खेडोपाडीच्या शाळांमध्ये मुली तर येतात, त्यांच्या शिकण्याच्या वाटेतल्या काटय़ांचा एका संवेदनशील शिक्षकाने लावलेला हिशेब आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त.
भाऊसाहेब चासकर
भ्यासाला बसले का घरचे लोकं अभ्यास करून देती नाही. नुसती कामं सांगत्यात..’
‘कामाला घरी राहायचं, शाळेत नाही जायचं’, असं घरचे म्हणत्यात..
‘कालच्या राती अभ्यास करीत बसले व्हते. बाप लय दारू पिऊन आला. त्यानं सारी वह्या-पुस्तकं फाडून फेकून दिली. आमाला समद्यांला लई हाणलं. तवा आमी उपाशीच झोपलो व्हतो..’
‘आम्हाला बारा महिने शाळा पायजेल, सुटी नकोच..’
‘कोणती बी गोष्ट घेताना घरचे मला कधीच विचारती नाही. भैयाला बाजाराला घेऊन जात्यात. त्याच्या आवडीचं दप्तर, वह्या, ड्रेस..’
‘दादा दारू पिऊन लई मारतो आईला. शाळेत आल्याव बी मला डोळ्यांसारखी आईच दिसती. शाळेच्या अभ्यासात अजिबात लक्ष लागत नाही..’
ही मनोगतं आहेत ग्रामीण, आदिवासी भागातल्या लहानग्या मुलींची. ज्यातून त्यांचं भावविश्व आपसूकच उलगडत जातं आणि हे वाचताना आपलं मन एकामागून एक धक्के खात राहतं.
खरं तर शिकण्यासाठी उत्सुक आहेत त्या. पण शिकण्यासाठी आवश्यक वातावरण नसल्याने या लेकीबाळी जाम खचलेल्या, पिचलेल्या आहेत. व्यवस्थेने उभे केलेले प्रश्न, अडथळे आणि समस्यांचा भुंगा त्यांचे नाजूक, कोवळे मन कुरतडतोय.
काय काय सहन करताहेत त्या. इथल्या पुरुषी व्यवस्थेनं त्यांना ‘बिचा:या’ बनवलंय! शाळेत वेगवेगळ्या प्रसंगी मुलामुलींमध्ये गप्पा होतात. त्यातून त्यांचं विश्व उलगडत जातं. मनोव्यापार समजतो. अशा गप्पांत या पोरींना विश्वासात घेऊन बोलतं करत गेलो.
संवादाच्या सुईनं त्यांच्या मनाच्या जखमेवरची खपली हलकेच बाजूला केली की आत ठसठसणारी जखम ‘वाहती’ होते. मी हे अनेकदा पाहिलेय. त्यांच्या आयांप्रमाणो परंपरेनं वाटय़ाला आलेल्या व्यथा, वेदना, वंचना आणि दु:ख सोबतीला घेऊन पोरी जगताहेत. जगण्यासाठी झगडताहेत. कारु ण्याने भरलेल्या कहाण्या सांगताना त्यांच्या मनाचा बांध फुटलेला अनेकदा पाहिलाय.. तशी सावित्रीच्या लेकींची पहिली-दुसरीच पिढी इथं शिकू पाहतेय. भरपूर शिकायचंय, पण जगण्याने पुरतं छळलंय. त्यात बालपण कोमेजतंय आणि शिकणंही जणू हरवलंय! अलीकडचाच एक प्रसंग. सहावीतल्या दीपालीचा चेहरा काळानिळा पडलेला दिसला. ‘काय गं दीपाली, काय झालं?’ तिला विचारलं.
तिच्या पापण्यांच्या कडा पाणावल्या. तिनं सांगितलं ते हादरवून टाकणारं आणि अस्वस्थ करणारं वर्तमान होतं. रविवारच्या दिवशी आईनं दीपाला धुणी-भांडी करून घर शेणानं सारवायला सांगितलं. सुटी असल्यानं शाळेनं पण घरचा अभ्यास दिलेला. कामं आणि अभ्यासाच्या गडबडीत सारवायचं राहून गेलं. शेतावरून परतलेल्या आईचा रागाचा पारा चढला. अभ्यास करत बसलेल्या पोरीला तिनं चपलेनं बदडलं. पोटची लेक हमसूहमसू रडत, तशी उपाशी झोपी गेली. ना कोणी तिला प्रेमानं जवळ घ्यायला होतं, ना कोणी मायेनं पाठीवर हात फिरवत धीर द्यायला. वडिलांची स्वारी रोज दारू पिऊन डुलत मध्यरात्री घरी येणारी.. आई त्रस्त असते, दीपा सतत जिवाला खाते.. अस्वस्थ आणि असुरक्षित असते.
