- अरविंद गोखले
घमेंड करूनी काय साधले
कशास त्यांचे वडिल काढले
अफझलखानाच्या मांडीवर
कसा आता बसणार?
उद्धवा, विसर तुझे सरकार . . .
सध्या व्हॉट्सअँपवर फिरणारे हे विडंबन काव्य बरेच मोठे आहे. अशा किती तरी काव्यांना, चित्रांना आणि व्यंग्यचित्रांना व्हॉट्सअँपवर बहर आलेला पाहायला मिळतो आहे. मला त्याविषयी फारसे काही लिहायचे नाही; पण जनतेच्या मनात काय प्रचंड खळबळ आहे, राग आहे ते त्यातून स्पष्ट होते. ‘उद्धवा, विसर तुझे सरकार’ हे काव्य लिहिणारा कोण आहे ते कळणे अशक्य. तोही बिचारा ठोकशाहीला घाबरत असणार. व्हॉट्सअँप ही अशा कलावंतांची ढाल आहे. त्यामुळे त्याचा कवी कोण आणि त्याला आणा रे पकडून, अशा दमबाजीला भीक न घालणारे निनावी वीर आता उदंड झाले आहेत. भीड चेपलेली आहे आणि तोच आताच्या लोकशाहीचा आधार ठरतो आहे. ते योग्य की अयोग्य आणि अशाने एखाद्याची बदनामी होते किंवा काय, याविषयी फिकीर करण्याची त्यांना गरज वाटत नाही. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला पाठिंबा भारतीय जनता पक्षाला दिला त्यानंतर काही क्षणांतच पवारांचे एक चित्र व्हॉट्सअँपवर आले. त्यात पवार हे संघाच्या चड्डीत आहेत आणि डोक्यावर काळी टोपी व हातात सुरा, असा त्यांचा अवतार दाखविला गेला आहे. हे चित्र जर खरेच एखाद्या मराठी माणसाने काढले असते, तर त्याचे काही खरे नव्हते. सांगायचे कारण, आजची लोकशाही ही भीतीने ग्रस्त आणि म्हणूनच काळवंडलेली आहे.
महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने १२२ जागा जिंकल्या आणि नव्याने एक प्रश्न निर्माण करून ठेवला. या जागा १४५ ते १५0च्या घरात असत्या, तर त्या पक्षाला अगदी सहजगत्या महाराष्ट्रात सरकार बनवता आले असते. तसे झाले नाही, याला कारण शिवसेनेच्या नेत्यांचा आडमुठेपणाच आहे. ‘तुम्ही भारतीय जनता पक्षाला चांगले अडवून धरा आणि मग पाहा तो पक्ष कसा तुमच्यापुढे कुर्निसात करीत उभा राहतो ते,’ असे उद्धव ठाकरे यांच्या मनात भरवण्यात आले होते आणि त्यांना या कामी त्यांचे जवळचे सहकारी सल्लागार उपयोगी पडले असण्याची शक्यता आहे. शिवसेनेत हे जे कुणी सल्लागार आहेत, त्यांचे आणि पवारांचे संबंध हे वादातीत चांगले आहेत. त्यामुळे पवारांवर टीका होताच आपल्या छातीचा कोट करून त्यांनी पवारांचे संरक्षण करण्याचा पवित्रा घेतला आणि भारतीय जनता पक्षाकडून एवढी हीन दर्जाची टीका होत असताना पवार भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देतीलच कसे, असे जाहीर केले. पवारांपेक्षाही पवारनिष्ठ असल्याचा हा प्रकार दुर्मिळच; पण महाराष्ट्रात अशा दुर्मिळांची संख्या पैशाला पासरीभर आहे.
प्रश्न तो नाही. एखादा राजकीय पक्ष आणि त्याचा नेता आपल्या दावणीला कसा बांधता येऊ शकतो ते पवारांनी यापूर्वीही अनेकदा आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे. तसेच ते आताही. सांगायचा मुद्दाही तो नाही. हे सगळे घडणारच होते, हे इंग्लंडमध्ये असलेल्या एका माझ्या मित्राने जूनमध्येच भाकीत केले. मी त्या वेळी सांगलीत होतो. मला त्या व्यक्तीने लंडनहून फोन केला आणि विचारले, की ‘तुम्ही आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही संपर्क होऊ शकतो का?’ मी म्हटले, की प्रयत्न करून पाहतो. माझा ठाकरे यांच्याशी कधी संपर्क झालेला नाही. त्यांच्या जवळच्या काही व्यक्ती मला माहिती आहेत एवढेच. मी त्यातल्याच एका व्यक्तीला आधी एसएमएस करून प्रश्न विचारला, की त्याला वेळ आहे काय? या व्यक्तीने त्यावर काहीच उत्तर दिले नाही. तेही बरोबरच आहे. तिच्या दृष्टीने मी एक क्षुल्लक व्यक्तिमत्त्व असलो पाहिजे. तरीही मी धीर सोडला नाही. एक दिवस मी तरीही त्या व्यक्तीला दूरध्वनी करायचा प्रयत्न केला. त्याने तो उचललाच नाही. मग मात्र मी हे प्रयत्न थांबविले. लंडनच्या माझ्या मित्राने मला शिवसेनेसाठी द्यायच्या निरोपाची माहिती दिली होती. तो काय होता ते सांगितले, तर मला टाळणार्या त्या व्यक्तीचेही डोळे उघडतील, अशी शक्यता आहे. त्याने मला असे सांगितले, की सध्या शिवसेना भारतीय जनता पक्षापासून दूर व्हायचा प्रयत्न करते आहे. जर असे खरोखरच घडले, तर शिवसेनेच्या दृष्टीने ती आत्महत्या ठरेल, असे उद्धव यांना सांगायची आवश्यकता आहे. तुम्हाला जर महाराष्ट्रात सरकार स्थापन करायचे असेल, तर भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही.
लंडनच्या त्या व्यक्तीने मला काय सांगितले आणि तिचा होरा काय होता ते सांगत बसत नाही; पण शिवसेना वेगळी लढली तर काय होईल, हे त्याने जे सांगितले, ते तसेच तंतोतंत घडल्याचे गेल्या आठवड्यात आपण पाहिलेले आहे. शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला निशाणा साधायची किमया कदाचित त्या व्यक्तीच्या परिचयाची असण्याची शक्यता आहे. शिवसेनेला पवारांनीच भरीला घातल्याचे बोलले जात आहे. आता तेच पवार शिवसेनेला बाजूला ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाला सरकार बनवायला आपला म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचे सांगून मोकळे झालेले आहेत. त्यामागचे तर्कशास्त्र काय, तर महाराष्ट्रात जर प्रगतिशील आणि स्थिर सरकार हवे असेल, तर सध्या तरी भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही. विशेष हे, की त्यांना निवडणूक काळात हे कळालेले नव्हते. उलट, त्यांनी मतदारांना उद्देशून ‘तुम्ही राज्य कोणाच्या हाती देणार, गडकरींच्या की फडणवीसांच्या?’ असा प्रश्न केला होता, ज्याला मतदारांनी चांगलीच चपराक लगावली आहे. त्याच पक्षाला आता पाठिंबा द्यायची त्यांची ही चाल लांडग्याची आहे असे म्हटले, तर मग भारतीय जनता पक्षाची हुरळलेली मेंढी त्याच्यामागे काही काळ तरी धावत सुटली, असे म्हणायला हवे. मला हेच कळले नाही, की ज्या पवारांच्या पक्षाला भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत जाऊन आवाज दिला, की बारामतीकरांना आता पवार कुटुंबीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याची आवश्यकता आहे, त्याच पवार कुटुंबीयांच्या गुलामगिरीत राहण्यात भारतीय जनता पक्षाला समाधान वाटणार आहे किंवा काय? तसे असेल तर त्यांनी तसे स्पष्ट शब्दांत सांगायला काय हरकत आहे? म्हणजे मतदारांनाही भविष्यात त्यांच्या पक्षाचे करायचे काय ते ठरवता येईल.
पवारांना कदाचित कल्पना आहे किंवा नाही मला माहीत नाही; पण सध्या महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वावरच प्रचंड राग आहे. ते जे बोलतात त्याबद्दल जनतेचे काय मत आहे, याचा त्यांनी कानोसा घेतलेला बरा. त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला पाठिंबा द्यायच्या घोषणेनंतर लगेचच अनेकांनी जे तर्क लढवले आणि त्यावर जे भाष्य केले गेले, त्यामध्ये प्रामुख्याने पवारांना आता आपल्या पुतण्याला वाचवायचे असायची शक्यता आहे, असे सांगण्यात येत होते. आपली संपत्ती, मालमत्ता यांच्याकडे सीबीआयची तसेच प्राप्तीकर खात्याची नजर जाऊ नये यासाठीची ही खेळी आहे, असा काहींनी त्यांच्यावर थेट आरोप केला. तर, काहींनी राष्ट्रवादीने भारतीय जनता पक्षाकडे केलेला हा दयेचा अर्ज आहे, असे स्वच्छ शब्दांत सांगून टाकले. ते खरे असेल वा खोटे; पण त्याने हा प्रश्न सुटत नाही. अनेकांनी मग पवारांना आता केंद्रात स्थान नक्की मिळणार, असे अगदी पैजेवर सांगायला सुरुवात केली. नाही तरी केंद्र सरकारकडे सध्या संरक्षणमंत्रिपदावर पूर्णवेळ मंत्री नाहीच; त्यामुळे मोदी आणि पवार यांच्यातल्या चर्चेचा हवाला देऊन अनेकांनी त्यांना ते संरक्षणमंत्रिपद देऊ करण्यात आल्याचे अगदी शपथपूर्वक सांगितले. मोदी हे सध्याच्या स्थितीत पवारांशी बोलतील, अशी शक्यता नाही. तसे ते नेहमीच बोलत असले पाहिजेत किंवा त्यांचा सल्ला घेत असले पाहिजेत, असे पवारांच्या अगदी जवळच्या सहकार्यांना नेहमीच वाटत असते आणि जो सत्तेवर असतो, त्याच्या ते किती जवळचे आहेत, हे त्यांच्याकडून रसभरीतपणे ऐकवले जातही असते. आता पवार जेव्हा सत्तेवर असतात, तेव्हा ते जवळपास पंतप्रधानच असतात, हेही पुन्हा त्यांच्याच शब्दांत ऐकण्यात मजा असते.
