शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झाडी, काय डोंगर... शिंदेंचा ५० आमदारांपैकी एक पडला; शहाजीबापू पाटलांचा पराभव
2
ठरलं! 'या' दिवशी राज्यात स्थापन होणार महायुतीचं सरकार; कोण होणार मुख्यमंत्री?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचे काय झाले? इस्लामपूरमध्ये महायुती की मविआ जिंकले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: सांगोल्यात काय झाडी काय डोंगराला भगदाड; शहाजीबापू पाटील यांचा पराभव
5
"एका राजपुत्रासाठी आम्ही थांबलो तर..."; सुषमा अंधारेंचं विधानसभा निकालाबाबत मोठं विधान
6
चौरंगी लढतीत दीपक केसरकरांची बाजी, मोठ्या मताधिक्यासह मिळवला विजय 
7
एकनाथ शिंदेंची जोरदार मुसंडी; एकट्याने ठाकरे, पवार, कांग्रेसपेक्षा जास्त जागांवर घेतली आघाडी
8
चारकोपमध्येही भाजपची सरशी, योगेश सागर यांचा विजय जवळपास निश्चित
9
Chitra Wagh : "महायुतीच्या विजयाचे शिल्पकार", स्पष्ट बहुमत दिसताच चित्रा वाघ यांचं ट्विट!
10
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे 'नितीशकुमार' ठरणार की फडणवीसांसारखे युद्ध जिंकूनही हरणार? CM कोण होणार...
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: एक्झिट पोल पुन्हा ठरले फोल! महायुतीला कौल दिला, पण ‘त्सुनामी’चा अंदाज नाही आला!
12
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदेंनी 'करून दाखवलं', विधानसभेत जे बोलले होते, तसंच झालं! उद्धव ठाकरेंना जबर धक्का
13
नैसर्गिक युती तोडल्याचा जनतेच्या मनात राग, महायुतीच्या निकालानंतर विनोद तावडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : मोठी बातमी...! नागपूर दक्षिण-पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत विजय; होणार मुख्यमंत्री?
15
बारामतीची जनता हुशार; एका वाक्यात सुनेत्रा पवारांनी केले विरोधकांना गपगार...
16
मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...
17
Ramtek Vidhan Sabha Election Result 2024: ठाकरेंच्या शिवसेनेला रामटेकमध्ये जबर हादरा!
18
Badnera Assembly Election 2024 Result Live Updates: "आमच्या रामाचं बाण मतदारांनी चालवून दाखवलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार"
19
Kopri Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live: एकनाथ शिंदेच आनंद दिघेंचे खरे वारसदार! पुतण्या केदार दिघेंना किती मतं पडली, पाहा आकडे
20
हाय व्होल्टेज ड्रामा, ते अपक्ष उमेदवारी; शेट्टीचं तिकीट कापलेल्या मतदारसंघात संजय उपाध्यायांची सरशी

मुंबई - पुणे अवघ्या 21 मिनिटांत; जाणून घ्या, कसा होणार हा प्रवास? काय आहे हायपरलूप?

By पवन देशपांडे | Published: February 25, 2018 7:39 AM

ही रस्त्यावरून धावणारी गाडी नाही, रुळांवरून सरकणारी रेल्वे नाही आकाशात उडणारे विमान नाही, की महासागरांचे पाणी कापणारे जहाज नाही. पाणी वाहून नेणारी पाइपलाइन असावी, अशा भल्या प्रचंड लांबचलांब निर्वात पोकळीतून तासाला हजाराहून अधिक किलोमीटर्स इतक्या वेगाने सरकत जाणा-या कॅप्सूल्स आहेत या !

प्रवाशांसाठीची कॅप्सूल एखाद्या निमुळत्या, लांबुडक्या मोटारीसारखी रचना समोरचा भाग निमूळता मधल्या भागात जवळपास ३० प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था स्टेशनहून निघाल्यानंतर पहिल्या ३ ते ५ सेकंदातच किलोमीटरभर प्रवास करून पुढे जाईल मिनिटभरात ती जवळपास १५ ते २० किमी अंतरावर असेल़

सकाळचे १० वाजलेत... आॅफिस गाठायचंय... साडेदहाची वेळ चुकायला नको म्हणून चिडचिड-धावाधाव सुरू आहे... तब्बल ११८ किमीचा प्रवास करून आॅफिसला धडकायचंय... अन् पुढच्या पंचवीस मिनिटांमध्ये आॅफिस...!! तेही पुण्याहून मुंबईला येऊन..!!

पुण्याहून मुंबईत दररोज आॅफिससाठी येणा-या हजारो प्रवाशांसाठी हे सारंच स्वप्नवत आहे... म्हणजे कल्याणमध्ये राहणाºयाने फास्ट लोकल पकडली की मुंबई सीएसएमटीला येईपर्यंत लागणाºया वेळेच्या अर्ध्या वेळात हा पुणे-मुंबई प्रवास! केवळ एखाद्या साय-फाय सिनेमातच दिसावं, असं हे दृश्य येत्या अवघ्या काही दिवसात प्रत्यक्ष अनुभवात येऊ घातलं आहे.सकाळची सिंहगड एक्स्प्रेस पकडण्याची वर्षानुवर्षांची सवय असणाºयांना नजीकच्या भविष्यात कदाचित दररोजच्या आयुष्यातले पाच-सहा तास प्रवासात वाया घालवावे लागणार नाहीत. एरवीही सातत्याने मुंबई-पुणे प्रवास करणाºयांसाठी एक वेगवान सुविधा उपलब्ध होईल आणि वाहतुकीची नवी साधनं, नवे मार्ग शोधणा-या भारतासाठी आणखी एक अत्याधुनिक पर्याय !

