- डॉ. अभय बंग
त्या दिवशी त्या माळरानावर उभं राहून किशोरवयाच्या आम्ही दोन भावांनी नियतीशी तो करार कसा काय केला? आमचं घर व आश्रम त्याला कारणीभूत असावे. दोन्ही विलक्षण होते.माझं जवळपास अख्खं बालपण व किशोरवय वर्ध्याच्या तीन आश्रमात गेलं.पहिला होता वर्धा शहराच्या बाहेर असलेला ‘महिलाश्रम’. हा आश्रम १९२५ साली ‘सत्याग्रहाश्रम’ म्हणून विनोबांनी सुरू केला. पुढे तो ‘महिलाश्रम’ झाला. मी तीन वर्षांचा असताना, १९५३ साली, विनोबांच्या ‘भूदानयज्ञ’ आंदोलनासाठी वडिलांनी प्रोफेसरकीचा राजीनामा दिला. आई महिलाश्रममध्ये शिक्षिका म्हणून रुजू झाली. आमचं कुटुंब तिथे राहायला गेलं. तिथूनच माझी स्मृती सुरू होते. गांधीजींचा सेवाग्राम आश्रम तिथून फक्त तीन मैल अंतरावर होता. वयाच्या दहाव्या वर्षी, १९६० साली, हेही अंतर मिटलं. आमचं कुटुंब प्रत्यक्ष सेवाग्राम आश्रमात राहायला गेलं. एकेकाळी स्वत: महात्मा गांधींनी सुरू केलेल्या ‘नयी तालीम’ शाळेची मुख्याध्यापिका माझी आई व आम्ही चाळीस विद्यार्थी अशी ती ऐतिहासिक शाळा पुन्हा सुरू झाली. माझं ‘नयी तालीम’ पद्धतीने शिक्षण सुरू राहिलं. वयाच्या चौदाव्या वर्षी आमचं कुटुंब वर्ध्याजवळच्या, विनोबांनी ग्रामसेवेसाठी स्थापन केलेल्या ‘गोपुरी’ या आश्रमात राहायला गेलं. मी मेडिकल कॉलेजमध्ये जाईपर्यंत आम्ही गोपुरीमध्ये राहत होतो. मेडिकलसाठी नागपूरला गेलो आणि माझं बालपण संपलं.तिन्ही आश्रमात गांधी व विनोबांची उपस्थिती सार्वत्रिक होती. त्या काळात ते प्रत्यक्ष तिथे नव्हते. पण त्यांचे तत्त्वज्ञान व त्यांनी सुरू केलेली जीवनपद्धती याद्वारे ते तिथे उपस्थित असत. आम्ही सर्वच खादी व फक्त खादीच नेसायचो. खादी हे व्रत होतं, केवळ बाजारातून विकत आणायचा पोशाख नव्हता. खादीच्या बाबत गांधीजींचं सूत्र होतं- ‘जो पहने वो काते, जो काते वो पहने’. आम्ही रोज किमान तासभर तरी चरख्यावर सूत कातायचो. मी चरखा चालवायला केव्हा शिकलो ते आठवतदेखील नाही. आजकाल मुलं मोबाइल फोन व कॉम्प्युटर जितकं सहजपणे लहानपणीच शिकतात तसं मी चरखा शिकलो. घरी व शाळेतही. ग्लोबल वॉर्मिंग, चंगळवाद हे शब्द अजून निर्माण झाले नव्हते. पण कमीत कमी गरजांची जीवनशैली हे आश्रमात व घरात व्रत होतं. तो अपरिग्रहाचा तसेच दरिद्रीनारायणाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न होता. शरीरश्रम व स्वावलंबन हे आश्रमातही होते आणि घरातही. विनोबांनी जवळपास तीस वर्षे तिथेच स्वत: कठोर शरीरश्रम केल्याचा इतिहास होता.‘चरखा कातणाऱ्या मजुराला मजुरी किती द्यावी?’ - या गांधीजींच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी विनोबांनी सहा महिने मागून घेतले. सहा महिन्यांनी ते गांधीजींना भेटायला परतले तेव्हा त्यांचं वजन तीस पौंड कमी झालेलं होतं.‘विनोबा, हे काय झालं?’ - गांधीजींनी विचारलं.‘गेले सहा महिने रोज आठ तास कातून त्यातून मिळालेल्या सहा पैसे मजुरीमध्ये जगून पाहिलं. अशी अवस्था होते. कातणाऱ्यांची मजुरी चारपट वाढवली पाहिजे’ - विनोबा उत्तरले.अशी तज्ज्ञ समिती पुन्हा झाली नसणार!विनोबांचा जन्मदिन ‘भूमी-क्रांती दिन’ म्हणून आश्रमात साजरा व्हायचा. त्या दिवशी सर्व घरातील चुली बंद. सकाळी आठ ते संध्याकाळी पाचपर्यंत अख्खं आश्रम शेतात शेतकऱ्यांसारखं राबायचं. केलेल्या कामाचा शेतमजुरीच्या दराने संध्याकाळी हिशेब व्हायचा. तेवढ्या पैशात होईल असा सामूहिक स्वयंपाक करून संध्याकाळी सर्वांनी सोबत जेवायचं. त्यापलीकडे अन्नाचा कण नाही. शेतकऱ्याचे व मजुराचे कष्ट व हलाखी यांचा प्रत्यय घेण्याची व सोबतच शरीरश्रम, स्वावलंबन शिकण्याची ही डायरेक्ट पद्धत होती.त्या रात्री झोपताना भूक लागली होती. आई थोपटून झोपवताना म्हणाली- आपण हे एक दिवस जगलो. ते रोज आयुष्यभर कसं जगत असतील?खूप वर्षांनंतर महाराष्ट्रातील शेतमजुरांची किमान मजुरी किती असावी याचा मी अभ्यास केला. त्यांची अन्नाची गरज किती यावरून केलेला मजुरीचा हा हिशेब गाजला. साठ लक्ष ग्रामीण मजुरांची शासनमान्य किमान मजुरी तीन पटीने वाढवण्यासाठी तो अभ्यास आधार ठरला. त्या हिशेबामागे हा भुकेचा अनुभव होता.या तीन आश्रमांमधील माझ्या बालवयात उपनिषद व गीता होते. रोजच भेटायचे. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, मीराबाई व कबीर होते. नरसिंह मेहता व सूरदास होते. त्यांची भजनं रोज संध्याकाळी प्रार्थनेत म्हणायचो. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ होतं आणि ‘वैष्णव जन तो तेणे कहिये’ होतं, ऋषी आणि संत यांसारखी माणसं रोजच अवती-भोवती दिसत होती. भेटत होती. स्वातंत्र्ययुद्धातील मोठे व छोटे स्वातंत्र्यसैनिक नियमितपणे यायचे. त्या सर्वांसाठी वर्धा, सेवाग्राम ही स्थळं म्हणजे काशी-रामेश्वर होते.एकदा जवाहरलाल नेहरू महिला आश्रमात आले. पंतप्रधान होते; पण या आश्रमामध्ये पूर्वी अनेकवेळा गांधीजींना भेटायला आलेले असल्याने इथं तर खरंच ‘चाचा’ म्हणून आले. गोरेपान, शिडशिडीत, तरतरीत चपळ. नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वात वीज होती. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आले. धोतर-कुर्ता, डोक्यावरची पांढरी टोपी. त्या दोन तासात ती टोपी सरळ, तिरपी, आडवी सर्वच दिशांनी फिरली. नेहरूंसमोर आम्ही गीत म्हटलं. राजेंद्र प्रसादांसोबत सामूहिक जेवण झालं. डॉ. सुशीला नायर आल्या. त्या भारताच्या आरोग्यमंत्री होत्या. असतील, दिल्लीत त्या आरोग्यमंत्री असतील. इथे त्या गांधीजींच्या डॉक्टर म्हणून पूर्वी अनेक वर्षं राहिलेल्या ‘सुशीला बहन’ होत्या. गांधीजींच्या आदेशावरून त्यांनी सेवाग्रामच्या अवती-भवतीच्या खेड्यांमध्ये आरोग्यसेवेचं काम केलेलं होतं. छोटंसं कस्तुरबा हॉस्पिटल सुरू केलं होतं.