- स्नेहा केतकर
इराण हा देश आम्हाला सर्व अंगांनी भिडला. इराणशी माझा जसजसा अधिकाधिक संबंध येत गेला, इराणचे आणि तिथल्या माणसांचे एक वेगळेच चित्र माझ्यासमोर उलगडत गेले. पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांनी उभ्या केलेल्या चित्रापेक्षा हे चित्र अगदी वेगळे होते. मला ते कधीच भयावह वाटले नाही. इराणी माणसाची संवेदनशील, सुसंस्कृत बाजू त्यातून आम्हाला दिसली.
इराणविषयी अगोदर माझ्या मनात बरेच गैरसमज होते. पण मी स्वत:च जेव्हा प्रत्यक्ष इराणमध्ये राहायला गेले, त्यावेळी एक एक करत अनेक गैरसमज हळूहळू गळत गेले आणि इराणची एक वेगळीच, नवी बाजू मला दिसली. भारत आणि भारतीयांच्या संदर्भात निदान मला तरी ही बाजू फारच विलोभनीय वाटली.
भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर इराणमध्ये ५० टक्के भागात पर्वतराजी आहे, २५ टक्के भागात वाळवंट आहे आणि उरलेल्या २५ टक्के भागातच ते थोडीफार शेती करू शकतात. पूर्वीपासूनच इराण हा स्पाइस रूट आणि सिल्क रूट या व्यापारी मार्गावरील एक महत्त्वाचा देश होता. मसाल्याचे व्यापारी व चीनमधून येणारे व्यापारी पर्शियामार्गे इस्तंबूलसाठी रवाना होत असत. इराणमधील इस्फाहन, तब्रिझ, शिराझ या जुन्या राजधान्यांच्या ठिकाणी मोठी व्यापारी केंद्रे होती.
भारत हा जसा शेतीप्रधान देश आहे, तसा पर्शिया/इराण हा मुख्यत्वे व्यापारप्रधान देश होता. यामुळेच इराणी माणूस बोलण्यात अतिशय चतुर असतो. लहानपणापासून ही हुशारी त्यांच्यात बाणवण्याचा प्रयत्न केला जातो. आपण लहानपणी ज्या गोष्टी वाचायचो, त्यात नेहमी शहाण्या, कष्टाळू, प्रामाणिक मुलाला बक्षीस मिळायचे. तसेच इराणमधील गोष्टीत चतुर मुलाला बक्षीस मिळायचे. या चातुर्याला फारसी भाषेत झेरँग असे म्हणतात. जगण्यासाठी झेरँग असावेच लागते अशी त्यांची ठाम समजूत आहे.
इराणमध्ये एक वैशिष्ट्य मला जाणवले ते म्हणजे त्यांचे सगळे सण, समारंभ ते आपल्या कुटुंबासमवेत साजरे करतात. पण मित्र-मैत्रिणींना एकत्र बोलावणे, जेवणखाण करणे यापासून मात्र ते कायमच अलिप्त दिसले. आम्ही इराणमध्ये असताना, आमच्या अनेक इराणी मित्र-मैत्रिणींना घरी बोलवायचो, जेवायला बोलवायचो. पण आम्हाला मात्र कोणीही त्यांच्या घरी आवर्जून बोलावले नाही. याला अपवाद आमचे घरमालक. त्यांच्या घरी आम्ही जायचो आणि काही खास जेवायला केले तर आमच्या घरीही मालकीणबाई जरूर पाठवायच्या. इतर इराणी दर आठवड्याला आपल्या आई-वडिलांकडे किंवा सासू-सासऱ्यांकडे जातात व तिथेच सुटी घालवतात. बागेत गेले तरी इराणी माणूस अनेक नातेवाइकांसोबतच जातो.
