविणं अत्यंत गरजेचं होतं. रोज हजारो पर्यटक बिनधास्तपणे आत शिरून फुलं तुडवायचे. तेव्हा लोकांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठीच आम्ही ही उपाययोजना केली. शनिवार, रविवार अन् सुटीदिवशीचे दर मुद्दाम वाढवले. एका दिवसात जास्तीत जास्त फक्त तीन हजारच पर्यटक पठारावर फिरतील, याचं नियोजन केलं.’ 
पण हाय.. ‘तिकिटांचे दर वाढविले तर पर्यटकांची संख्या रोडावेल, हा अंदाजही पार कोलमडून पडला. कारण गर्दी वरचेवर वाढतच चाललीय. गणेशोत्सव काळात सकाळी बाप्पांची प्रतिष्ठापना करून दुपारी पठारावर हजर झालेल्या हजारो पुणेकरांना पाहून साऱ्यांनीच डोक्याला हात लावला. विसर्जनादिवशीही जवळपास अशीच परिस्थिती. शहरातल्या डॉल्बीच्या धांगडधिंग्यापेक्षा डोंगरावरच्या रानवाऱ्याची सुरेख शीळ ऐकण्याकडेच साऱ्यांचा कल होता. 
चालत-चालत पठाराकडं निघालो. बोलता-बोलता रंगीबेरंगी फुलं कधी लागली, तेच समजलं नाही. मात्र, फुलांपेक्षा माणसंच अधिक. इथल्या शेकडो फुलांची नावं आजही कुणाला माहीत नाहीत; परंतु हातातल्या आठ-दहा मेगापिक्सेल मोबाइलमुळे बहुतांश मंडळी जणू ‘परफेक्ट फोटोग्राफर’ बनलेली. फुलांशी जवळीक साधण्यात अनेक हौसे-गवसे पुढे सरसावलेले. 
पठारावरच्या भाऊगर्दीत एक तरुण खाली वाकलेला. अक्षरश: जमिनीला नाक लावून फुलांचा फोटो काढण्यात मग्न झालेला. क्षणभर वाटलं, महाशय एखादे ‘बॉटनी प्रोफेसर’ आहेत की काय.. जवळपास पंधरा-वीस मिनिटे कॅमेऱ्यातून विविध फुलांची न्याहाळणी सुरू. एवढ्यात पाठीमागून दोन गार्ड आले. हातातली काठी वाजवत त्यांनी त्याला हाका मारून उभं केलं... नंतर पाचशेच्या दंडाची पावती पाडून थेट हातात दिली. कारण काय तर... एका फुलाचा ‘क्लोज फोटो’ काढण्याच्या नादात या पठ्ठ्यानं पाठीमागची पाच-पंचवीस फुलं कळत-नकळत पायानं चिरडली होती. त्यानं मुकाट्यानं पैसे भरले.. कारण प्रश्न पाचशे रुपयांचा नव्हता, तर निसर्गाच्या जपणुकीचा होता. प्रश्न केवळ लोकशाहीतल्या स्वातंत्र्याचा नव्हता, तर निसर्गानं आखून दिलेल्या काटेकोर नियमांचा होता !
 
‘रिसॉर्ट’मुळे रोजगार.. 
चाकरमानी परत गावाकडे!
फुलांच्या सिझनमध्ये लाखो पर्यटकांची पावले या पठाराकडे धावतात. इतरवेळीही वर्षभर सुटीचा दिवस गाठून येणाऱ्यांची संख्या हजारांमध्ये. चार-पाच वर्षांपूर्वी इथं प्यायला घोटभर पाण्याचीही मारामार होती. मात्र काळाची गरज ओळखून यवतेश्वर घाटापासूनच हॉटेल्स, धाबे अन् रिसॉर्ट्स उभी राहिली. आजपावेतो इथल्या खडकाळ माळरानावर केवळ जनावरे चारून पोट भरणाऱ्यांना नवा रोजगार मिळाला. नोकरीसाठी मुंबई-पुण्याकडे गेलेले अनेक चाकरमानी पुन्हा आपल्या गावाकडे आले.
मधल्या काळात धडाधड उभारल्या गेलेल्या ‘आरसीसी स्ट्रक्चर’च्या रिसॉर्टमुळे निसर्गाचा समतोल बिघडतो की काय, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ‘न्याहरी-निवास योजना’ राबवून पर्यावरणपूरक पर्यटनावर अधिक भर दिला. त्याचाही फायदा अनेक स्थानिकांनी घेतला. दहावी पास तरुणांनीही सहा-सहा महिने अगोदर ‘आॅनलाइन बुकिंग’ची सिस्टीमही अवगत केली. मात्र बाहेरच्या पर्यटकांना हव्या असलेल्या सुविधा पुरविण्यात आजही हा परिसर कमीच पडतोय, हे नक्की.
 
