- प्रगती जाधव-पाटील
सौभाग्याच्या अहिवपणाचं लेणं अंगाखांद्यावर मिरविणार्या महिला बँकेतील कर्जाच्या रांगेत ‘लंकेची पार्वती’ होऊन उभ्या राहिल्या की समजायचं जनावरांना चारा खरेदी करण्याची वेळ जवळ आली ! सातार्याच्या माण तालुक्यात हे चित्र वारंवार दिसून येतं.ज्या अभिमानाने दागिने अंगावर घालायचे तेवढय़ाच जिद्दीनं त्यावर कर्ज घेण्यासाठीही ते उतरवले जातात. हे चित्र साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये दिसायचं. मात्र, हे चित्र यंदा तीन-चार महिने आधी नोव्हेंबरमध्येच दिसलं आणि चाहूल लागली दुष्काळाची.पाण्याच्या अभावामुळे लहरी शेतीला सक्षम पर्याय म्हणून जिवापाड जपलेली जनावरे जगविण्यासाठी सर्वांची धडपड सुरू होती. स्थानिक शेतकरी कुटुंबांची ही अडचण लक्षात घेऊन म्हसवडच्या माणदेशी फाउण्डेशनने1 जानेवारीपासून चारा छावणी सुरू केली. या छावणीत दहा हजार जनावरे आणि त्यांच्याबरोबर शेतकरीही दुष्काळी दिवस पुढे ढकलत आहेत.गावाकडे शेती, विहीर; पण पाण्याअभावी पडून. मुंबईत रोजगार मिळतो; परंतु तेवढय़ाने भागत नाही. त्यातच शेती करायची म्हटलं की जनावरे असावीच लागतात. जमिनीच्या मशागतीसाठी बैलं आवश्यक तर दूध आणि खतासाठी गायी, म्हशी उपयोगी ठरतात. म्हणूनच जनावरेही सांभाळली जातात. पण, सध्या माणदेशात भीषण दुष्काळी स्थिती आहे. जनावरांना चारा-पाणी नाही. म्हसवड येथील चारा छावणीला चार महिने उलटून गेलेत. सातार्याबरोबरच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील जनावरंही म्हसवडच्या या छावणीत दाखल आहेत. पालं ठोकून राहणारे सुमारे साडेचार हजार लोकवस्तीचं एक मोठं गावच याठिकाणी वसलंय. घोटभर पाण्यासाठी आणि जनवारांच्या चार्यासाठी कोणत्याही तक्रारीविना चार महिन्यांपासून ते येथे गुण्यागोविंदाने राहाताहेत.महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळख असलेले, अतिपावसाचे महाबळेश्वर आणि पाचगणी तर कायम दुष्काळी असलेला माण तालुका ही परस्परविरोधी भौगोलिक परिस्थिती फक्त सातारा जिल्ह्यातच पहायला मिळते. माण तालुका हा या विचित्र परिस्थितीच्या कायम अग्रभागी राहिला आहे. याच तालुक्यातील महत्त्वाचे शहर मानल्या जाणार्या म्हसवडपासून काही किलोमीटर अंतरावर माणदेशी फाउण्डेशनमार्फत चारा छावणी चालविली जाते. चारा-पाण्याच्या तरतुदीसाठी तारण कर्जाचे वाढते प्रमाण लक्षात घेता माणदेशी फाउण्डेशनला यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा अंदाज गेल्यावर्षीच आला होता. त्यामुळे फाउण्डेशनने आधीच तयारी सुरू केली आणि जानेवारीच्या सुरुवातीस सिद्धनाथ मेगासिटीच्या 120 एकर क्षेत्राच्या विस्तीर्ण पटांगणावर चाराछावणी सुरू केली. माण (जि. सातारा), आटपाडी (जि. सांगली) व माळशिरस (जि. सोलापूर) या तीन तालुक्यांतील जनावरांची व्यवस्था या छावणीवर झाली आहे. कोणाची दोन, कोणाची चार तर कोणीची नऊ-दहा जनावरे या छावणीच्या दावणीला आहेत. या जनावरांची रोजची देखभाल करण्यासाठी कुटुंबातील एक-दोन लोक छावणीत राहतात. तरुणांबरोबरच काही ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुलांचेही प्रमाण याठिकाणी अधिक आहे. चारा छावणीत राहणार्या लहान मुलांसाठी याठिकाणी अंगणवाडी भरविली जाते. आयुष्याची अजून तोंडओळखही झाली नाही, तरीही त्यांना लहरी निसर्गाच्या परिणामांचा सामना करावा लागतोय.
