शर्मिला फडके
आशियातला सर्वात मोठा साहित्यिक मेळावा म्हणून नाव मिळवून असलेला जयपूर लिटरेचर फेस्टीवल नुकताच संपला. दशकभरापूर्वी जेव्हा हा पहिल्यांदा भरला तेव्हा ऑर्गनायझर्सपैकी नमिता गोखले आणि विल्यम डॅलरिम्पल, साहित्यिकांपैकी हरी कुंझरू, शोभा डे आणि प्रेक्षक मिळून शंभर लोकांचीही उपस्थिती नव्हती. २0१५ साली याच लिटफेस्टला २३५ देशी-विदेशी साहित्यिकांच्या विविध चर्चासत्रांना मिळून अडीच लाख प्रेक्षकांची उपस्थिती नोंदवली गेली. केवळ जयपूर लिटफेस्टलाच नाही, तर आज देशभरात मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, गोवा, हैदराबादपासून कसौली, भुवनेश्वर, आसामातील करिमगंजसारख्या ठिकाणीही भरणार्या लिटफेस्ट्सना उदंड प्रेक्षकांची उपस्थिती लाभत आहे. यौपकी अनेकजण नेमाने दरवर्षी लिटफेस्टची वारी करणारे आहेत. काहीजण जमेल तसे पण पुन्हा पुन्हा जात राहतात, एखाद्या वर्षी उपस्थिती चुकली तर हळहळतात.
भारतात गांभीर्याने वाचणारे, विशेषत: नॉन फिक्शन साहित्यप्रकारात रस घेणारे वाचक अतिशय कमी संख्येने आहेत. इंग्रजी नॉन-फिक्शन पुस्तकाच्या ५000 हार्डबॅक प्रती विकल्या गेल्या की पुस्तक बेस्ट सेलर ठरते. देशभरात मिळून जेमतेम ३0 च्या वर चांगली, दज्रेदार पुस्तकालयेही नाहीत. भारत हा एक गरीब वाचन-संस्कृती असलेला देश ठरतो असा निष्कर्ष ‘द इकॉनॉमिस्ट’ने नुकताच एका सर्वेक्षणानंतर नोंदवला. मग असं असतानाही लिटफेस्टला लाखोंच्या संख्येने येणारे कोण आहेत हे प्रेक्षक? आणि का जातात, जात राहतात ते या लिटफेस्टला? - उघड आहे की हे सगळे वाचक, लेखक या कोणत्याही प्रकारे साहित्यिक व्यवहारांशी जोडले गेलेलेच असे नसणार. अनेक हवशे-नवशेही सामील असतातच, कदाचित म्हणूनच मीडियामध्ये अनेकजण तुच्छतेने लिटफेस्ट्सचा उल्लेख ‘साहित्यिक तमाशा’ असाही करतात.
भलेही इथे आलेल्या अनेकांनी गाजलेल्या लेखकांचं नावही ऐकलेलं नसतं, त्यांची पुस्तकं वाचली नसतात, पण महत्त्वाचे हे आहे की आलेल्यांपैकी प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या तरी सेशनला उपस्थिती लावतोच, प्रत्येकाकरता लिटफेस्टमधे काहीतरी असतेच आणि जाताना प्रत्येकजण सोबत काही ना काही तरी घेऊन जातोच, मग ते विचार असतील, पुस्तक असेल, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचा लेखकाशी प्रत्यक्ष बोलले गेलेले दोन शब्द असतील किंवा नोबेल विजेत्या लेखकाची मिळवलेली सही असेल. पुढच्या वर्षी येताना यातले अनेकजण अधिक सजग होऊन येतात. लिटफेस्टचं यश हेच आहे.
आले तरी वाद, न येऊनही वाद !
लिटफेस्टमध्ये ओरहान पामुक, कोत्झी, नायपॉलसारखे नोबेल विजेते साहित्यिक येतात. विक्रम सेठ, पिको अय्यर, हनिफ कुरेशी, सुनील गंगोपाध्याय, यू. आर. अनंतमूर्तीही येतात. सलमान रश्दी, शशी थरुर. तरुण तेजपाल, आपल्या उपस्थित राहण्याने आणि न राहण्यानेही वादविवाद निर्माण करतात. ओप्रा विन्फ्रे, पॉल थेरॉक्स, पॅट्रिक फ्रेन्चपासून झुंपा लाहिरी, ग्लोरिया स्टाइनमेन आणि गुलझार, जावेद अख्तर, प्रसुन जोशी, शबा आझमी, नासिरुद्दीन शहा, गिरिश कर्नाड अगदी वहिदा रेहमानही असते. येणारा कोणत्याही सामाजिक, वैचारिक व्यावसायिक स्तरातून आलेला असला तरी त्यांच्यात एक धागा समान असतो तो म्हणजे साहित्याचा.
