-अपर्णा वाईकर
मुलाच्या शाळेमुळे बऱ्याच मैत्रिणी (जर्मन) भेटल्या. त्या जर्मन स्त्रियांकडून एक खूप मोठा गुण घेण्यासारखा आहे, तो म्हणजे कुठलंही काम करायला त्या मागेपुढे बघत नाहीत. घरातली सगळी कामं त्या स्वत: आणि अगदी मनापासून करतात. प्रत्येकाचं वेळापत्रक आखलेलं असतं. त्यावेळी, त्यादिवशी ते काम झालंच म्हणून समजा. अतिशय आॅर्गनाइज्ड अशा या मैत्रिणी होत्या. मीदेखील त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करत असे; पण ते मुळातच असावं लागतं हे मला लक्षात आलं. या मैत्रिणींना मी त्यांचे काही आवडते भारतीय पदार्थ शिकवले आणि त्यांनी मला जर्मन केक्स, बिस्किटं आणि १-२ स्नॅक्स शिकवले. जर्मन फूडमध्ये मुख्यत्त्वे मांसाहारच जास्त असतो आणि तोदेखील सॉसेजेस, कोल्ड कट्स (प्रिझर्व्हड मिट) यांच्या स्वरुपात. भाज्यांमध्ये नवलकोल फ्लॉवर (फुलकोबी), पानकोबी, बटाटे, गाजर, ढोबळी मिरची याच भाज्या मिळायच्या. जेवणात ते बटाटेसुद्धा बरेच वापरतात. उकडून, बेक करून किंवा किसलेल्या बटाट्यात अंडं घालून त्याची धिरडी बनवून ते खातात. आपल्याला वाचताना गंमत वाटेल पण ही धिरडी म्हणजे ‘कारटोफेल पुफर’ फार प्रसिद्ध आहेत. ख्रिसमसच्या वेळी लागणाऱ्या मोठमोठ्या मार्केट्समध्ये हे कारटोफेल पुफर खाण्यासाठी लोक रांगा लावतात. जर्मनीमध्ये हॅलोवीनशिवाय अजून दोन महत्त्वाचे किंवा मोठ्या प्रमाणावर साजरे होणारे सण म्हणजे ख्रिसमस आणि ‘जर्मन फासनाख्ट’. ‘वाइनाख्टन’ म्हणजे ख्रिसमस हा सण अतिशय जोशात साजरा होतो. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून शाळांना सुट्या लागतात. आॅफिसेसमध्येसुद्धा काही ठिकाणी १५ दिवसांची सुटी असते. आपण दिवाळीत जशी खाण्यापिण्याची चंगळ करतो तसेच जर्मन लोक ख्रिसमस साजरा करतात. सगळा परिवार यावेळी एकत्र येतो. यादरम्यान महिनाभरासाठी मोठमोठे ख्रिसमसचे बाजार भरतात. दरवर्षी या बाजारात जायला मजा येत असे. कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेजेस, गरमागरम ‘कारटोफेल पुफर’, वेगवेगळे केक्स, साखर लावलेले ड्रायफ्रुट्स अशी खाण्याची मजा. शिवाय सुंदर सुंदर शोभेच्या वस्तूंची दुकानं. हाताने बनवलेल्या लाकडी शोभेच्या वस्तूंमध्ये ‘नटक्रॅकर’ नावाचा शिपायासारखा दिसणारा बुवा फार प्रसिद्ध होता. आम्हीही तो घेतलाय. थोडक्यात, काय तर या ख्रिसमस मार्केटमध्ये खूप मित्र-मैत्रिणींना घेऊन जायचं आणि धमाल करायची. अर्थात, यासाठी तुम्हाला प्रचंड थंडीत बाहेर हिंडण्याची तयारी ठेवावी लागते. ‘फासनाख्ट’ कार्निव्हलच्या वेळी लोक मोठमोठ्या ग्रुप्समध्ये वेगवेगळे देखावे करून रस्तोरस्ती फिरतात. आपल्याकडे जसे गणपती विसर्जनाला लोक दुतर्फा उभे असतात, तसेच लोक उभे असतात. या देखाव्यांमधली माणसं लहान मुलांकडे चॉकलेट्स, बिस्किट असे खाऊचे प्रकार फेकतात. कुणी किती खाऊ जमवला