- वंदना अत्रे
अनेकरंगी गुलाबाच्या फुलांनी फुललेल्या बागेतील संध्याकाळ. वातावरणात गुलाबाच्या फुलांचा आणि चैती-ठुमरीच्या स्वरांचा दरवळणारा सुगंध. समोरचे श्रोतेही पांढऱ्या-गुलाबी रंगाच्या वस्त्रांमध्ये. त्या मैफलींसाठी अन्य रंगाच्या कपड्यांना मंजुरीच नसते. ठुमरीच्या रंगात श्रोते रंगत असताना त्या स्वरांच्या बरोबरीने गुलाबाच्या मखमली पाकळ्यांचा हलका वर्षाव श्रोत्यांवर सुरू होतो आणि त्यानंतर उतरत्या संध्याकाळचा गारवा वातावरणात उतरण्यापूर्वी सुरू होतो गुलाबपाण्याचा सुगंधी, शीतल शिडकावा. फाल्गुन-चैत्राच्या सीमेवरील ती काहीशी तापलेली संध्याकाळ आणि अशा वेळी होणारा हा सुगंधी शिडकावा, अगदी हवाहवासा, प्रसन्न करणारा! सोबतीला दाट थंडाई, मिठाया आणि मघईचे मखमली विडे. पंचेन्द्रियांना तृप्तीमध्ये बुडवून निवांत करणारा हा उत्सव, खरं म्हणजे एखाद्या अभिजात चित्रपटात शोभावा असा. प्रत्यक्षात हा सारा माहोल वाराणसीतील गुलाब बारी नावाच्या उत्सवाचा. फाल्गुनाच्या तलखीला निरोप देत वसंत पालवी घेऊन येणाऱ्या चैत्राचे स्वागत करण्यासाठी होणारा. एक शतकापेक्षा अधिक मोठी परंपरा असलेला संगीत-नृत्याचा आणखी एक उत्सव. निमित्त अर्थात राधा-कृष्णाच्या प्रेमाचे. होळीच्या निमित्ताने सृष्टितील सगळे रंग मनसोक्त अनुभवून झाल्यावर मनात निर्माण होणारी शुभ्र शांत रंगांची ओढ आणि त्याच्यासोबत गुलाबाचा सौम्य सुगंध. चैत्रात उमललेले हे ताजे गुलाब राधेने कृष्णासाठी आणले आहेत, ते देण्यासाठी निवडलेली ही रम्य वेळ..!
दिवसाच्या विविध प्रहरांना आणि ऋतूंच्या बदलत्या चेहऱ्यांना स्वरांचा साज चढवण्याची कल्पना फक्त भारतातील कलावंतानाच सुचू शकते. निसर्गातील विविध ऋतूंची अनेकरंगी उग्र-सौम्य रूपे पार्श्वभागी ठेवीत त्याच्या साक्षीने, त्या ऋतूला साजेसे संगीत ऐकण्याची रसरशीत रसिक वृत्ती हे भारतीय संगीताचे एक लोभस रूप आहे. अशा मैफली संगीताचे आपल्या जगण्याशी आणि त्यातील सुख-दुःखाच्या विविध प्रहरांशी असलेले नाते अधोरेखित करीत असतात. अशा मैफलींच्या स्मृती पुन्हा-पुन्हा आपल्याला स्वरांकडे घेऊन येत असतात.
आपल्या देशातील ज्या काही मोजक्या शहरांना हे समजले त्यात एक अतिशय महत्त्वाचे शहर आहे वाराणसी. गंगेच्या पाण्याबरोबरच आजही संगीत आणि नृत्याचे संस्कार सतत अंगाखांद्यावर घेत प्रेमाने, चवीढवीचे खाणे, घेत-देत जगणारे हे शहर. इथेच जन्म घेऊ शकते गुलाब बारी नावाची रम्य कल्पना आणि बोटीमध्ये रंगणारे जलसेसुद्धा. संध्याकाळच्या मंद वाऱ्यांबरोबर खेळणाऱ्या गंगेतील पाण्याच्या लाटांच्या साथीने बोटींमध्ये होणाऱ्या मैफलीची चैन अन्य कुठे मिळणे मुश्कील. या शहराला जगभर स्वतःची ओळख देणाऱ्या गंगामैयाचे जेवढे म्हणून लाड करता येतील तेवढ्या तऱ्हेने इथे होत असतात. कोणत्या ना कोणत्या घाटावर निमित्तानिमित्ताने मैफली सुरू असतात. देवदिवाळी किंवा त्रिपुरी पौर्णिमेच्या सांजेला एकीकडे पाण्यात छोटे-छोटे प्रकाशाचे द्रोण लाटांबरोबर तरंगत असताना बोटींमध्ये मैफली सुरू होतात. एखाद्या मोठ्या बोटीत गायक-वादक, त्याचे साथीदार आणि काही श्रोते बसलेले. त्याच्या भोवती तरंगत असतात छोट्या बोटी. बोटींचा हा ताटवा गंगेच्या पाण्यावर आणि स्वरांच्या लहरींवर तरंगत राहतो. काठावरील मंदिरांमधून होणारे घंटेचे नाद ऐकत समोर पाण्यात हलणारा हा स्वरांचा काफिला बघत राहणे, वाऱ्यावर तरंगत येणारे स्वर कानावर घेत राहणे हा अनुभव या भूलोकीचा नक्कीच नाही...! वाराणसीतील काशी विश्वेश्वराच्या मंदिरात पहिली काकड आरती सुरू होण्यापूर्वी उस्ताद बिस्मिल्ला खां यांचा सनईचा रियाझ सुरू व्हायचा म्हणे...! आपल्या घरात बसून देवाच्या मंदिराच्या दिशेने नमस्कार करून सुरू होणाऱ्या त्यांच्या रियाझाच्या आठवणी विदुषी गिरीजा देवी आवर्जून सांगत होत्या...!
बदलत्या काळाची पाऊले जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपला स्पर्श करून त्याचे रूप आरपार बदलत असताना संगीत-नृत्य त्याला अपवाद कसा राहणार? अशा शहरांमधील उत्सवांचे व्यावसायिक ‘इव्हेंट’मध्ये रूपांतर होऊ लागते तेव्हा प्रश्न पडतो, या झुळझुळीत ‘इव्हेंटस’शी सामान्य माणसाचे नाते काय असेल? त्याचे उत्तर दिले वाराणसीतील एका बासरीवाल्याने. एका तापलेल्या दुपारी, गंगेच्या घाटावर सावलीत बसून एका उत्सुक परदेशी माणसाला तो बासरी वाजवायला शिकवताना बघितला तेव्हा. एरवी गर्दीच्या वेळी बासरी विकणारा एखादा तरुण बासरी विकता विकता ती वाजवायला लागतो आणि शिकवायलाही लागतो तेव्हा समजावे स्वर हे त्या शहराला जगण्यासाठी आधार देत आहेत! स्वरांच्या आधाराने जगत असलेल्या अशा गावांना नमस्कार करायला हवा.
(लेखिका संगीताच्या अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
vratre@gmail.com
(छायाचित्र सौजन्य- आशिमा नारायण, National Geographic travellor India)