- पंडित उदय भवाळकर
ढाक्यामधील धनमंडी परिसरातील अबहानी मैदान. नजर जाईल तिथपर्यंत श्रोत्यांचा तुडुंब हलता-हेलावता समुद्र. जरा दूरवर मैदानाच्या डाव्या-उजव्या बाजूला जिभेचे चोचले पुरवणार्या तर्हेतर्हेच्या खाद्यपदार्थांच्या टपर्यांवर दिसणारी खवय्यांची अखंड चहलपहल आणि चमच्या-बश्यांची किणकिण. निरोपाच्या भैरवीचे सूर जसे रंगमंचावरून वातावरणात उतरू लागतात तशी एक खिन्नतेची एक लहर वातावरणावर पसरू लागते आणि निरोपाच्या क्षणी कोणीतरी म्हणतो, ‘आगामी काळ आमाको भालो लागे ना..!’- जगभरातील वाद्यांचे स्वर, गात्या गळ्यातून निघणार्या बंदिशी, मुश्कील ताना-पलटे आणि पायात बांधलेल्या शेकडो घुंगरांचा बेभान करणारा नाद हे जग उद्या या मैदानावरून अदृश्य होणार? असे म्हणत व्याकूळ होऊन घराकडे परतणारा ढाक्यामधील रसिक हा माझ्या मनातील नेहमीच एक कुतूहलाचा विषय आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासून बेंगॉल फाउंडेशनतर्फे ढाक्यात होणार्या बेंगाल क्लासिकल म्युझिक फेस्टिव्हलमध्ये आजवर भारतातील सगळ्या आघाडीच्या कलाकारांनी हजेरी लावली आहे. कागदाच्या नकाशावर भले आपल्या दोन देशांना एकमेकांपासून अलग करणारी एक रेघ ठसठशीतपणे डोळ्यांना दिसत असेल, पण जेव्हा विषय संगीत आणि संस्कृतीचा असतो तेव्हा पुण्यातल्या सवाई गंधर्व महोत्सवातल्या रसिकांचे संगीतप्रेम आणि ढाक्यातील अनुभव यांच्यामध्ये भेदभाव करणे अवघड आहे.मला आठवतेय, नव्वदीच्या दशकात माझे मोठे गुरुजी झिया मोइनुद्दीन डागर ह्यांच्या रुद्रवीणा वादनाने युरोपमधील रसिकांना चकित केले होते. एरव्ही सरावासाठी वापरले जाणारे ते वाद्य त्यांनी मैफलीत आणले आणि मैफलीत स्वीकारले जावे यासाठी त्यात काही बदलही केले. युरोपमधील रसिकांना केवळ वाद्यवादन आवडले नाही, तर ते जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आणि मग मैफलींपाठोपाठ सुरू झाला वर्कशॉपचा सिलसिला. भारतीय संगीत जाणून घेण्याच्या ओढीने कित्येक युरोपियन कलाकार त्यात सामील होत होते. रंगलेली मैफल अकस्मात मूक व्हावी तशी ही सारी गजबज गुरुजींच्या अकस्मात निधनामुळे निवली; पण काही काळापुरतीच. त्यानंतर माझ्या खांद्यावर ती जबाबदारी आली आणि हे शिक्षण देण्यासाठी मी कायमचे हॉलंडला राहावे असा आग्रह माझ्यामागे सुरू झाला.जगभरातील कलाकार आणि रसिकांनी पुन्हा-पुन्हा वळून पाहावे आणि अनिवार ओढीने भेटायला यावे असे काय आहे भारतीय अभिजात संगीतामध्ये? जन्मभर अनुनय केला तर मोठय़ा कष्टाने एखादा कृपाकटाक्ष वाट्याला यावा अशी ही बिकट, खडतर, चकवा देणारी वाट. तरी का येतात या वाटेवर कलाकार? स्वरांचे बोट हातात धरून, न थकता, सौंदर्याच्या नव्या वाटा धुंडाळत राहण्याचा तिच्यामध्ये असलेला खळाळता उत्साह त्यांना कोड्यात पाडत असेल? हातात कोणताही कागद न घेता रंगमंचावर येणारा कलाकार, जणू अवकाशामधून गळ्यात उतराव्या अशा स्वराकृती ऐकवतो; त्या ऐकताना त्यातील उत्स्फूर्तता त्यांना अनोखी वाटत