मुळातील पर्शियन माणूस हा अतिशय कलाप्रेमी, संगीतप्रेमी होता. पण मुस्लिमांनी त्यांच्यावर आक्रमण केल्यावर त्यांच्या संगीत, नृत्य, नाट्य ह्या कलांवर, अभिव्यक्तीवरही बंधने आली. त्यामुळेच की काय, इराणने जगाला उत्तमोत्तम कवी दिले. कारण कविता करण्यावर बंधने नव्हती. हाफिज, सादी, उमर खय्याम, रुमी, फिरदोसी, आमिर खुस्रो हे कवी आजही लोकप्रिय आहेत. आपली प्रतिमा बाहेरच्या जगात थोडी मलीन झाली आहे याचाही त्यांना फार त्रास होतो. अरब आणि नंतर पश्चिमी देशांनी आपल्यावर अन्याय केला अशी त्यांची भावना आहे. गेल्या पन्नास वर्षांत अमेरिकन आणि ब्रिटिश लोकांनी आपल्या देशाला लुटले, आपल्या देशाची संपत्ती असलेल्या तेल साठ्यांवर कब्जा करून भरपूर पैसे मिळवले आणि गेल्या तीस-पस्तीस वर्षांत आर्थिक निर्बंध लावून इराणची नाकेबंदी केली याचा राग त्यांच्या मनात आहे.
भारताबद्दल इराणी माणसाला खास प्रेम वाटते. भारताला ते बहुत करून 'हिंदुस्तान'च म्हणतात. भारताच्या समृद्ध इतिहासाची त्यांना माहिती आहे. त्यांच्या ज्वेलरी म्युझियममधील बऱ्याचशा गोष्टी भारतातून लुटून आणल्या आहेत, हे ते खिलाडूपणाने, काहीशा मिस्कीलपणे मान्य करतात. बाराशेहून अधिक वर्षांपूर्वी भारतात पळून आलेल्या पर्शियन लोकांनी झोराष्ट्रीयन धर्म इथे जिवंत ठेवला याची कृतज्ञ जाणीव त्यांना आहे. त्यामुळेच हिंदूंविषयी, हिंदू धर्माविषयी इराणी/पर्शियन माणसाला आदर वाटतो. हा आदर सध्याच्या परिस्थितीत अधिकच वाढला आहे. भारताने अमेरिकेच्या दबावाखाली न येता, इराणशी राजकीय संबंध कायम ठेवले याचा त्यांना आनंद वाटतो. इराणकडून आपण तेल विकत घेत होतो. व्यापारी संबंधही तोडले नाहीत. भारत स्वतंत्र परराष्ट्रनीती जोपासत आहे, या गोष्टीचेही त्यांना कौतुक वाटते.
इराणी माणूस अतिशय प्रेमळ आहे. वागायला गोड आहे. मात्र या गोडपणाचा खाण्यात अतिरेक झाला आहे. चवीढवीने खाणाऱ्या माणसाचे इथे हाल होतात. कोणत्याही पदार्थाला इथे फारशी चव नसते. अगदी हिरव्या मिरच्याही इथे चक्क गोड असतात. परदेशात सर्वत्र आढळणारी भारतीय दुकानेही इथे जवळ जवळ नाहीतच. इराण हा देश आम्हाला असा सर्व अंगांनी भिडला. मला आता तो जवळचा वाटायला लागलेला आहे. आपल्या इतिहासातीलही अनेक संदर्भ इराणी (तेव्हाच्या पर्शियाशी) जोडलेले आहेत. सम्राट अकबराचा ‘खान-ए-खाना’ (कमांडर इन चीफ) बेहराम खान हा पर्शियन होता. हुमायून जेव्हा हिंदुस्तानात परतला, तेव्हा त्याच्यासोबत अनेक पर्शियन सरदार, कारागीर आणि कामगारही आले होते. आपण ज्याला मुघल वास्तुकला म्हणतो, ती खरी तर पर्शियन वास्तुकला म्हणायला हवी. इराणमधल्या अनेक इमारती पाहत असताना मला सतत ताजमहाल, हुमायूनची कबर, सिकंदरा, जामा मशीद या आपल्याकडच्या देखण्या इमारतींची आठवण येत होती. पर्शियन वास्तुकलेचा कळस भारतातील या इमारतींत साधला गेला असावा असं वाटतं. आपला ताजमहाल ज्या कारागिरांनी बांधला, त्यातही अनेक जण पर्शियन असावेत. ‘ताजमहाल’च्या वास्तुविशारदाचे नावही ‘शिराझी’ होते, असे वाचलेले आठवतेय.
