- विजय दिवाण
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुकामार्गे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातून वाहत जाऊन गोदावरी औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करते. अहमदनगर आणि औरंगाबाद या जिल्ह्याच्या सीमेवर ‘प्रवरा’ ही एक मोठी उपनदी प्रवरासंगम येथे गोदावरीला जोडली जाते. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांतून मार्गक्रमण करीत ती नांदेडकडे जाते. या नदीच्या नाशिक-अहमदनगर ते पैठणपर्यंतच्या प्रवाहाला ‘ऊर्ध्व गोदावरी’ असे म्हटले जाते, तर औरंगाबादपासून नांदेडपर्यंतच्या नदी प्रवाहाला ‘मध्य गोदावरी’ असे म्हणतात. नांदेडच्या पुढे गोदावरी आग्नेय दिशेने वाहत जाऊन तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून मार्गक्रमण करते. गोदावरीच्या या शेवटच्या भागास ‘निम्न गोदावरी’ असे नाव दिले गेलेले आहे.
या तीनही भागांत गोदावरी आणि तिच्या अनेक उपनद्या यांच्या खोऱ्या-उपखोऱ्यांचे ३ लाख १९ हजार ८१० चौरस किलोमीटर्स एवढे प्रचंड मोठे पाणलोट क्षेत्र आहे. ऊर्ध्व गोदावरी प्रभागात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून आणखी काही उपनद्या वाहत येऊन गोदावरी नदीलामिळतात. कोळगंगा, मुळा, म्हाळुंगी, अढळा आणि शिवणा अशी त्या उपनद्यांची नावे आहेत, तसेच मध्य गोदावरी प्रभागात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांत कर्पुरा, सुखना, खाम, दुधना, येळगंगा, ढोरा, कुंडलिका, सिंदफणा, बिंदुसरा, तेरणा, मनार, तीरू, मणेरू, मांजरा, पूर्णा, मन्याड, आसना, सीता, लेंडी आणि वाण या नद्या गोदावरीला येऊन मिळतात.
याच मध्य गोदावरी प्रभागात विदर्भ आणि मध्यप्रदेशातील सातपुडा पर्वतांतून उगम पावून दक्षिणेकडे येणाऱ्या काही नद्यादेखील गोदावरीला जोडल्या जातात. ‘वैनगंगा’ ही नदी प्रथम विदर्भातील ‘वर्धा’ आणि ‘पेनगंगा’ या नद्यांशी जोडली जाते आणि या तीन नद्यांच्या संयुक्त संगमातून ‘प्राणहिता’ नावाची एक नदी तयार होते. मग ही प्राणहिता नदी तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यात काळेश्वरम येथे गोदावरीला जाऊन मिळते. मध्यप्रदेशातच उगम पावणारी ‘इंद्रावती’ ही आणखी एक नदी विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यात सोमनूर येथे गोदावरीत विलीन होते.
निम्न गोदावरी प्रभागात तेलंगणातील ‘मांजरा’ नदी, ओरिसातील ‘सिलेरू’ आणि ‘शबरी’ आणि आंध्रातील ‘तालिपेरू’ या नद्या गोदावरीला मिळतात आणि अखेर आंध्रातील राजमहेंद्री शहराजवळ नरसापुरम येथे ही गोदावरी नदी समुद्राला जाऊन मिळते; परंतु तत्पूर्वी समुद्र किनाऱ्याच्या अलीकडे सुमारे ८० किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीचे विभाजन दोन उपवाहिन्यांमध्ये होते. गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी, अशी या दोन उपवाहिन्यांची नावे आहेत. या गोदावरीची प्राकृतिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि जैविक वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण यापुढील लेखामध्ये पाहूया.
(vijdiw@gmail.com)