सारे एकाच मंचावर !
लिटफेस्ट्समधे ‘साहित्य’ या शब्दाशी संबंधित प्रत्येक गोष्ट सामावून घेतली जाते. चर्चा, पुस्तक, प्रकाशन, पुस्तक वाचन, लेखक, वाचक, वक्ते, प्रकाशक हे शब्दश: एकाच मंचावर असतात. समीक्षकांना गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिले जात नाही. उकृष्ट संयोजन असते. पुरेशी आसन व्यवस्था, खाण्या-पिण्याच्या सहज सोयी, स्वच्छ टॉयलेट्स, उत्कृष्ट संयोजन, अचूक नियोजन, वेळेची तत्परता, स्वयंसेवकांची योग्य कामगिरी हे सगळं सहजतेनं पार पडतं इथे. लिटफेस्टचा हा एक महत्त्वाचा अनुभव.
वैचारिक ‘घमासान’ पण ‘संवाद’ही !
या लिटफेस्ट्समधली कदाचित सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारचे हार-तुरे, औपचारिकता, मानापमान, नेतेगिरी यांना संपूर्णपणे आणि जाणीवपूर्वक दिलेला फाटा असतो आणि अर्थातच इथे ग्लॅमर असते. बुक स्टॉल्सच्या बरोबरीने किंवा अधिक संख्येनेच देशा-विदेशी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असतात. म्युझिक, मीडिया, समाज, फिल्म्स, क्रिकेट, आर्ट, धर्म, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, मानवी नातेसंबंध, सेक्स अशा सर्वांना सामावून घेणारी चर्चासत्र असतात.
इतिहासापासून इरॉटिकापर्यंत, कवितेपासून कुकबुक्सपर्यंत, बालसाहित्यापासून स्क्रिप्ट रायटिंगपर्यंत. एलजिबीटीपासून राजकारणापर्यंत सर्व प्रकारच्या साहित्यावर लिहिणार्यांना इथे मोकळा मंच बहाल केला जातो. कोणत्याही साहित्य प्रकाराला कमी लेखले जात नाही. इथे गाजलेल्या पुस्तकांवर चर्चा होतात. वाद होतात, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. इंग्रजी विरुद्ध प्रादेशिक भाषा असे झगडे होतात. नर्मविनोदांची, चमकदार भाष्यांची उधळण होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘संवाद’ होतो. त्यात वाचकांनाही बरोबरीने सहभागी करून घेतले जाते. साहित्यविषयक चर्चा म्हणजे काही तरी गंभीर, रटाळ, डोक्यावरून जाणारेच असायला हवे असा समज असलेले कित्येकजण इथल्या रंगतदार चर्चांनी भारावून जातात यात नवल नाही.
खवय्यांपासून वाचकांपर्यंत.
साहित्यातली व्यावसायिकता चांगल्या लिखाणाला मारक ठरते आहे का सारख्या गंभीर विषयावरील चर्चेलाही म्हणून तितक्याच हिरिरीने प्रतिसाद दिला जातो. गर्दी लोटते जितकी अमिश त्रिपाठीच्या किंवा चेतन भगतच्या सेशन्सना लोटते. रस्किन बॉन्डसारखा लेखक मैलोंगणती लांब रांगेतल्या प्रत्येक वाचकाला सही देतो आणि कोणताही नोबेल बुकर, पुलित्झर विजेता लेखक सहजरित्या ऑडिटोरियमध्ये किंवा पुस्तक दालनात किंवा खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर आपल्या आसपास असू शकतो, असतो हे लिटफेस्टचे एक ग्लॅमर आहे, चार्म आहे जो नाकारून चालणार नाही. आपली बौद्धिक पातळी, साहित्यिक जाण अचानक वाढेल अशी भ्रामक कल्पना ठेवून इथे येणारेही असतातच. लिटफेस्ट त्यांनाही नाराज करत नाही. साहित्यिक प्रस्थापित असो. सुप्रसिद्ध असो, जग गाजवणारे असतो. ते इतके सौजन्यशील, हसरे, नम्र प्रतिसाद, उत्तरे देणारे, वाचकाला न विसरलेले, अभ्यासूपणे इतरांचंही ऐकणारे, रांगेत उभं राहणारे, आपल्या टेबलावर बसून खाणारे, पुस्तकं विकत घेत फिरणारे असू शकतात हा अनुभव लिटफेस्टच देतो फक्त.