इराणमधल्या वास्तव्यात मला आणि माझा नवरा संजयला अनेक जण वारंवार विचारायचे, ‘तुम्ही हिंदुस्तानातून (भारत हा शब्द आम्हाला तिथे एकदाही ऐकायला मिळाला नाही) आलात का?’
‘हिंदुस्तान’बद्दल तिथे सगळ्यांना आपुलकी आहे. कारण सातव्या शतकात पर्शियात झालेल्या इस्लामच्या आक्रमणापासून सुटका करून घेण्यासाठी अनेक पर्शियन भारतात पळून आले होते. भारतात त्यांना त्यांचा धर्म पाळता आला होता. आजही इथल्या पारसी समाजात जुन्या सर्व चालीरीती, सणवार पाळले जातात. आजच्या इराणी लोकांना या गोष्टीचीही कृतज्ञता वाटते. भारताच्या वाटचालीत पारसी लोकांनीही महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. जमशेदजी टाटा आणि जे.आर.डी. टाटा ही त्यातली प्रमुख नावे. अडीच हजार वर्षांपूर्वीही पर्सेपोलिस येथे सम्राट सायरसने गुलामांऐवजी कामगारांकडून काम करवून घेतले होते. त्यांना त्यांच्या कामाप्रमाणे आणि कौशल्याप्रमाणे वेतन दिले जायचे.
मुंबईत ७०-८० च्या दशकात, जेव्हा कामगार युनियनचा सर्व कंपन्यांमध्ये दबदबा होता, तेव्हाही टाटांच्या कोणत्याच कारखान्यात दीर्घकाळ चाललेले संप मला आठवत नाहीत. त्या काळातही टाटांच्या कंपन्यांतून राबवल्या जाणाऱ्या एचआर पॉलिसीज कामगारांना माणूस म्हणून वागवणाऱ्या होत्या. कामगारांच्या हक्कांची पायमल्ली करणाऱ्या नव्हत्या. भविष्याचा वेध घेत टाटांनी स्थापन केलेल्या अनेक संस्था आपल्या देशाला विज्ञाननिष्ठ व सुसंस्कृत बनवत आहेत. इराणशी माझा जसजसा अधिकाधिक संबंध येत गेला, इराणचे एक वेगळेच चित्र माझ्यासमोर उलगडत गेले. हे चित्र पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांनी उभ्या केलेल्या चित्रापेक्षा अगदी वेगळे होते. ते भयावह मला कधीच वाटले नाही. ते होते लोभस. इराणी माणसाची संवेदनशील, सुसंस्कृत बाजू दाखवणारे.
पूर्वीचा पर्शिया आणि आताचा इराण!! म्हटले तर एकच देश, पण भिन्न संस्कृती असणारा! आमच्या इराणच्या वास्तव्यात या दोन्ही संस्कृतींचा आम्हाला परिचय झाला. कोणत्याही देशाकडे, तिथल्या माणसांकडे, त्यांच्या विचारांकडे अनेक दृष्टिकोनातून पाहता येते हे तिथल्या वास्तव्यात अधिक प्रकर्षाने आमच्या लक्षात आले. त्या अनुभवाने आणि जाणिवांनी आम्ही समृद्ध होत गेलो.
(लेखिका बेंगळुरूमध्ये वास्तव्याला आहेत.snehasanjayketkar@gmail.com )