राजेश शेगोकारनागपूर:प्रदीप अवचार, रोहित गाडगे, विशाल रंभापुरे व रोहन इंगळे या नावांना खरं तर कुठलीही ओळख नाही. सर्वांचे शिक्षण वेगवेगळे, महाविद्यालयेही वेगवेगळी; पण सर्वसामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी अन् ध्येयवेडेपणा हेच काय ते साम्य. ही मित्रांची चौकडी अकोल्यातच शिकली, वाढली अन् आता चंदेरी दुनियेच्या रजतपटाचे ग्लॅमर कवेत घेण्यास सज्ज झाली आहे. चित्रपट निर्मिती, चित्रपटात किंवा गेला बाजार एखाद्या टीव्हीच्या मालिकेमध्ये जाहिरातीमध्ये तरी स्थान मिळावे म्हणून झटणारे लाखो तरुण आहेत. डोळ्यात मोठमोठी स्वप्नं घेऊन मुंबईसारख्या मायानगरीत दाखल होतात अन् निराश होऊन भरकटणारेही अनेक आहेत. अकोल्यातील या चार तरु णांनी मात्र मुंबई, पुण्याच्या चंदेरी वर्तुळात वावर केला, अनुभव मिळविला अन् स्वत:चीच सर्जनशीलता वापरून, नवनिर्मितीचा ध्यास घेऊन पुन्हा आपले गाव गाठले, नव्याने सुरुवात केली व आज शॉर्ट फिल्म निर्मितीमध्ये या चौघांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेऊन अकोल्याचा गौरव वाढविला आहे.२१ फेब्रुवारी २०१८ रोजी या चौघांनी निर्माण केलेली ‘पल्स’ ही शॉर्ट फिल्म झळकली अन् चंदेरी दुनियेचे लक्ष यांच्याकडे वेधले गेले. प्रदीप अवचार यांची प्रमुख भूमिका असलेली ही फिल्म वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरांना रुग्णांच्या उपचारादरम्यान सामोरे जावे लागत असलेल्या अडचणींवर आधारित आहे. रुग्णांचा जीव वाचविण्याची धडपड, नातेवाइकांची भूमिका, डॉक्टरांची मानसिकता यांचे अचूक चित्रण या फिल्मच्या माध्यमातून मांडण्यात आले अन् ही फिल्म मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. अभिमानाची बाब म्हणजे, या फिल्मला तब्बल तीन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. ग्रेट मॅसेज इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वाेत्तम शॉर्ट फिल्मचा अवॉर्ड, तिसऱ्या आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्तम संवादासाठी नॉमिनेशन तसेच आचार्य तुलसी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिग्दर्शनासाठी बेस्ट क्रीटीक अवॉर्डने या फिल्मचा गौरव झाला. खरं तर ‘पल्स’ ही या कलावंताची पहिली फिल्म नाही. माइंड विदाउट फिअर, बाप्पा फॉरएव्हर, हॉनेस्टी बॉक्स, शर्यत, करुणा, घे भरारी अशा बारा शॉर्ट फिल्म त्यांनी बनविल्या. त्यापैकी क्लॅन व ट्ररू मॅन या दोन शॉर्ट फिल्मलासुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आले आहे. आता रजतपटाचा पडदा यांना खुणावत आहे.अकोल्यासारख्या शहरात राहून आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाला गवसणी घालण्यासाठी निघालेल्या या तरुणांनी मिळविलेले यश हे त्यांच्या परिश्रमातून मिळाले आहे. डॉ. प्रदीप अवचार यांच्यामुळे हे चारही तरुण एकत्र आले. अवचार हे हरहुन्नरी कलावंत. वडील पोलीस निरीक्षक; मात्र प्रदीप यांना अभिनय क्षेत्रात करिअर घडवायचे होते. त्यांनी लेखन, अभिनय, दिग्दर्शन यामध्ये रुची घेऊन कौशल्य आत्मसात केले. बालमानसशास्त्र हा त्यांचा अभ्यासाचा विषय त्यांनी ‘पीएचडी’ मिळवूनही चंदेरी दुनियेला पॅशन म्हणून स्वीकारले. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते विविध महाविद्यालयांत एकपात्री प्रयोग करीत असताना त्यांची गाठ अकोल्याचा रोहित गाडगे या तरुणांशी पडली अन् रोहितच्या माध्यमातून रोहन अन् विशाल ही जोडी एकत्र येत स्वप्न पाहणाऱ्या व प्रत्यक्षात उतरविण्याची धडपड करणाऱ्या मित्रांचे वर्तुळ पूर्ण झाले.रोहित गाडगे हा तरुण घरून पुण्याला गेला. पत्रकारिता करायची आहे, असे खोटं सांगत पुण्यात एम.एस्सी. मास कम्युनिकेशनला प्रवेश घेतला अन् दिग्दर्शन व एडिटिंगमध्ये मास्टर झाला. मुंबईच्या चंदेरी दुनियेत कामाचा अनुभव घेतला अन् पुन्हा अकोल्यात येऊन याच क्षेत्रात करिअर सुरू केले. विशाल रंभापुरे हा बाळापूरचा युवक. वडील सुतारकाम करतात. सर्वसामान्य कुटुंबातील विशाल याला कॅमेऱ्याची लेन्स खुणावत होती. त्यांनी वेगळी वाट चोखाळत नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ फोटोग्राफीमध्ये, सिनेमोटोग्राफीमध्ये पदविका घेतली. रोहन इंगळे हासुद्धा असाच ध्येयवेडा तरुण. वडील शेतकरी; परंतु रोहनने मोशन ग्राफिक्समध्ये आपले भविष्य घडविण्याचे ठरविले. मुंबई विद्यापीठात व्हिजव्हल इफेक्टमध्ये पदविका प्राप्त करून रोहनने अनुभव मिळविला अन् आपल्याच गावात आपण काहीतरी वेगळे करू, या ध्येयाने डॉ. प्रदीप अवचारांसोबत जुळला.या चारही तरुणांनी खिशाला खार लावत स्वप्नांच्या दिशेने प्रवास सुरू केला व आता अकोल्यातच राहून शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी, जिंगल्स यामध्ये आपलं नाव मोठं केलं आहे. कुटुंबाची पृष्ठभूमी कोणतीही असो, साधनांची उपलब्धता कमी असली तरी चालेल; पण जिद्द, परिश्रमाची तयारी अन् नवनिर्मितीचा, सर्जनशीलतेचा ध्यास असला म्हणजे यश गाठता येते, हे सिद्ध करून दाखविले आहे. आता या तरुणांचा अकोल्यातच अभिनय, दिग्दर्शन, फोटोग्राफी, एडिटिंग अशा विविध माध्यमांच्या कार्यशाळा घेऊन आपल्या परिसरातील गुणवत्तेला संधी देण्याचा मानस आहे. साधने किती आहेत, यापेक्षा साध्य कसे मिळवायचे, हे एकदा ठरले म्हणजे यश कठीण राहत नाही. दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाची निर्मिती करून भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला. हा चित्रपट बनविण्यासाठी त्यांनी जी जिद्द दाखविली, ती जिद्द हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाने नव्या पिढीला समजली. तोच वारसा या चार तरुणांनी उचलून शॉर्ट फिल्मच्या हरिश्चंद्राची फॅक्टरी अकोल्यात सुरू केली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण त्यांच्या यशाला अकोल्यातील मातीचा सुगंध आहे.
अकोल्यात शॉर्ट फिल्मच्या हरिश्चंद्राची फॅक्टरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 8:00 AM
प्रदीप अवचार, रोहित गाडगे, विशाल रंभापुरे व रोहन इंगळे या नावांना खरं तर कुठलीही ओळख नाही. सर्वांचे शिक्षण वेगवेगळे, महाविद्यालयेही वेगवेगळी; पण सर्वसामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी अन् ध्येयवेडेपणा हेच काय ते साम्य.
ठळक मुद्देतीन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले