- जगदीश कोष्टी
आयुष्यभर काबाडकष्ट उपसलेल्या असंख्य सातारकरांचा शेवटचा प्रवासही सुखाचा नसायचा... कृष्णा नदी किनारी हगणदारीत अंत्यसंस्कार करावे लागत. अग्नी देऊन नातेवाईक निघून गेले की, कुत्री नदीत डुबकी मारून चितेला धडका देऊन प्रेताचे लचके तोडत. मृतदेहांची चाललेली अवहेलना न पाहावल्याने ‘त्या’ तरुणांचे काळीज पिळवटून निघालं. .. अन् सुरू झाला कैलास स्मशानभूमी उभारण्याचा प्रवास. साताºयातील कैलास स्मशानभूमी आज ‘हायटेक’ समजली जाते. सीसीटीव्ही कॅमेºयांमुळे परदेशातील नातेवाईकही अंत्यसंस्कार कार्यात ‘आॅनलाईन’ सहभागी होऊ शकतात.मरण हे अंतिम सत्य असल्याचे साºयांनाच मान्य असले तरी समाजाच्यादृष्टीने ही अतिशय दुर्लक्षित बाब. स्मशानभूमीत कोणी फिरकतही नाही; पण साताºयातील कैलास स्मशानभूमी याला अपवाद आहे. संत तुकारामांची मूर्ती असलेल्या कमानीतून आत गेल्यानंतर सर्वांत प्रथम कैलासपती शंकराचे ध्यानावस्थेतील भल्या मोठ्या मूर्तीचे दर्शन घडते. पुढे गेले तर एका रांगेत अग्निकुंड दिसतात. अनेक ठिकाणी चिता जळत असते. येथील स्वच्छता पाहिल्यानंतर आपण स्मशानभूमीत आलो आहोत की एखाद्या मंदिरात हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. साताºयातील कृष्णा-वेण्णाच्या संगमावरील कैलास स्मशानभूमी आदर्श मानली जात असली तरी तिच्या निर्मितीची कहाणी फारच रंजक आहे.
बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे हे १९९९ मध्ये नातेवाइकांतील व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गेले होते.तेथील दृश्य पाहून त्यांना अत्यंत वाईट वाटले. जळत असलेल्या चितेला काही कुत्रे धडका मारत होते. पुन्हा नदीत जाऊन भिजून येत अन् पुन्हा धडका मारत. त्यानंतर मृतदेहाचे लचके तोडत असत. त्यामुळे त्यांनी साताºयात चांगली स्मशानभूमी उभारण्याचा निर्धार केला. चोरगे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी डिकीकर यांची भेट घेऊन त्यांना तेथील स्थिती सांगितली. काही रक्कम भरल्यास शासकीय जागा स्मशानभूमीसाठी देण्याची ग्वाही जिल्हाधिकारी डिकीकर यांनी दिली. बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रक्कम भरल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांमध्ये पंधरा गुंठे जागा त्यांनी दिली. जागेचा प्रश्न मिटला; पण आर्थिक मेळ बसविणे फारच अवघड होते. आर्केटेक्चर सुधीर शिंदे यांच्याकडून अंदाजपत्रक तयार केले. या कामासाठी अंदाजे साठ लाख रुपये खर्च सांगण्यात आला.
ही जागा कृष्णा अन् वेण्णाच्या संगमावर असल्याने येथे मोठा पूर येतो. त्यामुळे स्मशानभूमीला धक्का पोहोचू नये म्हणून जमिनीत पाईप फाऊंडेशन करण्याचा सल्ला देण्यात आला. तीस फूट खोल १७४ पाईप गाडले. खर्चाचा अंदाज चुकला. खर्च वाढत गेला. देणगी गोळा करून पैसा उभारण्याचा विचार आला. घरोघरी जाऊन देणगी मागितली जाऊ लागली. पण, स्मशानभूमीसाठी मदत हवी म्हटल्यावर लोक गेटच्या बाहेर उभे करत. दरम्यान, २००२ मध्ये तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी कामाच्या ठिकाणी भेट देऊन ‘२५ टक्के काम करून दाखवा. पुढील मदत स्वत: मिळवून देतो,’ अशी ग्वाही दिली. निधी उभारण्यासाठी भाग्यवान सोडत योजना आणण्याचा विचार पुढे आला.