असेल? का गुरु-शिष्याच्या नात्यातील ताणे-बाणे त्यांना जगावेगळे वाटत असतील? परदेशातून माझ्याकडे शिकायला येणार्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना मला जाणवलेली पहिली गोष्ट म्हणजे, या सगळ्या विद्यार्थ्यांना भारत हा जणू या ग्रहमालिकेतील एक वेगळा, नवा ग्रह वाटतो. एक सर्वस्वी वेगळे जग! इथले ऋतू आणि निसर्ग, प्राचीन संस्कृतीच्या पाऊलखुणा दाखवणार्या इथल्या रीतीभाती आणि जगण्याच्या पद्धती, आपली समाजव्यवस्था, कुटुंबातील परस्पर संबंध, आहाराच्या अनेक तर्हा आणि चवी अशा अनेक गोष्टींचे कुतूहल घेऊन हे कलाकार आणि रसिक येतात; या बहुरंगी संस्कृतीत रुजलेली भारतीय संगीताची मुळे शोधण्यासाठी. भेटीच्या पहिल्या टप्प्यावर ते भारत नावाच्या एका अवघड कोड्याला भिडून त्यातील परस्परांमध्ये गुंफलेले धागे बघण्याचा, जमल्यास जाणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. एकदा हे जरा परिचयाचे झाल्यावर पुढे प्रश्न असतात ते भारतीय कलांबद्दलचे. भारतीय कलाकार जे गातात ते राग संगीत आहे की त्यापेक्षा काही वेगळे? परंपरा या संगीतात किती महत्त्वाची आहे? परंपरा आणि बदलता काळ यांचे नाते काय आहे? गुरु-शिष्य नात्यात किती मोकळेपणा, स्वातंत्र्य असते आणि किती बंधनांची सक्ती? हे आणि असे वेगवेगळ्या पातळीवरचे कुतूहल घेऊन हे विद्यार्थी मग भारतीय संगीत शिकवणार्या गुरुचा शोध घेऊ लागतात. अर्थात सगळेच टिकतात असे मात्र नाही. कारण, एक तर भारतीय गाणे म्हणजे झटपट तयार होणारी इन्स्टंट कॉफी नाही. त्यात टिकून राहण्यासाठी आधी भारताची ओळख करून घ्यावी लागते. संगीताकडे हा देश कसा बघतो, त्याच्याकडे काय मागतो, त्यासाठी काय द्यायला तयार असतो हे समजून घ्यावे लागते. स्वीकारावे लागते. आणि दुसरी गोष्ट, हे संगीत खूप संयमाने वाट बघण्याची अवघड परीक्षा घेत असते; त्यासाठी मानसिक तयारी करावी लागते. जमिनीत लावलेल्या बीजाने निर्मळ, सशक्तपीक ओंजळीत टाकावे यासाठी आधी मातीची मशागत करावी लागते ती ही साधना आहे; न थकता, निरपेक्षपणे करायची. आणि माझा अनुभव असा, शिकण्याची इच्छा असलेले दोनशे विद्यार्थी माझ्या कार्यशाळेत आले तर पुढे त्यातील जे टिकतात ते अक्षरश: अनेकदा एका हाताच्या बोटांवर मोजावे इतके असतात; पण असतात. भारतीय संगीताबद्दल कुतूहल असलेले आणि ते शिकण्यासाठी आपला देश सोडून या मातीला आपलेसे करणारे परदेशी विद्यार्थी. इटालियन विद्यार्थिनी अँमिलीया कुनी, फ्रान्सचा इव्हान्त तृज्लर, हॉलंडची मारियान स्वाच्छेक हे असेच काही लक्षात राहिलेले विद्यार्थी. भारतीय संगीत फक्त भारतात शिकले-शिकवले जाते असे नक्कीच नाही. अमेरिका आणि युरोपमध्ये हे शिक्षण देणारे गुरु आणि त्यांच्या संस्था आहेतच; पण आपला शेजारी असलेल्या ढाक्यामध्ये सहा-सात वर्षांपूर्वी भारतीय संगीताचे शिक्षण देणारे गुरुकुल सुरू झाले आहे. तिथे होणार्या संगीत महोत्सवाला हजेरी लावणारे 30-40 हजार उत्सुक र्शोते हे अभिजात भारतीय