- निळू दामलेजॉर्ज फर्नांडिस मंगळूरमध्ये जन्मले, ख्रिस्ती, सुशेगात वातावरणात. सभोवतालची माणसं ब्रिटिशधार्जिणी. तेरा-चौदाच्या वयात जॉर्ज ब्रिटिशांच्या विरोधात, स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय झाले. सत्याग्रह आणि मोर्चे झाले तेव्हा जॉर्जनी मित्रांना गोळा करून पोलिसांवर दगडफेक केली, वंदे मातरम्च्या घोषणा दिल्या. परिवारातल्या आणि आसपासच्या ख्रिस्ती मंडळींना जॉर्जचं वर्तन पसंत नव्हतं. वडीलही भडकले होते.वडिलांची शेती होती. शेतावर काम करणाऱ्या मजुरांमध्ये जॉर्ज मिसळत, त्यांच्या घरी जाऊन राहात. वडिलांना ते आवडत नसे. हजेरीवरून, मजुरीवरून कटकटी होत. मजुरांना मारहाण केली जाई. जॉर्जना त्याचा फार राग होता. मॅट्रिक झाल्यावर जॉर्जनी वकील व्हावं अशी जॉर्जच्या वडिलांची अपेक्षा होती. म्हणजे शेती, जमिनीचे कज्जे वगैरे सांभाळणारा एक वकील घरातच तयार व्हावा, असं वडिलांना वाटत असे. जॉर्ज म्हणाले की, मजुरांना मारझोड करणाºयांच्या बाजूनं कोर्टात उभं राहायचं हे मला जमणार नाही. त्यांनी वकिलीकडं जायला नकार दिला, वडिलांची इच्छा नाकारून सेमिनरीत गेले.सेमिनरीतही तिथल्या प्रीस्टांशी त्यांचं जमलं नाही. शिक्षणक्रम मोकळा करावा, व्हॅटिकनच्या जोखडातून तो मुक्त करावा अशी खटपट जॉर्जनी केली. प्रीस्ट खवळले. मंगळूरमधल्या मित्रांना बरोबर घेऊन जॉर्जनी एक पेपर काढला आणि त्या पेपरात ‘देव आहे की नाही?’- या प्रश्नावर चर्चा घडवून आणली. चर्च खवळलं. जॉर्जला धर्मबाह्य, पाखंडी घोषित करण्यात आलं.जॉर्जला वडिलांनी घराबाहेर काढलं, जॉर्ज घराबाहेर आपणहून पडले यापैकी काही तरी घडलं आणि जॉर्जला खाणावळीत जावं लागलं. फाटक्या जॉर्जला खाणावळीच्या माणसानं दयाभावानं फुकट जेवूघातलं. जॉर्जची खाणावळीत काम करणाºया माणसांशी दोस्ती झाली, सहवासानं. वडिलांच्या शेतावरच्या मजुरांशी दोस्ती झाली होती तशीच. तो काळ म्हणजे १९४८च्या आसपासचा. दोन वेळा खायला मिळणं एवढ्यावरच मुलंमाणसं खाणावळीत कामं करायची. झालं. जॉर्जनी त्या लोकांना संघटित केलं, त्यांचा संप घडवून आणला. अख्ख्या जगात हॉटेल कामगारांचा संप नावाची गोष्ट कधी घडली नव्हती ती या माणसानं घडवली. एक किंवा दोन खाणावळीतल्याच लोकांचा संप, फार मोठी संख्या आणि मोठ्या संख्येचा दबाव अशातला भाग नाही. अशा संपाचा परिणाम होण्यासारखा नव्हता.पोलिसांनी जॉर्जला बदडलं. मालक तर जामच वैतागला. या माणसाला आपण दयाबुद्धीनं थारा दिला आणि हा माणूस आपल्याच खाणावळीत संप घडवून आणतो म्हणजे काय?जॉर्ज काय करतील याचा नेम नसे. त्यांची गणितंच वेगळी होती. ती गणितं फक्त त्यांनाच कळत.***मुंबईतला एक चैतन्यशील जुना पत्ता.२०४, चर्नी रोड- या वास्तूशी (आज ती हयात नाही) जॉर्जचं एक खास नातं होतं.