- निळू दामलेट्रम्प यांचा भारत दौरा पार पडला. भारत-अमेरिका व्यवहारात अडचण ठरलेल्या कुठल्याही गोष्टीवर ते चकार शब्दही बोलले नाहीत. भारतीय माणसांना अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी आवश्यक व्हिसा तरतुदी त्यांनी कडक करून भारतीयांना नाराज केलंय. त्या तरतुदी सैल केल्याची घोषणा त्यांनी केली नाही. भारतीय मालावर त्यांनी लावलेल्या जकाती आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन मालावर भारतानं लावलेल्या जकाती हा मारामारीचा धुमसत असलेला मुद्दा त्यांनी गुलदस्त्यातच ठेवला. सीएएसंदर्भात ट्रम्प मोदींची बाजू घेतील असं काही लोक कुजबुजत होते, तेही घडलं नाही. काश्मीरबाबत पाकिस्तानला ठोकतील असं लोकांना वाटलं होतं, ते घडलं नाहीच, उलट पाकिस्तान सुधारत आहे असं ते बोलले.भारतीयांच्या पदरात काय पडलं, तर तीनशे कोटींची हेलिकॉप्टरं ! पण तीही दान म्हणून किंवा सवलतीच्या दरात मिळालेली नाहीत, बाजारातल्या किमतीतच भारताला विकत घ्यायची आहेत.एक मात्र खरं. भारत हा एक ग्रेट देश आहे, त्यात विवेकानंद हा एक ग्रेट माणूस होऊन गेला, त्यात ग्रेट सिनेमा नट आणि क्रि केट खेळाडू आहेत, नरेंद्र मोदी नावाचे आपले एक ग्रेट मित्र आहेत हे ट्रम्पनी सांगितलं. ही भारतीयांच्या दृष्टीनं जमेची आणि नव्यानं कळलेली बाजू. ते सारं भारताला माहीत नव्हतं आणि खूप संशोधन करून ते ट्रम्प यांनी सांगितलं याबद्दल ट्रम्प यांचे आभारच मानायला हवेत!हा उद्योग ट्रम्प यांनी का केला? गॉगलधारी डझनभर जेम्स बॉण्ड, शेकडो शरीर संरक्षक, पत्नी, मुलगी, जावई, बॉम्बलाही दाद न देणारी बिस्ट ही गाडी इत्यादी सार्या गोष्टी सोबत घेऊन ते भारतात का आले? ट्रम्पना अमेरिकन भारतीयांची मतं हवी आहेत.कोण आहेत भारतीय मतदार? 1883 साली आनंदीबाई जोशी डॉक्टर होण्यासाठी अमेरिकेत गेल्या. 1893 साली हिंदू धर्माबद्दल बोलायला विवेकानंद अमेरिकेत गेले. दोघेही आपापली कामं आटोपून भारतात परतले. पण 1960च्या दशकात मात्र भारतीय माणसांचा अमेरिकेकडं ओघ सुरू झाला. सुरवातीला शीख तिथं गेले, नंतर गुजराती, मराठी, तेलुगू इत्यादी माणसांनी रांगच लावली. आज सुमारे 42 लाख भारतीय माणसं अमेरिकेत वसती करून आहेत. त्यातले सुमारे 90 टक्के हिंदू आहेत.भारतीय (हिंदू) माणसं शिकली सवरलेली आहेत, बहुतांशांकडे पदव्युत्तर पदव्या आहेत. खुद्द गोरे अमेरिकनही इतकं शिकत नाहीत. बहुतेक माणसं नोकरदार, व्यावसायिक, सल्लागार, उद्योगी आणि दुकानदार आहेत. बहुतांशांचं सरासरी उत्पन्न वार्षिक एक लाख डॉलरच्या आसपास आहे, अमेरिकेच्या हिशोबात हे उच्च उत्पन्न मानलं जातं. बेकारी, गरिबी हा भारतीयांच्या अनुभवाचा भाग नाही.सामान्यत: या लोकांना अमेरिकेत कमी कर असतात याचा आनंद आहे, ते वाढू नयेत असं त्याना वाटतं. कर आणि आर्थिक सुस्थिती हा भारतीयांच्या दृष्टीनं एक नंबरचा मुद्दा असतो. भारतीयांना वसती शक्य करणारे व्हिसा इत्यादी कायदे तरतुदी दोन नंबरवर असतात. ब्राउन, काळे, पिवळे इत्यादींना अमेरिकन गोरे कमी लेखतात हा अनुभव त्यांना असतो. परंतु त्याचा फार जाच ते करून घेत नाहीत. ते अशा ठिकाणी वावरतात जिथं त्यांना कमी जाच होतो. ह्यूस्टनमध्ये पूर येतात. गरीब, काळे, पिवळे, लॅटिनो आदी लोक पुरामुळे त्रास होतो अशा ठिकाणी राहातात. गोरे आणि भारतीय पूर येणार नाही, अशा ठिकाणी राहातात.