डॉ. कैलास शिंदे (मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषद)ठिकाण : सातारा जिल्हा
काय केले? सातारा जिल्ह्यात कुपोषणाचं प्रमाण अत्यल्पच; पण संपूर्ण कुपोषणमुक्तीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी विशेष मोहीम हाती घेतली. सातारा तालुक्यातील जकातवाडी हे गाव त्यांनी दत्तक घेतले आहे. गरिबाघरच्या मुलांना पौष्टिक खाऊ मिळावा, या उद्देशाने जकातवाडीच्या अंगणवाडीत पौष्टिक खाऊचा ‘हसरा कोपरा’ तयार करण्यात आला आहे.
काय घडले?गावातील प्रत्येक ग्रामस्थाने या हसरा कोपर्यात स्वयंस्फूर्तीने पौष्टिक घटक पुरवायला सुरुवात केली. ग्रामस्थांनी शेंगदाणे, सोयाबीन, चुरमुर्याची पोती, भाजलेला हरभरा देऊन आपले कर्तव्य निभावले. परिणामी कुपोषण पहिल्या टप्प्यावरच रोखणं शक्य झाले.डॉ. शिंदे यांच्या आग्रहाने ग्रामस्थांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अंगणवाडीतील मुलांना पौष्टिक खाऊ वाटप करण्याचे निश्चित केले आहे.ग्रामस्थांच्या वाढदिवसांची यादी ग्रामपंचायतीने काढली आहे. त्यामुळे एक महिना आधी या हसरा कोपर्यात खाऊ देण्याची जबाबदारी कोणावर असेल हे निश्चित करण्यात आल्याने पौष्टिक खाऊची रसद विद्यार्थ्यांना विनाखंड मिळत राहणार आहे. या संकल्पासाठी ज्येष्ठांसह तरुण ग्रामस्थांची संख्या लक्षणीय आहे.
मार्गदर्शक उपक्रमजकातवाडी हे गाव मी दत्तक घेतले आहे. शासनाच्या अनेक उपक्रमांमध्ये गावाचा सहभाग कौतुकास्पदपणे वाढलेला दिसतो. हा खाऊचा हसरा कोपरा संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल. - डॉ. कैलास शिंदे
(मुलाखत आणि शब्दांकन : प्रगती जाधव-पाटील, लोकमत, सातारा)