१९६७ ची स. का. पाटील यांना हरवणारी ऐतिहासिक निवडणूक जॉर्जनी इथून लढवली. या इमारतीत हिंदू मजदूर पंचायत, बॉम्बे लेबर युनियन, म्युनिसिपल मजदूर युनियन इत्यादी अनेक कामगार संघटनांच्या कचेºया असत. संयुक्त समाजवादी पक्षाचंही कार्यालय इथंच होतं.जॉर्ज फर्नांडिस इथंच बसत. असं सांगतात की जॉर्ज मुंबईत प्रथम आले तेव्हा गोदीबाहेरच्या फुटपाथवर राहात आणि या कचेरीत येत. ती होती पहिल्या मजल्यावर. समोर एक मोठ्ठा हॉल. समोरच्या भिंतीला लागून विविध युनियनचेसेके्रटरी बसत. सातव, शेट्टी, एम.यू. खान, सोमनाथ डुबे. डाव्या हाताच्या भिंतीशी मेंडोंसा. काही वेळा अण्णा साने. उजव्या बाजूच्या भिंतीशी शरद राव, गोपाळ शेट्टी आणि महाबळ शेट्टी. त्यांच्या समोर टेबलं. टेबलांसमोर बाकं. बाकांवर बसत भेटायला आलेले कामगार.डाव्या हाताला एक खोली, तिथं जॉर्ज फर्नांडिस बसत असत. एका खिडकीशी जॉर्जची खुर्ची आणि समोर भलं मोठं टेबल. टेबलाभोवती, खोलीभर कामगार बसलेले किंवा उभे असत. टेबलावर लोखंडी काडीवर लावलेला भारताचा झेंडा.समाजवादी मंडळीतली पद्धत अशी की माणूस वयानं आणि कीर्तीनं कितीही मोठा असला तरी त्याचा एकेरी उल्लेख केला जात असे. त्यामुळं जॉर्ज आलाय का, जॉर्ज काय करतोय, जॉर्जकडं कोण बसलंय असे उल्लेख होत.उकाडा. डोक्यावर गरगरणारा पंखा. जॉर्ज खुर्चीवर बसायच्या आधी शर्ट काढून ठेवत असत. बिनबाह्यांच्या बनियनमध्येच सर्वांना भेटत. जॉर्जचे एक सहकारी जगन्नाथ जाधव म्हणत, ‘छतावरच्या पंख्यात एक पॉवरफुल मॅग्नेट आहे, दुनियाभरचे मॅड लोकं त्या मॅग्नेटकडं आकर्षित होतात.’दिवसरात्र कार्यकर्त्यांचा राबता असे. दिवसरात्र बैठका. जॉर्जचे कामगार चळवळीतले सहकारी मोहीम आखत होते. काही तरी फार महत्त्वाचं घडतंय असं वातावरण असे. कोण काय बोलतंय ते नीट कळत नसे कारण त्या हॉलमध्ये अनेक गट असत आणि कलकलाट असे.म्युनिसिपल मजदूर युनियनचे बाळ दंडवते आणि बेस्ट वर्कर्स युनियनचे नारायण फेणाणी ही माणसं (इतरही कित्येक) लक्षात राहाण्यासारखी प्रमुख माणसं होती. तुम्ही स. का. पाटलांना पाडू शकता ही घोषणा दंडवतेंनी तयार केली होती असं म्हणतात. नारायण फेणाणींच्या तोंडातल्या पानाच्या तोबºयातून वाट काढून मोलाचे आणि वल्ली सल्ले बाहेर पडत. या माणसांच्या सहवासात निवडणुकीचे ताणतणाव खलास होत.खादी भांडारातल्या कामगार संघटनेचे एक पदाधिकारी दाते नावाचे गृहस्थ कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असत. गोरे. हनुवठीपुरती दाढी. घारे. चित्रपटात पहायला मिळतात तशी एक कॅरेक्टर. आतल्या गाठीचे, गूढ वाटत. यांना जगातलं सारं माहीत आहे; पण बोलत नाहीत असं वाटायचं. त्यांच्या भोवती बरीच माणसं असत. किती तरी म्हणजे किती तरी माणसं जमा असत. आपणही तिथं होतो असं सांगणारी गेला बाजार चार-दोन हजार माणसं आज जिवंत असतील.