- डॉ. तारा भवाळकर
बदलणं हा तर जगण्याचा धर्म. शब्दातल्या, भाषेतल्या बदलांची प्रक्रिया अखंड चालत आलीय. अगदी प्राचीन काळापासून. संतसाहित्यातले अनेक शब्द आता आपल्याला माहीत नाहीत. तेव्हाच्या संस्कृतीतले, जगण्यातले ते शब्द आता भौतिक संस्कृतीच्या बदलामुळं मागं पडलेत. जगणं बदलल्यामुळं त्या जगण्यातले शब्दही बदलले.
आपलं एकूणच जगणं बदललं. पाश्चिमात्यांचं अनुकरण करणं वाढलं. त्यामुळं भाषेतल्या बदलांचीही देवघेव वाढली. जागतिक संस्कृतीतल्या आदानप्रदानामुळं शब्दही आदानप्रदान होत असतात. मराठीत तर प्रादेशिक बदलानुसार शब्द बदलतात. मराठीत शब्दांच्या अनेक छटा दिसतात. एकाच अर्थाचा शब्द प्रदेशानुसार बदललेला दिसतो. सीमाभागात ही सरमिसळ अधिक जाणवते. जेव्हा सांस्कृतिक आदानप्रदान होतं, तेव्हा भाषेचंही होतंच. लग्नसमारंभातली ‘मेहंदी’ ही संकल्पना आपल्याकडं नव्हतीच. आपल्याकडं होती ती ‘हळद’. मात्र उत्तरेतून ‘मेहंदी’ हा प्रकार आला आणि आपल्यातलाच झाला. सांस्कृतिक बदलामुळं लग्नातल्या मुहूर्तमेढ, रूखवत, मांडव परतवणी, आजेचीर (आजीला देण्यात येणारी साडी-चोळी), पोट झाकणं (वधूच्या आईस्ची साडी-चोळी), धारेचा आहेर (चुलत्याने आणलेल्या कळशीतून वधुवराच्या पायावर पाणी सोडल्यानंतर द्यायचा आहेर) या संकल्पनाही हरवत चालल्या आहेत. हरवत चाललेले शब्द ज्या संस्कृतीतून आले, ती संस्कृतीच नाहीशी होऊ लागल्यानं हे होणं स्वाभाविकच म्हणा!
केवळ शेतीसंस्कृती आणि गावगाडय़ातलेच नव्हे तर शहरी संस्कृतीतलेही शब्द बदलले. जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रतच बदल झाल्यानं भाषिक बदल होणं, हे ओघानंच आलं! डिपार्टमेंटल स्टोअर्समुळं आठवडी बाजार मागं पडले. परिणामी त्या बाजाराशी संबंधित शब्द हरवले. बैठकीच्या खोलीचा ‘हॉल’ झाला. माहेरवाशिणीचा प्रवास बदलला. ती बैलगाडीएवजी एकटी मोटारीनं जाऊ लागली. मग मुराळी, बुत्ती हे शब्द कसे राहतील?
अलीकडं हिंदी आणि इंग्रजीचा प्रभाव वाढल्यानं त्या दोन्ही भाषेतल्या शब्दांना आपण जवळ केलं. त्यामुळं व्याकरण आणि वाक्यरचनाही बदलू लागली आहे. या काळात मातृभाषेत भाषांतरित केलेले शब्द वापरण्याचा प्रयत्नही झाला. उदाहरणार्थ : भ्रमणध्वनी (मोबाईल), स्थिरभाष (लॅन्डलाईन), कृष्णधवल (ब्लॅकव्हाईट), धनादेश (चेक), रोखापाल (कॅशिअर).
- पण रूळत असलेल्या शब्दांपेक्षा मातृभाषेतले, मुद्दाम निर्माण केलेले शब्द अवघड असल्याचं दिसून आलं. या भाषिक गमतीजमती आहेत.
शब्द नुसते टिकत नाहीत, कारण तो संस्कृतीचा भाग असतो. तिच्यातल्या बदलानुसार ते मागं पडतात. आपल्याला भूतकाळाबद्दल उमाळा असतो. नवं स्वीकारताना जुन्याबद्दल आत्मियता वाटते.. आणि इथंच गोंधळ होतो. विशेषत: मध्यमवर्गीयांमध्ये ही द्विधावस्था जास्त आढळते. भावनिक बांधिलकी आणि उपयुक्ततावाद यात ओढाताण होते.
हरवत जाणारे शब्द टिकवण्यासाठी ती संस्कृतीही टिकवली पाहिजे, पण ते शक्य आहे का? आपण आज मोटेनं पाणी काढणार आहोत का? जात्यावर दळणार आहोत का? बैलगाडीतून प्रवास करणार आहोत का? पाच-पाच दिवसांचे लग्नसमारंभ साजरे करणार आहोत का? याचं व्यावहारिक उत्तर ‘नाही’ असंच येतं. मग त्यासोबतचे शब्द तरी कसे व्यवहारात टिकतील?
शब्द मुद्दाम जतन होत नसतात. मुळात भाषेचा हा प्रवाह टिकवण्यासाठी तिच्याविषयी आस्था असली पाहिजे. शिक्षणाचं माध्यम मराठीऐवजी इंग्रजी होऊ लागलंय. त्यामुळं शिकण्याच्या परिभाषेवरही परिणाम झालाय. माणसाचं जसं जगणं, तसं त्याचे आविष्कार असतात. त्या आविष्काराचा परिणाम होणारच.
- जगण्यातली सहजता संपल्यानं सहज आलेले शब्दही संपणारच की!