- किरण अग्रवाल
गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणून ठेवले आहे, परंतु ज्यांनी मदत मिळवून द्यायची ते राजकारणी पोटनिवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेता नुकसानीच्या पंचनाम्याची पारंपरिक वाट न धरता तातडीने थेट मदतीची गरज आहे.
निसर्गाने मारले तर राजाने तारावे अशी प्रजाजनांची रास्त अपेक्षा असते, पण राजाचे प्रधान म्हणा अगर प्रतिनिधी; ते निवडणुका आणि राजकारणात मश्गूल असल्यावर अपेक्षा कोणाकडून करायची? दुबार, तिबार पेरणी करून कसातरी हातातोंडाशी आलेला घास अलीकडच्या मुसळधार पावसाने हिरावून नेला म्हटल्यावर वऱ्हाडातील शेतकऱ्यांच्या डोळ्यातून आता पाण्याची संततधार लागली असून मायबाप सरकारची गतिमानता अजून काही दिसून येऊ नये हे दुर्दैवीच म्हणायला हवे.
साडेसाती वगैरे प्रकारांवर विश्वास ठेवणे समर्थनीय ठरूच शकत नाही, परंतु कधी कधी काही गोष्टी अशा घडून येतात की क्षणभर तो विचार मनात डोकावून जातो खरा. गेल्या सुमारे दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटाशी मुकाबला सुरू असतानाच निसर्ग चक्रीवादळ व अवकाळीच्या पाठोपाठ गुलाबी चक्रीवादळामुळे अलीकडेच झालेल्या धुवाधार पावसाने मोठ्या प्रमाणात जे नुकसान घडून आले ते पाहता, काय साडेसाती लागलीय कुणास ठाऊक असाच अंधश्रद्धीय प्रश्न पडावा. निसर्गाच्या सततच्या माऱ्यामुळे त्रासलेल्या बळीराजाला यंदा समाधानकारक पावसामुळे काहीसे अच्छे दिन येण्याची चिन्हे होती, मात्र काढणीला आलेला सोयाबीन, भुईमूग, कापूस आदी पिके नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने भुईसपाट करून ठेवलीत. बरे, केवळ पिकेच हातची गेली असे नाही तर पाऊस असा धो-धो बरसला व नदीनाल्यांना पूर आले, की शेतातील जमीनही खरडून गेली. त्यामुळे उद्या त्या जमिनीत काय पिकवायचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आपल्याकडे मंगल कार्याप्रसंगी गुलाब जल शिंपडण्याची प्रथा आहे. त्यामुळे सुवासिकता व प्रसन्नतेचा अनुभव येतो, परंतु ‘गुलाब’ नावाच्या चक्रीवादळामुळे ज्या जलधारा कोसळल्या त्यामुळे वेदनांचे भळभळून वाहणे स्वाभाविक ठरले आहे. पिकांचे, जमिनीचे नुकसान तर झालेच, काही जणांचे पशुधनही वाहून गेले. आपल्याकडे म्हणजे पश्चिम वऱ्हाडात अकोला, वाशिम सोबतच सर्वाधिक नुकसान बुलडाणा जिल्ह्यात झाल्याची प्राथमिक आकडेवारी आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत, परंतु त्यांची गती व स्थिती काय असते हे वेगळे सांगण्याची गरज नसावी. ई पीक पाहणीसारख्या अतिशय चांगल्या योजनेचे तांत्रिक अडचणींमुळे तसेच योग्य प्रशिक्षणाअभावी कसे मातेरे होते आहे हे आपण पाहतो आहोतच, तेव्हा नुकसानग्रस्तांबाबत पंचनामे व अहवालांचे सोपस्कार पार पाडण्याऐवजी थेट मदतीचे पॅकेज घोषित केले तर दिलासा मिळू शकेल. नाहीच काही तर पीक कर्ज काढलेल्या नुकसानग्रस्तांचे ते कर्ज तरी तातडीने माफ करायला हवे. पीक विमा काढलेल्या कंपन्यांना शेतीच्या बांधावर पाठवून तातडीने त्याची नुकसान भरपाई मिळवून द्यायला हवी.
अर्थात, कुठलीही मदत अगर नुकसान भरपाई सहज मिळणारी नाही. त्यासाठी जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा आग्रह व पाठपुरावा गरजेचा आहे. दुर्दैव असे, की जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत ही मंडळी व्यस्त आहे, त्यामुळे मदत मिळवून देणे दूर; साधे शेतकऱ्यांच्या दारी जाऊन त्यांचे अश्रू पुसण्याची तसदी अनेकांनी अजून घेतलेली दिसत नाही. पोटनिवडणुकीसाठी मते मागायला येणाऱ्या पुढाऱ्यांना याचा जाब विचारण्याची हिंमत मतदारांनी दाखविली तर अनेकांची अडचण होईल. आताचे नुकसान आहेच आहे, पण मागच्याही नुकसानीची भरपाई अजून मिळालेली नाही. त्याचे काय? यावर कुणी बोलताना दिसत नाही.
सारांशात, दसरा - दिवाळी तोंडावर असताना बळीराजाच्या डोळ्यात आलेले अश्रू पुसण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून सरकारी यंत्रणांना गतिमान करणे व आपद्ग्रस्तांना नुकसान भरपाई मिळवून देणे गरजेचे बनले आहे.