- स्नेहल जोशी
गेले काही दिवस या लेखमालेत आपण लहानपणीच्या खेळांमध्ये रमलो आहोत. बाहुल्या, भातुकली, गाड्या, यातून रंगलेले पिटुकले संसार आणि माती, ठोकळे, लेगो वापरून बांधलेले जादुई मनोरे आपल्याला बालपणीच्या रम्य आठवणीत घेऊन गेले. वय वाढतं तशी खेळाची साधनं बदलतात; पण खेळ खेळण्याची मजा तशीच टिकून राहते. आता जरा आठवून पहा, आपण लहानपणापासून अगदी आत्तापर्यंत खेळत आलो असे कुठले खेळ आहेत का? 3-4 जण मिळून खेळताना धमाल येतेच; पण एकट्यानं खेळतानाही मनोरंजन होतं, असा खेळ. या खेळाला कोणतीच वयोर्मयादा नाही. उन्हाळ्याची सुट्टी यांच्याशिवाय पूर्ण होत नाही आणि कित्येकांकडे दिवाळीत हे खेळण्याची मोठीच प्रथा आहे.हा खेळ म्हणजे पत्ते!माझी आजी दुपारी विरंगुळा म्हणून पत्त्यांचा डाव लावायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळी भावंडं जमली की मग आजीबरोबर पत्त्यांचे खेळ खेळायला सगळे उत्सुक असायचे. दुपारी तासंतास हे खेळ रंगायचे. ‘लिंबू-टिंबू’ भावंडांसोबत ‘भिकार-सावकार’पासून सुरुवात होऊन मग पुढे ‘बदाम सात’, पाच-तीन-दोन, गुलाम चोर, झब्बू, चॅलेंज, लॅडीस, कॅनेस्टा, रम्मी. अशी पत्त्यांशी दोस्ती वाढत जायची. किती गम्मत आहे बघा, अनंत प्रकारचे खेळ निर्माण करण्याची क्षमता ह्या 52 पत्त्यात आहे. भिकार-सावकार किंवा पेशन्ससारखे डाव पूर्णत: नशिबाच्या शक्यतांवर आधारित आहेत. अगदी माफक नियम आणि हार-जीत आपल्या वाट्याला आलेल्या पत्त्यांवर अवलंबून आहे. बदाम सात किंवा झब्बू असे खेळ पाहिले तर लक्षात येईल की डाव हातात आलेल्या पत्त्यांवर अवलंबून असला तरीही त्यात काही भाग हा तुम्ही ठरवलेल्या रणनीतीवरही अवलंबून असतो. कोणते पत्ते सोडायचे, कोणते अडवायचे, ते अडवल्यामुळे निर्माण होणारा तणाव यातून खेळ रंगात येतो. तेव्हा नशिबाच्या बरोबरीनं बुद्धीचा जोर लावणं आवश्यक आहे.
पाच-तीन-दोनसारख्या खेळांमध्ये तर फक्त 28 पत्ते वापरले जातात. त्यात काही पत्ते पाहून हुकूम ठरवण्याची स्वायत्तता एका सवंगड्याला मिळते. लॅडीस, मेंढीकोट सारखे खेळ जोडीनं खेळण्याचे आहेत. तेव्हा नशिबाचा भाग तर आहेच; पण त्याबरोबर काहीही न बोलता आपल्या जोडीदाराची नीती समजून त्याला साथ करणं महत्त्वाचं आहे. खेळातली ही भागीदारी एक वेगळीच मजा देऊन जाते.रम्मी तर आपल्याकडे सर्वात लोकप्रिय डाव आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पैसे लावून रम्मी खेळण्याला बर्याच कुटुंबांमध्ये शुभ मानलं जातं. त्यामागे पौराणिक आख्ख्यायिकादेखील सांगितल्या जातात. या सगळ्या करमणुकीच्या खेळांपासून वेगळा आणि बुद्धिमत्तेचा कस ठरवणारा पत्त्यांचा सर्वात कठीण डाव म्हणजे ब्रिज. जोडीनं खेळण्याच्या या डावाची तुलना थेट बुद्धिबळाशी केली जाते. ब्रिजचे डावपेच शिकवणारी कितीतरी पुस्तकं लिहिली गेली आहेत. जागतिक स्तरावर या खेळाची क्रीडासत्रंदेखील होतात.