शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

गंगूबाई काठीयावाडी आणि अंडरवर्ल्डमधील खतरनाक लेडी डॉन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 3:01 PM

अंडरवर्ल्डमध्ये गॉडफादरची काही कमतरता नाही; पण एकापेक्षा एक घातक गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या गॉडमदरही आहेत. केवळ गंगूबाईच नव्हे, तर अनेक लेडी डॉननी खतरनाक डॉननाही आपल्या इशाऱ्यावर नाचण्यास भाग पाडलंय. कुणी रक्ताचे पाट वाहून, तर कुणी रक्ताचा एक थेंबही न पाडता दहशत माजवली. जेनाबाई दारूवाली, शशिकला रमेश पाटणकर, हसीना आपा, दस्यू सुंदरी फुलनदेवी, सीमा परिहार, अर्चना बालमुकुंद शर्मा, शोभा अय्यर, संतोकबेन जडेजा, रेश्मा मेनन, बेला आंटी, शिल्पा झवेरी, अर्चना माखन.. अशा अनेकींनी अंडरवर्ल्डवर राज्य केलं.

ठळक मुद्देअनेक खतरनाक गुंडही गंगूबाईचं नाव काढताच थिजून जात असत. अंडरवर्ल्डमध्ये गॉडफादरची काही कमतरता नाही; पण एकापेक्षा एक घातक गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या गॉडमदरही आहेत.

- रवींद्र राऊळ

गंगूबाई काठीयावाडी. मुंबईच्या रेडलाइट एरियाची अनभिषिक्त सम्राज्ञी. १९६० च्या दशकात आलिशान ब्लॅक बेन्टले कार बाळगून असलेली आणि वेश्यांच्या प्रश्नांवर थेट पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंना भेटून सवाल करणारी तेजतर्रार गंगूबाई कामाठीपुऱ्यात दाटीवाटीने पसरलेल्या शेकडो कुंटणखान्यांची तारणहार होती. अशा गंगूबाई काठीयावाडीच्या जीवनावर बेतलेल्या चित्रपटाच्या टिझरच्या निमित्ताने सध्या ती चर्चेत आली आहे. अल्लड गंगा ते गंगूबाई कोठेवालीपर्यंतचा प्रवास तिचं जीवन घुसमटवून टाकणारा होता.

गुजरातच्या काठीयावाडमध्ये उच्चपदस्थ कुटुंबात जन्मलेल्या गंगूबाईचं नाव गंगा हरजीवनदास काठीयावाडी. घरात बहुतेक जण वकील. त्यांच्याकडे कामाला असलेला अकाऊंटंट रमणिक मुंबईतून काठीयावाडमध्ये गेलेला. चहा देण्याच्या निमित्ताने गंगा रमणिकशी बोलू लागली. त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले. एके दिवशी दोघे पळून मुंबईला आले. तेथूनच गंगाच्या जीवनाची फरपट सुरू झाली. काही दिवसांतच रमणिकने गंगाला पाचशे रुपयांत कामाठीपुऱ्यातील एका घरवालीला विकून टाकलं आणि तो पळून गेला. वस्तुस्थिती लक्षात येताच गंगा उद्‌ध्वस्त झाली; पण काठीयावाडमध्ये परतण्याचे दोर तुटले होते. वेश्या वस्तीतून परतल्यावर कुटुंबीय स्वीकारणार नाही, याची खात्री तिला होती. तिने त्या यातनाघरातच राहायचा निर्णय घेतला तेव्हा तिचं वय होतं सोळा वर्षे.

एकदा कुंटणखान्यात शौकत खान नावाचा गुंड आला आणि तिच्यावर अत्याचार करून पैसे न देताच निघून गेला. गंगाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. गंगाने माहिती काढली, शौकत खान हा अंडरवर्ल्ड डॉन करीमलालाच्या टोळीतील खतरनाक गुंड. तिने थेट करीमलालाला त्याच्या घराजवळ रस्त्यात गाठलं. त्याने तिला यापुढे कुणी त्रास दिला तर मला कळव, अशा शब्दांत दिलासा दिला. सन्मानाने वागवणाऱ्या करीमलालाला तिने भाऊ मानलं. काही दिवसांनी शौकत खान पुन्हा कुंटणखान्यात गेला तेव्हा गंगाने कुणामार्फत तरी करीमलालाला कळवलं. करीमलाला कोठ्यावर गेला आणि शौकत खानला हॉकीस्टिकने चोप देत गंगा आपली मानलेली बहीण असल्याचं जाहीर केलं. अर्थातच तेव्हापासून कुणी तिच्याशी पंगा घेण्याचा प्रश्नच उरला नाही.

