- राहुल बनसोडे
जगात दोन अमेरिका आहेत. एक दक्षिण अमेरिका आणि एक उत्तर अमेरिका. डोनाल्ड ट्रम्प ज्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत तो देश उत्तर अमेरिका किंवा रूढार्थाने फक्त अमेरिका म्हणून ओळखला जातो. जमिनीच्या ज्या भूभागावर हा अमेरिका देश वसलेला आहे तिथे माणसाचे सर्वात पहिले पाऊल पडले अवघ्या सोळा हजार वर्षांपूर्वी. कुणी म्हणतं त्या काळातल्या शीतयुगात बर्फामुळे आशिया व अमेरिका एकमेकांशी सांधले गेलेले होते आणि ह्या बर्फावरून चालत चालत माणूसप्राणी आशियातून अमेरिकेत पोहोचला. दुसरा एक मुख्य प्रवाद सांगतो की, आग्नेय आशियाच्या ज्या भागात सध्या चीन व कोरिया हे देश वसलेले आहेत तिथली माणसे जुन्या काळात लाकडांपासून बनविलेल्या मोठमोठय़ा होड्या आणि जहाजांमार्फत इथे पोहोचली. माणसाचे पाऊल ह्या भूमीवर पडण्यापूर्वी इथल्या जंगलांमध्ये आणि भूभागावर अनेक प्रजाती गुण्यागोविंदाने नांदत होत्या. तिथे आकाराने सर्वात मोठे रानगवे होते, त्या रानगव्यांची शिकार करणारे सिंह होते, भारतीय हत्तींपेक्षा आकाराने अर्धे पिग्मी हत्ती होते, आणि असे नानाविध प्राणी होते. सोळा हजार वर्षांपूर्वी माणूस इथे पहिल्यांदा पोहोचल्यानंतर त्यांनी रानगव्यांच्या शिकारी करायला सुरुवात केली. एका वेळी एका मोठय़ा रानगव्याची शिकार शंभर माणसांचे पोट भरू शकत होती. हळूहळू रानगव्यांची संख्या कमी झाली तसे सिंहही कमी होऊ लागले आणि लवकरच रानगवे आणि सिंहाच्या प्रजाती नष्ट झाल्या. तिथल्या निसर्गाचा जगण्यासाठी वापर करून घ्यायला हळूहळू माणूस शिकला आणि त्यातून तिथे प्रगत संस्कृती आकारास येऊ लागल्या. आजच्या दोन्ही अमेरिका जिथे एकमेकांना मिळतात त्या भागांमध्ये पाच हजार वर्षांपूर्वी करल-सुपी संस्कृती, तीन हजार वर्षांपूर्वी ओल्मेक संस्कृती आणि अवघ्या अडीच हजार वर्षांपूर्वी प्रगत माया संस्कृती उदयास आली. आपल्या भरभराटीच्या काळात माया संस्कृतीत वीस लाखांहून अधिक लोक जीवन जगत होते. लोकसंख्या कमालीची वाढल्याने, वारंवार दुष्काळ पडल्याने, धंद्यात तोटा होऊ लागल्याने आणि अंतर्गत युद्धांमुळे माया संस्कृती नष्ट झाली. तिच्या इतिहासातली मोठमोठी मंदिरे आणि स्मारके निमूटपणे गतवैभवाची साक्ष देत उभी राहिली. प्रगत संस्कृती जाऊन माणसे पुन्हा जंगलांच्या आधाराने जगायला शिकली हळूहळू पुन्हा स्थिरावली. काही काळ आणखी गेला आणि लवकरच ह्या भूभागावर नव्या माणसाचे आगमन झाले. भारत देश नेमका कुठे आहे हे समुद्रमार्गे शोधायला निघालेल्या ख्रिस्तोफर कोलंबस नावाच्या स्पॅनिश दर्यावर्दीची बोट आपला मार्ग चुकून ती ह्या भूभागावर दाखल झाली. 