तेव्हा पत्ते - हा फक्त खेळ नसून नवनवे खेळ निर्माण करण्याची अतिशय लवचिक प्रणाली आहे असं मला वाटतं. यात वयाचं बंधन नाही. प्रत्येकाला आपल्या करमणुकीच्या गरजेनुसार, सवंगड्यांच्या आणि वेळेच्या उपलब्धीप्रमाणे नियम ठरवून खेळ खेळता येतात. कोणी आणि कसा डिझाइन केला असेल हा पत्त्यांचा कॅट? पत्त्यांचा इतिहास पाहायला गेलं तर फारच रंजक आहे. या खेळाची सुरुवात सुमारे 800 ते 1000 वर्षांपूर्वी चीनमध्ये झाली. पहिल्यांदा कागदी चलन आणलं तेही चिनी सत्तांनी. मुळात हा धनिक दरबारी आणि व्यापारी मंडळींचा पैशांचाच खेळ असावा. पण खरे पैसे बाळगणं जिकिरीचं असल्यानं त्याचं रूपांतर पत्त्यांच्या संचात झालं. त्या काळी जगभर समुद्री व्यापार चांगलाच विकसित झालेला होता. व्यापारी मालवाहतुकीबरोबर सांस्कृतिक देवाण-घेवाणसुद्धा साहजिकपणे होते. अशाच एका व्यापारी दौर्यात 40 पत्त्यांचा संच चीनमधून मध्य-पूर्वेत, पर्शिया, अरेबिया आणि इजिप्तपर्यंत येऊन पोहोचला आणि तिथल्या संस्कृतीत मिसळला. पर्शियाई लोकांनी प्रत्येक गटात राजा आणि वजीर असे 2 नवे पत्ते घालून 48 पत्त्यांचा संच तयार केला. हा संच पुढे युरोपात गेला. तिथे राजाच्या जोडीला दोन दरबारी आले. पहिल्यांदाच पत्त्यांवर राजा आणि दरबारी मंडळींची चित्र काढण्यात आली. हळूहळू पत्ते दरबारातून सामान्य घरांपर्यंतही पोहोचू लागले. फ्रान्समध्ये मात्र वजिराची जागा राणीनं घेतली आणि त्यात सैनिकाचा पत्ता वाढविण्यात आला. पुढे याच सैनिकाचा, जॅक म्हणजे गुलाम झाला.इस्पिक, बदाम, किलवर आणि चौकट असं पत्त्यांचं वर्गीकरण झालं. हे चारही राजे फ्रान्समधल्या ऐतिहासिक व्यक्तींवर आधारित होते. बायबलमधला डेव्हिड इस्पीकचा राजा, अलेक्झांडर किलवरचा, शार्लमे बदामचा आणि जुलियस सीझर हा चौकट राजा झाला. 52 पत्त्यांचा हा फ्रेंच कॅट जगभरात प्रमाणित झाला. आजही आपण हेच पत्ते खेळतो. अजून एक गंमत म्हणजे अठराव्या शतकापर्यंत एक्का नव्हताच. 1 मूल्यांकन असलेला सगळ्यात कमी महत्त्वाचा तो पत्ता होता. अठराव्या शतकात फ्रेंच क्रांती झाली. सामान्य जनतेनं राजाला उलथवून लावलं. तेव्हा पत्त्यातल्या राजाचीसुद्धा किंमत सर्वाधिक असून चालणार नव्हतं. यातूनच राजापेक्षा वरचढ असा एक्का जन्माला आला.पत्त्यांची घडणसुद्धा खूप प्रगत होत गेली. खेळण्याच्या सोयीसाठी पत्त्यांचा आकार आधीसारखा लांबुळका न ठेवता हातात मावेल या हिशोबानं कमी करण्यात आला. बरेच पत्ते हातात धरताना त्याचा पंखा करावा लागतो. त्यामुळे पत्त्यांचा बहुतांश पृष्ठभाग झाकला जातो. तेव्हा प्रत्येक पत्त्याचं मूल्य दर्शवणारे आकडे आणि अक्षरं समासात छापण्यात आले. राजा-राणीचे पत्ते उलट-सुलट धरले तरीही एकसारखे दिसावेत असे डिझाइन करण्यात आले. पत्ते खेळताना सर्वाधिक हाताळले जातात ते त्यांचे कोपरे. ते मोडले जाऊ नये म्हणून गोलाकार करण्यात आले. पिसण्याच्या सोयीसाठी पत्त्यांचे पृष्ठ गुळगुळीत करण्यात आले.सहज कुठेही उपलब्ध असणार्या पत्त्यांच्या या कॅटचा प्रवास केवढा मोठा आहे. हजार वर्षांच्या जागतिक इतिहासाचा, सांस्कृतिक वातावरणाचा, सामाजिक व्यवस्थांच्या बदलाचा ‘खेळ’ हा पत्त्यांचा संच आपल्याला दाखवतो.
snehal@designnonstop.in(लेखिका वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)