- अमेय गोगटेगेल्याच्या गेल्या रविवारी गुरुपौर्णिमा साजरी झाली. आपल्यासारख्या मातीच्या गोळ्याला आकार देणाऱ्या, आपली जडणघडण करणाऱ्या, जगण्याचं तंत्र आणि यशाचा मंत्र शिकवणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. गेल्या काही वर्षांपासून या दिवशी घरातील, शाळा-कॉलेजांमधील गुरूंसोबतच ‘गुगल गुरू’ला वंदन करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. खरं तर, त्याचं कारण वेगळं सांगायची गरज नाही. ‘थ्री इडियट्स’ सिनेमात रँचो जसं म्हणतो की, ‘पेन की नीब से लेके पँट की झिप तक... हम मशिनों सें घिरे हुए है...’, तसंच काहीसं गेल्या काही वर्षांत आपलं आयुष्य गुगलने घेरलं आहे, असं म्हणायला हरकत नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरं कुणाकडे आहेत?, या प्रश्नावर गेल्या पिढीतील बहुतांश लोक आकाशाकडे बोट दाखवत. आजची मुलं झटक्यात ‘गुगल’ असं उत्तर देतील. कारण, एखाद्या शब्दांचं स्पेलिंग हवं असो की प्रोजेक्ट पूर्ण करायचं असो; ती सरळ ‘गुगल’ करतात. हे चूक की बरोबर, हा चर्चेचा विषय होऊ शकतो. पण, कोरोना लॉकडाऊनमुळे सुरू झालेलं ई-लर्निंग, डिजिटल शाळा अशाच सुरू राहिल्या, तर भविष्यात आपल्याकडे ‘गुगलपौर्णिमा’ही साजरी होऊ शकेल. हे सगळं ‘गुगल माहात्म्य’ सांगण्यामागचा हेतू म्हणजे सरत्या आठवड्यातील एक ठळक बातमी. आपल्याला सगळ्या जगाची माहिती चुटकीसरशी देणारी आणि आपल्याबद्दची सगळी माहिती (डेटा) तितक्याच वेगाने घेणारी गुगल कंपनी आता भारतात ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था पार कोलमडली असताना, गुगलची ही घोषणा म्हणजे वाळवंटात पाणी सापडण्यासारखंच झालंय. पण, हे मृगजळ तर ठरणार नाही ना, अशी शंकाही बऱ्याच जणांच्या मनात आहे. ७५ हजार कोटींपैकी ३३,७३७ कोटी रुपये गुगलने रिलायन्स जिओमध्ये गुंतवल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. पण, गुगल ही काही सेवाभावी संस्था नाही. भारतासोबतचा करार हा त्यांच्यासाठी बिझनेस आहे, धंद्याचा भाग आहे. स्वाभाविकच, १०० नाही २०० टक्के ते त्यांचा फायदा बघणारच. त्यामुळे आपणही या गुंतवणुकीकडे भावनिकदृष्ट्या न बघता व्यावहारिक दृष्टिकोनातून बघितलं तर त्यातून बरंच काही साध्य करू शकतो; तेही फारशी किंमत न मोजता!अमेरिकेतील कॉम्प्युटर तज्ज्ञ अँलन के यांचं एक वाक्य आहे. ‘पीपल हू आर रिअली सिरीअस अबाउट सॉफ्टवेअर शुड मेक देअर ओन हार्डवेअर’! गुगलचा विचार केल्यास सॉफ्टवेअरमध्ये ‘बाप’ असलेल्या या कंपनीसाठी हार्डवेअर बनवणं हा ‘ताप’ झाल्याचं पाहायला मिळतं. गुगल अँण्ड्रॉइडवर चालणारे फोन आपण वापरतो; पण ग्राहकांची नस ओळखून तसे हॅण्डसेट बनवणं काही गुगलला जमलेलं नाही. ती बाजारपेठ चिनी ड्रॅगनने अक्षरश: खाऊन टाकली आहे. पण, कोरोनामुळे चीन अनेक मोठय़ा देशांच्या ‘बॅड बुक’मध्ये गेलाय. गलवान खोर्यातील चकमकीनंतर भारतातही चीनविरोधात तीव्र रोष आहे. चिनी अँपवर सरकारनेच बंदी घातली आहे. हे सगळं चित्र लक्षात घेऊन, आधी फेसबुकनं आणि आता गुगलनं भारतात नव्याने घसघशीत गुंतवणूक केली आहे. कारण, सगळ्यात मोठी बाजारपेठ, तरुणांचा देश आणि ‘आत्मनिर्भर’ होण्याचे वेध या तीनही गोष्टी त्यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत आणि आपल्यासाठीही.
