अंकुश काकडे- पुण्यात महाविद्यालयात असताना बोर्डिंगमध्ये राहणे आणि तेथील मेसमध्ये जेवण, ही एक वेगळीच मजा विद्यार्थीवर्गाला असे. पण काही मोठी महाविद्यालये सोडली तर इतर ठिकाणी मेस नव्हत्या, त्यामुळे साहजिकच खासगी मेसमध्ये किंवा बोर्डिंग हाऊसमध्ये जेवण घ्यावे लागत होते. अर्थात शैक्षणिक संस्था या बहुतेक शहराच्या पश्चिम भागातच होत्या. त्यामुळे टिळक रोड, सदाशिव पेठ, डेक्कन जिमखाना या परिसरात या मेस मोठ्या प्रमाणावर होत्या. सर्व महाविद्यालयांतील मेसमध्ये दर बुधवारी रात्री चेंज (म्हणजे अगदी २-३ पदार्थ ), तर दर रविवारी दुपारी फिस्ट (नेहमीच्या रोजच्या जेवणापेक्षा काहीतरी वेगळे आणि एखादा गोड पदार्थ) हे ठरलेलं असे. त्यामुळे या दोन दिवशी मेस, बोर्डिंग हाऊसमधील उपस्थिती भरपूर असे. महाविद्यालयातील मेसमध्ये तुम्ही जेवला नाहीत तरी त्याचे पैसे हे द्यावेच लागत; पण खासगी बोर्डिंगमध्ये महिन्याची कूपन्स मिळत. ती तुम्ही तुमच्या सवडीने केव्हाही वापरू शकत होता. शिवाय होस्टेलमधील मेसपेक्षा या खासगी बोर्डिंग हाऊसमधील जेवण हे गरम, तसेच चटकदार असे. कॉलेजमधील मेसच्या संदर्भात तक्रार करूनही दखल घेतली जात नसे, तसे खासगी बोर्डिंगमध्ये तक्रारीची दखल घेत.
पुण्यात महाविद्यालयात असताना बोर्डिंगमध्ये राहणे आणि तेथील मेसमध्ये जेवण, ही एक वेगळीच मजा विद्यार्थीवर्गाला असे. पण काही मोठी महाविद्यालये सोडली तर इतर ठिकाणी मेस नव्हत्या, त्यामुळे साहजिकच खासगी मेसमध्ये किंवा बोर्डिंग हाऊसमध्ये जेवण घ्यावे लागत होते. अर्थात शैक्षणिक संस्था या बहुतेक शहराच्या पश्चिम भागातच होत्या. त्यामुळे टिळक रोड, सदाशिव पेठ, डेक्कन जिमखाना या परिसरात या मेस मोठ्या प्रमाणावर होत्या. सर्व महाविद्यालयांतील मेसमध्ये दर बुधवारी रात्री चेंज (म्हणजे अगदी २-३ पदार्थ ), तर दर रविवारी दुपारी फिस्ट (नेहमीच्या रोजच्या जेवणापेक्षा काहीतरी वेगळे आणि एखादा गोड पदार्थ) हे ठरलेलं असे. त्यामुळे या दोन दिवशी मेस, बोर्डिंग हाऊसमधील उपस्थिती भरपूर असे. महाविद्यालयातील मेसमध्ये तुम्ही जेवला नाहीत तरी त्याचे पैसे हे द्यावेच लागत; पण खासगी बोर्डिंगमध्ये महिन्याची कूपन्स मिळत. ती तुम्ही तुमच्या सवडीने केव्हाही वापरू शकत होता. शिवाय होस्टेलमधील मेसपेक्षा या खासगी बोर्डिंग हाऊसमधील जेवण हे गरम, तसेच चटकदार असे. कॉलेजमधील मेसच्या संदर्भात तक्रार करूनही दखल घेतली जात नसे, तसे खासगी बोर्डिंगमध्ये तक्रारीची दखल घेत.