एकदा मोरारजी देसाई आले. तेव्हा ते देशाचे अर्थमंत्री होते. आम्ही शाळेतल्या मुलांनी त्यांना सही मागितली. त्यांनी अट घातली.. ‘खादी नेसणाऱ्या मुलांनाच सही देईन.’ अडकले. सर्वच मुलं खादी नेसणारी होती. बिचारे तासभर सह्या करत बसले. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाल्याबरोबर प्रथम इकडे आले. खेड्यातला लहानखुरा शेतकरी स्वच्छ कपडे नेसल्यावर दिसेल तसे दिसले. किती साधे, किती नम्र.या सर्वांना जवळून पाहून सत्तेचं जे दर्शन झालं त्यामुळे सत्तेचं आकर्षण व भीती दोन्ही निघून गेले. हे सर्व नेते अत्यंत सुसंस्कृत, चारित्र्यवान होते. देशाच्या सर्वोच्च पदी ते होते. सर्वत्र त्यांच्याविषयी आदर होता. ते गांधींच्या कुटीला प्रणाम करायला किंवा विनोबांना भेटायला नम्रपणे येत होते. पण तरी ते दिल्लीतील केंद्रित सत्तेचे प्रतीक होते. ही सत्ता गावा-गावात पसरावी, विकेंद्रित व्हावी म्हणून गांधी व विनोबा स्वत: गावात जाऊन बसले होते. दिल्लीच्या राजकीय सत्तेपेक्षा सेवाग्राम-पवनारच्या महात्म्यांची सत्ता मला जास्त आवडली. सत्ता हे वास्तव होतं. कोणती सत्ता व ती कुठे असावी हा खरा प्रश्न होता.***भूदान पदयात्रेतून पिताजी (वडील) कधी कधी घरी यायचे. आमच्यासाठी ती जणू दिवाळी असायची. वस्तू, खेळणी किंवा खाऊ ते कधीच आणायचे नाहीत. ते भानच त्यांना नव्हतं. पण आमच्यासाठी त्यांचं येणं हीच मोठी भेट असायची. ते घरी आले की तेज, त्याग आणि तप यांनी जणू घर न्हाऊन निघायचं.ते म्हणजे कधीच रागवायचे नाहीत. माझ्या अख्ख्या आयुष्यात फक्त एकदा त्यांनी माझ्या डोक्यावर हलकी टपली मारली. दिवसभर पिताजींना भेटायला, चर्चा करायला भूदान कार्यकर्ते यायचे. खादीचे पांढरे धोतर, कुर्ता व पांढरी टोपी घातलेले. त्या कपड्यांना त्याकाळी इस्तरी आली नव्हती. खेड्यातले शेतकरी यायचे. भूमिक्रांती करण्याच्या स्वप्नाने भारित स्वातंत्र्यसैनिक यायचे. घर गजबजलेलं असायचं. केव्हाही, कुणीही पाहुणा घरी जेवायला, झोपायला थांबू शकायचा. घर जणू सार्वजनिक आश्रमच होता.पिताजींसोबत आम्ही दोघं मुलं पूर्ण मोकळीक घेऊ शकायचो. रात्री झोपण्यापूर्वी ते आम्हाला टॉलस्टॉय, ओ. हेन्री, मोपांसाच्या कथा सांगायचे. कधी स्वातंत्र्ययुद्धातले, कधी गांधीजींचे, तर कधी भूदान पदयात्रेतले प्रसंग सांगायचे. त्या काळात ब. मो. पुरंदऱ्यांच्या ‘राजा शिवछत्रपती’ या दहा भागातील इतिहासाची अशोक व मी पारायणं करायचो. आमच्या रोजच्या बोलण्यात ‘खानाचा हात कलम करू, यवनांचा नि:पात करू’ वगैरे भाषा उमटायला लागली. एक दिवस पिताजींनी शांतपणे बसवून आम्हा दोघांना प्रश्न विचारला.‘शिवाजी महाराज कोण होते? त्यांची थोरवी कशात होती?’