..पण जिओच का?मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, गुगल भारतात गुंतवणूक करताहेत, याचा आनंदच आहे; पण ते सगळे जिओकडेच का जाताहेत, जिओला असं काय सोनं लागलंय, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. या आणि अशाच काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आर्थिक घडामोडींचे अभ्यासक कौस्तुभ जोशी, टेक्नॉलॉजी पॉलिसी, डिजिटल पेमेंट्स सिस्टम्स आणि टेलिकम्युनिकेशन्समधील बारकावे जाणणारे ऑब्र्जव्हर रिसर्च फाउण्डेशनचे असोसिएट फेलो शशीधर के. जे. आणि माहिती-तंत्रज्ञान विषयातील तज्ज्ञ, प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांची यासंदर्भात मतं जाणून घेतली.ग्राहकांची- त्यातही भारतीय मोबाइल यूर्जसची नस जिओनं अगदी नेमकी पकडली आहे. गेल्या दोन वर्षात त्यांनी दूरसंवाद क्षेत्रात जे ‘करून दाखवलं’, ती क्षमता, तो आवाका पाहूनच या परदेशी कंपन्या जिओमध्ये गुंतवणूक करत असल्याचं कौस्तुभ जोशी आणि शशीधर यांनी सांगितलं. ‘एसटीडी फोन, पीसीओ बूथ ते फोर जी तंत्रज्ञान ही झेप आपण 25 वर्षात घेतली. मात्र मागील दहा वर्षात दूरसंवाद आणि तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक स्तरावर जे बदल घडलेत, त्या वेगाशी जुळवून घेण्यासाठी लागणारं तंत्रज्ञान मिळणं आव्हानच आहे आणि ते तंत्रज्ञान सर्वसामान्य भारतीयांना परवडेल अशा दरात उपलब्ध करणं त्याहून मोठं आव्हान आहे. फोर जी सेवा सुरुवातीच्या काळात महाग होती; पण, जिओने हे सगळे आयाम बदलून टाकले आणि दूरसंवाद क्षेत्रातील किमतीचे गणित पालटले. ‘संपर्क साधण्यासाठी पैसे’ याऐवजी ‘इंटरनेट वापरण्यासाठी पैसे’ हे नवे गणित रूढ करण्यात जिओचा वाटा मोठा आहे’, याकडे कौस्तुभ यांनी लक्ष वेधलं.फेसबुकच्या ‘मन की बात’भारतात 60 कोटींहून अधिक मोबाइल इंटरनेट यूर्जस आहेत. त्यांनी आपल्याच प्लॅटफॉर्मवर टिकून राहावं यासाठी सगळ्यांची धडपड आहे. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग फेसबुक, गुगलला करायचेत. ते जिओचा प्लॅटफॉर्म वापरून करता येतील, असं त्यांना वाटतंय, हे शशीधर यांनी उदाहरण देत स्पष्ट केलं.