3 ऑगस्ट 1492 साली युरोपियन लोकांचे इथल्या जमिनीवर पहिले पाऊल पडले आणि तिथून पुढे ह्या भूमीचा इतिहास रक्ताने माखून गेला. या प्रदेशाचे मूलनिवासी लोक गोर्या लोकांपेक्षा तंत्रज्ञानाच्या बाबतीत बरेचसे मागास होते, त्यांच्या चालीरीती ह्या कमालीच्या अंधर्शद्धेने भरलेल्या आहेत आणि ही लोकं रानटी आहेत असा निष्कर्ष युरोपियन लोकांनी काढला आणि त्यांना माणसांत आणण्यासाठी प्रय} सुरू केले. ज्या ठिकाणी त्यांना विरोध झाला त्या ठिकाणी त्यांच्या कत्तली करण्यात आल्या, त्यांच्याजवळ असलेल्या मौल्यवान गोष्टी लुटून घेण्यात आल्या, त्यांच्या स्रियांवर बलात्कार करण्यात आले. काही युरोपियन लोकांनी त्यांना दयेपोटी ब्लँकेट आणि वापरलेले जुने कपडे दिले; ज्यातून मूलनिवासींमध्ये देवी आणि गोवरची साथ पसरली. ह्या लोकांमध्ये हे साथीचे आजार यापूर्वी कधीही झालेले नसल्याने त्या रोगांशी लढण्याची कुठलीही प्रतिकारक्षमता त्यांच्यामध्ये नव्हती. त्यामुळे या रोगांमुळे लाखो मूलनिवासी मृत्युमुखी पडले. कोलंबसच्या आगमनापूर्वी अमेरिकेतल्या मूलनिवासींची संख्या साडेचौदा कोटी होती अवघ्या दोनशे वर्षात ती अवघी दीड कोटी इतकी कमी झाली आणि या सर्व लोकांना गुलाम करण्यात आले.बाहेरच्या जगात व्यापार आणि साम्राज्य विस्तार करणार्या युरोपियन दर्यावर्दींना नवनव्या प्रदेशांचा आणि लुटण्यायोग्य सुबत्तेचा शोध लागतच होता. आणि ही सुबत्ता लुटून ती मायदेशी पाठवण्यासाठी किंवा आहे तिथेच उपभोगण्यासाठी युरोपियन वसाहतींची जगभर स्थापना चालूच होती. ज्याप्रमाणे युरोपियन लोक अमेरिकेत स्थिरावत होते तसेच ते आफ्रिकेतही स्थिरावत होते. आफ्रिकेतल्या माणसांबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन अजूनच वेगळा होता. त्यांना या लोकांमध्ये माणूसच दिसत नव्हता. माणसासारखाच दिसणारा; पण कुठलीही प्रगती न केलेला हा सशक्त प्राणी आपल्या साम्राज्यविस्तारासाठी किती उपयोगाचा असेल हे युरोपियन लोकांना उमगले आणि त्यांनी या लोकांना आफ्रिकेतून पकडून आणून अमेरिकेत गुलाम म्हणून विकण्यास सुरुवात केली. सोळाव्या शतकात युरोप, अमेरिका आणि आफ्रिका खंडाला जोडणार्या अटलांटिक समुद्रातील प्रसिद्ध सुवर्ण त्रिकोणातल्या सागरी समृद्धी महामार्गाने हे गुलाम अमेरिकेत आणले गेले. ज्याला ‘अटलांटिक स्लेव्ह ट्रेड’ असे म्हटले जाते. या मार्गाने अमेरिकेत गुलामी करण्यासाठी आणलेल्या माणसांना वसाहतींनी मालाचा दर्जा दिला. ह्या मालाचे मालक आपल्याजवळ असलेल्या गुलामांची जाहिरात करू लागले, खंडीतल्या बकर्या विकताना जशी बोली लावली जाते तशी त्यांची बोली लावली जाऊ लागली, काहींनी एका गुलामावर एक गुलाम फ्री, तर काहींनी शंभर गुलामांसाठी होलसेल भाव आणि एकेकट्या गुलामांसाठी रिटेल भाव लावायला सुरुवात केली. क्वचित कधी मालाचे भाव पडत आणि अशावेळी गुलामांना मुक्त करण्याऐवजी युरोपियन व्यापारी आपला माल समुद्रातच फेकून देत, काही ठिकाणी गुलामाच्या लहान मुलांचा वापर मगरींना पकडताना चार्यासारखाही केला जात असे. दरम्यान, आता काही पिढय़ांपासून अमेरिकेतच सेटल झालेल्या युरोपियन लोकांची आपल्या मायदेशाशी भांडणे सुरू झाली होती. लवकरच इथल्या गोर्या लोकांनी एकत्र येऊन अमेरिकेवर असलेला युरोपियन वरदहस्त अमान्य करून स्वत:ला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले.4 जुलै 1776 रोजी गोर्या अमेरिकन लोकांचा देश स्वतंत्र झाला; पण गुलामांच्या परिस्थितीत काहीही