‘त्यांनी खानाची बोट छाटली, दुसऱ्या खानाचा कोथळा काढला’ - आम्ही.‘मग त्यांनी किती मशिदी पाडल्या? ते हिंदू औरंगजेब होते का?’ आम्ही निरुत्तर. पिताजी म्हणाले- ‘शिवाजी महाराज धर्मद्वेष्टे नव्हते. ते स्वातंत्र्यासाठी लढले.’या सोबतच पिताजींनी आम्हाला इतर धर्माविषयी द्वेष पसरविणारे राजकीय विचार, त्यामुळे भारताचं विभाजन कसं घडलं, व खरा इतिहास कसा बघावा हे समजवून सांगितलं. आमचं खुळ उतरलं. अर्नोल्ड टॉयंबी व त्याची इतिहासाची दृष्टी तेव्हा पहिल्यांदा ऐकली. कायम सोबत राहिली.एका रात्री झोपण्यापूर्वी आम्ही सर्व बाजेवर बसलो होतो. पिताजी बाईला म्हणाले, ‘सुमन, क्रांतीचा जयजयकार म्हण.’आई लहानपणी साने गुरुजींच्या व सेवा दलाच्या संपर्कात होती. बेचाळीसच्या चळवळीतली गाणी ती म्हणायची. पिताजी तर बेचाळीसच्या ‘चले जाव’ चळवळीतले स्वातंत्र्यसैनिक होते. भूमिगत होऊन लढलेले. ‘धोक्याचा कैदी’ म्हणून दोन वर्षे तुरुंगात राहिलेले. त्या दोघांसाठी ती गाणी म्हणजे स्वातंत्र्य- युद्ध काळात परतणे होते. आई गात होती..‘एकच तारा समोर पायतळी अंगारगर्जा जयजयकार क्रांतीचा.....’मी नऊ वर्षांचा होतो. पहिल्यांदाच ती अमर कविता ऐकत होतो. शब्द आम्हाला कळत होते, पण अर्थ पूर्ण समजत होता असं म्हणणार नाही. पायतळी अंगार काय असतो? एकच तारा कोणता? रुपकं कळत नव्हती. बाई-पिताजींचे डोळे बंद होते. दोघांच्या डोळ्यातून पाणी झरत होतं. काहीतरी अद्भुत असं वातावरण होतं. त्या वातावरणातच क्रांती होती.दुसऱ्या दिवशी पहाटे उठून पिताजी भूमि-क्रांतीसाठी पदयात्रेवर निघून गेले.दरवर्षी काही दिवस आमची शाळा बंद असायची. आई-वडील, शिक्षक व विद्यार्थी सर्व भूदान पदयात्रेत जायचे. आपलं अंथरूण-पांघरूण, दोन जोडी कपडे, दोन-चार पुस्तकंघेऊन गावोगाव पायी चालत जायचं. जाताना शेत, जंगल, नदी, नाले बघत जायचे. गावी पोचल्यावर ते गाव बघायचं. एखाद्या शेतकऱ्याच्या किंवा मजुराच्या घरी राहायचं. घरातली मंडळी जे जेवतात तेच जेवायचं. सहसा ज्वारीची भाकरी, बेसन, कांदा व मिरची. भयानक तिखट. नाका-डोळ्यातून पाणी गळायचं. रात्री गावाची सभा. जमिनीचा प्रश्न, गरिबी, सामाजिक समता यावर चर्चा. श्रीमंतांकडून जमीन मागायची, गावातील भूमिहीनांना द्यायची. कधी शिव्या खायच्या, कधी कृतज्ञता. सर्व आपल्या खांद्यावरच्या झोळीत टाकून दुसऱ्या दिवशी नवीन गावाला चालायला लागायचं.भूदान पदयात्रेत मी जे पाहिलं, अनुभवलं, त्याला काय म्हणावं? समाज शिक्षण? सामाजिक सेवा? राजनैतिक कृती? हे सर्वच व अजून खूप काही तरी. ग्रामीण महाराष्ट्र कसा आहे हे कुठल्या पाठशाळेत असं शिकायला मिळणार होतं? इथे तर घर व शाळा दोन्ही सोबतच खेड्याच्या दिशेने चालत होते.