संगीतावरचे प्रेम जसे व्यक्त करतात तसेच गुरुकुलात शिकणारे विद्याथीर्ही! अबुल खेर आणि लुवा ताहीर चौधरी या दोघांच्या प्रयत्नांमधून हे गुरुकुल उभे राहिले आणि माझ्याखेरीज पंडित उल्हास कशाळकर, सुरेश तळवलकर असे ज्येष्ठ गुरु इथे दर महिन्याला शिकवण्यासाठी जातात. आजही बांगलादेशात दुर्गापूजा आणि जन्माष्टमी साजरी होते. वसंतपंचमीला मैफली रंगतात. हे उत्सव आणि भारतीय संगीतावर प्रेम हा या देशांना जोडणारा स्नेहाचा बंध आहे; राजकीय वास्तव बाजूला ठेवीत कलाकार आणि सामान्य रसिक यांनी विणलेला. स्वत:चा देश आणि माणसे इथे रुजलेले स्वत:चे जगणे सोडून भारतीय संगीताच्या वाटा शोधत दूरवर येणार्या, एका नव्या देशाला आपले घर मानणार्या या वेड्यांचे अनुभव ऐकणे म्हणजे एका सर्वस्वी वेगळ्या चष्म्यातून आपल्या संगीताकडे बघण्यासारखे आहे. कसे दिसत असेल त्यांना ते संगीत..?
अर्बन व्हॉइसेस - फ्रान्समधला नि:शब्द करणारा अनुभवमला आजही आठवतो तो आठ-नऊ वर्षांपूर्वीचा फ्रान्समधील एक अनुभव. नेहमी होणार्या मैफली आणि गुरुकुलातील शिक्षण यापेक्षा अगदी वेगळा असा अनुभव. सगळे जग आज ज्या स्थलांतरितांच्या अवघड प्रश्नाला तोंड देते आहे अशा लोकांच्या मनातील जीवघेणे अस्थैर्य आणि वेदना यावर संगीत काही उपचार करू शकेल का? सतत अनाकलनीय वेगाने धावणार्या शहरी जिवांना संगीत चार शांत क्षण देऊ शकेल का, या विचाराने अर्बन व्हॉइसेस नावाचा उपक्रम चालवणार्या तरुणांपैकी मिशेल ग्वे आणि करीम आमोर या दोघांनी मला आणि मंजिरी असणारे-केळकर अशा दोन भारतीय कलाकारांना फ्रान्समधल्या नान्थ गावात संगीत शिकवण्यासाठी आमंत्रित केले होते. हे संगीत कोणाला शिकवायचे होते, तर त्या शहरातील जे कोणी शिकण्यास उत्सुक आहे अशा लोकांना. रोज संध्याकाळी नोकरी-व्यवसायावरून घरी परत आलेली पन्नास-शंभर माणसे एकेका वसाहतीत एकत्र यायची. या लोकांना ज्या बंदिशी आम्ही शिकवणार होतो त्या आधीच आमोरकडे पाठवून त्याचे नोटेशन तयार झालेले होते आणि त्यांची ओळखपण या लोकांना करून दिली गेली होती. मी आणि मंजिरी, आम्ही दोघांनी हे संस्कार अधिक दृढ आणि सुरेल केले. पाच आठवड्यांच्या या शिक्षणाची आणि सरावाची सांगता झाली ती नान्थ शहरातील सुमारे आठशे लोकांच्या सामूहिक मैफलीने. भारतीय अभिजात संगीताची तोंडओळख झालेल्या या आठशे रसिकांनी गावती रागाची बंदिश आणि त्यांच्यासाठी ‘टंग ट्ट्विस्टर’ ठरेल असा तोंडी रागातील तराना हातावर बोटांनी तालाच्या मात्रा मोजत समोर जमलेल्या काही हजार र्शोत्यांना मोठय़ा आत्मविश्वासाने ऐकवला. आमच्या आलापानंतर तेराव्या मात्रेवर येणारी समसुद्धा मोठय़ा सहजतेने उचलली.! भारतीय अभिजात संगीताचा असा सामूहिक आविष्कार आम्ही प्रथमच बघत, अनुभवत होतो. या अनुभवाने आम्ही केवळ चकित नाही, तर नि:शब्द झालो..
------------------मुलाखत, शब्दांकन : वंदना अत्रे vratre@gmail.com---------------ही लेखमाला दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होईल.