- लीना पांढरे
बासूदा.निवांत निजलेल्या नक्षत्राप्रमाणे निद्राधीन असतानाच या दुनियेला अलविदा करून ते गेले. त्यांच्या बहुसंख्य चित्रपटांसाठी गीतं लिहिणारा आणि नुकताच स्वर्गलोकी पधारलेला त्यांचा जिगरी दोस्त शायर योगेशजींनी कदाचित त्यांना पुकारलं असावं. आता जन्नतमध्ये या दोघांची सर्जनशील सहयात्रा बरकरार राहील.‘ब्लिट्झ’ या नियतकालिकात मुंबईमध्ये तब्बल 18 वर्ष व्यंगचित्रकार म्हणून बासू चटर्जी यांनी काम केले. नंतर बासू भट्टाचार्य या सिनेदिग्दर्शकाबरोबर राज कपूर आणि वहिदा रहमान यांच्या तिसरी कसम (1960) या चित्रपटासाठी सहदिग्दर्शक म्हणून दिग्दर्शनाचा अनुभव घेतला आणि हिंदी सिनेमाच्या रुपेरी पडद्याला दंतकथा होऊन राहिलेला बासू चटर्जी हा एक सिनेदिग्दर्शक आणि पटकथालेखक लाभला.हिंदी सिनेमा आणि त्यातील गाणी याशिवाय भारतीय समूहमनाची कल्पनाच करता येऊ शकत नाही. कोट्यवधी मनांवर गारूड करणार्या सिनेमाचे दिग्दर्शन करणे, तो सिनेमा बॉक्सऑफिसवर हिट करणे आणि असं करतानासुद्धा त्या सिनेमाची कलात्मक पातळी टिकवून ठेवणे, तो सवंग आणि हीन होऊ न देणे, दिग्दर्शन, संकलन, छायाचित्रण ध्वनी संयोजन, संगीत, अभिनय, तांत्रिक घटक या सर्व गोष्टी सांभाळण्याचं काम सिनेदिग्दर्शकाचे असते. या गोष्टी बासूदांनी लीलया पेलल्या.1970 आणि 1980 या दशकांमध्ये बॉलीवूडच्या मुख्य धारेतील व्यावसायिक सिनेदिग्दर्शक राजकपूर, यश चोप्रा, व्ही शांताराम यांचा जनमानसावर प्रचंड प्रभाव होता. प्रायोगिक सिनेमाच्या कलात्मक सृष्टीमध्ये बिमल रॉय, तपन सिन्हा, मणी कौल सत्यजित राय, मृणाल सेन, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी आणि नंतरच्या काळात ऋत्विक घटक सारखे सिनेदिग्दर्शक राज्य करीत होते. मराठी चित्रपटसृष्टीत जब्बार पटेल, सत्यदेव दुबे, मल्याळममध्ये अदूर गोपालकृष्णन अभिजनांसाठी प्रायोगिक चित्रपटांची निर्मिती करत होते. या प्रायोगिक चित्रपटांच्या निबिड अरण्यातून विसावा घेण्यासाठी आसरा शोधायचा असेल तर मध्यमवर्गीय आणि महानगरीय जगण्यातून उगवलेल्या सिनेसृष्टीतील तीन बिनीचे शिलेदार म्हणजे बासू भट्टाचार्य, ऋषिकेश मुखर्जी आणि बासू चटर्जी यांचे चित्रपट होते.बासू चटर्जी यांनी टीव्हीच्या छोट्या रुपेरी पडद्यावर साकारलेल्या रजनी आणि व्योमकेश बक्षी या मालिकाही खूप गाजल्या. ‘रजनी’ या मालिकेतील सरकारी कार्यालयातून लाल फितींमध्ये अडकणार्या गोष्टींच्या विरुद्ध संघर्ष करणारी मध्यमवर्गीय गृहिणी प्रिया तेंडुलकर आजही आपल्या स्मरणात आहे.आमच्या पिढीतील मध्यमवर्गीय, सुशिक्षित आणि महानगरीय मंडळींना बासू चटर्जी यांचे चित्रपट स्वत:चे चित्रण वाटले. कारण या चित्रपटांमधील सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक पैस हा आमचाच होता. बासुदांच्या चित्रपटांमध्ये ड्रामा जरूर आहे, पण मेलोड्रामा नाही. त्यांचे चित्रपट मनोरंजन करतात, पण निव्वळ टाईमपास नाही. भावनिक स्थैर्य, प्रेम, विश्वास, खरेपणा, स्वच्छ आणि पारदर्शक जगणं आणि आपल्या रोजच्या जगण्यातील छोट्या-मोठ्या गोष्टी यांचे संदर्भ आल्याने या चित्रपटातील नायक नायिकांमध्ये आम्ही स्वत:चं प्रतिबिंब पाहू शकायचो. मुख्य म्हणजे संपूर्ण कुटुंबियांसह एकत्र थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा आनंदाने बघता यायचा. कुठेही संकोच वाटायचा नाही. व्यावसायिक सिनेमाच्या संदर्भात श्याम बेनेगल यांनी असे म्हटले आहे की ‘बहुतांश हिंदी सिनेमे म्हणजे कपड्यातील पोर्नोग्राफी.’ बासू दांचे बहुसंख्य चित्रपट या रोमॅण्टिक प्रेमकहाण्या होत्या, पण त्या प्रेमकहाण्यांना देवघरातील तेवणार्या नंदादीपाचा स्निग्ध, सोनेरी, शांत करणारा प्रकाश होता.बासूदांच्या मध्यमवर्गीय, मध्यम मार्गाच्या समांतर सिनेमांमध्ये बहुतेकदा सेटिंग हे महानगरातील मुंबई, दिल्ली, कोलकाता अशा शहरांचे असायचे. या सर्व कौटुंबिक कथा होत्या, लग्न आणि प्रेम या दोन गोष्टीभोवती फिरणार्या त्या हलक्याफुलक्या कहाण्या होत्या. अपवाद फक्त त्यांच्या दोन चित्रपटांचा. एक ‘रुका हुआ फैसला’ (1986) आणि ‘कमला की मौत (1989)रोजच्या दैनंदिन जीवनातील घटना रंगीत करून मांडण्याचे कौशल्य त्यांच्यामध्ये होतं. त्यांच्या चित्रपटातील अमोल पालेकर आणि विद्या सिन्हा असे अभिनेते आपल्या पलीकडच्या गल्लीतील घरात राहणारे चिरपरिचित चेहरे वाटायचे. त्यांच्याशी सहज तादात्म्य पावता यायचं. त्यांच्या चित्रपटांचा कॅनव्हास अतिशय र्मयादित होता. एखादा हस्तिदंतांचा छोटासा तुकडा घ्यावा आणि त्याच्यावर कलात्मक पद्धतीने कोरीव काम करत जावं त्याप्रमाणे त्यांनी कौटुंबिक, रोमॅण्टिक प्रेमकहाण्या कॉमिक पद्धतीने आपल्यासमोर सादर केल्या. ते मुळात व्यंगचित्रकार असल्याने उपरोध, नर्म विनोद, रेशमी चिमटे घेत केलेली टीका टिप्पणी सामाजिक विसंगतीवरील त्यांची मल्लिनाथी या सार्यामुळे त्यांचे दिग्दर्शन आणि त्यांच्या पटकथा लेखनाची तुलना अठराव्या शतकाच्या उत्तराधार्तील इंग्लंडमधील प्रसिद्ध कादंबरीकार ‘प्राइड अँण्ड प्रेज्युडीस’ या कादंबरीच्या लेखिका कौटुंबिक वतुर्ळातील स्त्री-पुरुष प्रेम कहाण्या, लग्न यांचे लोभसवाणे चित्रण करणार्या जेन ऑस्टीन यांच्या शैलीशी करावीशी वाटते.बासू चटर्जींनी अमोल पालेकर, विद्या सिन्हा यांच्यासह स्टार म्हणून गाजलेल्या मिथुन चक्रवर्ती, विनोद मेहरा, जितेंद्र आणि मौसमी चटर्जी, देवानंद आणि टीना मुनीम, राजेश खन्ना आणि नीतू सिंग, धर्मेंद्र आणि हेमामालिनी, इतकंच काय, अमिताभ बच्चन यांना घेऊनही चित्रपट दिग्दर्शित केलेले आहेत. त्यांनी काही बंगाली फिल्मही केलेल्या आहेत. त्यांच्या हिंदी चित्रपटांनासुद्धा बंगालच्या भूमीचा हिरवागार निसर्गस्पर्श तसेच तिथले रितीरिवाज, वस्त्रप्रावरणे, परंपरा यांचा गंध लाभलेला आहे. उस पार, छोटी सी बात, चित्तचोर, खट्टामिठा, प्रियतमा, मनपसंद, हमारी बहू अल्का, चमेली की शादी हे त्यांचे गाजलेले चित्रपट.त्यांचा ‘स्वामी’ हा गिरीश कर्नाड आणि शबाना आजमी यांनी प्रमुख भूमिका केलेला सिनेमा आठवतो? त्यातील येसुदासचे ‘का करू सजनी आये ना बालम’ हे सूर आजही कानात गुंजत राहतात. बंगालच्या खेड्यातील वातावरण. कौलारू घरं, नारळाची बनं, घराच्यामागील पारदर्शक निळ्याभोर पाण्यानं भरलेली तळी, फुललेले गुलमोहर आणि बहावा, मधेच रिमझिमणारा पाऊस, वळणावळणाच्या वाटांवर पडलेले फुलांचे सडे आणि त्यात बहराला आलेलं सौदामिनी आणि नरेंद्रमधील अडनिड्या वयातील तारुण्यसुलभ आकर्षण. पण सौदामिनीचं लग्न होते घनश्यामशी. घनश्यामचं बंगाली एकत्र कुटुंब. त्यातील सौदामिनीची घुसमट. तिला घेऊन जायला आलेला तिचा पूर्वायुष्यातील प्रियकर नरेंद्र, पण चित्रपटाच्या शेवटी सौदामिनी (शबाना) नकळत्या वयातील वेडं आकर्षण असणार्या नरेंद्रच्या नात्याकडे पाठ फिरवून आपला पती घनश्याम (गिरीश कर्नाड) याच्याबरोबर आपल्या घरी परतते.