मुले काय किंवा मुली काय, आपल्याला पुढे आयुष्यात काय करायचे आहे याचा निर्णय त्यांना घेताच येत नाही. तो घेतात त्यांचे आई-वडील. ‘निवड कशी करावी’ हे आपली शिक्षणपद्धतीही कधीच शिकवत नाही. सुदैवाने आधीच्या मध्यमवर्गीय पिढय़ांतला भाबडेपणा, संकोच
या पिढीत कमी होतो आहे.आई-वडिलांचे सल्ले
फाटय़ावर मारून अनेक तरुण स्वत:चा निर्णय घेताहेत. आईवडिलांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला हवे तेच करण्याची सवय मुलामुलींना लागली तर भविष्यात त्यांचे फार भले होईल अशी आजची परिस्थिती आहे.
- सचिन कुंडलकर
आपल्याला पुढे आयुष्यात काय काम करायचे आहे ह्याचा निर्णय आपण लहानपणी नक्की कसा आणि कधी घेतो हे सांगणो फार अवघड असते. भारतात हा निर्णय बहुतांशी वेळा मुलांचे आईवडील घेतात असे दिसते. उदाहरणार्थ, ते डॉक्टर असतात, त्यांनी स्वत:च्या हव्यासापायी भलीमोठी इस्पितळे उभारून ठेवलेली असतात, ‘मग हे सगळे चालवणार कोण?’ असे म्हणून आपोआपच मुलाला डॉक्टर केले जाते. ती डॉक्टर मुले मेडिकल कॉलेज सोडून बाहेर कुठे प्रेमात वगैरे पडायला जात नाहीत, मग सूनही डॉक्टरच येते. असे गाडा भरून डॉक्टर घरात गोळा होतात. तसेच काही ठिकाणी इंजिनिअर्स, काही ठिकाणी बँकर्स. असे सगळे आपोआप विचार न करता चालूच राहते. बहुतेक वेळा आपण जे काम निवडणार आहोत त्याचा आपल्या आयुष्यावर किती दूरगामी आणि खोलवर परिणाम होणार आहे ह्याची जाणीव बहुतेक सुशिक्षित कुटुंबातील व्यक्तींनासुद्धा नसते. आणि मुलींच्या बाबतीत अजूनही न बोललेलेच बरे. भारतातील शहरातल्या बहुतांशी मुली अजूनही सोयीने आणि स्वार्थाने आपल्याला नक्की किती स्वतंत्र व्हायचे आहे हे चाणाक्षपणो ठरवतात. स्वातंत्र्य त्यांना दिले तरी नको असते, कारण स्वतंत्र होणो वगैरे त्यांना ङोपणारे नसते. परावलंबित्वाचे सुख अजूनही त्यांना आवडते आणि कुटुंबव्यवस्थेमुळे परवडतेसुद्धा. फक्त शहरी समाजात स्त्रिया आणि मुलींच्या कोणत्याही निर्णयाविषयी बोलण्याची सोय आपल्या अर्धवट आणि अध्र्याकच्च्या स्त्रीवादाने ठेवलेली नाही. काहीही बोलले तरी मुली एक तर रडून ओरडून कांगावा करतात किंवा हक्क मागत आरडाओरडा करतात. ख:या अर्थाने बुद्धिमान, स्वतंत्र आणि स्वत:ची जबाबदारी घेणा:या स्त्रिया भारतीय शहरी पांढरपेशा समाजातही पन्नासात एक एवढय़ाच असतात.
पैसे कमवण्यापलीकडे आपल्या काम करण्याच्या निर्णयाचा अतिशय मोठा आणि सखोल परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर होत राहणार असतो. आणि दुर्दैवाने आपल्या शिक्षण पद्धतीत निवड कशी करावी हे कधीच शिकवत नाहीत. आपल्या आयुष्याची आपण नीट निवड करणो आणि अतिशय जबाबदारीने आपले निर्णय आपण स्वत: घेणो हे आपल्याला घरामध्ये, शाळेमध्ये कधीही शिकवले जात नाही. ह्याचे मुख्य कारण वयाने ज्येष्ठ व्यक्तींना आपल्यापेक्षा जास्त कळते आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतील असा आपला भाबडा विश्वास. भारतातील नव्वद टक्के लोक आपल्या करिअरचे निर्णय अजूनही स्वत: घेत नाहीत ते ह्यामुळे. कारण घेतलेल्या निर्णयाची किंमत चुकवायची तालीम भारतीय मूल्यव्यवस्था आणि शिक्षणव्यवस्था आपल्याला कधीच देत नाही.
