शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस!"; आई सरिता फडणवीस यांचं मोठं विधान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : जतमध्ये फडणवीसांच्या शिलेदाराने गड खेचून आणला; गोपीचंद पडळकरांचा मोठा विजय
3
Yevla Vidhan Sabha Election Result 2024 Live : छगन भुजबळांनी येवल्याचा गड राखला; २६०५८ मतांनी विजयी, शिंदे पराभूत 
4
"हा महायुतीच्या एकजुटीचा विजय, जनतेसमोर नतमस्तक", देेवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
5
Mahim Vidhan Sabha Election Result 2024 Live : "एक धनवान अन् एक राजपुत्र, त्यांच्या..."; विजयानंतर महेश सावंतांची पहिली प्रतिक्रिया
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "आम्ही आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह तोडून दाखवला"; एकहाती विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
7
अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील दिग्गजांना पराभवाचा धक्का! थोरात, गडाख, तनपुरे, भांगरे पराभूत
8
Sangamner Vidhan Sabha Election Result 2024 Live : बाळासाहेब थोरातांना पराभवाचा धक्का; नवखे अमोल खताळ ठरले जायंट किलर
9
Anushakti Nagar Vidhan Sabha Result 2024: स्वरा भास्करचा पती फहाद अहमद विरुद्ध सना मलिक, निकाल काय?
10
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: संस्थान खालसा! विनोद तावडेंना घेरणारे हितेंद्र, क्षितिज ठाकूर पडले; वसई-विरारमध्ये ‘कमळ’ फुलले!
11
भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुखांचा विजय; मानसिंगराव नाईकांना किती मत मिळाली?
13
अंधेरी पूर्वेत शिवसेनेच्या मुरजी पटेलांची बाजी, उबाठाच्या ऋतुजा लटकेंचा पराभव 
14
Vikhroli Vidhan Sabha Result 2024: संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊतांचा निकाल काय?
15
Maharashtra Assembly Election Result 2024: अमित ठाकरेंचा दारूण पराभव, बाळा नांदगावकरही हरले; राज ठाकरेंवर उद्धव ठाकरे भारी पडले
16
प्रणिती शिंदेंना मोठा धक्का! त्यांच्याच मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार पडला; भाजपने बालेकिल्ला फोडला
17
Maharashtra Assembly Election Result 2024: कांदिवली पूर्वेतून भाजपच्या अतुल भातखळकरांची हॅटट्रिक, काँग्रेसच्या कालू बढेलियांचा पराभव
18
ठरलं! 'या' दिवशी राज्यात स्थापन होणार महायुतीचं सरकार; कोण होणार मुख्यमंत्री?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचे काय झाले? इस्लामपूरमध्ये महायुती की मविआ जिंकले
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'अजित पवार पिछाडीवर', अशी खोटी बातमी का दाखवता? अजित पवारांचा सवाल

टाकेवाडी आणि भांडवली या दोन गावांनी कशी जिंकली वॉटर कप स्पर्धा?

By सचिन जवळकोटे | Published: August 18, 2018 5:44 PM

सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या दोन गावांनी घाम गाळून यंदाच्या एका पावसातच गावातल्या विहिरी तुडुंब भरून घेतल्या आहेत आणि प्रतिष्ठेचा ‘वॉटर कप’ही पटकावलाय! या दोन गावातला हा फेरफटका

आठशे वाघजाई पठारालगतच्या भांडवली शिवारात गावकर्‍यांनी यंदा जणू आठवं आश्चर्य बघितलंय. या परिसरातल्या पन्नास विहिरी यंदा तुडुंब भरल्या आहेत. अगदी काठावर उभारलं तरी हाताला पाणी लागेल, एवढय़ा गच्च. त्याही केवळ एकाच पावसात. पिढय़ान्पिढय़ा दुष्काळाची भीषण परंपरा लाभलेल्या या शिवाराचं बदलतं रूप सा-यासाठीच कौतुकाचं आहे. या विहिरी बघण्यासाठी कुठून-कुठून माणसं येत  आहेत. या लोकांच्या चेह-यावरचे भाव बघून  गावक-याच्या घामाचं चीज होताना दिसतंय. होय. घामाचं चीज. सलग 45 दिवस राबलेल्या हजारो हातांच्या श्रमदानाला मिळालेलं अनोखं फळ.