रेडलाइट एरियात गंगूचं वजन वाढलं. त्याचा गैरफायदा न घेता ती अन्याय होणाऱ्या सेक्सवर्करच्या बाजूने उभी राही. कुंटणखाने चालविण्यासाठी घरवाली आणि बडी घरवालीसाठी निवडणुका होतात. वेश्यांसाठी आवाज उठविणारी गंगा या दोन्ही निवडणुका जिंकली आणि तेव्हापासून गंगूबाई कोठेवाली झाली. आपल्याप्रमाणे कुठल्याही मुलीला तिच्या मर्जीविरुद्ध या व्यवसायात राहावं लागू नये यासाठी ती प्रयत्नशील असे. त्या मुलींमध्ये माँ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाईचा फोटो प्रत्येक कोठीत लावलेला दिसे. वेश्यांच्या प्रश्नांसाठी पुढे ती पंतप्रधान नेहरूंनाही भेटली. आझाद मैदानात झालेल्या मैदानातील तिचं भाषण त्या काळात बरंच गाजलं. वेश्यांमुळेच मुंबईत अन्य महिला सुरक्षित राहत असल्याचं ती म्हणाली होती.

अनेक खतरनाक गुंडही गंगूबाईचं नाव काढताच थिजून जात असत. अंडरवर्ल्डमध्ये गॉडफादरची काही कमतरता नाही; पण एकापेक्षा एक घातक गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या गॉडमदरही आहेत. केवळ गंगूबाईनेच नव्हे, तर अनेक लेडी डॉननी खतरनाक डॉननाही आपल्या इशाऱ्यावर नाचण्यास भाग पाडलंय. कुणी रक्ताचे पाट वाहून, तर कुणी रक्ताचा एक थेंबही न पाडता दहशत माजवली.

१९३० च्या दशकात स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्या पोरसवदा जैनबने फाळणीनंतर पाकिस्तानात येण्यास नकार दिला म्हणून तिचा पती पाच मुलांसह तिला सोडून निघून गेला. नशिबाची चक्रे उलटी फिरलेली जैनबने तांदूळविक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यात नुकसान सोसल्यावर दक्षिण मुंबईतील दारूधंद्यावर राज करू लागली आणि ती जेनाबाई दारूवाली झाली. १९७० पर्यंत तर ती माफिया क्वीन झाली होती. जेनाबाईच्या डोंगरीतील घरी तस्कर हाजी मस्तानपासून अवघ्या विशीतील दाऊद इब्राहिम आणि काही पोलीस अधिकारीही हजेरी लावत असत इतका तिचा दबदबा. वेगवेगळ्या टोळ्यांमधली भांडणं तिच्या सांगण्यावरून मिटत आणि केवळ तिच्या शब्दाखातर पोलीस काही गुंडांवर कठोर कारवाई करायचे टाळत.

शशिकला रमेश पाटणकर ही तर ड्रग्जची देवी म्हणून ओळखली जाई. वरळीत राहणारी शशिकला उदरनिर्वाहासाठी कधीकाळी दुधाच्या बाटल्या विकायची. तिच्या पती आणि भावाला ड्रग्सचं व्यसन होतं. त्यामुळे या धंद्यातील नेटवर्क आणि नफ्याचा अंदाज तिला आला. हशीश आणि ब्राऊन शुगरपासून तिने ड्रग्जच्या धंद्याला सुरुवात केली. राजस्थानातील ड्रग्जच्या व्यापाऱ्यांकडून ती ड्रग खरेदी करून पोटावर बांधून कपड्यांनी झाकलेल्या अवस्थेत ट्रेनने मुंबईला येई. त्या ड्रग्जमध्ये ती भेसळ करीत असे. तिची मालमत्ता शंभर कोटींच्या घरात होती, यावरून तिच्या अवाढव्य नेटकर्वची कल्पना यावी.