‘सारखं पुस्तकात नाक खुपसून काय बस्ती? सांगितलेलं काम ऐकत नाही, जादा शाणी झाली काय?’ अशी सातवीतल्या रूपालीविरु द्ध तिच्या पालकांची ‘तक्र ार’ आहे. शाळा सोडून देण्याचा धोशा घरच्यांनी लावलाय. वर्ष झालंय. हिला शाळेत यायच्या ‘हट्टासाठी’ (हक्कासाठी नव्हे!) झगडावं लागतंय! अडचणींमुळे/घरच्या आग्रहांमुळे किंवा अजिबात टाळता न येणा:या कारणांमुळे गैरहजर राहणा:या मुलांवर ‘शाळाबाह्य मुले’ म्हणून शिक्का मारणारा आमचा शिक्षणाच्या हक्काचा कायदा या वास्तवाची नोंद कशी घेणार?
शिक्षकांना जरु रीच्या कामासाठी बारा नैमित्तिक रजा असतात. पण शाळेतल्या मुलांना एखादी-दुसरी रजा असू नये? आणि असा प्रश्न मुलांकडून येतो तेव्हा आपल्याकडे उत्तर कुठं असतं? आणि तरीही आमचं शिक्षण बालस्नेही असतं!
सुटीच्या दिवसांत मुलींच्या वाटय़ाला भरपूर कामं असतात. अक्षरश: आयाबायांना असतात, तेवढी जबाबदारीची आणि मोठी कामं करावी लागतात, या पोरींना. मुलींनी कामंच करू नयेत असं अजिबात म्हणायचं नाहीये; पण म्हणून काय सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुलींनी झुलत राहायचं?
सातवीतल्या सुरेखाच्या भाषेत सांगायचं तर ‘सुटीच्या दिवशी सारखं हालतंझुलतं राहावं असं घरच्यांना वाटतं.’ अठराव्या वर्षाच्या आतल्या अनेक मुलींना शेतात मोलमजुरीला जावं लागतं.
एक मुलगी वैतागून म्हणाली, ‘सर, आमी का बरं मुली झालो ओ? मुलगे म्हणून जन्मायला पायजेल होतो!’ या मुलींचं मनोगत ऐकताना ‘रम्य ते बालपण,’ ‘लहानपण देगा देवा..’ ‘बालपणीचा काळ सुखाचा,’ ‘स्त्री-पुरु ष समानता’, ‘मुलगा-मुलगी एकसमान’ असे विषय निबंध लिहायला तरी कसे काय द्यायचे? असा प्रश्न समोर उभा राहतो!
सहाव्या-सातव्या वर्गातल्या मुली शाळेतून घरी जातात. कपडे बदलून लगेच कामाला बिलगतात. झाडलोट, शेणकूर (गोठय़ाची साफसफाई), दावणीच्या जनावरांना पाणी पाजणं. शहरी भागात मुलींना ‘बघायला’ येणारी नवरदेवाकडची मंडळी ‘मुलीला स्वयंपाक येतो का?’ असा प्रश्न हमखास विचारतात. इथं तर चौथ्या वर्गापासूनच मुलींच्या स्वयंपाक करण्याची सुरु वात होते. आई शेतातून येईपर्यंत काहीजणींचा भाकरी, कालवण, भात अशा मेनूसह स्वयंपाक तयार असतो! आमच्या गावात आदिवासी लोकांचा भरणा मोठाय. अनेक घरांत दारू गाळली जाते. पुरु षांना दारूचं व्यसन जडलेलं. दारु डय़ा बापाचा मुलांना प्रचंड जाच वाटतो. त्यातून मुलं घायकुतीला आलेली. स्त्रियांच्या छळाला सीमाच नाहीये. दारू पिऊन गुराढोरांसारखी मारहाण नेहमीची. त्यांचं रोजचं जगणं म्हणजे दु:खाची करुण कहाणी!