पर्यटनाचं मार्केटिंग... धबधब्याचं युद्ध!
पुण्या-मुंबईची बरीच पर्यटक मंडळी दर शनिवारी-रविवारी इथं येऊन राहतात. तेव्हा त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवते ती निसर्गाबद्दलची ओढ. या मंडळींचं सॅलरी पॅकेज कैक लाखांत. रोजचा खर्चही हजारांत. सारी भौतिक सुखं पायाशी लोळत पडलेली. मात्र, त्यांना हवी असलेली मानसिक शांती महानगरांमध्ये मिळत नसल्यानं प्रत्येकाचाच ओढा इथल्या डोंगरदऱ्यांकडे. त्यात पुन्हा ‘हायवे’च्या सहापदरीकरणामुळे पुणेकर मंडळी तास-दोन तासात या पठारावर हजर. फुलांलगतच ‘कासचा तलाव’ अन् ‘बामणोलीचा डोह’ दर्शनासाठी मोकळाच. त्यामुळे या कासच्या फुलांचं मार्केटिंग करणाऱ्या कैक कंपन्या पुण्या-मुंबईत जन्माला आल्यात. कास पठाराच्या डाव्या बाजूला वजराई धबधबा, जो देशातला सर्वात उंच कोसळणारा म्हणून यंदा जाहीर झालाय. या धबधब्यावरूनही दोन गावांमध्ये प्रचंड संघर्ष होतोय. भांबवली गावकऱ्यांच्या मते या धबधब्यावर त्यांचाच हक्क.. मात्र कास ग्रामस्थ ‘सातबारा’ दाखवून मालकी प्रस्थापित करताहेत. परस्पर पर्यटन शुल्क गोळा करू लागलेत. त्यामुळे भांबवलीकरांंनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतलेली. आजपावेतो शेतीच्या बांधावरून अन् घराच्या कुंपणावरून झालेले वाद मिटविण्यात माहीर असणारे महसूल खाते या धबधबा प्रकरणात मात्र पुरते गोंधळून गेलेय... आता बोला!
 
माणसांसाठी जाळी.. जनावरांसाठी घुसमट!
जवळपास तीन हजार एकरात पसरलेल्या या पठारावर पूर्वी कुणाचंच नियंत्रण नव्हतं. गाड्या भरून पोरं यायची. ‘हातात बाटली’ अन् ‘गाडीत म्युझिक’ यांची अभद्र युती व्हायची. निष्पाप कोवळी फुलं तुडवत धिंगाणा घातला जायचा. बाटल्यांच्या काचांचा खच पडायचा. हे ‘कास पठार की काच पठार?’ असा भीतिदायक प्रश्नही स्थानिकांसमोर उभा ठाकायचा. हे कमी घडलं की काय म्हणून उघड्या टपाच्या जीपगाड्या फुलांमध्ये आडव्या-तिडव्या फिरविण्याची नवी विकृतीही बोकाळली. टायरखाली चिरडलेल्या फुलांमधून स्वत:चं नाव उमटविणाऱ्यांची मस्ती भलतीच उफाळून आली.
या साऱ्याच प्रकारांचा अतिरेक झाल्यानंतर मात्र वनखातं खडबडून जागं झालं. त्यांनी कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्याच्या बाजूनं कैक किलोमीटर दूरपर्यंत सहा फुटी लोखंडी जाळी बसविली. त्यामुळे आतमध्ये बिनधास्तपणे घुसणाऱ्या गाड्यांना कच्ऽऽकन ब्रेक बसला. मात्र, यामुळे एक नवंच त्रांगडं निर्माण झालंय. उन्हाळ्यात स्थानिक जनावरांना या पठारावर चरणं मुश्कील झालंय. ‘जनावरांचं शरीर अन् शेण यांच्याद्वारे बीजांचा प्रसार झाला नाही तर भविष्यात फुलांच्या रोपांची पैदास कशी होणार?’ - असा नैसर्गिक प्रश्न पर्यावरणवाद्यांना पडलाय.
 
(लेखक ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीचे प्रमुख आहेत.)