या योजनेला मंत्रालयातून परवानगी मिळवून देण्यात माजी आमदार मदन भोसले, सुनील काटकर, जिल्हा परिषदेतील पदाधिकाºयांनी मदत केली; पण काहींनी अपप्रचार सुरू केल्याने अपेक्षित तिकिटांची विक्री झाली नाही. त्यामुळे हा प्रयत्नही फार यशस्वी झाला नाही.स्मशानभूमी उभारण्यातील अडथळ्यांची मालिका संपण्याचे नावच घेत नव्हती. काम सुरू असतानाच काही मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत. तेव्हा कामगार घाबरून निघून जात. तेव्हा राजेंद्र चोरगे स्वत: तेथे थांबत. या काळात अनेक तक्रारी झाल्या. त्यातून बालाजी चॅरिटेबल ट्रस्टची सहा ते सातवेळा चौकशी झाली; पण काहीही करून साताºयात भव्य स्मशानभूमी उभारण्याचा चोरगे यांनी मनात चेतवलेली ऊर्मी कमी होऊ दिली नाही. या अडथळ्यांच्या शर्यतीवर मात करीत २००३ मध्ये स्मशानभूमीचे काम पूर्ण झाले.शेणीच्या वापराने २५ हजार झाडे वाचलीकैलास स्मशानभूमीत सुरुवातीस अंत्यसंस्कार करताना लाकडे, टायरचा वापर केला जात होता. कालांतराने पर्यावरण रक्षणासाठी लाकडांचा वापर थांबविण्याचा निर्णय घेतला. यासाठी पर्याय म्हणून शेणी (गोवरी)चा वापर सुरू केला. ठोसेघर परिसरातील बचत गटाला शेणी बनविण्यास सांगितले. यातून १३० महिलांना रोजगार मिळाला. यामुळे बारा वर्षांत सुमारे पंचवीस हजार झाडांची कत्तल वाचल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दररोज तीन हजार लोकांची भेटकृष्णा-वेण्णा नदीच्या संगमाला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. याठिकाणी खेड, माहुली, शाहूपुरी, गोडोली, कोडोली, धनगरवाडी, विलासपूर, देगाव, खिंडवाडी, तसेच त्रिशंकू भागातील लोक येथे अंत्यसंस्कार करू लागले आहेत. तसेच इतर विधीही होत असल्याने दररोज सुमारे तीन हजार लोक येत असतात.
बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्काराचा खर्च संस्थेकडूनया ठिकाणी सप्टेंबर २०१८ पर्यंत १८ हजार ३७३ अंत्यसंस्कार झाले आहेत. शेणीचा खर्च सोडला तर एक रुपयाही घेतला जात नाही. तसेच बेवारस मृतदेह आले तर अंत्यसंस्कारासाठी लागणाºया शेणीचाही खर्च ट्रस्ट उचलते.या आहेत सुविधा१४ अग्निकुंड४ मोठे सभागृह६ सीसीटीव्ही कॅमेरे२ पाण्याच्या टाक्या२ महिला, पुुरुषांसाठी स्वच्छतागृहे१ अस्तिकुंड८ कर्मचारी स्वच्छतेसाठीध्वनिक्षेपक यंत्रणा, साऊंड सिस्टीम
मरण डोळ्यासमोर ठेवून जगलं तर हातून चांगलंच काम घडतं, असं मी मानतो. स्मशानभूमी उभारण्यास मी निमित्त होतो. दररोज सकाळी किमान एक तास स्मशानभूमीत जाऊन पाहणी करतो.- राजेंद्र चोरगे, अध्यक्ष, बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट, सातारा