- हृषीकेश खेडकर
स्वत:च्या हातून काही बनवण्याचं समाधान औरच. हा अनुभव अगदी लहान असल्यापासून आपण घेतो आहोत. या सुंदर जगात जगताना आपण पाहिलेली, अनुभवलेली दुनिया सुप्तपणे मनाच्या एखाद्या कोपर्यात घर करून असते; काही बनवण्याची संधी मिळताच उपलब्ध साहित्यातून मनातल्या त्या दुनियेचं रूप हातातून प्रत्यक्षात उतरू लागतं. गादीवर उशा रचून बनवलेलं घर, दिवाळीत चिकणमाती आणि दगडातून बनवलेला किल्ला किंवा दिवाणखान्यात असंख्य ठोकळ्यांच्या पसार्यातून बनवलेला मनोरा; खेळता खेळता रचायचं आणि रचता रचता शिकायचं!आठवतंय ना हे सगळं? दगड, लाकडाचे तुकडे, फळांच्या बिया अशा नैसर्गिक गोष्टीचा वापर करून ते विशिष्ट प्रकारे रचण्याचे खेळ प्राचीन काळापासून आपल्याला अवगत आहेत. लिंगोरचा हे त्याचेच एक उदाहरण. साधारण 5000 वर्षांपूर्वी लिहिलेल्या भागवत पुराणात या खेळाचा उल्लेख आढळतो. एकावर एक गोष्टी रचत असताना गोष्टीचा आकार, वजन, समतोलपणा अशा अनेक भौतिक संकल्पनांचा विचार बालमनात नकळत सुरू होतो आणि मेंदूला विचारांची एक वेगळीच चालना मिळायला लागते.हीच गोष्ट हेरत घनाकृती ठोकळे बनवून त्याचा मनोरंजनात्मक शिक्षणासाठी उपयोग करण्याचा उल्लेख सर्वप्रथम 1594 साली ब्रिटिश लेखक आणि संशोधक हुग प्लाट याने लिहिलेल्या ‘द ज्वेल हाउस ऑफ आर्ट अँण्ड नेचर’ या पुस्तकात सापडतो.लाकडाच्या ठोकळ्यावर कोरलेली इंग्रजीतील मुळाक्षरे, खेळता खेळता मुलांच्या ओळखीची बनतील अशी कल्पना हुग या पुस्तकात मांडतो. आधुनिक शिक्षणाचा जनक समजल्या जाणार्या र्जमन अध्यापक फ्रेड्रिक फ्रोबेलने 1837 साली सर्वप्रथम शैक्षणिक खेळणी बनवायला सुरुवात केली. आज सगळ्यांच्या परिचयाची असणारी ‘किंडरगार्टेन’ ही फ्रेड्रिकची संकल्पना. लहान मुलांच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजा आणि क्षमता यांचा विचार करून ‘फ्रोबेल गिफ्ट’ नावाचा एक अतिशय भन्नाट असा लाकडाच्या ठोकळ्यातून बनवलेला संच जन्माला आला.गणित, भूमिती आणि विज्ञान या विषयांचे प्राथमिक ज्ञान देण्याच्या हेतूने बनवलेला हा संच आजही शैक्षणिक खेळण्यांच्या दुनियेतला मापदंड मानाला जातो. मऊ सुतापासून बनवलेले सहा वेगवेगळ्या रंगांचे चेंडू, लाकडातील एक घनाकृती ठोकळा आणि एक लाकडी चेंडू असलेला हा संच. लहान मुलांची जिज्ञासू वृत्ती आणि जोडीला प्रौढ माणसाचे मार्गदर्शन यांचा मिलाफ साधत या संचाच्या माध्यमातून मांडलेल्या खेळाचा परिपाक गजबच म्हटला पाहिजे.