स. का. पाटील आणि त्यांची काँग्रेस पार्टी यावर लोकांचा राग होता, त्या रागाला जॉर्जनी तोंड फोडलं होतं. जॉर्जची निवडणूक म्हणजे एक मोठ्ठी सामाजिक घटनाच झाली होती. माणसं बोलता बोलता दमून भुकावली की समोरच्या कुलकर्ण्यांच्या हॉटेलात जाऊन भजी खात.संध्याकाळी पोस्टर्सचे गठ्ठे येऊन पडत. कार्यकर्ते गोळा होत. गिरगावात आसपास राहाणारे तरुण कार्यकर्ते. मराठी, गुजराथी, मारवाडी असा मिश्र गट.रात्रीचे १० वाजून गेले की आसपासच्या हॉटेलात कामं करणाºया पोरांची झुंड हजर होत असे. ही पोरं युनियनचं काम करत. दक्षिण आणि उत्तर भारतातून स्थलांतरित झालेली. मुंबईत त्यांना घर नसे. दिवसभर हॉटेलात काम आणि रात्री हॉटेलची साफसफाई करून तिथंच झोपणं. उन्हाळ्यात उकडत असे, ही पोरं रस्त्यावर पथाºया पसरून गप्पा करत झोपत. हॉटेलात काम करणाºयांची जॉर्जनी बांधलेली युनियन जगातली अपूर्व युनियन होती असं त्या काळात पेपरात छापून आलं होतं. पोरं जोशात असायची. शेट्टी हा त्यांचा संघटक त्या पोरांना घेऊन पोस्टर लावायला निघायचा. काही ठिकाणी पोस्टर लावायला विरोध व्हायचा. विरोध करणारे स. का. पाटलांचे समर्थक असावेत. मग ही चाबरट पोरं तिथं राडा करायची.पोस्टरं लावून झाली की प्रार्थना समाजाच्या नाक्यावर पावभाजीच्या गाड्याभोवती झुंड गोळा व्हायची. रात्रीचे २ वाजलेले असायचे. चिकटलेली खळ खरवडून खरवडून हात धुवायचे आणि पावभाजी खायची. नंतर छोट्या काचेच्या ग्लासातली कटिंग कॉफी. काही पोरं पुन्हा कचेरीत परतायची, तिथं घुटमळायची. काहीजणं तिथंच झोपायची.वातावरण जाम भारलेलं. कचेरीत बातम्या यायच्या. अमुक ठिकाणी आपल्या सभेवर दगडफेक झालीय. तमुक ठिकाणी सभा उधळायचा प्रयत्न झालाय. मग कार्यकर्त्यांची झुंड तिकडं सुसाट निघायची.कार्यालयात गजबज असताना तिकडं जॉर्ज आसपासच्या प्रत्येक इमारतीत जाऊन नागरिकांना व्यक्तिगत भेटत फिरायचे. बंदसम्राट जॉर्ज म्हणजे राक्षस आहे अशी लोकांची समजूत असे. कुठल्याही कार्यालयात काम करणाºया माणसासारखा पॅन्ट-शर्ट घातलेले जॉर्ज समोर उभे पाहिल्यावर लोकांना आश्चर्य वाटत असे.शेवटी स. का. पाटील हरले. कार्यालयासमोर नुसता जल्लोष झाला. द. मुंबई मतदारसंघातले सर्व नागरिक कार्यकर्ते झाले होते. आपले आपणच पेढे वाटत होते, फटाके उडवत होते. सारं काही परस्परच घडत होतं.२०४, चर्नी रोड ही इमारत तेव्हा सगळ्या मुंबईच्या नजरेत भरली. पुढली कित्येक वर्षं या इमारतीवरून जाणारे-येणारे इमारतीकडं बोट दाखवून ‘जॉर्ज फर्नांडिसचं आॅफिस’ असं कौतुकानं म्हणत.