***आमच्या घरात गरिबी होती. वडिलांनी प्रोफेसरच्या नोकरीचा राजीनामा दिल्यावर आर्थिक कमाई कधी केली नाही. आईच्या आश्रमातील शिक्षिकेच्या मर्यादित वेतनावर कुटुंब चालायचं. कुण्याही लहान मुलाला होईल अशा इच्छा मलाही व्हायच्या. नवे कपडे, मिठाई, फटाके, फुगे, खेळणी त्या क्वचितच पूर्ण व्हायच्या. आणि तरी या गरिबीविषयी मला व अशोकला असंतोष नव्हता. आई-वडिलांच्या या निवडीप्रती नाराजी नव्हती. का?एक तर आपले आई-वडील उच्चशिक्षित आहेत, त्यांनी स्वेच्छेने ही निवड केली आहे हे भान आम्हाला होतं. आमची गरिबी मजबुरीने आलेली नव्हती, आई-वडिलांनी ती व्रत म्हणून स्वीकारली होती. दुसरं, त्या दोघांच्या जीवनात ती प्रखरपणे प्रकट व्हायची. आम्ही ऐकायचो, वडिलांनी प्रोफेसर असूनही आपल्या लग्नात फक्त सहा आणे खर्च केला होता. तोही गांधीजींच्या फोटोला फ्रेम करून लावला त्याचा. लग्नासाठी एक कपडाही त्यांनी नवा विकत घेतला नाही. आई त्या काळात एम.ए. असलेली, मुख्याध्यापिका. पण स्वत: घरातली भांडी घासायची, जातं दळायची. शरीरश्रम, स्वावलंबन व स्वत:वर कमीत कमी खर्च करण्याच्या व्रताचं ती जिवंत उदाहरण होती.दरवर्षी आई-वडील आम्हा दोन्ही मुलांना घेऊन घरखर्चाचं बजेट बनवायचे. आपलं मासिक उत्पन्न इतकं इतकं. ही मर्यादा आपणच स्वीकारलेली. या उत्पन्नाच्या आत आपला खर्च राहायला हवा. मग अन्नधान्यावर किती रुपये, दुधावर किती रुपये, कपड्यांसाठी किती, घरभाडे किती, पुस्तकांसाठी किती असं करत आम्ही आपलं बजेट सोबत बनवायचो. हे बजेट आमच्या कुटुंबसभेत मान्य झाल्यावर त्यानुसार जगायची जबाबदारी आमच्यावर यायची. स्वत:च आखलेली असल्याने ती जाचक जबरदस्ती वाटायची नाही.त्यामुळे माझ्या मनाला एक सवय लागली. कोणतीही वस्तू हवीहवीशी वाटली तर मी मनात हिशेब करायचो. दिवसभराच्या कामाची मजुरी आठ आणे- बारा आणे; या हिशेबाने या वस्तूसाठी मजुराला इतके तास, इतके दिवस मजुरी करावी लागेल. ‘तू हे करशील का?’- मी स्वत:ला विचारायचो.बहुतेक इच्छा या कसोटीवर गळून पडायच्या.आमच्या घरातली स्वेच्छेने स्वीकारलेली गरिबी शिक्षा नव्हती. ते शिक्षण होतं. पुढे आयुष्यात कितीतरी वेळा मदतीला धावून आलं. अन्यथा गडचिरोलीमध्ये कसं जाऊ व राहू शकलो असतो? आपल्या इच्छा व गरजा कमी केल्या की एक प्रचंड मोठं स्वातंत्र्य प्राप्त होतं. अनेक सौदे व तडजोडी करण्याच्या मजबुरीपासून मुक्ती मिळते. जे करायचं ते करायला आपण स्वतंत्र होतो. ते स्वातंत्र्य मी लहानपणी त्या घरात, त्या आश्रमात कमावलं.हे घर आश्रमात होतं, पण घर हाच एक आश्रम होता. घर हीच शाळा होती. आणि शाळादेखील घरच होतं. तिन्ही एकरूप होते.अशा जगात मी तेरा वर्षांचा असताना मला आयुष्याचा हेतू सापडला. भारतातील खेड्यांचं आरोग्य सुधारायचं.त्रेपन्न वर्षांनंतर अजूनही तेच करतो आहे.(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि ‘सर्च’चे संस्थापक आहेत.)
shodha.yatra@gmail.com