भांडवली नावाचं छोटंसं गाव आहे, हे बाजूच्या तालुक्यालाही जिथं आजपावेतो माहीत नव्हतं; तिथं या गावानं जगाच्या नकाशावर स्वत:च्या अस्तित्वाची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. ‘वॉटर कप’ स्पर्धेत पहिल्या तीनमध्ये पारितोषिक पटकावून सा-या जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सातारा जिल्ह्यातील माण तालुका नेहमीच घोटभर पाण्यासाठी तडफडत राहिला आहे. ओंजळभर पावसासाठीही वर्षानुवर्षे वाट पाहून-पाहून थकलेला. इथल्या शाळकरी पोरांनी भरगच्च नदी-नाले केवळ अभ्यासाच्या पुस्तकातच बघितलेले असावेत. दिवसभर टँकरसमोर रांगा लावूनच दोन-तीन पिढय़ा मोठय़ा झाल्या. अशा  तालुक्यातील दहिवडीजवळची दोन इवलीशी गावं. टाकेवाडी अन् भांडवली.

आमीर खानच्या पानी फाउण्डेशनचा ‘वॉटर कप’ यावर्षी या गावांनी पहिल्या आणि दुस-या नंबरने पटकावलाय. टाकेवाडीची लोकसंख्या जवळपास 1800. सातोबा देवाला मानणारं हे गाव अवघं 270 उंब-याचं. गावात दीड हजार हेक्टरची जमीन; परंतु जवळपास सारीच पडीक. त्यामुळं गावकर्‍यांचा मुख्य व्यवसाय मेंढपाळीचा. प्रत्येक घराचं अंगण कसं मेंढरांनी भरलेलं. बें बें आवाजानं अवघं वातावरण भारलेलं. ‘दुष्काळ आपल्या पाचवीलाच पूजलाय,’ याची खूणगाठ बांधलेल्या कैक पिढय़ा उन्हाळ्यात मेंढरं घेऊन कोकणाकडं जात आल्या. मात्र, यंदाचा उन्हाळा या गावच्या शिवारासाठी अविस्मरणीय ठरला. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुंबईच्या तीन ट्रॅव्हल्स बस गावात येऊन थडकल्या. आतून शंभर-दीडशे माणसं पटापटा खाली उतरली. कधी काळी पोटापाण्यासाठी मुंबईला गेलेल्या या गावातल्याच मंडळीनी आता गावचं भवितव्य बदलण्याचा चंग बांधला होता. कारण पाण्याविना तडफडणा-या गावातील अनेकांनी स्थलांतर केलं. शेती ओसाड टाकून अनेकजण रोजंदारीकडे वळले. आजूबाजूची गावं हिरव्यागार शिवारानं बहरलेली असताना आपल्याच नशिबी दुष्काळाचा शाप का, या जाणिवेनं तरुण पिढी निसर्गावर चिडून उठली होती.

8 एप्रिल रोजी पहाटे जवळपास दीड हजार मंडळी शिवारात शिरली. दोन-पाचशे लोक शेरीच्या पठारावर गेले. काही सातोबा दंडावर आले. श्रमदानाला सुरुवात झाली. पहाटेच्या अंधारात सार्‍याचं अंग घामानं निथळून निघालं. सूर्याच्या पहिल्या किरणांनी घामाचे थेंब चमकून निघाले.

पाहता-पाहता 45 दिवस या लोकांनी माळरानावर कष्टाची जणू सुबक रांगोळी काढली. पठारावर डीप सीसीटी करतानाच ओघळ अन् ओढय़ांमध्ये लूज बोल्डरही तयार केले. गावाला टारगेट होतं दहा हजार घनमीटर क्षेत्राचं.. पण झपाटलेल्या या मंडळींनी काम केलं तेरा हजाराचं.