फरक पडला नाही. ज्यांना मुळात माणूस म्हणूनच अद्याप मान्यता मिळाली नव्हती त्यांना कसले आलेय स्वातंत्र्य? अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा हा मुक्तस्वातंत्र्याचा महत्त्वाचा दस्तावेज म्हणून मिरवला जातो; पण ज्या काळात तो मांडला गेला त्या काळात त्याच्यामध्ये गुलामांसाठी कुठलीही वेगळी तरतूद नव्हती. अमेरिकेच्या चार राष्ट्रपित्यांपैकी एक थॉमस जेफरसन यांनी गोर्या आणि काळ्या माणसांधला भेद आणि साम्यांवरती काही उलटसुलट विचार मांडले. अर्थात त्याने स्वत:ही कधीकाळी गुलाम विकत घेतलेच होते. जेफरसनने मांडणी केल्यानंतर गुलाम आणि गुलामीच्या प्रश्नांना एक समाजशास्रीय चौकट मिळाली ज्यात गुलामीची प्रथा नष्ट करावी असे म्हणणारे गोरे लोक आणि गुलामी योग्य ठरविणारे गोरे लोक असे सरळसरळ दोन तट पडले. पुढे 1863 साली तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी कायदेशीररीत्या गुलामीची प्रथा बंद केली; पण त्यांची ही सुधारणा मोठय़ा प्रमाणांत गुलाम विकत घेऊन त्यांच्या वापराने र्शीमंत झालेल्या लोकांना मान्य नव्हती. त्यांनी अमेरिकेतून फुटून आपले स्वत:चे संघराज्य आणि त्यांचा झेंडाही तयार केला होता. यातूनच मग अमेरिकेत गृहयुद्ध पेटले; ज्यात साडेसात लाख सैनिकांचा तर लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. गृहयुद्धाच्या काळात झालेले तीनपैकी दोन मृत्यू हे साथीच्या आजारानेही झाले; ज्याचे मूळ गृहयुद्धकाळातल्या अफरातफरीच्या व्यवस्थेत होते. युद्ध संपल्यानंतर एक देश म्हणून अमेरिकेची गुलामांबद्दलची मोठय़ा प्रमाणात भूमिका बदलली; पण अजूनही गुलामव्यवस्थेचे सर्मथन करणार्या गोर्या लोकांना हा बदल मान्य नव्हता. गुलामांचे पहिल्याप्रमाणे पूर्ण शोषण करण्याची व्यवस्था पुन्हा आणण्यासाठी त्यांनी प्रय} सुरू केले. जिथे कायद्याचे हात लवकर पोहचू शकत नव्हते तिथल्या गुलामांसोबत कमालीचा भेदभाव आणि अमानुष वागणूक दिली गेली; पण कायद्याला आता त्यांचे अस्तित्व मान्य असल्याने त्यांना व्यवस्था ‘कृष्णवर्णीय’ वा ‘ब्लॅक पीपल’ असे संबोधू लागली. याशिवाय त्यांची निग्रो वा निग्गर म्हणून हेटाळणीही सुरू झाली; पण गुलामांना आता काळ्या का होईना मात्र माणसाचा दर्जा मिळला होता. केवळ माणूसपण मिळाले असले तरी ते व्यवस्थित जगण्याची परिस्थिती अमेरिकेच्या उत्तरी भागांमध्ये अधिक चांगली होती आणि दक्षिणेकडची राज्ये अजूनही कृष्णवर्णीयांचा द्वेषच करीत होती. अधूनमधून कृष्णवर्णीयांना जिवंत जाळणे, झाडाला लटकावून फाशी देणे वा दगडाने ठेचून मारण्याच्या घटना अविरत घडतच होत्या. या भयंकर परिस्थितीतून सुटण्यासाठी आणि जीव वाचविण्यासाठी लाखो कृष्णवर्णीयांनी मग दक्षिणेकडची राज्ये सोडून उत्तरेच्या राज्यात स्थलांतरित होण्यास सुरुवात केली. या स्थलांतरानंतर कृष्णवर्णीयांची अमेरिकेतल्या इतर राज्यातली संख्या वाढू लागली; पण ज्या ज्या ठिकाणी हे लोक गेले तिथे तिथे प्रस्थापित गोर्या लोकांकडून त्यांना अपमानाची आणि घृणेचीच वागणूक दिली जाऊ लागली. हे लोक आपल्या नोकर्या पळवतील, आपल्या स्रियांशी संबंध करतील अशा प्रकारची भीती समाजात पसरवून कृष्णवर्णीयांविषयी कमालीचा द्वेष पसरविण्यात आला ज्याला आज आपण वर्णद्वेष म्हणून ओळखतो.अमेरिका दुसर्या महायुद्धात उतरल्यानंतर मात्र हा वर्णद्वेष काही प्रमाणात कामी झाला आणि गोरे लोक काळ्या लोकांशी जास्त माणुसकीने वागू लागले. कृष्णवर्णीयांना माणूस म्हणून अमेरिकेने मान्यता दिली तरी त्यांना नागरिक म्हणून अजूनही मान्यता मिळालेली नव्हती. कृष्णवर्णीयांना शिक्षणाचा अधिकार नव्हता की संपत्ती मिळविण्याचा वा नोकर्यांमध्ये समान संधींचा.ह्या सर्व परिस्थिती विरोधात 1950 नंतर अमेरिकेत नागरी स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला जो पुढे तीस वर्षे चालला. मार्टिन ल्युथर किंग यांनी ह्या लढय़ाला निर्णायकी यश मिळवून दिले आणि कृष्णवर्णीयांना पूर्णत: अमेरिकन नागरिक म्हणून दर्जा मिळवून दिला. याच काळात अमेरिकेत स्थायिक झालेल्या इतर देशांतील लोकांचाही दुय्यम दर्जा जाऊन त्यांना नागरिकत्व दिले जाऊ लागले. भारतातून अमेरिकेत स्थलांतरित झालेले ‘इंडियन अमेरिकन’ बनले तर इराकहून अमेरिकेत स्थलांतरित झालेले ‘इराकी अमेरिकन’. आणि चारशे वर्षांपूर्वी आफ्रिकेतून इथे आणले गेलेले आणि नंतरही आफ्रिकेतून येऊन अमेरिकेत स्थलांतरित झालेले सर्व लोक ‘आफ्रिकन अमेरिकन’ झाले.युरोपातून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या लोकांना मात्र या पद्धतीची गाज नव्हती. त्यांच्यासाठी स्पॅनिश अमेरिकन, ब्रिटिश अमेरिकन, र्जमन अमेरिकन अशा संज्ञा न वापरता फक्त अमेरिकन इतकीच संज्ञा वापरली गेली, ज्यामुळे गोरे लोकच खरे अमेरिकन आहेत आणि अमेरिकेवर त्यांचीच मालकी आहे अशी वंशर्शेष्ठत्वाची भावना तशीच शिल्लक राहिली. ऐंशीच्या दशकानंतर आफ्रिकन अमेरिकन लोकांनी शेती, उद्योगधंदे, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली असली तरी अमेरिकेतल्या सर्वात गरीब लोकांमध्ये आजही आफ्रिकन अमेरिकन लोकांचाच भरणा जास्त आहे. चारशे वर्षांपूर्वी सुरू झालेला वंशवाद आणि वंशद्वेष आता वर्णद्वेषापर्यंंत येऊन ठेपला असला तरी तो अद्यापही थांबलेला नाही. आजही अमेरिकेत काळ्या लोकांना द्वेषाचा सामना करावा लागतो. कामाच्या ठिकाणी भेदभावाला सामोरे जावे लागते, काही गौरवर्णीय लोक त्यांच्याविषयी आजही घृणा बाळगतात आणि कुत्सितपणे बोलतात. कधीकाळी गुलामांच्या प्रथेसाठी अमेरिकेशी फारकत घेतलेल्या राज्यांमधून गोर्या रंगाचे वर्चस्ववादी पोलीस कृष्णवर्णीयांना पोलीस कोठडीत हालहाल करून मारतात, त्यांना गोळ्या घालतात आणि त्यांच्या मानेवर स्वार होऊन गळा दाबून त्यांचा भररस्त्यात दिवसाढवळ्या खून करतात. गेली चारशे वर्षे अस्तित्वात असलेला वर्णविद्वेष कोविड-19नंतर आता नव्या पर्वात प्रवेश करीत असून, यावेळी तो अमेरिकेचे सरळसरळ तुकडे करतो, की मग कुठलाही वर्णद्वेष शिल्लक नसलेली एकसंध अमेरिका तयार करतो हे ठरणार आहे..(उत्तरार्ध)
rahulbaba@gmail.com(लेखक मानववंशशास्राचे अभ्यासक आहेत.)