सुदैवाने 1999 सालापासून अर्थकारण आणि तंत्रज्ञान ह्यात मूलगामी बदल भारतात घडायला लागले आणि अर्थव्यवस्था खुली झाली तेव्हापासून ज्येष्ठ वगैरे ज्या व्यक्ती कुटुंबात असतात त्यांना काही केल्या आजूबाजूला हे सगळे काय घडते आहे हे कळेनासे झाले. आणि आपल्या पुढच्या पिढीला कोणताही सल्ला द्यायला ती हुशार आई-वडिलांची पिढी अपात्र ठरली. ह्याने आमच्यासारख्या मध्यमवर्गीय शहरी लोकांचा खूपच फायदा झाला. त्या बाबतीत आमची पिढी नशीबवान म्हणायला हवी. कारण मुक्त अर्थव्यवस्था आल्यावर आमच्या घरादारातील ज्येष्ठ वगैरे मंडळींना कशाचे काही कळेनासे झाले आणि तेच खूप घाबरून, भांबावून बसले. डॉक्टर, इंजिनिअर, सरकारी नोकरी, बँक किंवा किराणा मालाचे दुकान एवढेच माहिती असलेल्या पालकांचे धाबे ह्या काळात दणाणले. वयाचा व शहाणपणाचा कोणताही संबंध नसतो ही मोठी जाणीव सुस्त आणि राजस्वी कुटुंबव्यवस्थेत लोळत पडलेल्या शहरी कुटुंबांना झाली. ह्याचे कारण उघडलेली अर्थव्यवस्थेची दारे, वेगाने बदलते तंत्रज्ञान हे होय. कामाच्या आणि आपले आयुष्य हवे त्या पद्धतीने घालवण्याच्या अनेक संधी या काळाने आम्हाला उपलब्ध करून दिल्या.
मला हे अजून लख्खपणो आठवते आहे की, सरकारी नोक:यांमध्ये जातीनुसार राजकारण आले तेव्हा आमच्या आजूबाजूचे सर्व पुणो अतिशय घाबरले होते. आपण आता पटापट अमेरिकेला जाऊन नोक:या मिळवू, कारण आपल्या देशात आपल्या लोकांच्या बुद्धीला आणि कर्तृत्वाला अजिबात किंमत उरणार नाही, अशी मोठी भीती सगळ्या ब्राrाण कुटुंबांमध्ये त्यावेळी पसरली होती. आणि आज पाहताना हे दिसते की, कुटुंबीयांच्या त्या भीतीने खरोखर आमच्या आजूबाजूची जवळजवळ सर्व मुले आज युरोप आणि अमेरिकेत राहतात. ती अतिशय सुखात आहेत, कर्तृत्ववान आहेत. अनेक जण खूप चांगली कामे करतात. पण हे झाले ते कुटुंबाच्या आणि त्या काळातील जातीय संक्रमणाच्या भीतीने. स्वत:च्या निर्णयाने नाही. कारण त्यावेळी सरकार तुमच्या आयुष्यातील बरेच काही ठरवत असे. आज ती परिस्थिती नाही. कारण त्यानंतर काळाने वेगळीच पावले टाकली आणि सुदैवाने भारतात खासगी क्षेत्र बळकट झाले. बुद्धी आणि कष्टाला भरपूर किंमत मिळाली. सरकारी नोक:यांना हुशार कर्तृत्ववान तरुण मुले विचारेनाशी झाली.