खरं तर गाव दरीत होतं. गावच्या तिन्ही बाजूंनी असलेल्या डोंगरावर गावक-याच्या जमिनी होत्या. खालून वर जाण्यासाठी दोन-तीन किलोमीटरचं अंतर पार करावं लागायचं. वरच्या पठारावर जाईपर्यंत अनेकांची दमछाक व्हायची. मात्र, गावाला पाणीदार बनविण्याच्या स्वप्नानं झपाटलेल्या मंडळींनी पावणेदोन महिन्यांत हे सारे डोंगर रोज पालथे घातले. पठाराचा नकाशाच बदलून टाकला. स्पर्धेसाठी पंचेचाळीस दिवसांचा अवधी होता. एवढय़ा काळातच डोंगराएवढी कामं उपसायची होती. म्हणून रोज सकाळी अन् संध्याकाळी तीन-तीन तास गावासाठी द्यायचं नियोजन गावाकर्‍यांनी केलं. मात्र, सकाळी कुणी उशिरा उठायचा तर कधी कंटाळा करायचा. तेव्हा बरोबर पहाटे सहा वाजता स्पीकर वाजवत गाडी गावभर फिरली की ग्रामस्थ मंडळी पटापट आवरून डोंगराकडं पळू लागली. आजपर्यंत न येणार्‍या लोकांनाही हळूहळू या आवाजाची सवय होत गेली. ती सुद्धा आपसूकच पहाटे उठून र्शमदानात भाग घेऊ लागली. या मोहिमेत पुढाकार घेणारे गंगाराम दडस सांगत होते, ‘गेल्या अनेक वर्षांपासून गावाला टँकर लागायचे. गेल्या वर्षी तर सात टँकर्स रोज गावात यायचे. मात्र, यंदाच्या र्शमदानामुळं चमत्कार घडला. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या पावसानं डोंगरातलं पाणी झिरपत- झिरपत खालच्या विहिरीपर्यंत आलं. गावची विहीर याक्षणी पूर्णपणे भरली असून, याच पाण्यावर आमची रोजची तहान भागतेय. गावाला रोज चाळीस हजार लिटर पाणी लागत असूनही विहिरीतल्या पाण्याची पातळी थोडीशीही कमी झालेली नाही बरं का.’

विशेष म्हणजे, हा सारा चमत्कार घडला. केवळ एकाच पावसानं. या परिसरात वर्षाकाठी पाऊस पडतो केवळ तीनशे ते चारशे मिलीमीटर. तोही गणेशोत्सव काळातच. नंतर कधीतरी परतीच्या एखाद्या पावसानं दर्शन दिलं तर नशीबच म्हणायचं. त्यामुळं यंदा पुढच्या महिन्यात एखादा दुसरा काळा ढग कोसळला तरी शिवाराचं भाग्य वर्षभरासाठी उजाडलंच म्हणायचं.

दुसरा क्रमांक पटकाविलेल्या भांडवली गावाची परिस्थिती थोडीशी वेगळी. इथल्या शिवारात पाण्याची पातळी पूर्वीपासूनच चांगली. गावच्या विहिरीतून रोज पंधरा-सोळा टँकर्स भरून तालुक्यात जायचे. तरीही गावानं ‘वॉटर कप’ स्पर्धेत भाग घेऊन वेगळा आदर्श निर्माण केला. सुरुवातीला गावानं ‘वॉटर कप’ स्पर्धेचे सर्व नियम नीट समजून घेतले. केवळ पाण्याची पातळी वाढविणं इतकंच नव्हे तर गावाची एकी अन् गावातली स्वच्छता, या गोष्टीही अधिक महत्त्वाच्या असल्याचं लोकांच्या लक्षात आलं. डीप-सीसीटी, सीसीटी, बांध-बंदिस्ती, गॅबियन स्ट्रक्चर, ओढा खोलीकरण-रुंदीकरण, नवीन मातीबांध, जुन्या माती बांधातील गाळ हटाव असे अनेक नवनवीन तांत्रिक शब्द    गावक-यानी पाठ केले. 