औद्योगिकीकरणाची सुरुवात झाल्यावर ठोकळ्याच्या या दुनियेला नवीन आयाम मिळाले. वेगवेगळी साधने वापरून यंत्रांच्या साहाय्याने खेळणी बनवली जाऊ लागली. आधुनिक शिक्षणाचं महत्त्व जसं वाढत गेलं तसं शिक्षण देणारी साधनेदेखील विकसित होऊ लागली. आजही कधी वर्कशॉप किंवा गॅरेजमध्ये चक्कर मारली की आठवतो तो काळ, जेव्हा रंगीबेरंगी प्लॅस्टिकच्या पान्ह्यांनी आपण नट-बोल्ट फिट करायचो. जेव्हा स्वत:च्या हाताने जेवायलाही शिकलो नव्हतो तेव्हा एखादा पूल किंवा इमारत बांधण्याची स्वप्नं ‘मेकॅनो’ खेळाने दाखवली. 1901 साली फ्रॅँक हॉर्नबी नामक ब्रिटिश संशोधक आणि व्यावसायिकाने ‘मेकॅनिक्स मेड ईझी’ नावाचे यांत्रिकी संकल्पनेवर आधारित खेळणे बाजारात आणले. छिद्रित धातूच्या पट्टय़ा, प्लेट, गर्डर, पुली, गेयर, चाके, नट-बोल्ट आणि पान्हा अशा अफलातून गोष्टींना मुलांच्या रचनात्मक विचारांची जोड मिळून जादूचे मनोरे बनवण्याचा खेळ म्हणजे आपल्या बालपणीचा साक्षीदार ‘मेकॅनो’. 1919 साली र्जमनीमध्ये ‘बहोस’ नावाच्या; डिझाइनचे शिक्षण देणार्या पहिल्या संस्थेची स्थापना झाली. 1923 साली या संस्थेत शिकत असलेल्या अल्मा सेडॉफ नावाच्या विद्यार्थिनीच्या मनात एक भन्नाट कल्पना आली. लहानपणापासूनच मुलांना डिझाइनचे धडे देण्यासाठी अल्माने तीन प्राथमिक रंगात वेगवेगळे आकार आणि मापे असणारे लाकडाचे 22 ठोकळे असलेला एक संच तयार केला. या ठोकळ्यांच्या एकमेकांशी असणार्या प्रमाणित नात्यांमधून होडी, घर, पूल असे शेकडो लहान-मोठे आकार मुले तयार करू शकत. सुसंवादी ठोकळ्यांच्या या संचाने लहान मुलेच काय तर सगळ्यांसाठीच आकार आणि रंगाची एक वेगळी दुनिया प्रत्यक्षात आणली.दुसर्या महायुद्धानंतर ठोकळ्यांची खेळणी बनवण्यात आमूलाग्र बदल जाणवू लागला. मानसशास्रज्ञ मुलांच्या जगाकडे प्रौढांच्या नाही तर मुलांच्याच नजरेतून बघू लागले. मुलांच्या नैसर्गिक आणि सर्जनशील क्षमता उलगडण्याच्या हेतूने खेळणी बनवली जाऊ लागली. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ठोकळ्यांच्या खेळातला जगप्रसिद्ध शिरोमणी ‘लेगो’.1950 साली डेन्मार्क स्थित खेळणी उत्पादक गॉडफ्रेण्ड ख्रिस्तियनसेन याने ‘लेगो’ नावाची एक संपूर्ण खेळण्यांची प्रणाली तयार केली. या प्रणालीचा मूलभूत भाग म्हणजे एक विशिष्ट प्रमाण लक्षात घेऊन बनवलेली ‘लेगो ब्रिक’ म्हणजेच लेगोची वीट.5:6 प्रमाण असलेला या रंगीबेरंगी प्लॅस्टिकच्या घनाकृती ठोकळ्याने मुलांच्या सर्जनशील आणि जिज्ञासू वृत्तीला मनोरंजनाच्या माध्यमातून एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवले. एकमेकांमध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने लॉक करण्याची क्षमता असणारे वेगवेगळ्या मापांचे हे ठोकळे, वस्तू बनवण्याच्या अपरिमित शक्यता दर्शवतात. कारपासून ते इमारतीपर्यंत आणि फुलापासून ते विमानापर्यंत मनात येईल ते बनवण्याची शक्यता या प्रणालीत दिसून येते. ज्यांनी कुणी लेगो खेळ खेळला असेल ते माझ्या मताशी नक्कीच सहमत होतील, की एकदा का लेगो ब्रिकशी मैत्री झाली की पुढे कायम या मैत्रीचे आकर्षण टिकून राहते.वाढत्या वयाबरोबर खेळणार्याचं लेगोशी नातं अजून घट्ट होत जातं आणि लेगोची निर्जीव ब्रिक आपल्याशी संवाद साधू लागते. ठोकळ्यांच्या खेळण्यांची ही दुनिया मला कायम मजेशीर वाटत आली आहे.खेळता खेळता आपण ती रचतो, खेळून झालं की मोडून पुन्हा आवरून ठेवतो. म्हणजे पुन्हा एकदा रचायला तयार! मला वाटतं, खर्या दुनियेत; पण असे ठोकळे सापडले तर जगायला काय मजा येईल नाही !
hrishikhedkar@gmail.com(लेखक वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)