प्रज्ञा देसाई
मुलाखत आणि शब्दांकन : - सोनाली नवांगुळ
'इनडिसिजिव चिकन-हिचकिचानेवाली मुर्गी’ हे शीर्षक गमतशीर आहे. खरंच!
धारावीतल्या स्वयंपाकघरातून बाहेर पडलेलं हे देखणं, आगळंवेगळं ‘कुकबुक’, पण फक्त कुकबुक नव्हे! इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमधलं हे पुस्तक. हे पुस्तक म्हटलं तर पाककृतींचं आणि म्हटलं तर पाककृतींच्या निमित्तानं पदार्थ ज्या घरात, ज्या घडणीतून, संस्कारातून, समज-अपसमजातून, परंपरेतून रांधला जातो त्याची ही गोष्ट. पदार्थ रांधणा:या बायांच्या जगण्यातल्या मसाल्यांची, फोडण्यांची, मुरवणाची, त्यांच्या भवतालाची, त्यांनी भवताल अन्नाच्या माध्यमातून अनुवादित केल्याचीसुद्धा ही गोष्ट. धारावीसारख्या झोपडपट्टीविषयी आणि एकूणच स्त्रीच्या विनामोल केलेल्या श्रमाविषयी आपल्या धारणा बदलणारी, घडवणारी ही गोष्ट. या पुस्तकाच्या संकल्पक-लेखिका, कलाइतिहासकार आणि क्युरेटर असणा:या प्रज्ञा देसाईंशी या गप्पा.
या रुचकर गोष्टीचा उगम कसा झाला?
- धारावी म्हणजे आशियातली एक मोठी झोपडपट्टी या ओळखीपेक्षा आणि बराच खजिना दडलाय तिच्यात. ही नवी ओळख करून देणारा ‘धारावी बिएनाले कला व विज्ञान महोत्सव’ तिथे भरतो. ‘स्नेहा’ म्हणजे ‘सोसायटी फॉर न्यूट्रिशिअन एज्युकेशन अॅण्ड हेल्थ अॅक्शन’ ही एनजीओ 2क्15 पासून हा महोत्सव भरवते. जगभर कलाविषयक काम करत आणि बघत असताना मला संग्रहालयं निर्माण करणं आणि त्यांचं जतन करणं यापेक्षा क्युरेटरचं काम आणखी व्यापक आहे याची जाणीव होत होती. भारतीय कलाक्षेत्रत वावरताना इथं एक थकलेपण, थांबलेपण जाणवत होतं. कलेबद्दल मी लिहित असते, तेव्हा मला नेहमी असं वाटायचं की कलेची व्याख्या नि संकल्पना खूप मर्यादित अर्थानं वापरली जाते. ‘अमुक’ ही कला म्हणून जे मानलं गेलं आहे त्याचेच अर्थ काढणं, त्याचं सौंदर्य समजून घेणं ही नेहमीची गोष्ट. दुस:या ‘कल्चर प्रॅक्टिस’ला आपण कसं बघतो हेही मला निरखायचं होतं. रोजच्या स्वयंपाकाकडे तुम्ही कला व त्यातलं सौंदर्य म्हणून कशा त:हेनं डिफाईन करू शकता हे पाहायचं होतं. अर्थात कलेविषयीच्या मूळ समजांना आव्हान म्हणून नव्हे! धारावीतल्या बिएनालेसाठी काही प्रोजेक्ट करण्याकरता मला त्यांच्या संचालकांपैकी एकानी निमंत्रित केलं. तेव्हा खाण्यापिण्याच्या सवयींच्या आतलं समकालीन सांस्कृतिक राजकारण पाहावं असं मला वाटलं आणि मी ‘फूड प्रोजेक्ट’ करण्याचं ठरवलं. अर्थात तिथं बायकांना जमवून शिकवणं नव्हे तर विचारांच्या आदानप्रदानातून त्यांची अन्नाबद्दलची जाणीव व प्रक्रि या समजून घेणारी वर्कशॉप्स घ्यायची व त्यावर एक पुस्तक लिहायचं हे पक्कं केलं. 2क्14 पासून झालेल्या तेरा सेशन्सचं ‘चीज’ म्हणजे हे पुस्तक.
आणि पुस्तकाचं हे अगम्य नाव?
