- मधुकर राणे, यवतमाळ
सर्वधर्मसमभाव किंवा ‘विविधतेत एकता’ असे शब्द आपण अगदी सहजपणे वापरतो, त्याचा गवगवाही करतो, प्रत्यक्षात किती लोकांच्या प्रत्यक्ष आचरणात ही कृती दिसते. आजकाल तर धर्मांच्या अस्मिता कधी नव्हे इतक्या टोकदार झाल्या आहेत. प्रत्येक जण म्हणतो, आमचाच धर्म श्रेष्ठ आणि इतर धर्मीयांना कस्पटासमान लेखतो. जाती-धर्मीयांमधील इतकी कटुता पूर्वी कधी नव्हती इतक्या तीव्रतेनं ती आता दिसते आहे. कुठे चाललो आहोत आपण? गांधीजींनाही इतिहासात ढकलून देऊन आपण मोकळे झालो आहोत; पण हाच एक माणूस असा आहे, ज्याचे विचार आपल्या जगण्याला दिशा देऊ शकतात.
लोकमतच्या 30 सप्टेंबरच्या ‘मंथन’ पुरवणीत सुरेश द्वादशीवार यांनी गांधीजींच्या धार्मिक पैलूंचं अतिशय सुंदर विवेचन केलं आहे.
गांधीजी स्वत:ला सनातन हिंदू म्हणवून घेत असले तरी त्यांचा विचार आणि त्यांचं आचरण वैश्विक होतं. एकाच वेळी ते हिंदू होते, मुस्लीम होते, ख्रिश्चन होते. खरं तर कुठल्याही धर्मात मावणार नाही असं त्यांचं आचरण होतं.महात्मा गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं असं म्हटलं जातं, ते खरंच आहे; पण त्यांनी भारतीयांनाच नाही तर संपूर्ण जगालाच जगायचं कसं हे शिकवलं.
जगातल्या सर्व धर्मांना कवेत घेऊ शकणारा आणखी एक मोठा धर्म त्यांच्याकडे होता, तो म्हणजे मानवता. त्याच्या याच मानवतेमुळे ते जगाला कवेत घेऊ शकले.
जगातले सर्वधर्म मानवजातीच्या कल्याणाचे स्वप्न सांगत आले, तरी त्यांच्या अंगभूत मर्यादा होत्या, आहेत आणि त्यामुळेच त्या त्या धर्माची शिकवण फक्त त्यांच्या अनुयायांपुरतीच मर्यादित राहिली, हे लेखकाचं निरीक्षण अत्यंत अचूक आणि अभ्यासपूर्ण आहे.
कोणत्याच धर्माचा इतिहास वाखाणण्याजोगा नाही, हे लेखकाचं विधान अनेकांना धक्कादायक वाटेल; पण ती वस्तुस्थिती आहे आणि लेखकानं ते उत्तम पटवूनही दिलं आहे.