या मोहिमेचं नेतृत्व करणारे सुनील सूर्यवंशी बरीच नवीन माहिती देत होते, ‘आमच्या गावची लोकसंख्या 973. गावची जमीन 917 हेक्टर. त्यामुळं कमी माणसांत जास्त काम करावं लागलं. मशिनरीसाठी एक कोटींचा खर्च केला. अजूनही जवळपास 44 लाखांचं देणं थकलंय, तरीही आम्ही खूप समाधानी आहोत. कारण र्शमदान केल्यानंतरचा चमत्कार आख्ख्या तालुक्यानं बघितलाय. आमच्या शिवारातल्या 54 पैकी 50 विहिरी तुडुंब भरल्यात. हाताला वरूनच पाणी लागतंय. नदी अन् नाले कोरडे असले तरी भरलेल्या विहिरी गावाला नवी स्वप्नं दाखवताहेत.’भांडवली गावाला खरंतर पहिल्या क्रमांकाची अपेक्षा होती. मात्र, तरीही ते आता मोठय़ा उमेदीनं नव्या तयारीला लागलेत. पुढच्या वर्षीच्या स्पर्धेत एखादं गाव दत्तक घेण्याचा विचार ग्रामस्थांनी सुरू केलाय. या गावाजवळून जाणा-या माणगंगा नदीत गावानं गेल्या बारा वर्षांपासून ‘वाळूबंदी’ केलीय. ‘आमची नदी.. आमची वाळू’ची घोषणा देत गावानं वाळू उपश्यावर पूर्णपणे बंदी घातलीय. बाहेरचा ठेकेदार तर सोडाच गावातली व्यक्तीही इथल्या वाळूला हात लावू शकत नाही. गावात घराचं बांधकाम निघालं तर वाळूचा ट्रक बाहेरूनच येतो. याचा एक चांगला परिपाक असा झाला की, आजपर्यंतच्या पावसाचं सारं पाणी इथंच मुरलं गेलं. झिरपत-झिरपत गावच्या विहिरीत साठलं गेलं.

दरवर्षी साताराच अव्वल का ?

* गेल्या तीन वर्षांत सातारा जिल्ह्यानं ‘वॉटर कप’ मध्ये हॅट्ट्रिक नोंदवली आहे. 2016 मध्ये वेळूनं पहिला तर जायगावानं दुसरा क्रमांक पटकाविला. 2017 मध्ये भोसरेला द्वितीय तर बिदालला तृतीय क्रमांक मिळाला. 2018 मध्ये टाकेवाडी प्रथम आलं तर भांडवली द्वितीय. यंदा तर राज्यभरातल्या 24 जिल्ह्यांमधून तब्बल 4000 गावं स्पर्धेत उतरली होती. तरीही ‘सातारी बाणा’ अव्वल राहिला.* ‘दरवर्षी साताराच का?’ या प्रश्नावर बोलताना जलतज्ज्ञ डॉ. अविनाश पोळ सांगत होते, ‘साता-याला परंपरा चळवळीची. ग्रामस्वच्छता, निर्मल अभियान अन् तंटामुक्तीसारख्या प्रत्येक मोहिमेत हा जिल्हा नेहमीच अव्वल ठरलेला. कोणत्याही चांगल्या कामात एकत्र येण्याची इथल्या लोकांची मानसिकता नेहमीच तयारीची. त्यामुळं वॉटर कपमध्येही इथल्या गावांनी आपलं वेगळेपण जपलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ही स्पर्धा केवळ बक्षीस मिळविण्यासाठी नसून आपल्या गावचं भवितव्य बदलण्यासाठी असल्याचंही या जिल्ह्यानं ओळखलं. या सार्‍यांचा परिपाक म्हणजे सलग तीन वर्षे चांगला क्रमांक मिळत राहिला.’

(लेखक ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीचे प्रमुख आहेत.)

sachin.javalkote@lokamat.com