रात्री उशिरा खेकडे शिजवून खाऊ न घातल्याचा राग येऊन एका महाभागानं बायको आणि दोन मुलांना पहारीनं (लोखंडी सळईनं) बेदम मारलं. जिवाच्या भीतीनं अध्र्या रात्री दोन लेकरं घेऊन ती रानात पळाली. रात्रभर जीव मुठीत धरून जंगलातल्या गुहेत थांबली. अंगावरच्या कपडय़ांनिशी पोरांना घेऊन माहेरी गेली. मुलं शाळेत येईना म्हणून सहज चौकशी केली. तेव्हा शाळेतल्या मुलांकडूनच हा ‘प्रताप’ कळला! मध्यस्थी केली. गुराढोरांसारखं मारणा:या कसाई बापाकडून बायको आणि मुलांना त्रस देणार नाही, असे ‘हमीपत्र’ लिहून घेतलं. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! हे निवडून काढलेलं उदाहरण नाही. घरोघरी मातीच्या चुली! अशा वातावरणात मुलांनी काय आणि कसं शिकायचं? आमची शिक्षण व्यवस्था शाळेत आल्यावर या मुलांना घरचा अभ्यास मागते! छडी नाही मारली, तरी शब्दांनी फटकारते. मुला-मुलींना छळणा:या, आतून पोखरलेल्या, भीतीग्रस्त मनातला कल्लोळ आमच्यापर्यंत पोहोचतच नाही! मग एबीसीडी आणि बाराखडी शिकण्यात अशा हजारो मुलांचं लक्ष कसं लागणार?
सराव चाचणी सुरू होती. गणिताचा पेपर झाला. पेपर मुलांनी स्वत:च तपासायचा असं ठरलं होतं. एरवी दिलखूश राहणा:या मीनाचा चेहरा पेपर तपासताना साफ पडला होता. नजरेतून हे निसटलं नाही. राहवलं नाही. तिला जवळ बोलावलं. ‘का गं नाराज आहेस?’ मी विचारलं. ती काही बोलेना. मीना आदिवासी ठाकर जमातीतली. मुळातच ही मुलं लाजरीबुजरी असतात. नीट व्यक्त होत नाहीत. मोठय़ा कौशल्यानं त्यांना बोलतं करावं लागतं. आताशा अनुभवाने ते जरा अवगत झालंय. ‘सर, मी गणितात नापास झालेय.’ तिनं हळू आवाजात सांगितलं. मला शाळाच शिकायची नाही.. हे सांगताना एकाएकी तिचा बांध फुटला. ती हमसूहमसू रडू लागली. तिला काय झालं हे कळेना. सगळा वर्ग एकदम शांत. म्हणाली ‘सर, घरी गेल्यावं मावाला अभ्यासच व्हत न्हाई.’
‘का बरं नाही होत तुझा अभ्यास?’ - तिला विचारलं. म्हणाली, ‘माङया आई-वडलांचं रोज भांडण होतं. भांडण झालं का, ते आईला लई मारीत्यात. लगेच घराबाहेर निघून जात्यात. आमी त्यांची वाट पाहत बसतो. रात झाली, तरी येती नाही. ब:याच येळेला न जेवताच झोपतो. आई लई येळा रडत बस्ती. आईला मारल्याव मला लई वाईट वाट्टं.. शाळेत आलं तरी आईच आठवती. आमचा अभ्यासच व्हत नाही..’
तिला रडू आवरेना! मोठय़ाने हुंदके देऊन ती रडू लागली. तिला थोडं मोकळं होऊ दिलं. जवळ घेऊन थोपटून शांत केलं. आजही कुटुंबात आणि समाजात मुला-मुलींनी भेदभावाची म्हणजे मुलांच्या तुलनेत दुय्यम वागणूक मिळतेय. शाळेच्या सहलीला जायचं, तर मुलांना प्राधान्य. शिकायला बाहेर जायचंय, तर भाऊ-बहिणीत मेरीटपेक्षा भाऊच ‘सरस’ ठरतो. टीव्हीवरील मनोरंजनाचे कार्यक्र म बघताना तिच्या मताला काडीची किंमत नाही. विभक्त कुटुंबातही पुरु ष आधी आणि स्त्र्रिया नंतर जेवणार! शिल्लक असेल तेवढं निमूटपणो खाणार. दुजाभावाची आणखीही उदाहरणं सांगता येतील. पन्नास टक्क्यांहून अधिक मुली अॅनिमियाने त्रस्त आहेत. परिपाठात उभ्या राहिल्या की चक्कर येऊन धाडदिशी कोसळतात! मुलगी म्हणजे काचेचं भांडं. घराची अब्रू. अकाली बाईपणाचं ओझं वागवत मुली वाढताहेत. असह्य दबाव सोसत आहेत. त्यांना मोकळा श्वास घेता येत नाही. सांगता येत नाही आणि सहन होत नाही, अशा अत्यंत अवघडलेल्या अवस्थेतून त्या जाताहेत. घरात स्मार्टफोन असला तरी त्यावर घरातल्या मुलाचं राज्य असतं! शाळेनं संगणक, इंटरनेटची गाठ घालून दिली तर ठीक नाहीतर दहावीपर्यंत हे यांच्या गावीच नसतं. पाठय़पुस्तकं सोडून इतर वाचन नाही. आजही गावात निवडक घरांतच वर्तमानपत्रं येतात. इच्छा असली तरी संधी नाही! बलात्काराच्या घटनांनी पालकांचं मन गारठलंय. ते मुलींना आणि त्यायोगे स्वत:लादेखील सतत असुरक्षित समजत आहेत. त्यातून कळत नकळत मुलींच्या स्वातंत्र्याचा संकोच होतो आहे. ‘सावित्रीच्या लेकी आता आकाशाला वगैरे गवसणी घालताहेत.’ असली वाक्यं परिसंवादात ठीक, पण गावातलं वास्तव निराळंच असतं. शाळकरी वयात त्यांच्या आयांना मिळणारी वागणूक आणि आता मुलींना मिळणारी वागणूक यात ‘कुछ नही बदला’ असं म्हणता येत नसलं, तरी फार मोठा बदल झालाय, असंही दिसत नाही.
