- अपर्णा वेलणकर
सध्या भारतातले आपण ‘मधले लोक’ फार म्हणजे फार अस्वस्थ आहोत. तक्रार ही की आपल्याला काही म्हणजे काहीच धड मिळत नाही. आपली हवा वाईट. आपले अन्न निकस. आपले शिक्षण फसलेले. आपली शहरे घाण. आपली खेडी दरिद्री. आपले राजकारण फसलेले. आपली अर्थव्यवस्था रुतलेली. आपली लोकशाही अर्थहीन. आपला देशच एकूण गंडलेला.आपले लेखक सुमार. पुस्तके फालतू. टीव्ही छचोर. माध्यमे उथळ. सिनेमा उटपटांग. घरातही सुखापेक्षा मन:स्तापच. आपली नाती बिघडलेली. आपली स्वप्ने अर्धवट सुटलेली. आपले वजन वाढलेले. आपली तब्येत गंडलेली. आपली मुले मोबाईलने गिळून टाकलेली. आपली झोप उडालेली. मन असूयेने बरबटलेले. डोके काहीही करून कुणाच्यातरी पुढे घुसण्याच्या हव्यासाने भरकटलेले. पैसा कितीही मिळवा, आपल्यासाठी अपुराच! कर्जाने घेतलेले एक स्वप्न फेडा, पुढल्या स्वप्नाचा नवा ईएमआय पाठीशी उभाच! सकाळी उठल्यापासून कटकटी आणि स्वप्नभंग ठरलेलेच. साधे काही मत मांडायला जावे तर ‘आपण भक्त आहोत का नाही?’ हा घोळ. ‘राष्ट्रवादी’ की ‘राष्ट्रद्रोही’ यातला एक शिक्का निवडण्याची सक्ती. चारचौघांपेक्षा काही वेगळे म्हणावे तर ‘ट्रोल्स’ धाड घालणार, काल मित्र म्हणवणारे आज आपल्या ‘वॉल’वर नंगानाच करणार.आपले सोडा, आपण ज्यांना ‘हिरो’ मानत होतो ते सर्व-समृद्ध सेलिब्रिटीज खासगीत सर्व गमावून बसलेली अस्वस्थ-अस्थिर माणसेच असतात हे आपल्याला कळणार, मग त्यांच्या खासगी क्षणांची कलेवरे बाजारात मांडून त्यांचा सौदा लागणार. आपल्या नट्या बेताल बडबडत सुटणार. मग भलेभले नेते त्यांच्या तोंडाशी लागणार. हा चिखल अजून कालवायला कॉलेजातून नुक्ते बाहेर पडलेले तरुण बूमधारी जीव खाऊन त्यांच्या पाठीशी लागणार. त्यांचे संपादक म्हणवणारे स्टूडिओत कॅमेर्यासमोर लाईव्ह नाचणार. आपण हे सगळे मिटक्या मारत बघणार आणि मग चारचौघात मारे म्हणणार, हा कसला मीडीया? ही तर सर्कस! माकडे सर्कशीत नाचतात, माध्यमात नव्हे!.. प्रत्यक्षात मात्र आपण ज्यांना हिणवतो आहोत; त्या चतूर लोकांची चॅनेल्स आपल्या जीवावर टी.आर.पी. खाऊन जाणार. आपण जिथे खुमखुमीने वाद लढवतो, ते सोशल मीडीयाचे अड्डे आपला वेळ खाऊन, आपला डेटा पिऊन वरून आपले ‘आयबॉल’चोरून बख्खळ कमाई करणार आणि माकड?- ते आपले होणार!