या चारा छावणीत पहिले काही दिवस 700-800 जनावरं होती. नंतरच्या काळात टंचाईचे चटके वाढू लागले तसे परिसरातील माणसांनी जनावरांसह छावणीचा आसरा घेतला आणि बघता बघता जनावरांची संख्या जवळपास दहा हजारापर्यंत गेली. सुमारे 120 एकर क्षेत्रावर या चारा छावणीचा व्याप पसरला. रखरखत्या उन्हात विस्तीर्ण पसरलेल्या या छावणीचा दिवस भल्या पहाटे साडेपाचला उजाडतो. उठल्या उठल्या छावणीत स्वच्छता करून जनावरांना पाणी, चारा देण्यात येतो. दिवस उगवला की जनावरांच्या धारा काढण्याची लगबग सुरू होते. त्यानंतर घरून आलेला नास्ता खावून छावणीतील सदस्य चारा घेण्याच्या रांगेत जाऊन उभे राहतात. चारा आणून तो कापून जनावरांना देईपर्यंत सूर्य डोक्यावर येतो. त्यामुळे दुपारी 12.30 ते 4 फारशी कामे केली जात नाहीत. मात्र, छावणीतील पालाच्या सावलीत गप्पा जमतात. आपापल्या कथा आणि व्यथांची देवाणघेवाण तर इथे होतेच; पण जगण्याला नवी उमेद देण्याचं बळही याच गप्पांतून त्यांना मिळतं.दररोज सायंकाळी 5च्या सुमारास पाण्याचा टँकर आला की, पाणी भरून घेणं, पेंड उतरवून घेणं अशी कामं पुन्हा सुरू होतात. छावणीत सगळे स्वतंत्र राहात असले तरीही त्यांचा स्वयंपाक अनेकदा एकत्र केला जातो. एकत्र जेवल्यानंतर रात्री 10 पर्यंत छावणी झोपी जाते. दुसर्या दिवशी पुन्हा त्याच उत्साहाने सगळे कामासाठी सज्ज होतात. छावणीत महिला आणि पुरुषांच्या कामात फारसा फरक नाही. वजन उचलण्याची कामे सोडली तर प्रत्येक कामात येथे महिला-पुरुष समानता पहायला मिळते. छावणीत कोणतेही काम कोणाला सांगितलं जात नाही, तरीही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने येथे दिनक्रम चालतो. माणदेशी फाउण्डेशनतर्फे चालविण्यात येत असलेल्या या छावणीत आज जवळपास 10 हजार जनावरं आहेत. रोज जनावरांना व माणसांना साडेसहा लाख लिटर पाण्याची गरज आहे. म्हसवड व परिसरातील आठ विहिरी अधिग्रहित करून ही गरज भागवली जाते. आठ टँकर रोज प्रत्येकी पाच फेर्या मारतात. माणदेशी फाउण्डेशनतर्फे 2012 ते 2014 या तीन वर्षात चारा छावणी उघडली होती. त्यावेळी तब्बल 18 महिने छावणी चालवावी लागली आणि 16 हजार जनावरांना आधार मिळाला होता. यंदाही छावणीच्या या आधारावरच शेतकरी आपल्या भविष्याची आशा आणि डोळ्यांतली स्वप्नं जिवंत ठेवताहेत.
(लेखिका ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीत उपसंपादक आहेत.)
pragatipatil26@gmail.com