बासुदांच्या ‘चित्तचोर’मध्ये झरीना वहाब आणि अमोल पालेकर यांच्या फर्मास भूमिका आहेत. गीताचं लग्न तिच्या बहिणीने एका इंजिनीयरशी ठरवलेले असते, पण तिचे वडील दुसर्याच एका माणसाला घरी घेऊन येतात आणि तोच गीताचं चित्त चोरतो. ‘आज से पहले आज से ज्यादा’, ‘जब दीप जले आना’, ‘गोरी तेरा गाव बडा प्यारा’ ही अविस्मरणीय गाणी निसर्गरम्य वातावरणात चित्रित केलेली आहेत.बासूदांच्या ‘छोटीसी बात’मध्ये अरुण (अमोल पालेकर) प्रभा (विद्या सिन्हा) बस स्टॉपवर भेटल्यावर प्रथमदर्शनीच तिच्या प्रेमात पडलेला आहे. पण प्रेम व्यक्त करण्याचं धाडस त्याच्यामध्ये नाही. अरुणमध्ये आत्मविश्वास जागवण्याचं काम अशोक कुमार यांनी केलेलं आहे. ‘जानेमन जानेमन तेरे दो नयन’ हे या चित्रपटातील गीत गाजलेलं आहे.‘रजनीगंधा’ हा चित्रपट दिल्ली आणि मुंबई या दोन ठिकाणी घडतो. या चित्रपटाची नायिका दीपा (विद्या सिन्हा) पीएचडी करते आहे. ती तिच्या कॉलेजातला मित्र संजयच्या (अमोल पालेकर) प्रेमात पडलेली आहे आणि त्याच्याशी लग्न करायचा विचार करते आहे, पण अचानक तिला तिच्या पूवार्युष्यातील प्रियकर नवीन भेटतो आणि मग पुन्हा बासुदांचा आवडता प्रेमाचा त्रिकोण येथे रंगवलेला आहे. सलिल चौधरींचं मधुर संगीत आणि योगेशजींचे शब्द ‘रजनीगंधा फुल तुम्हारे, महके यूं ही जीवन में’.‘खट्टा मीठा’ या धमाल विनोदी चित्रपटात होमी हा पारशी विधूर आपल्या चार मुलांसह नर्गिस या एक मुलगी आणि दोन मुलगे असणार्या विधवेशी लग्न करतो आणि मग या दोन कुटुंबात एकमेकांशी जुळवून घेताना उडणारी धमाल या चित्रपटात रंगवलेली आहे.‘बातो बातो मे’ या चित्रपटात मुंबईतील मध्यमवर्गीय ख्रिस्ती समाजाचं वास्तवदर्शी देखणं चित्र रेखाटलेलं आहे. बांद्रा ते चर्चगेट या लोकलमधून प्रवास करताना नॅन्सी (टीना मुनीम) टोनी (अमोल पालेकर) याच्या प्रेमात पडलेली आहे. टोनी लग्नाला फारसा तयार नाही. नॅन्सीचा बालपणीचा मित्र हेन्री तिच्यावर जीव जडवून बसलेला आहे. त्याच्याकडे जावं का, असा विचार नाईलाजाने ती करते आहे, पण शेवटी टोनी आणि नॅन्सी यांच्या चर्चमधील विवाह सोहळ्याने चित्रपटाचा सुखांत झालेला आहे. यातील ‘उठे सबके कदम देखो रम पम पम’ हे ठेका धरायला लावणारं गाणं आजही अनेकांच्या स्मरणात असेल.‘चमेली की शादी’ या चित्रपटात चंदनदास (अनिल कपूर) चमेलीच्या (अमृता सिंग ) प्रेमात पडतो. त्यांच्या जाती वेगळ्या असल्यामुळे घरातील लोकांचा सक्त विरोध असतो, पण तरीही शेवटी ते कसे एकत्र येतात याची दिलखुलास प्रेम कहाणी म्हणजे हा चित्रपट. मोहमयी आणि नशिल्या चित्रपटांच्या मुलखातून सफर करताना घटकाभर विसावण्यासाठी असणारी आनंदसराई म्हणजे बासुदांचे सिनेमे. वैशाखाच्या रणरणत्या उन्हात भेगाळलेली भुई तुडवून आल्यावर शेताच्या बांधावर एक डेरेदार झाड असावं. झाडाच्या खरबरीत बुंध्याला आपली घामेजलेली पाठ टेकवून निवांत बसल्यावर पुढ्यात चकचकीत पितळेच्या गडव्यातून माठातलं थंडगार पाणी आणि पिवळाधमक गुळाचा खडा यावा आणि मग एक एक पाण्याचा घोट घशातून खाली उतरताना सारी तलखली मिटून जावी. बस्स. असंच काहीसं वाटतं बासूदांचा सिनेमा पाहिल्यावर..
pandhareleena@gmail.com(लेखिका इंग्रजी भाषेच्या अभ्यासक आणि साहित्य आस्वादक आहेत.)