- अप्पलपोट्या सुमारांचे राजकारण असो वा उथळ सर्कस बनलेली माध्यमे; सगळ्यांचे सगळे खेळ सुखेनैव चालतात, कारण आपण त्यांच्या हातातल्या दोरीवर नाचणारी ‘मूर्ख, झापडबंद माकडे’ बनणे पत्करलेले आहे. आपण साधे, सरळ, नेकीचे आणि पाठीचा कणा राखलेले सत्वाचे जीणे विसरून गेलो आहोत. भुलवणार्या ज्या-त्या खिडकीत सतत डोकावायची एवढी नशा आपल्याला चढली आहे की गर्दुल्ल्यांचे व्हावे तसे आपले डोके बधीर होऊन गहाण पडले आहे. हे असे बधीर, गुंगलेले डोके हा मानवी शरीरातला एक उपयुक्त अवयव आहे, ते ‘चालवायचे’ असते, हे आपण जणू विसरूनच गेलो आहोत. आपल्या या मंद, मठ्ठ डोक्याला आता कसला म्हणून त्रास नकोसा झाला आहे. त्यापेक्षा इकडून आलेले तिकडे फॉरवर्ड करणे उत्तम! हे करण्याला शून्य अक्कल लागते, त्यामुळे डोक्याला तोशीस नाही, शिवाय आपण ‘विचार करतो’ असा आव आणायची फुकट सोय! वरून कुणीही यावे आणि आपल्याला काहीही विकून जावे!- फुकट डेटा विकावा, निर्बुद्ध सिरीयली आपल्या डोक्यावर ओताव्यात, मूर्ख सिनेमे आपल्या गळ्यात बांधून पाचपाचशे कोटी कमवावेत,अत्यंत सुमार छचोर चर्चा-चिखलात आपल्याला गुंगवून ठेवावे आणि आपल्या पायाखाली काय जळते आहे त्याचा बेमालूम विसर पाडून सुखद-गुलाबी देशप्रेमाची नाजूकसाजूक स्वप्ने विकावीत! - आपले हे असे माकड झाले आहे. का? - कारण अत्यंत आळशी झालेले डोके, विचार करण्याचा अतोनात कंटाळा आणि हातातल्या चतकोर स्क्रीनमध्ये अखंड गहाण पडलेली अक्कल यामुळे आपणच ते होऊ दिले आहे. आपल्याला नशेची चटक लागली आहे, सततची धुंदी हवी आहे; आणि तीही स्वस्तात. शक्यतर फुकटातच. चर्चा हव्या आहेत, त्या इतरांनी केलेल्या. टाळ्या पिटण्यासाठी वाद हवे आहेत, ते इतरांनी लढवलेले! आपल्या डोक्याला तोशीस लावून आपल्यासाठी आपण स्वत: काहीच करायचे नाही; असे आपण जणू ठरवूनच टाकले आहे. म्हणून तर समोरच्या पडद्यावर लोक नागडे नाचत सुटले तरी आपण ते मंद डोक्याने मिटक्या मारीत बघत बसतो आणि रिमोटचे बटण दाबायचा पर्याय शब्दश: आपल्या हातात आहे, हे विसरूनच जातो!कष्ट नको, डोक्याला ताण देणारे काही नको, विचार करावा लागेल अशी निमित्ते नकोत, अस्वस्थ करून सोडतील असे लेखक-कलावंत नकोत, भानावर आणतील आणि वास्तव दाखवतील असे नेते नकोत, गंभीरपणे लेखन-मनन-विचार करतील असे पत्रकार नकोत, झडझडून अभ्यास करणे भाग पाडतील असे शिक्षक नकोत.. आपल्याला हवा आहे डोके चालवण्याला कारण अगर उसंतच न देईल असा सदाचा कलकलाट, मनाला नशेची धुंदी, शरीराला मिळतील तेवढे चोचले, फुकटातले छचोर मनोरंजन आणि सुमारांचा निर्बुद्ध कालवा!चिखलात बसलेल्या म्हशी बर्या आपल्यापेक्षा! त्यांना त्या चिखलातून उठून आपल्या रोजकामाला लागण्याचे भान तरी असते. आपले मात्र पुरते माकड झाले आहे. कारण ते आपणच होऊ दिले आहे.- आता उगीच कांगावा करून काय उपयोग?
aparna.velankar@lokmat.com(लेखिका लोकमत वृत्तसमुहात फीचर एडिटर आहेत.)