यासाठी मुलांमध्ये चढाओढ असते. या कार्निव्हलमध्ये पक्षी, प्राणी असे वेश घेतलेले लोकदेखील असतात. ऱ्हाइन नदी, कलोन, माईन्झ अशा वेगवेगळ्या ठिकाणी जानेवारी ते फेब्रुवारीच्या दरम्यान हे कार्निव्हल होतात. जर्मन लोकांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते वेळेचे अगदी पक्के आहेत. जी वेळ तुम्ही त्यांना दिलेली असते, त्याच्या ५-१० मिनिटे आधीच ते हजर असतात. वक्तशीरपणातल्या शिस्तीचा अनुभव आम्हाला आमच्या ६० वर्षांच्या घरमालकांकडून प्रथम मिळाला. आमच्या घरातली हिटिंग सिस्टीम कशी वापरायची हे विचारायला आम्ही त्यांच्या घरी म्हणजे शेजारी गेलो तेव्हा ते म्हणाले, ‘असं केव्हाही मी तुमच्या घरी येऊन ते समजावून सांगणार नाही. तुम्ही मला एक वेळ द्या, त्यावेळी मी तुमच्या घरी येईन आणि ते कसं वापरायचं हे समजावून सांगीन.’ आम्हाला वाटलं होतं की रिटायर्ड माणूस आहे, घरातच असतो, त्यांना वेळच वेळ असणार. पण तसं नव्हतं. ते पुढे म्हणाले, ‘हे मी यासाठी सांगतो की ज्यावेळी मी तुमच्या घरी येईन त्यावेळी मी पूर्ण लक्ष देऊन केवळ तेवढंच काम करेन आणि तुम्हीदेखील त्यावेळी ते नीट समजावून घ्या.’ असा हा वक्तशीरपणा आणि व्यवस्थितपणा या लोकांमध्ये मुळातच दिसून येतो आणि याचा त्यांना खूप अभिमानही आहे. अजून एक वाखाणण्यासारखी गोष्ट म्हणजे ही माणसं इतिहासापासून बोध घेऊन पुढे गेली आहेत. याची जाणीव आम्हाला बर्लिनला झाली. बर्लिन ही जर्मनीची राजधानी आहे. खूप सुंदर शहर, मोठमोठे रस्ते, हिरवळ सुंदर बिल्डिंग्स (अर्थात हे जर्मनीतल्या कुठल्याही मोठ्या शहरातलं दृश्य आहे.) आम्ही बर्लिन वॉल बघायला गेलो. तिथे आता भिंत नाहीये. त्या भिंतीचे काही अवशेष लोकांना बघण्यासाठी त्यांनी ठेवले आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व आणि पश्चिम जर्मनीला वेगळं करण्यासाठी ही ऐतिहासिक भिंत बर्लिन शहरात बांधण्यात आली होती. पुढे (कदाचित) ८०च्या दशकात सगळे वाद संपुष्टात आल्यानंतर ही भिंत पाडून टाकण्यात आली आणि केवळ एक आठवण म्हणून काही अवशेष तिथे ठेवले आहेत. त्यावर ग्राफिटी केली आहे. बाजूला एका म्युझियममध्ये या भिंतीशी संबंधित फोटो, त्याचा इतिहास इ. गोष्टी ठेवल्या आहेत. थोडक्यात, सांगायचं तर या कडू आठवणी सतत मनात ठेवून दर काही वर्षांनी त्या उगाळल्या जात नाहीत. त्यावेळी जे झालं, त्याचे जे काही पडसाद उमटले ते सगळं आता इतिहासजमा आहे. या इतिहासाला किंवा भूतकाळाला कुणी वर्तमानकाळात आणायचा प्रयत्न फारसा करत नाही.