भारतात अनेक छोटे उद्योजक व्हॉट्सअँपवरून व्यवसाय करतात. फोटो आणि त्याची किंमत ग्रुपवर टाकली जाते, इच्छुक मंडळी ऑर्डर देतात आणि मग पेमेंट होतं, गुगल पे किंवा पेटीएमवरून. त्याऐवजी त्यांनी व्हॉट्सअँप पे सेवेचाच वापर करावा, यासाठी फेसबुक प्रय}शील आहे. जिओकडे यूजर बेस तयार आहे. फाइव्ह जीचा प्लॅनही आहे. म्हणूनच, व्यापार्याला व्हॉट्सअँपशी जोडण्यासाठी त्यांना जिओची साथ हवीय. त्यातून यूर्जस वाढतील, जास्तीत जास्त नेटवर्क वापरतील आणि जिओचाही फायदा होईल, असं ‘नफ्याचं गणित’ शशीधर यांनी मांडलं. इतकंच नव्हे तर, इंटेल आणि क्वालकॉम या कंपन्यांनीही जिओशी भागीदारी केलीय. भविष्यात जिओ सिम किंवा चिप (कनेक्शन) असलेला लॅपटॉपही बाजारात येऊ शकतो. अर्थातच, या शर्यतीत आणखीही कंपन्या उतरतील आणि ही स्पर्धात्मकता ग्राहकांसाठी फायदेशीर ठरेल, याकडे कौस्तुभ जोशींनी लक्ष वेधलं.डेटाचं काय होणार? ‘डेटा इज न्यू ऑइल’, असं म्हटलं जातं. आपण इंटरनेटवर जे जे पाहतो, सर्च करतो, फोटो अपलोड करतो, तो सगळा डेटा, आपल्या सवयी, आवडी-निवडी अशी सगळी माहिती कंपन्या जमवतात आणि ती जाहिरातदारांना विकून प्रचंड पैसे कमावतात. आता गुगल, फेसबुक आणि जिओ एकत्र येताहेत, डिजिटल क्रांतीची घोषणा करताहेत, अशा वेळी प्रचंड डेटा जमवणं, विकणं, व्यवसायासाठी वापरणं हाही त्यांचा हेतू आहेच. अशावेळी ‘डेटा प्रोटेक्शन बिल’ मंजूर होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती सरकारची जबाबदारी आहे. खासकरून यूजरच्या खासगी माहितीच्या सुरक्षेबाबत एक ठाम आणि स्पष्ट कायदाच असायला हवा, असं शशीधर यांनी नमूद केलं.गुगलनं भारतात मोठी गुंतवणूक केली म्हणून फार हुरळून न जाता, त्याच्या परिणामांकडेही बघितलं पाहिजे. यातून खासगी संस्थांचंच उखळ पांढरं होणार असेल, विषमता आणि एकाधिकारशाही वाढीस लागणार असेल, तर ‘डिजिटल क्रांती’ची ही घोषणा फसवी ठरू शकते.
...ती खरी डिजिटल क्रांती! - अच्युत गोडबोले गुगलने एकूण गुंतवणुकीपैकी 40 टक्क्यांहून अधिक रक्कम एकट्या जिओमध्ये गुंतवली आहे. त्यापैकी बराचसा वाटा फाइव्ह जी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी, फीचर फोनवरून ग्राहकांना स्मार्टफोनकडे वळवण्यासाठी वापरण्याचा रिलायन्सचा विचार आहे. फाइव्ह जी तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड प्रचंड वाढेल. ‘बफरिंग’ इतिहासजमा होईल. स्वाभाविकच, त्यासाठी प्रचंड मोठय़ा प्रमाणावर इन्फ्रास्ट्रर उभं करावं लागेल. काही लाख कोटींची गुंतवणूक लागेल. त्यामुळे गुगलने जिओमध्ये गुंतवणूक करू नये, असं अजिबात म्हणणं नाही. पण, गुगल, फेसबुकने एका कंपनीत गुंतवणूक न देता भारत सरकारला सहकार्य केलं असतं तर अधिक आनंद झाला असता. कारण, शिक्षण, आरोग्य आणि शेती या क्षेत्रांमध्ये भारतात मोठय़ा प्रमाणावर काम होण्याची गरज आहे. शेतीच्या बाबतीत देशभरातील जमिनीचं परीक्षण, कोणतं पीक घ्यायचं याबाबत शेतकर्यांना मार्गदर्शन, सिंचन व्यवस्थापन, विपणन, साठवणूक व्यवस्थापन यासारख्या गोष्टी व्हायला हव्यात. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सुसज्ज व्हायला हवी. वीज, पाणी, रस्ते, सार्वजनिक वाहतूक, स्वस्त टिकाऊ घरं, या सगळ्याचं एक नेटवर्क बांधलं जाणं खूप गरजेचं आहे. शिक्षणामध्ये नवे प्रयोग व्हायला हवेत. तंत्रज्ञानाचा वापर सामान्य माणसाच्या फायद्यासाठीही झाला, तर ती खरी डिजिटल क्रांती ठरेल. त्यात फाइव्ह जीचा फायदा झाला तर सोने पे सुहागाच!
amey.gogate@gmail.com(लेखक लोकमत डॉट कॉमचे डेप्युटी एडिटर आहेत.)