आपली शहरे आणि गावे सोडून अनेक तरुण मुलांनी ह्या काळात स्थलांतर केले आणि सुरक्षितता सोडण्याची सवय त्यांना लागली. अनेकांनी वेगळे कल्पक व्यवसाय सुरू केले. एकाच ठिकाणी वीस-वीस वर्षे काम करून घरी परत येणा:या आमच्या पालकांच्या पिढीला ती सवय कधी नव्हती. त्यांना तेव्हाही आणि आजही हे बदल पचवता आले नाहीत. मराठी कुटुंबामध्ये कधीही पूर्वी न ऐकलेले व्यवसाय आणि कामे तरुण पिढी जोमाने करू लागली आहे.
आमच्या पुण्यात एका डॉक्टरांनी स्वत:चे मोठे देखणो आणि उत्तम सलून सुरू केले, तेव्हा त्यांना लोकांनी अनेक टोमणो मारले. ‘शेवटी लोकांचे केसच कापायचे होते, तर मग डॉक्टर कशाला झालास?’ असे आमचे क्रूर आणि संकुचित वृत्तीचे शहर. अशा टोमणो देणा:या लोकांची बदलत्या काळाने मोठी गोची केली. आणि माणसे स्वत:ला हवे ते काम आणि व्यवसाय करायला मोकळी झाली.
स्पर्धात्मक आणि थोडय़ा वेगवान शहरी जगात जगणा:या आजच्या तरुण पिढीला सुदैवाने स्वत:च्या निर्णयांची काळजी आणि किंमत आहे. मी अनेक वेळा मुलामुलींशी गप्पा मारतो तेव्हा मला लक्षात येते की आधीच्या मध्यमवर्गीय पिढय़ांमध्ये असणारा भाबडेपणा आणि संकोच ह्या पिढीत कमी होत जातो आहे. माङया आजूबाजूच्या अनेक तरुणांनी आई-वडिलांचे सल्ले संपूर्ण फाटय़ावर मारून अनेक असुरक्षित पण आवडती रंगीत कामे निवडली आहेत. ह्या मुलांना आज पैसे कमावण्यात, प्रवास करण्यात, तात्पुरती चार कामे करण्यात आणि ज्याला इंग्रजीमध्ये ‘फिगर आउट करणो’ म्हणतात ते करण्यात काहीही वावगे वाटत नाही. आईवडिलांच्या सूचना ऐकून हल्ली कुणीही आपल्या करिअरचे निर्णय पटकन घेऊन टाकत नाही ही एक फारच आश्वासक गोष्ट आजच्या काळाने साधली आहे. आपण काय काम करायचे आहे हे मुले फार सावकाश ठरवतात किंवा एकदा ठरवलेले मोडून तिशी-पस्तिशीत संपूर्ण नवी कामे करायला घेतात. त्यात यशस्वी होतात किंवा आपटतात. तरी पुढे जातात.
यशस्वी होणो म्हणजे काय? ह्याची व्याख्या आता ह्यापुढील काळात बदललेली आपल्याला दिसेल. आणि ती व्याख्या आधीच्या पिढीच्या व्याख्येपेक्षा फार वेगळी असेल. सुरक्षितता शोधणो म्हणजे यशस्वी होणो ही व्याख्या आता मोडून पडत आहे. तरुण मुलांमध्ये अनावश्यक प्रमाणात पैसे साठवून ठेवण्याचा कल कमी होतो आहे. कमावलेले पैसे तरुण मुले वेगवेगळ्या प्रवासांवर, नवी यंत्रे घेण्यात खर्च करतात. तरुण मुले लग्न उशिरा करतात आणि उगाच मुलेबाळे जन्माला घालायचे ताण स्वत:वर घेत नाहीत. त्यामुळे मोकळेपणाने हवी ती कामे करत, स्वत:चे आयुष्य अजमावत जगण्याची संधी ह्या आजच्या काळात मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झाली आहे. आपल्या आईवडिलांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला हवे तेच करण्याची सवय मुलामुलींना लागली तर त्यांचे पुढील काळात फार भले होईल अशी आजची परिस्थिती आहे.
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)
kundalkar@gmail.com