आमच्या घराच्या आजूबाजूला खूप शेतं होती. फुलांची, फळांची, धान्यांची. कधी संध्याकाळी या शेतांमधल्या पायवाटेने फिरायला गेलं तर गुबगुबित ससे झर्रकन इकडून तिकडे पळताना दिसायचे. कितीतरी रंगीबेरंगी पक्षी, फुलपाखरं बघत-बघत फिरायला खूप छान, प्रसन्न वाटायचं. ‘स्ट्रॉबेरी’च्या सीझनमध्ये तर फारच गंमत असायची. बाजूच्या शेतात जायचं त्यातून स्वत: हव्या तेवढ्या स्ट्रॉबेरीज तोडून घ्यायच्या. अशा या तोडलेल्या स्ट्रॉबेरीज मग त्या शेतातल्याच छोट्याशा शेडवजा दुकानात न्यायच्या. तिथे असलेला मालक किंवा मालकीण त्याचं वजन करून आपल्याला त्याचे पैसे सांगतील ते द्यायचे. ही किंमत सुपर मार्केटच्या किमतीपेक्षा कितीतरी कमी असायची. मी आणि माझा मोठा मुलगा असंख्य वेळा हा आनंद लुटायला त्या शेतात जायचो.असंच एक सुंदर फुलांचं शेत किंवा भली मोठी बाग घराजवळ होती. त्या बागेत जाऊन आपल्याला हवी ती आणि हवी तेवढी कट फ्लॉवर्स लोक तोडून घेत असत. फुलं तोडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या कात्र्याही तिथे ठेवलेल्या असायच्या. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे कुठेच कुणी माणूस नव्हता जो याचे पैसे घेईल. दारात/फाटकातून आत शिरताना एक बॉक्स लावलेला. बाजूला लॅमिनेटेड कागदावर फुलांच्या किमती लिहिलेल्या. प्रत्येकाने आपण तोडलेल्या फुलांप्रमाणे पैसे त्या बॉक्समध्ये टाकायचे. आणि हो, प्रत्येकजण ते प्रामाणिकपणे करतही असे. माणुसकी आणि प्रामाणिकपणावरचा तो विश्वास पाहून मी त्या सगळ्या माणसांना मनातल्या मनात सॅल्यूट केला. ती बाग फुलवणाऱ्या त्या माळ्याची कमाल आणि तिची नासधूस न करता अलगदपणे त्यातली फुलं तोडून त्यांचे पैसे ठेवलेल्या डब्यात टाकणाऱ्या प्रामाणिक लोकांची पण कमाल. अशा या सुंदर देशात आम्हाला मित्रसुद्धा खूप छान मिळाले. त्यातले काही जर्मन, काही पंजाबी, साऊथ इंडियन्स आणि काही मराठीही. आमची ही जी मैत्री झाली आहे ती कायमची, आयुष्यभरासाठीची आहे. खरं तर असे आपल्या आजूबाजूला आपल्या जिवाभावाचे मित्र असावे ही जाणीव आणि गरज आम्हाला दिल्लीपासून झाली. हे मित्र जमवण्याची सुरुवातदेखील दिल्लीतच झाली. जर्मनीत तर ही गरज अधिकच भासली आणि आम्ही अक्षरश: आमच्या गावाच्या आजूबाजूला राहणाऱ्या भारतीय लोकांचे ई-मेल, पत्ते मिळवून त्यांना आमच्या बाळाच्या पहिल्या वाढदिवसाचं आमंत्रण पाठवलं. केवळ ई-मेल आणि फोनवरून केलेल्या आमंत्रणावर आलेले कितीतरी लोक आज आमचे सख्खे मित्र झाले आहेत. एकदा ओळख झाल्यावर मग काय विचारता गणपती, दिवाळी, नवीन वर्ष, एवढंच नाही तर डोहाळे जेवण, बारसं असे कितीतरी प्रसंग आम्ही एकत्र साजरे केले. ३०-३५ लोकांची बस घेऊन आॅस्ट्रियाची ट्रीपदेखील करून आलो. त्या ट्रीपसाठी आॅर्गनाइज केलेला सामोसे अन् जिलेबीचा ब्रेकफास्ट आणि परत येताना एका तळ्याच्या काठावर जर्मन वर्तमानपत्रांवर बनवलेली भेळ मी कधीच विसरू शकणार नाही. अशा सुंदर शहरात एवढ्या धम्माल मित्रमंडळींबरोबर आम्हाला जवळपास ३ वर्षे पूर्ण व्हायला आली होती. कायम इकडेच राहता आलं तर काय मज्जा!! असे विचार मनात यायला लागले होते... आणि कळलं की आम्हाला चायनाला शिफ्ट व्हायचंय....