सामान्यत: भारतीय अमेरिकनांना त्यांच्या पहिल्या दोन क्रमांकांची सोय होत राहिल्यानं आणि डेमॉकॅट्र हे साधारणपणे भारतधार्जिणे असल्यासारखं वाटत असल्यानं भारतीय त्या पक्षाचे सर्मथक असतात. ते ट्रम्प यांचे मतदार नसतात.2008 साली 69 टक्के भारतीय मतदारांनी स्वत:ची डेमॉक्र ॅटिक पक्षाचे मतदार अशी नोंदणी केली होती. त्या वर्षी 91 टक्के भारतीयांनी ओबामांना मतं दिली. 2012 सालच्या निवडणुकीत तो टक्का कमी झाला तरी 84 टक्के भारतीयांनी त्यांना मतं दिली. 2016 सालच्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन उभ्या होत्या. त्यांना आणखी कमी, तरीही 77 टक्के भारतीय मतं मिळाली.2008 मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या मॅक्केनना सात टक्के भारतीय मतं मिळाली, 2012 मध्ये रिपब्लिकन मिट रॉमनी यांना भारतीयांची 16 टक्के मतं मिळाली आणि 2016 मध्ये ट्रम्प यांना वीस टक्के भारतीयांनी मतं दिली.भारतीय मतदार रिपब्लिकन पक्षाकडं झुकले याचं कारण भारतीय लोकांना त्यांच्या आर्थिक व सुस्थिती या मुद्दय़ांपेक्षा किंवा त्याबरोबरीनं हिंदू असणं हा मुद्दा महत्त्वाचा वाटू लागला. नऊ-अकराच्या घटनेनंतर जगभर दहशतवादविरोधी लाट उसळली; पण त्याचबरोबर दहशतवाद आणि मुस्लीम या दोन गोष्टी एकच आहेत असं जनता मानू लागली. इस्लामविरोध अमेरिकेत उफाळला. बाबरी पडली तेव्हापासून मुस्लीमविरोध भारतातही प्रथम क्रमांकावर आला होता. 9/11नंतर बाबरी अधिक न्यू यॉर्क मनोरे या दोन गोष्टी एकत्र झाल्या आणि अमेरिकन भारतीय माणसं आपलं हिंदूपण संकटात सापडलंय असं मानू लागली. ओबामा, क्लिंटन या संकटातून त्यांना आवश्यक असलेला भावनात्मक आधार देऊ शकले नाहीत, उलट ते मुस्लीम धार्जिणेच आहेत असं भारतीयांना वाटलं. याउलट ट्रम्प हे उघडपणे इस्लामविरोधी भूमिका घेऊ लागले आणि त्यामुळं ते अमेरिकन हिंदूंना जवळचे वाटू लागले.भारतीय माणसं अमेरिकन राजकारणात जपूनच भाग घेतात. फार भानगडीत पडत नाहीत. पण 2016 साली पहिल्या प्रथमच शिकागोच्या सल्ली कुमार या उद्योगीनं ट्रम्प यांना दहा लाख डॉलरची देणगी दिली आणि ‘अबकी बार ट्रम्प सरकार’ ही घोषणा दिली. त्या निवडणुकीत प्रथमच भारतीय माणसं ‘ट्रम्पजी, आम्ही हिंदू तुमच्यावर प्रेम करतो’, असे फलक हातात घेऊन उभे होते. आता ही माणसं भारतीय नव्हती, हिंदू होती. अमेरिकन राजकारणात झालेले तुकडे या निमित्तानं उघड झाले. हे तुकडे पाडण्यात ट्रम्प यांचाच पुढाकार होता.अमेरिकेतला निवडणुकीचा खेळ विचित्र आहे. तिथं नुसतं बहुमत मिळून भागत नाही. प्रत्येक राज्यातल्या लोकसंख्येच्या कसोटीवर त्या राज्यातली इलेक्टोरल मतं ठरतात. व्हरमाँट या कमी लोकसंख्येच्या राज्याला फक्त तीन मतं आहेत, कॅलिफोर्नियाला 55 मतं आहेत. त्यामुळं कॅलिफोर्निया आणि टेक्सस यासारख्या मोठय़ा राज्यात बहुमत मिळवण्यावर भर देतात आणि व्हरमाँटसारख्या लल्लूपंजू राज्याकडं दुर्लक्ष करतात. टेक्सस हे राज्य हाती सापडणं महत्त्वाचं असतं. ते राज्य परंपरेनं रिपब्लिकन पक्षाकडं असतं. क्लिंटन यांना ट्रम्पपेक्षा 25 लाख मतं जास्त मिळाली होती. राज्याकडून मिळणारी इलेक्टोरल 304 मतं ट्रम्पनी हुशारीनं मिळवली, ते प्रेसिडेंट झाले. क्लिंटन यांना 227 इलेक्टोरल मतं मिळाली, त्या हरल्या.