पुणे : आषाढ म्हणजे ढगांच्या काळ्या पुजक्यांआडून गर्जना करत धोधो बरसणारा पाऊस आणि कालिदास यांची अभिजात साहित्यकृती ‘मेघदूत’ यांची आठवण येतेच. यात निसर्गाबद्दलचं, सृष्टीबद्दलचं प्रेम जाणवतं. कालिदासाच्या यक्षाला आषाढसरींचा शिडकावा घेत सुचललं हे प्रेमकाव्य आहे. सोमवार (दि.२२) आषाढाचा पहिला दिवस असून, त्यानिमित्त कवी कालिदास यांचा दिन म्हणून साजरा केला जातो. कवी कालिदास भावनासौंदर्याचा उपासक होता, तसाच तो निसर्गसौंदर्याचा निस्सिम भक्त होता. त्याने आपल्या काव्यात निसर्ग आणि भावना यांचा मनोहारी समन्वय साधून अतिशय सुंदर वर्णन केले आहे. निसर्ग हा मानवी भावनांचा कशी साथ देतो याची मनमोहक चित्रे ‘शाकुंतल’ नाटकात आढळतात. या नाटकाचा प्रारंभ श्रृंगाराने होतो आणि शेवट शांतरसाने केला केला आहे. कालिदास हा वसंतवेडा कवी होता. ‘रघुवंशा’मध्ये ऋतुराज वसंताच्या आगमनाने वनराईच्या रंगरूपातील बदल अतिशय सुक्ष्मरूपाने टिपल्याचे दिसून येते. आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्र्चिष्टसानुं वप्रकिडापरिणतगजप्रेक्षनीयं ददर्श !! कालिदासांची प्रतिभाशक्तीचे कार्य पाहूनच आषाढाचा पहिला दिवस कवी कालिदान दिन म्हणून साजरा केला जातो. प्रेमाचे संदेश वहन करणारा ढग आहे. मेघदूत काव्यातील यक्ष रामगिरीवर एका शापामुळे एक वर्षभर पत्नीपासून दिवस कंठत आहे. शापामुळे त्याच्या सिध्दीचा नाश झालेल्याने तो कोणत्याही प्रकारे पत्नीला भेटू शकत नाही. तेव्हा हत्तीसारख्या ढगाला तो संदेशवाहक बनवून आपला प्रेमसंदेश आणि विरहवेदना पत्नी कांन्तापर्यंत पोचविण्यासाठी मेघदूत हे काव्य लिहिले आहे. संस्कृत ललित साहित्याचे मुकुटमणी, महाकवी कालिदास यांच्या वाड्:मयातील अप्रतिम, चपखल निसर्गवर्णने, निसर्ग आणि मानव यांचे त्याने साधलेले तादात्म्य अप्रतिम आहे. संस्कृत साहित्यातही त्याचा हात धरू शकणारा कोणी नाही. अनेक कलागुणांमुळे कालिदासाच्या साहित्यकृतींनी जागतिक अक्षर-वाड्:मयामध्ये मानाचे पान पटकावलेले आहे. हिमालय वनश्रीचे बहारीचे वर्णन करताना कुमारसम्भवात - कपोलकण्डू करिभिर्विनेतुं विघट्टितानां सरलद्रुमाणाम् !यत्र स्युतक्षीरतया प्रसूत: सानुनि गंध: सुरभीकरोति !!असे पाईन वृक्षांचे, सूचीपर्णी जंगलाचे आजही तंतोतं लागू पडणारे वर्णन आले आहे. गाल घाजविण्यासाठी सरल वृक्षांवर हत्ती ते घासतात, त्यामुळे राळयुक्त रस पाझरून आसमंत दरवळतो असा हिमालय ! ऋतुसंहारमध्ये वसंतऋतूतील विंध्यभूमीचे वर्णन करताना कालिदास म्हणतो की, लाल फुलांनी बहरलेल्या पळसाच्या झाडांमुळे भूमी एखाद्या नव्या नवरीप्रमाणे तांबडे वस्त्र परिधान केल्यासारखी शोभते. ‘सद्यो वसंतसमये हि समाचितेयं रक्तांशुका नववधूरिव भाति भूमि:! शाकुंतला नाटक तर कालिदासाच्या उत्तुंग प्रतिभेचा सर्वोच्च आविष्कारच मानला जातो. खजुराचा वीट आला म्हणजे चिंच खावी असे वाटते ! अशा साध्यासुध्या उद्गारांची पदोपदी पखरण आढळते. ‘शकुन्तला पतिगृहं याति’ या विश्वविख्यात भागात शकुंतला, माधवी लतासारख्या वनस्पती आणि हरणाचे कोवळे पाडस यांच्यामधील मनोज्ञ भावविश्व मुळातूनच वाचावे आणि आनंदाचे डोलावे असेच, केवळ अप्रतिम आहे, अशी माहिती ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांनी दिली. ==============
नागपूर येथील रामटेक डोंगरावरून थेट मेघाला हिमालयातील घरी निरोप पाठविण्याचे वर्णन ‘मेघदूत’ मध्ये आहे. नैऋत्याकडून ईशान्याकडे ढगांचा मार्ग आहे. हा मार्गच कवी कालिदास यांनी मेधदूतामध्य वर्णन केला आहे. तेव्हा प्रवासाची कोणतेही साधने नसताना नागपूर ते हिमालय या दरम्याची आकाशातून दिसणारी झाडे, पर्वत यांचे वर्णन कालिदास यांनी केले आहे. कुठे कोणते वृक्ष असतील, मध्यप्रदेशातील मेखला पर्वताचा उल्लेख देऊन तिथून डोंगराच्या मधून जा, असा मार्ग मेधदूत मध्ये सांगितला आहे. असा निसर्गकवी ज्याला, वनस्पतींचे आणि भूगोलाचे ज्ञान होते, अजून तरी झालेला नाही. - प्रा. श्री. द. महाजन, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ ==============
‘मेघदूत’मधील मार्गावरून प्रवास पुण्यातील डॉ. एस. भावे हे सैन्यदलासाठी काम करायचे. तेव्हा त्यांना ‘मेघदूत’ मधील मार्गावरून विमानाने जाण्याची इच्छा झाली होती. सुमारे २५ -३० वर्षांपुर्वीची ही गोष्ट असेल. त्यानूसार ते गेले होते. तर त्यांना ‘मेघदूत’मधील प्रत्येक गोष्टीचा अनुभव आला. जमिनीवरून दोन किलोमीटर उंच त्या काळी कवी कालिदास यांना कसे दिसले असेल आणि त्याचे वर्णन केले असेल, याची कल्पनाच करवत नाही. या अनुभवावर डॉ. भावे पुस्तक देखील लिहिणार होते, अशी आठवण प्रा. श्री. द. महाजन यांनी सांगितली.
====================