सोनाली नवांगुळ
अनोळखी माणसांच्या जित्याजागत्या गोष्टी
शहर आणि माणसं समजून घेण्यासाठी गळ्यात कॅमेरा अडकवून मुंबईच्या रस्त्यांवरून ती फिरू लागली.
अनेक गोष्टी दिसायला लागल्या.
व्यसनांच्या आहारी गेलेली माणसं,
नव:याच्या आठवणींवर जगणारी बाई, बायकोच्या मृत्यूनंतर
मुलांची आई बनलेला टॅक्सी ड्रायव्हर,
नकोसे अनुभव घेऊनही
कणा ताठ जपलेली स्त्री.
प्रत्येकाची गोष्ट वेगळी.
त्यातूनच काही महिन्यांपूर्वी
आकार घेतला एका फेसबुक पेजनं.
आज त्याचे सहा लाखांवर
फॉलोअर्स आहेत.
प्रत्येक शहराची आणि गावाची एक गोष्ट असते. ती असते त्यातल्या माणसांमुळे. नुसतं न्याहाळत बसलं तरी स्तब्ध चेह:यांवर गोष्ट वाचता येते. थोडं पुढं जाऊन, गोष्ट जाणून घेतली की जे हाती लागतं त्यानं आपल्यातलं काहीतरी बदलतं. हेंदकाळतं. ती गोष्ट सांगून आपण पुढच्या ऐकणा:याला त्या अनोळखी माणसाशी जोडतो. गोष्ट सांगणा:यावर अवलंबून ती पोहोचते कशी हे! मुळात गोष्ट समजून घेऊ इच्छिणा:याला समोरच्याचा विश्वास जिंकावा लागतो. विचारणा-या डोळ्यांतून व देहबोलीतून हेतूबद्दलचं हार्दिक पोहोचावं लागतं. आपल्याबद्दल विश्वास वाटणं हाही एक चुकत शिकत करण्याचा प्रवास. तो करिश्मा मेहतानं केला आणि ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ हे फेसबुक पेज तयार झालं.
आभासी सत्यात रमण्याचा हा काळ. सोशल साइट्सवर हजारोंचा गोतावळा असणारी, बोलबोल बोलणारी माणसं प्रत्यक्ष माणसांशी संपर्क येतोय हे पाहताच अंग आखडून घेतात, संवाद गोठवतात हा सर्वसाधारण अनुभव. आवडलेली पोस्ट माणसं लाइक करतात, शेअर करतात; पण खटकलेली गोष्ट दुरुस्त करण्यासाठी पाऊल उचलत नाहीत.. होय, प्रत्येकाच्या मर्यादा असतात हे मान्य, पण ‘सायलेंट ऑब्झरवर’ असण्याची स्थिती फ्रीज होऊ नये नं! - हे असं करिश्माला वाटायचं. ती स्वत: कॅमेरा गळ्यात अडकवून मुंबईच्या रस्त्यांवरून फिरायला लागली. सिद्धार्थ मुखर्जीसारखा फोटोग्राफरही होताच. तिला गोष्टी दिसायला लागल्या. कधी अडखळत व्यक्त होणारी, तर कधी कुणी स्वत:हून उत्सुकता दाखवतंय म्हणून धबधब्यासारखी कोसळणारी माणसं भेटू लागली. कुणाची काय तर कुणाची काय गोष्ट! - कुणाची गोष्ट खचवणारी असली तरी त्यातून नव्या श्वासासाठीचा जोम मिळतोय, उभारी येतेय हे करिश्माला लक्षात यायला लागलं. गोष्टी ऐकताना कधी समोरच्यासारखं व्हावं वाटायचं, तर कधी तसं न करताही आयुष्याची किंमत जाणवून जायची. या ‘लाखमोला’च्या गोष्टी स्वत:पाशी अडवून वाढत नसतात हे कळत होतं, त्यातून ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’नं आकार घेतला. जानेवारी 2क्16 मध्ये सुरू झालेल्या पेजला आज सहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ‘मेक लव्ह, नॉट स्कार’ सारख्या अॅसिड अॅटॅक विरोधात खडय़ा चळवळीला, सेक्स वर्करची मुलगी असण्याची ओळख उघड झाल्यावर भाडय़ाच्या घराबाहेर हाकललं गेलेल्या तरुण मुलीला, कितीतरी माणसांना ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’नं मदतीचा हात दिलाय. चाळीस लाखांहून अधिक फंड गरजू माणसांच्या जगण्याला हितकारी ठरलाय.