हे सारं अस्वस्थ करणारं वर्तमान असलं तरी या पोरींच्या मनाच्या गाभा:यात वैफल्याचा-निराशेचा अंधार नाहीये. त्यांच्याशी गप्पा मारताना ते जाणवतंच. शिकून-सवरून कर्तृत्व गाजवणा:या गाव-परिसरातल्या मुलींच्या नावलौकिकाच्या कहाण्या त्यांना स्फूर्ती, प्रोत्साहन देताहेत. काहीही झालं तरी शिकायचंच, असा मनोमन निश्चय केल्याचं जाणवत राहतं. घरी-समाजात काहीही असू देत, जिथं शाळेनं त्यांना उबदार वातावरण दिलंय तिथं त्यांनी पाय धरलेत, उभारी घेतलीये. आज ग्रामीण भागात मुलांच्या तुलनेत मुली जास्त कार्यक्षमतेनं स्वत:ला सिद्ध करायला निघाल्या आहेत. शिक्षणासाठी त्या जास्त संघर्ष आणि प्रयत्नही करताहेत.
शाळेला सुटी नकोùù
‘सुटी असावी की नसावी?’ या विषयावर एके दिवशी शाळेत गप्पांचा तास रंगला. 31 मुलांच्या वर्गात 16 मुली होत्या. ‘सुटी पाहिजेच’ असं सगळ्या मुलग्यांचं म्हणणं होतं. शाळा नसल्यावर मजा करता येते, मनमुराद खेळायला मिळतं, पोहायला जाणं, क्रि केट खेळणं, टीव्हीवरील कार्यक्र म बघणं अशा आवडीच्या गोष्टी करता येतात.. असं मुलांचं एकमुखी मत होतं, तर मुली एका सुरात ‘सुटी नको,’ असं म्हणत होत्या. ते ऐकून जरासा गोंधळलो. कारण मुलींचा असा प्रतिसाद अनपेक्षित होता. कारण विचारलं, मुलींनी सुटीतला त्यांचा अख्खा दिनक्रमच सांगितला. ते ऐकून चाट पडलो!
बाप श्या घालितो नि ठोकितो!
वर्गातल्या मुलांना सहज विचारलं, ‘किती जणांच्या आई-बापाचं भांडण होतं? खरं खरं सांगायचं. मी कोणालाच सांगणार नाही.’ - अशी ‘हमी’ दिल्यावर मुलं बोलू लागली. सुरेश म्हणाला, ‘माङो वडील रोज दारू प्यात्यात. पिऊन आल्याव आईला श्या (शिव्या) घालीत्यात. आई बोलल्याव लगेच मारीत्यात. आमी मधी पडल्याव आमाला बी ठोकीत्यात.’
भटक्या समाजातला राजू म्हणाला, ‘आमचे दादा रोज इतकी दारू प्यात्यात का लिमिट नाही. त्यांचं अंग बोंबलासारखं वाळून गेलंय. एक दिवस फाशी घ्यायला निघले व्हते. नशीब, मी नेमकं घराचं दार उघडलं! त्यांचा जीव वाचला!’
सविता, अंजना, राणी, गोरख.. यांनी त्यांच्या व्यथा सांगितल्या. प्रत्येकाची कारणं वेगळी. काही बाप व्यसनांकडे वळलेले, काही स्वभावदोषांनी पछाडलेले, काही वाट चुकलेले मुसाफिर, काही दारिद्रय़ात खितपत पडलेले.. नाना त:हा! आदिवासी समाजातला अडाणीपणा, अंधश्रद्धा. आणखी किती कारणं.. ‘आमचे आई-बाप अजिबात भांडत नाहीत’ असं सांगणारी मुलं दखलपात्रच वाटली नाहीत.
(लेखक प्रयोगशील शिक्षक असून, शिक्षण क्षेत्रतील कार्यकर्ते आहेत.)
bhauchaskar@gmail.com