दाऊद इब्राहिमची बहीण हसीना आपा हिचा १९९१ सालापर्यंत तसा गुन्हेगारीशी थेट संबंध नव्हता. दाऊदने प्रतिस्पर्धी अरुण गवळीचा भाऊ पापा गवळी याची हत्या केली. त्याचा बदला घेण्यासाठी गवळीने हसीना आपाचा पती इस्माईल परकारची हत्या केली. त्यानंतर हसीना आपा अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय झाली. नागपाड्यातील तिच्या दरबारात अनेक वाद मिटविले जात. दाऊदसाठी खंडणी उकळल्याचे गुन्हे तिच्यावर दाखल आहेत. त्याशिवाय भारत ते मध्य पूर्व देशात हवाला चालविल्याचेही आरोप तिच्यावर झाले. २0१४ साली हृदयविकाराने तिचं निधन झालं तेव्हा तिच्या नावावर पाच हजार कोटींची मालमत्ता असल्याचा तपास यंत्रणांचा अंदाज होता.

दस्यू सुंदरी फुलनदेवीच्या कहाण्या सर्वांनाच ठाऊक आहेत. सीमा परिहार ही सुद्धा तिच्यासारखी दस्यू सुंदरी. कुख्यात डाकू लालारामने तेराव्या वर्षी सीमाला उचलून नेलं. पुढे अठरा वर्षे आपल्यासोबत ठेवलं. या काळात सीमा गुन्हेगारीत पूर्णपणे बुडाली. १९८० ते १९९० या काळात तिच्या कारवायांनी जोर धरला. तिच्या नावावर ७० हत्या आणि २०० अपहरणांची नोंद आहे. पुढे ती निर्भय गुज्जरच्या टोळीत सामील झाली. २००३ साली सीमाने आत्मसमर्पण केलं.

मध्यप्रदेशातील उज्जैनमधील अर्चना बालमुकुंद शर्माने अभिनेत्री बनण्याच्या वेडापायी पहिल्या वर्षातच कॉलेज सोडलं. काही काळ पोलिसांत नोकरी केली. ती सोडून बॉलीवूडमध्ये नशीब अजमवायला मुंबईत आली. इथे काही जमलं नाही म्हणून एका ऑर्केस्ट्रा शोसाठी दुबईला गेली. तिथे तिची ओळख डॉन बबलू श्रीवास्तवशी झाली. दोघे प्रेमात पडले आणि दुबईहून नेपाळला आले. दरम्यान, पोलिसांनी बबलू श्रीवास्तवला पकडलं. त्यानंतर अर्चनाने त्याच्या टोळीची सूत्रं आपल्या हाती घेतली. लुटमार, अपहरण आणि हत्या अशा कारवायांनी तिने पोलिसांची झोप उडविली.

तामिळनाडूतील शोभा अय्यरच्या मर्जीशिवाय दक्षिण भारतातील अंडरवर्ल्डमध्ये पानही हलत नव्हतं; पण ती कधी पोलिसांच्या हाती लागली नाही. तिची गॅंग हे पोलिसांसाठी एक गूढच होतं. पकडून देण्यासाठी इनाम जाहीर झालेल्या शोभा अय्यरविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जाहीर झालीय.

पोरबंदर परिसरातील गॉडमदर संतोकबेन जडेजा हिची कहाणीही थक्क करणारी. मिल कामगार असलेला तिचा पती सरमान जडेजा याने स्थानिक गुंड देऊ वाघरची हत्या केली. वाघर मिल मालकांकडून सुपारी घेऊन कामगारांचे संप फोडायचा. १९८६ मध्ये सरमान जडेजाची हत्या झाल्यावर तोवर गृहिणी असलेली संतोकबेन अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय झाली. त्या जोरावर जनता दलाची आमदार झालेल्या संतोकबेनवर पतीच्या हत्येचा सूड उगवण्यासाठी १४ जणांच्या हत्या केल्याचे आरोप झाले.

छोटा शकील टोळीतील गुंडांना शस्त्रं, ड्रग्स पुरवणाऱ्या रुबिना सिराज सईदने पोलिसांच्या नाकात दम आणला. रेश्मा मेनन, बेला आंटी, शिल्पा झवेरी, अर्चना माखनसह अनेक लेडी डॉननी उलट्या काळजाच्या अंडरवर्ल्डमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलाही मागे नसल्याचं सिद्ध केलं.

(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपवृत्त संपादक आहेत.)

ravindra.rawool@lokmat.com