***पुढे फार वेगवेगळ्या वाटांनी गेला जॉर्ज ! जेपी सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून एक नवा पक्ष करायला निघाले होते. जॉर्जनी विरोध केला. इतर पक्ष विलीनीकरणाला विरोध करू लागले तेव्हा जॉर्ज विलीनीकरणाला तयार झाले. जनता पक्ष स्थापन झाला.जनता पक्षाचं सरकार आलं तेव्हा जॉर्जनी मंत्रिमंडळात सामील व्हायला नकार दिला. त्यांना बाहेर राहून, संघर्ष करून देशाचे प्रश्न सोडवायचे होते. पण दबाव आला म्हणून नंतर ते मंत्री झाले. पुढे मंत्रिमंडळ आणि पक्षात मारामाºया सुरू झाल्या. सत्तेत रस नसणाºया जॉर्जनी त्यावेळी कित्येक तास जोरदार भाषणं करून सरकारचं समर्थन केलं आणि दुसºयाच दिवशी राजीनामा दिला. सरकारही पडलं.वाजपेयींच्या मंत्रिमंडळात जॉर्ज संरक्षणमंत्री असताना तहेलका प्रकरण झालं. जॉर्जनी पैसे खाल्ले असं तहेलकातल्या लोकांनी सुचवलं. वाजपेयींनी जॉर्जना सांगितलं की, त्यांनी राजीनामा देऊ नये. जॉर्जनी राजीनामा दिला. जॉर्जचा राजीनामा स्वीकारताना वाजपेयी म्हणाले की, तहेलका प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यावर जॉर्ज निर्दोष सिद्ध होतील त्या वेळीच त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं जाईल. गंमत अशी की चौकशी अपूर्ण असतानाच, जॉर्ज निर्दोष सिद्ध झाले नसतानाच वाजपेयींनी जॉर्जना आमंत्रण धाडलं, जॉर्जनी ते स्वीकारलं आणि ते मंत्रिमंडळात सामील झाले.जनता पार्टीचं सरकार पाडायला कारणीभूत ठरलेल्या जॉर्जनी वाजपेयींचं सरकार मात्र पूर्ण पाच वर्षं टिकवून ठेवलं. त्यासाठी खुद्द भाजपानंही केली नाही इतकी मेहनत जॉर्जनी केली. हा माणूस काय करेल याचा नेम नसे. कामगारांचा संप असो की मंत्रिपद, कुठंही या माणसाचं वागणं स्वत:चा खिसा भरण्यासाठी नव्हतं, व्यक्तिगत स्वार्थासाठी नव्हतं, सत्तेसाठी नव्हतं. ना पदाचं, ना सत्तेचं, ना पैशाचं प्रेम. अडलेली माणसं जॉर्जकडं येत, त्यांच्या अडचणींचं निवारण करण्यासाठी जॉर्ज सर्वस्व पणाला लावून त्यांच्यासाठी काम करत. पन्नासेक वर्षं हा माणूस सार्वजनिक जीवनात राहिला. सार्वजनिक जीवन सुरू करताना तो फाटका होता, मरतानाही तो तितकाच फाटका शिल्लक होता.पन्नासेक वर्षाच्या सक्रि य झंझावाती आणि थरारक सार्वजनिक वातावरणात असंख्य माणसं जॉर्जच्या सहवासात आली. पण हा गृहस्थ नेमका काय आहे हे कोडं त्यांना उलगडलं नाही. कोणाला तो देव माणूस वाटला. कोणाला तो भंपक वाटला. कोणाला तो नि:स्वार्थी वाटला. कोणाला तो सत्तापिपासू वाटला. कोणाला तो प्रेमळ वाटला, कोणाला तो पिसाट वाटला. अंगावरचे कपडे आणि अगणित पुस्तकं एवढीच संपत्ती गोळा केलेल्या माणसावर लोकांनी पैसे खाल्ल्याचाही आरोप केला.यातले खरे जॉर्ज कुठले, याचा शोध घेणं आता शक्यच नाही. कारण आता तो माणूस शिल्लकच नाहीये.(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
damlenilkanth@gmail.com