म्हणूनच पवारांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावरचा प्रकाशझोत आपल्याकडे वळवून काँग्रेस पक्षाने शिवसेनेला सत्तेवर बसवायचा घाट कसा घातला होता आणि आपल्याला राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर येणारे ते संभाव्य सरकार कसे तकलादू वाटते ते सांगून टाकले. पडलो तरी आपले नाक वरच असते ते दाखवायची त्यांची किमया खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. सांगायचा मुद्दा, त्यांच्या त्या डावात ते स्वत:च फसले. काँग्रेस पक्षाने लगेचच हे सगळे थोतांड असल्याचे सांगून पवारांना खोटे ठरवले. खोटे बोला; पण रेटून बोला, हे त्यांच्याच शब्दातले सत्य मग उघड झाले. आता पवार कोणता नवा डाव टाकतात तेच पाहायचे. पवारांनी अर्थातच आपल्या पाठिंब्याचे परिणाम काय होतील ते पाहिले असावेत, असे वाटत नाही. त्यांच्या पक्षाला सत्तेबाहेर राहायची सवय नाहीच. स्वाभाविकच बाहेरून पाठिंबा म्हणजे सत्तेबाहेर ताटकळत राहायचे आणि सत्तेवर असलेल्यांच्या सतरंज्या उचलायच्या, हे खानदानी असलेल्या त्यांच्या पक्षकार्यकर्त्यांना न रुचणारे कार्य ते त्यांना करायला सांगणार होते. त्यातून पवारांचा पक्षच फुटायची शक्यता होती, हे त्यांनी लक्षात घेतल्याचे दिसत नाही. आताही ते भवितव्य असेल, तर ते चुकणार थोडेच आहे? पवार तर त्यात अधिक वाकबगार आहेत. म्हणूनच त्यांनी नितीन गडकरी यांच्यासाठी आपले मोहरे पणाला लावल्याची चर्चा आहे. काय नक्की होते ते पाहायला आता एक-दोन दिवसच थांबावे लागेल, अशी शक्यता आहे. गडकरी यांच्यासाठी नवनिर्वाचित ३९ सदस्यांनी आपला पाठिंबा जाहीर करून मोदींना जे आवडणार नाही, तेच करून दाखवले आहे. त्यांनी विनाकारण गडकरींना बळी द्यायचा हा घाट का घातला ते मात्र आकलनाच्या बाहेरचे आहे. गडकरींनी आपल्याला नको असताना दिल्लीला जावे लागल्याचा कढ काढला. तो तर अधिक ढोंगीपणाचा आहे. मोदी स्वत:च्या मतक्षेत्राच्या बाहेर जात नाहीत आणि त्यासाठी ते कुणाचीही पर्वा करीत नाहीत, हेही सिद्ध झाले आहे. गडकरींनी या आपल्या सर्मथकांना रोखायची म्हणूनच आवश्यकता होती.
भारतीय जनता पक्षाने नेहमीच काँग्रेस संस्कृती म्हणून जिचा उद्धार केला आहे, तिचेच प्रदर्शन आता त्या पक्षाच्या सर्मथकांनी, निवडून आलेल्या मंडळींनी केले आहे. ते घातक आहे आणि ते त्यांच्याच पक्षाच्या मुळावर येणारे आहे, हे तितकेच खरे. शिवसेनेने भारतीय जनता पक्षाबरोबर जर समझोता करून या निवडणुका लढवल्या असत्या, तर त्या दोन्ही पक्षांना मिळून कदाचित २५४ जागाही मिळाल्या असत्या; पण दैव देते ते त्यांचे कर्म नेते म्हणतात ते काही खोटे नाही. एका लोकसभा
मतदारसंघात विधानसभेचे ६ मतदारसंघ धरून जर हा अंदाज काढला, तर ४२ लोकसभेच्या जागांमध्ये येणार्या विधानसभा मतदारसंघांत हा एवढा खणखणीत विजय मिळणे अवघड नव्हते. पण, तिथेही मुख्यमंत्रिपदापेक्षा कमी काहीही नाही, हा त्यांचा दुराग्रह नडला आणि तोच आताही त्यांना ग्रासतो आहे.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)