परदेशात ‘बिझनेस अॅण्ड इकॉनॉमिक्स’ या विषयातला अभ्यास संपवून करिश्मा स्वत:च्या मूळ शहरात, मुंबईत परतली. ‘नॉट’ नावाची संस्था तिनं सुरू केली.. गूगलवर सतराशेसाठ लिंक्स ओपन करता करता तिला ‘ह्यूमन्स ऑफ न्यूयॉर्क’ नावाचं पेज खूप आवडायला लागलं होतं. ती ते फॉलो करायची. अमेरिकन फोटोग्राफर ब्रॅण्डन स्टॅण्टन यानं हे पेज 2010 मध्ये सुरू केलं होतं. आपण राहतो त्या ठिकाणाला चेहरा मिळतो असंख्य लहानमोठय़ा नि असंख्य धर्मजाती व संस्कृतीमध्ये वाढणा:या लोकांमुळे. रोजच्या जगण्याच्या कोलाहलात आपण हा ‘वेगळा’ स्वर ऐकायचा राहून जातो. तो ऐकण्यानं आपला स्वत:शी नवा संवाद सुरू होतो असंच काहीसं वाटून फोटोग्राफर ब्रॅण्डननं ‘ह्यूमन्स ऑफ न्यूयॉर्क’ सारखा फोटोब्लॉग बनवला होता. करिश्माला ते पटल्यानं ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ पेज सुरू करायचं घाटलं. सुरुवातीच्या काळात कुणी तिच्याशी बोलायलाच तयार होईना. नऊ लोकांकडून नकारानंतर एका आजीनं फोटो काढायला नि आपली गोष्ट सांगायला होकार भरला आणि पेज लाइव्ह झालं.
व्यसनांच्या आहारी गेलेली माणसं, नव:याच्या आठवणींनी दिवस सुंदर करत जगणारी बाई, बायकोच्या मृत्यूनंतर मुलांची आई बनलेला टॅक्सी ड्रायव्हर, खासगी आयुष्यात एक स्त्री म्हणून नकोशा अनुभवांना सामोरी गेलेली आणि कणा ताठ जपलेली एक बाई. अशा कितीतरी गोष्टी मिळत गेल्या. समलैंगिकता, चोरी, कुठलेसे आजार नि अपंगत्व किंवा टक्कल पडण्यासारख्या असंख्य वेगवेगळ्या कारणांनी बहिष्कृत झालेली माणसे या पेजचा विषय बनली. कधी ती दिमाखदार श्रीमंत वस्तीतली होती, तर कधी झोपडपट्टीतल्या अंधा:या गल्लीतली. कुत्र्याला फिरायला नेणारा कुणी, दुकानाच्या गल्ल्यातून पाच मिनिटाचा ब्रेक घेणारा कुणी या टीमशी बोलू लागला. त्यातल्या शंभर गोष्टींचं याच नावाचं पुस्तक बनलं. हीसुद्धा प्रेरणा ‘ह्यूमन्स ऑफ न्यूयॉर्क’कडून घेतलेली. त्यांनी अशा ‘स्टोरीज’ पुस्तक रूपात प्रकाशित केल्या आहेत.
खरी गोष्ट ना न्यूयॉर्कच्या पेजची, ना बॉम्बेच्या. रोजच्या वेगवान आयुष्यात आपल्या घरापुढचं अंगण कुठंतरी हरवल्यासारखं वाटतंय.. ते अंगण शोधण्याचा प्रयत्न आभासी जगात होतोय नि केवळ आभासी न उरण्याची ओढही दिसतेय. अनोळखी माणसांशी बोलू नका, त्यांनी दिलेलं काही घेऊ नका असं कंडिशनिंग लहानपणापासून होतं. वयानं मोठं होताना हे संशयाचं भूत अधिकाधिक स्ट्रॉँग व कडवट होत जातं. वस्तुस्थिती संशय ठेवण्यासारखी असली तरी तेवढंच फक्त खरं नाहीये असं सांगून जित्याजागत्या माणसांच्या या गोष्टी नकारात्मकतेकडे झुकणा:या मनाच्या कलाला थोडं जागेवर आणतात. जिवंत जगाशी कनेक्ट करतात. ‘न्यूयॉर्क’मधला फोटोब्लॉग मग शहरापुरता मर्यादित न राहता वीसभर देशांमध्ये फिरून असंख्य माणसांशी, अनुभवांशी जोडून घेतो.. ‘बॉम्बे’ पेज भौगोलिकदृष्टय़ा आपल्याच आसपासचं, पण त्यातून अनोळखी माणसांच्या गोष्टीतून आपण स्वत:चं काही विणत नेतो.. मनातले ताण हलकं करतो.. आपल्या आसपासच्या माणसांना न्याहाळून त्यांना शब्दांतून अधिक ओळखीचं करून घेण्याचे प्रयत्न फेसबुकच्या वॉलवर अलीकडे अनेकजण करू पाहताहेत. आभासी माध्यमांचा उपयोग करून भास फेडण्याचा हा नव्या जगाचा ‘वे ऑफ लाइफ’!