किरण कर्नाड, डेटन, न्यू जर्सीअमेरिकेतील हवामान जगात सर्वांत चांगले आहे. इथे थंडीचा सिझन सोडल्यास फेब्रुवारी ते आॅक्टोबर हा स्प्रिंग व समरचा काळ आल्हाददायक असतो. येथील वातावरण धूळ व प्रदूषणविरहित असते की धूळ नावाचा प्रकार इथे नजरेला पडत नाही. त्यामुळे दुचाकी, चारचाकी इथल्यासारखी रोज धुवावी वा पुसावी लागत नाहीत. यामुळेच इथे रोज केरवारे करावे लागत नाही की जाड कापडाने फरशीही पुसावी लागत नाहीत. घरातील फर्निचर व इतर गोष्टींवर अडकलेली धूळ झटकावी लागत नाही. शिवाय येथे घराघरांत असलेली व्हॅक्यूम क्लिनर्सही याची काळजी घेतात. केरकचरा दहा दिवसांनी, तर धुणे-पुसणे, घरची स्वच्छता पंधरा-वीस दिवसांनी केली तरी चालते. प्रत्येकाच्या घरात अत्याधुनिक वॉशिंग मशीन व त्यात कपडे धुण्यापासून ते थेट वाळविण्याची सुविधा असल्याने विशेष फरक पडत नाही.
भांडी घासण्याचे म्हणाल तर येथे प्रत्येकाच्या घरी डिश वॉशर्स असतात. अत्याधुनिक प्रकारच्या डिश वॉशर्सने भांडी स्वच्छ निघतात. अमेरिकेत प्रत्येकजण आपली प्लेट, ताट, वाटी स्वत: धुतो. मग प्रश्न पडतो घरात मोलकरणी हव्याच कशाला? इथे सामान्य माणसाकडे ‘मोलकरीण’ नावाचा प्रकारच नसतो. दोन-तीन महिन्यांतून एखादी मोलकरीण बोलवावी लागते. इथे अमेरिकेच्या अध्यक्षांकडेच मोलकरीण नावाचा प्रकार असतो, असेही गमतीने म्हटले जाते.
या मोलकरणींचा ‘पगार काय असतो?’ या प्रश्नाला माझ्या मुलीने दिलेले उत्तर चक्रावून टाकणारे होते. ही मोलकरीण दोन-तीन तासांसाठी चक्क १२० ते १४० अमेरिकन डॉलर्स घेते. याची भारतीय रुपयात किंमत केली असता ती जवळजवळ नऊ ते दहा हजार रुपये होते. म्हणजे महिन्याकाठी एक मोलकरीण तब्बल सहा ते सात लाख रुपये मिळविते. एका दिवसात या मोलकरणी किमान दोन ते तीन घरे करतात.
या मोलकरणींमध्येही विविध ग्रेड असतात, तसेच त्यांच्या वेतनाचा दर घराच्या एकूण क्षेत्रफळावर अवलंबून असतो. माझ्या मनात सहज विचार आला की, आपल्याकडील मोलकरणींना याची बित्तंबातमी लागल्यास विमाने भरून त्या अमेरिकन भूतलावर उतरतील.!! आज बऱ्याच दिवसांनी माझ्या मुलीने अशीच मोलकरीण ‘हायर’ केली होती. त्यामुळे तिला पाहण्यास आम्ही उत्सुक होतो.
मोलकरणींबद्दल हा विचार करीत असतानाच ती आलीच...! एखाद्या सुंदर राजकन्येसारखी... क्वीन एलिझाबेथसारखी... हळूवार.. दरवाजा उघडल्यानंतर तिचे ‘हॅलो गुड मॉर्निंग’ वगैरे झाले.. त्या स्वरूपसुंदर कन्येने फिक्कट निळसर तोकडी पँट, काऊबाय टी शर्ट.. मागे केसांची पोनी..... अतिउंच टाचेचे ब्राऊनीश बूटस् असा ड्रेस परिधान केला होता. ‘ओ हाय.. हाऊ आर यू’ असे काही म्हणतच परवानगी न घेता आत घुसली. येताना तिने एक मोठा व एक छोटा असे दोन व्हॅक्यूम क्लिनर्स, दोन डबे त्यात वूलन्सची फडकी, स्टेन रिमुअर्स, जेलीज, लांब झाडू, आदी साहित्य आणले होते. ‘कॅन आय प्लिज स्टार्ट माय वर्क?’ असे म्हणताच तिने विद्युतगतीने कामास सुरुवात केली.
सोबत आणलेल्या व्हॅक्यूम क्लिनरच्या मशीनवर असलेल्या कोल्ंिड्रकच्या बाटलीतून अधूनमधून ज्यूसचे घोट घेत मध्येच मोबाईलवर बोलत ती कामेही करीत होती आणिपुढचे प्लॅनिंगही करीत होती. तिने आमचे शयनगृह व स्वच्छतागृह चकाचक केले. तिने सर्व खोल्या, खुर्च्या, सोफा, आसने, स्वयंपाकघर, कुकिंग रेंज, फ्रीज, एक्झॉस्टफॅन, चिमणी, मायक्रोवेव्ह, टोस्टर, डीश वॉशर, आदी सर्व साफ केले. एखादी गोष्टसाफ करताना ती त्यावर अॅसीडचे चार थेंब शिंपडून त्यावर घासून घासून साफ करीत होती. तिचे प्रयत्न खरोखरीच प्रामाणिकपणाचे वाटत होते.