- ती एक गंमतच झाली. ‘कुकबुक’च्या निमित्तानं धारावीतल्या बायकांशी गप्पा व्हायला लागल्या. त्या हळूहळू खुलायला लागल्या. मांसाहारी पदार्थाबद्दल गप्पा मारताना एक बाई म्हणाली, ‘कोंबडीचं काही खरं नाही. रस्त्यावर सोडली की कधी इकडं धावते, कधी तिकडे. निश्चित दिशा नसते तिला. म्हणून मी चिकन खात नाही. माझा नवरा म्हणाला की तू असलं खाल्लंस तर कोंबडीसारखी मूर्ख होशील.’ दुसरी बाई मध्येच आठवल्यासारखं म्हणाली, ‘कोंबडी किडे खाते, कागदं खाते, कच:यातलं वाट्टेल ते खाते आणि वाट्टेल तिथं अंडी घालते. तिला खाण्याचा धीर कसा होणार?’ गप्पा रंगात आल्यावर पहिली बोलण्याच्या ओघात गुपित खोलून गेली की, ‘‘माझ्या नव:याला आवडत नाही चिकनची टेस्ट म्हणून..’’ - म्हटलं तर काव्यात्म आहे उत्तर, पण एखादी जिन्नस आपण का खातो व का नाही याच्या समर्थनासाठी गोष्टी कशा तयार होतात हे इंटरेस्टिंग आहे. आपली अन्नाची निवड कोणकोणते घटक निश्चित करतात हा विचार या वर्कशॉपच्या निमित्तानं व्हायला लागला. पदार्थ चुलीवर किंवा गॅसवर शिजण्यापूर्वी त्याची जी गोष्ट शिजते ती समजून घेण्यानं संस्कृतींचे, धर्मांचे, त्यातल्या राजकारणाचे अनेक पदर उलगडतात. त्यामुळंच एका साध्या बाईनं साधेपणानं दिलेल्या उत्तरात मला तिचं चातुर्य, संसारातलं ‘शहाणपण’ दिसलं. मग तेच शीर्षक झालं.
हे केवळ कुकबुक नव्हे तर मग काय आहे?
- अन्नाची गंमत अशी आहे की आपण ते खाल्लं की अदृश्य होतं. करणा:यानं त्यामध्ये मन:पूर्वक दिलेला वेळ, शारीरिक-बौद्धिक श्रम आणि त्याची रुची व सौंदर्याचा केलेला विचार हेही अदृश्य होतं. आपल्याकडे बाईनं स्वयंपाकघर सांभाळणं गृहीत धरलं गेलं आहे. नॉनपेड जॉब! बायका जेव्हा वर्कशॉपला यायला लागल्या तेव्हा त्यांना अपेक्षित होतं मी काही शिकवणं. तुम्हीच कृती सांगायची व बनवायचं असं म्हटल्यावर त्या प्रचंड चाचपडायला लागल्या. त्यांचं रोजचं काम त्या स्वत:ची जाणीव विसरून करत होत्या. या कंफर्ट झोनबाहेर पडून वर्कशॉपमध्ये रांधताना त्यांचं कौतुक व्हायला लागलं तेव्हा एक सहज म्हणाली, ‘घर की मुर्गी दाल बराबर!’ - कल्पनाशक्तीचा वापर करत एक बाई तुटपुंज्या सामग्रीतूनसुद्धा सुंदर पदार्थ बनवते तेव्हा ती अर्थ शास्त्रज्ञ, रसायन शास्त्रज्ञ, इतिहासकार, पोषणतज्ज्ञ असे कितीतरी रोल करत असते. विनावेतनाच्या आणि तिनं केल्याशिवाय अडेल अशा या कामात एक स्त्री संपूर्ण संवेदना गुंतवून काम करत राहते आणि तरीही अदृश्य राहते तेव्हा संस्कृती व परंपरेचे खूप प्रकारचे प्रश्न समोर येतात. स्त्रीच्या श्रमाचं मोल, तिचं अस्तित्व, अधेमधे कौतुक करून तिला श्रमव्यवस्थेच्या चाकोरीत अडकवलं जाणं, तिच्या ‘कले’ला शहाणी, समंजस प्रतिष्ठा न मिळणं असं बरंच! म्हणून हे पुस्तक करणं जास्त अवघड होतं.
वर्कशॉपमुळं धारावीतल्या काही महिलांना तरी स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंची आणि प्रश्नांचीही जाणीव झाली हे महत्त्वाचं. आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पुस्तक पोहोचून त्या निमित्तानं उपस्थित होणारे प्रश्न वाचकांना जाणवणं आणि कलेची व्याख्या विस्तारायला थोडीफार मदत होणं घडायला हवं.
कविता कावलकर अंबाडी पुलावचे
प्रात्यक्षिक दाखवताना.
छायाचित्र - नेविल सुखिया,
सौजन्य - द इनडिसिजिव चिकन
(लेखिका ‘धारावी बिएनाले’ या प्रकल्पांतर्गत
करण्यात आलेल्या ‘धारावी फुड प्रोजेक्ट’च्या मार्गदर्शक, समाजकला अभ्यासक आणि
सध्या गाजत असलेल्या ‘. हिचकिचानेवाली मुर्गी’
या पुस्तकाच्या लेखिका आहेत.)
prajnavijaydesai@gmail.com