मुरलीधर भोजनालय : १९२९ साली माहेश्वरी विद्या प्रसारक मंडळाची पुण्यात स्थापना झाली. शिक्षणासाठी येणाºया मुलांना राहण्यासाठी शेठ रावसाहेब ताराचंद रामनाथ राठी यांनी देणगी देऊन नारायण पेठ पोलीस चौकीजवळ मुलांचे वसतिगृह बांधले. जेवणाचं काय? हा प्रश्न सोडविला मुरलीधर मंदिराचे पुजारी शंकरमहाराज तिवारी व त्यांची पत्नी कमलाबाई यांनी. त्यांनी तेथे खानावळ सुरू केली. अतिशय सुग्रास जेवण विद्यार्थ्यांना मिळू लागले. तो काळ होता १९४५ चा. १९६१ मध्ये शंकरमहाराजांनी तेथेच मुरलीधर भोजनालय सुरू केले. रोज दोन वेळचे जेवण, रविवारी फिस्ट यामुळे विद्यार्थी वर्गात ते फारच लोकप्रिय झाले. स्वत: शंकरमहाराज विद्यार्थ्यांची काळजी घेत, कुणाकडे पैसे नसतील तरी त्याला ते जेवू घालत. विलासराव देशमुख लॉ कॉलेजमध्ये असताना या मेसमध्ये आवर्जून जेवायला येत असत. श्रीनिवास पाटील, गोपीनाथ मुंडेही येत. पुढे शंकरमहाराजांच्या नंतर त्यांचा मुलगा गोपाळ यांनीही काही काळ ही मेस चालविली. सध्या तेथे मुरलीधर व्हेज हे हॉटेल सुरू आहे. आता तेथे मासिक पास किंवा विद्यार्थी वर्ग फारसा नसतो. इतर ग्राहक मात्र मोठ्या संख्येने असतो.विद्या भवन : सदाशिव पेठेत ज्ञानप्रबोधिनीसमोर सावंत इनामदारांचं मोठं वसतिगृह होतं. पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील शेतकºयांची मुलं शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर तेथेच राहत. उत्तम खोल्या, हवेशीर वातावरण, सर्व खोल्यांना बाल्कनी त्यामुळे ते सतत भरलेलं असे. त्याच इमारतीत धुळ्यातून पुण्यात आलेले गंभीरराव झावरू मराठे यांनी बोर्डिंग सुरू केलं. ते साल होतं १९६१. वसतिगृहातील बहुतेक सर्वच मुलं तेथे जेवायला येत. रुचकर मराठमोळं जेवण असल्यामुळे इतर विद्यार्थीही तेथे येत. रोज दोन्ही वेळेस मिळून ४०० ते ५०० विद्यार्थी जेवणास असत. दर रविवारी फिस्टसाठी तर येथे विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असे. मराठे यांनी काही काळ पुणे विद्यापीठ मेसही चालविली होती. पतंगराव कदम हे सुरुवातीच्या काळात न्यू इंग्लिश स्कूलजवळील त्यांच्या कार्यालयात नेहमी येत, तेव्हा ते आवर्जून विद्याभवन मेसमध्ये जेवणास येत, अशी आठवण राजेंद्र मराठे सांगतात. पुढे मराठ्यांनी धुळ्यात ‘मेघदूत’ नावाचे ३ मजली मोठे हॉटेल सुरु केले होते. २०१६ पर्यंत हे बोर्डिंग चालू होते. पुढे सावंत इनामदारांनी ती जागा घेऊन तेथे छोटी-छोटी हॉटेल सुरु केली; पण त्याला मराठेंच्या बोर्डिंगची सर काही येत नाही हे खरं! आज या विद्याभवनमध्ये मोबाईलची दुकानं दिसतात.एच. एन. डी. जैन बोर्डिंग : गणेशखिंड रोडवरील हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या वतीने सुरू असलेले हे बोर्डिंग आजही चालू आहे. भरपूर मोठी जागा, उत्तम खोल्या, संपूर्ण शाकाहारी बोर्डिंग यामुळे तेथील वसतिगृहात कधीही गेलं तर जागा शिल्लक नाही, असे उत्तर मिळते. आजही तेथे जवळपास २५० विद्यार्थी आहेत.