साहित्याला जगवणारी सळसळती ऊर्जा
लिटफेस्ट्मध्ये तरुण, उत्साही, उर्जेने भरलेल्या, संवाद साधू इच्छिणार्या वाचकांचा सहभाग सर्वात जास्त संख्येने असतो यामागचे रहस्य यातच आहे. इथे खूप तरुण चेहरे दिसतात. त्यात मजा करायलाच आलेले जास्त असू शकतात; पण ते दिसतात हे महत्त्वाचं. या वाचकाला प्रतिसाद द्यायचा असतो. प्रोव्होक व्हायचं असतं. हसायचं असतं. भारावून जायचं असतं. आपलं म्हणणं तावातावाने ऐकवायचं असतं. लिटफेस्टच्या चर्चासत्रांना मायक्रोफोन्स जेव्हा या प्रेक्षकांच्या गर्दीतून फिरतात तेव्हा अनेक तरुण, उत्साही हात त्याला आपल्याकडे ओढून घ्यायला उत्सुक असतात. ते प्रश्न विचारतात. मिळालेल्या उत्तरांवर प्रतिप्रश्न करतात. हे प्रेक्षक लिटफेस्टमध्ये तारुण्य, सळसळती, सकारात्मक उर्जा भरतात. साहित्याला जगवायला याहून अधिक कराय हवे असणार?
हवंहवंस काही तरी. प्रत्येकासाठीच !
सायन्स, गणित, अनुवाद, प्रादेषिक भाषा, लोकसाहित्य, स्थलांतरीत धर्म, कला, राजकारण, सिनेमा, इतिहास अनेक विषय ऐकणारे कोणी नवोदित, कोणी प्रस्थापित, कोणी वाचक, कोणी लेखकराव, कोणी प्रकाशक, कोणी भाषाप्रेमी, काही स्त्री-वादी, विद्रोही, अनेक इतिहासप्रेमी, चित्रकार, संगीतप्रेमी, काही पत्रकार, काही पहिली कादंबरी लिहू पहाणारे, काही ब्लॉगर्स, काही नुसतेच ट्वीटर्स. पण प्रत्येकाला लिटफेस्ट काही तरी देतं राहतं. लिटफेस्टने अनेकांना आपल्यात सामावून घेतले. आधीच्याही लिटफेस्टने अनेकांना हे मिळाले म्हणूनच ते पुढच्या वर्षीही येत राहिले.
साहित्याचा हा महाकुंभमेळा आहे आणि तो ओसंडून वाहात राहतो, राहू देत.
भारतातले गाजणारे लिट-फेस्टस
दरवर्षी भरणारा आणि विविध कारणांनी गाजणारा जयपूर लिटररी फेस्टिवल केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात आता प्रसिद्ध झाला आहे. अशाच प्रकारचे अनेक फेस्टिवल्स आता भारतात अनेक ठिकाणी भरु लागले आहेत. वेगवेगळ्या कारणांनी ते प्रसिद्धही आहेत. अलीकडे त्यांचीही मोठय़ा प्रमाणात चर्चा होते आहे. अशाच काही ‘लिट-फेस्ट्सची ही ओळख.
अपिजय कोलकाता लिटररी फेस्टिवल
पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात भरणारा हा वार्षिक उत्सव. कला आणि साहित्याच्या क्षेत्रातील जगभरातील नामांकित मंडळी याठिकाणी नेमाने हजेरी लावतात.
गोवा आर्ट्स अँण्ड लिटररी फेस्टिवल
या साहित्यिक मेळाव्याचे हे पाचवे वर्ष. पुस्तक प्रकाशनांपासून तर साहित्यिक उपक्रमांपर्यंत सार्या घडामोडी तर येथे होतातच, शिवाय ‘सन अँण्ड सॅण्ड एक्सपिरिअन्स’साठी उपस्थितांना तिथल्या नामांकित बिचवरदेखील सैर घडवली जाते.
लखनौ लिटररी फेस्टिवल
आर्थिक आणि सामाजिक विपन्नतेसाठी ओळखल्या जाणार्या उत्तर प्रदेशातील हा श्रीमंत आणि संपन्न साहित्यिक सोहळा. साहित्यिक, कलावंतांसह सर्वसामान्य रसिकांची मोठय़ा प्रमाणावर उपस्थिती हे या मेळाव्याचं वैशिष्ट्य.
टाटा लिटरेचर लाईव्ह
आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकितांची दरवर्षी हजेरी. लेखक, वाचक आणि प्रकाशकांसाठीची वार्षिक पर्वणी म्हणूनही प्रसिद्ध.
टाईम्स लिटररी कार्निव्हल
दरवर्षी एखादा महत्त्वाचा, विचाराला चालना देणारा विषय निवडून त्यासंदर्भात सर्व अंगांनी त्याचं आकलन घडवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी साहित्यासह फिल्म, फूड आणि अगदी निसर्गासह विविध गोष्टींचा कल्पक वापर.