म्हणून अमेरिकन राजकारणात जिथं जास्त इलेक्टोरल मतं आहेत ती राज्यं पटकावायची, ज्या 13 राज्यांत चुरस असते ती स्विंग स्टेट्स जिंकायची आणि जी आपली पक्की राज्यं आहेत ती राखायची असा खेळ असतो. ट्रम्प यांच्या हिशोबात टेक्सस हे त्यांचं राज्य आहे, तिथं रिपब्लिकन पक्षाला 36 मतं मिळतात. ती टिकवायची असतील तर तिथं बहुमत मिळवायला हवं. त्या राज्यात एकेकाळी 80 टक्के जनता गोरी होती. आता गोरे जेमतेम 51 टक्के उरलेत. इतरांमध्ये लॅटिनो, काळे आणि भारतीय आहेत. पैकी लॅटिनो आणि काळे आता ट्रम्पना मतं देत नाहीत. तेव्हा त्यांना वगळून भारतीयांची दोन लाख 70 हजार मतं मिळाली तर ते राज्य राखता येईल, असा ट्रम्प यांचा हिशोब आहे.त्यासाठीच गेल्या वर्षी टेक्ससमधील ह्यूस्टनमधे ट्रम्पनी ‘हावडी मोदी’ कार्यक्र म घडवून आणला. त्यांना भारतीय हिंदूंची मतं हवीत. त्या कार्यक्रमाचं ‘रिटर्न प्रेझेंट’ म्हणून मोदींनी अहमदाबादमध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम घडवून आणला. मोदींना परदेशी भारतीय हिंदूंकडून पैसे हवेत.2020च्या निवडणुकीत ट्रम्पना निवडून यायचं आहे. अमेरिकेत त्यांचे वांधे झालेत. काँग्रेसनं चौकशी करून त्यांना उघडं पाडलंय. त्यांनी केलेल्या भानगडी दररोज बाहेर येत आहेत. त्यांचेच सहकारी त्यांच्यापासून दूर जात आहेत. खुद्द त्यांच्याच पक्षातले लोक वैतागले आहेत. अशा परिस्थितीत एकेक मत मिळवण्यासाठी ट्रम्पना खटपट करावी लागत आहे. त्यामुळेच अमेरिकेतले 18 लाख भारतीय मतदार त्यांच्या दृष्टीनं फार म्हणजे फार महत्त्वाचे आहेत.भारत दौर्यानंतर ट्रम्पना अमेरिकेतल्या, टेक्ससमधल्या भारतीय हिंदूंची मतं मिळतील काय? भारतीय मतदारांचे तीन ढोबळ गट होतात. 1960च्या आसपास तिथं गेलेले लोक आता म्हातारे झालेत. तो एक गट. त्यांची मुलं-मुली तिथं जन्मून वाढत आहेत त्या प्रौढांचा दुसरा गट. आणि त्या प्रौढांना झालेली मुलं हा तरु णांचा तिसरा गट.पहिल्या दोन गटातल्या भारतीयांना उरलेले दिवस काढायचेत; पण त्याचबरोबर त्यांच्या सांस्कृतिक-धार्मिक भावना जरा तीव्र झाल्या आहेत. त्यांना व्हिसा तरतुदींबद्दलची फार चिंता नाही, त्यांना मुसलमान, पाकिस्तान आणि काश्मीर या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. त्यांना पाकिस्तानवर भारतानं हल्ला करावा, काश्मीरमधल्या आणि भारतातल्या मुसलमानांना ठोकून काढावं असं वाटतं. ट्रम्प हे जरी कडवट मुसलमानविरोधी असले तरी त्यांनी वरील बाबतीत भूमिका घेतल्या नाहीत. काश्मीरचा प्रश्न शांततेनं सोडवा, मी मध्यस्थी करायला तयार आहे असं ट्रम्प म्हणाले. म्हणजे पाकिस्तानवर हल्ला करणं वगैरे गेलंच. शिवाय पाकिस्तान सुधारतोय असंही ट्रम्प म्हणाले. सीएए प्रकरणात मोदींनी दमानं घेऊन प्रश्न सोडवावा, असं ट्रम्प म्हणाले. म्हणजे वरील 80 टक्के हिंदू खट्टूच झाले म्हणायचे.20 टक्के तरुण माणसं व्हिसा तरतुदी कडक केल्यामुळे रागावले असतील. त्यांच्या दृष्टीनं धर्म नव्हे नोकर्या, शाश्वती, आरोग्य आणि पर्यावरण हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. या सर्व बाबतीत ट्रम्प भारतात काहीच बोलले नाहीत. ही पिढी बर्नी सँडर्स यांना जोरदार पाठिंबा देणार आहे.थोडक्यात असं की, 2016 साली मिळाली तेवढी भारतीयांची मतंच फार तर ट्रम्पना मिळतील, ती वाढण्याची शक्यता कमी, कमीच होण्याची शक्यता जास्त आहे. दौरा करून ती मतं मिळवण्याचा प्रयत्न ट्रम्पनी केला एवढंच.
damlenilkanth@gmail.com(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत.)