बाहेरच्या विद्यार्थ्यांनाही मेस खुली केली आहे. पूर्वी धनापल जेले हे ही मेस चालवीत. नंतर नितीन आपटे यांनी काही काळ ती चालविली. त्यानंतर मात्र गेली ३० वर्षे दिलीप मालाणी ही मेस चालवीत आहेत. एकच व्यक्ती इतकी वर्षे मेस चालवितो याचाच अर्थ विद्यार्थ्यांना त्यांचे जेवण निश्चितच आवडते, असा होतो. रविवारी फिस्ट असते; पण इतर मेसप्रमाणे येथील चेंज बुधवारी नसतो तर गुरुवारी असतो. या बोर्डिंगला मोठे पटांगण असल्यामुळे पार्किंग, क्रिकेट, हॉलीबॉल, वार्षिक संमेलन दरवर्षी होते. १९८२ पासून तेथील रेक्टर सुरेंद्र गांधी हे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असल्यामुळे रक्तदान, व्याख्यान असे कार्यक्रम राबविले जातात.फिरोदिया हॉस्टेल : बी.एम.सी. कॉलेजशेजारी असलेलं फिरोदिया हॉस्टेल हे १९३९-४० मध्ये सौराष्ट्रातील काही व्यापाºयांनी सौराष्ट्र स्थानकवासी जैनतर्फे सुरू केले. त्याचे पूर्वीचे नाव होते एस. एस. जैन होस्टेल. नवलभाऊ फिरोदिया यांनी होस्टेलच्या उभारणीसाठी मोठी मदत केली. त्यामुळेच त्यांचे नाव फिरोदिया होस्टेल असे ठेवले. आज तेथे २५०-३०० विद्यार्थी भोजन घेतात. ३५-४० वर्षे ही मेस पांडुरंग बोडके या महाराष्ट्रीय माणसाने चालविली. पांडोबा नावाने ते विद्यार्थ्यांत प्रिय होते. पुढे वयोमानामुळे त्यांनी ती मेस सोडली. आता हरी देसाई ही मेस चालवीत आहेत. फिरोदिया उद्योगाचे अभय फिरोदिया आणि त्यांची कन्या बाला फिरोदिया या होस्टेलचे व्यवस्थापन करीत आहेत, अशी माहिती युवराज शहा सांगतात.महावीर जैन होस्टेल : फिरोदिया होस्टेलशेजारीच असलेलं सध्याचं महावीर जैन होस्टेल. पूर्वी त्याचं नाव होतं भारत जैन विद्यालय. पोपटलाल शहा, गगलभाई हाथीभाई यांनी या होस्टेलसाठी जागा दिली आणि हजार हजार रुपये गोळा करून या मंडळींनी अवघ्या १ लक्ष रुपयांत हे होस्टेल उभं केलंय. जैन विद्यार्थी येथे मोठ्या संख्येने असत. पण पुढे १९३९ साली प्लेगसाथीमुळं हे होस्टेल बंद पडलं. तसेच शहरापासून हे थोडं दूर असल्यामुळे व शहरात वाड्यात भाड्याने खोली घेऊन राहण्याची सोय झाल्यामुळे काही काळ हे होस्टेल बंदच होतं; पण पुढे पोपटलाल शहांनी मोरारजी देसाईंना विनंती करून ही जागा महावीर जैन विद्यालयाला मिळवून दिली. १९६५ मध्ये तेथे नवीन इमारती बांधल्या. २००६ मध्ये मुलींचेही वसतिगृह येथे सुरू झालंय; युवराज शहा यांनी तेथे टेकडीवरुन येणारं पाणी वाचवून ४-५ हजार ट्रक माती भरुन घेतली. उत्तम उद्यान तयार केलं. वासुपूज्य स्वामी जैन मंदिर बांधलं. मगनमहाराज चौधरी नावाचे गृहस्थ येथील मेस चालवितात. मुलं-मुली मिळून ६०० विद्यार्थी येथे राहतात. (लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक कार्यकर्ते आहेत.)