- हे शक्य होईल एका तंत्रज्ञानामुळे.. ते तंत्रज्ञान म्हणजे हायपरलूप.मुंबईत नुकत्याच झालेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषदेत मुंबई-पुणे या दोन महानगरांदरम्यान ‘हायपरलूप’ उभारण्याचा करार झाला आहे. रिचर्ड ब्रॅन्सन यांची ‘व्हर्जिन हायपरलूप वन’ ही कंपनी आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात झालेल्या या करारानुसार (रेल्वेमार्गाचा विचार केल्यास) ११६ किलोमीटर अंतर असलेल्या दोन शहरांमधला प्रवास १६ ते २१ मिनिटांत होईल, अशी हायपरलूप वाहतूक व्यवस्था उभारण्याचे नियोजन आहे. म्हणजे आता लोणावळा-खंडाळा-कर्जत-कल्याण अशा मार्गावर धडधडत धावणाºया असंख्य एक्स्प्रेसपेक्षा वेगळा मार्ग असेल की काही ठिकाणी जमिनीखालून ही हायपरलूप वाहतूक होईल हे अद्याप निश्चित व्हायचे आहे. त्यासाठीची व्यवहार्यता पडताळून पाहण्याचे काम रस्त्यावरून धावणारे वाहन नाही, विमान नाही की रेल्वेही नाही; मग ही वाहतूक व्यवस्था नेमकी कशी असेल?

- याची चर्चा आपल्याकडे आता सुरू झाली आहे.वरवर पहाता असे दिसते की, एका मोठ्ठ्याच्या मोठ्या निर्वात पोकळ नळकांड्यातून वेगाने सरकणाºया कॅप्सूल्ससारख्या लांबुडक्या ‘पॉड्स’ माणसे आणि सामान वाहून नेतील. त्यांचा वेग प्रतितासाला तब्बल हजारेक किलोमीटर एवढा असेल.

- हा प्रकार वास्तवात शक्य आहे का? सुरक्षेचे काय? नळकांड्यातून सरकताना अपघात घडला तर काय? - अशा अनेकानेक प्रश्नांची उत्तरे आजघडीला केवळ जर-तरच्या भाषेतच मिळतात, कारण सद्यस्थितीत ‘हायपरलूप’ ही विकसित होणारी आणि प्रायोगिक स्तरावर वेगाने उन्नत होत चाललेली एक ‘कन्सेप्ट’ आहे’. भारतात हे असे काही शक्य आहे का? त्यासाठी किती वर्षे जातील? इतक्या महाभयंकर वेगात होणारा हा प्रवास सुखकर असेल का? - हे तर त्यापुढचे प्रश्न !

- पण त्या प्रश्नांच्या अलीकडची कहाणी मात्र मोठी मनोवेधक आहे.काही वर्षांपूर्वी ‘हायपरलूप’ ही मूळ कल्पना टेस्ला आणि स्पेसेक्स कंपनीचा मालक एलॉन मस्क या जगप्रसिद्ध उद्योजकाने मांडली, तेव्हा खरे तर या नव्या शक्यतेवर विश्वास ठेवायलाही फारसे कुणी तयार नव्हते. काहींना ही केवळ फॅण्टसी वाटली. एखाद्या ‘साय-फाय’ हॉलिवूडपटात शोभावी, अशीच ही संकल्पना होती़ पण अर्थात, ती मांडणारे मस्क पहिले नव्हते़ जवळपास शंभर वर्षांपूर्वी अशाच प्रकारच्या वाहतूक व्यवस्थेचा विचार करून झाला होता़ तो केला होता सायन्स फिक्शन लिहिणाºया ‘भविष्यवेधी’ लेखकांनी !

- त्यानंतर रॉबर्ट गोडार्ट या रॉकेट तंत्रज्ञानाच्या उद्गात्यानं १९०९ साली पहिल्यांदा हवेच्या पोकळीतून जाणाºया ट्रेनची संकल्पना मांडली होती़ त्यानंतर जवळपास ६५ वर्षांनी रॅण्ड कॉर्प या कंपनीनेही अंडरग्राउण्ड रेल्वेची संकल्पना पुढे आणली होती़ मस्क यांनी मांडलेली हायपरलूपची संकल्पना आणि रॉबर्ट गोडार्ट यांनी मांडलेली हवेच्या पोकळीतून सरकणारी ट्रेन जवळपास सारखी आहे़ आता तर त्यात अनेक नवनव्या संकल्पना जोडल्या जात असून, या तांत्रिक अत्याधुनिकतेच्या जोरावर जवळपास ध्वनीचा वेगाशी (१२३५ किलोमीटर्स प्रतितास) स्पर्धा करणे ‘हायपरलूप’ला साधेल, असे दिसते आहे.

एलॉन मस्क म्हणतो, हायपरलूप हे वाहतुकीचे पाचवे माध्यम आहे़ रस्ते, हवाईमार्ग, जलमार्ग आणि रेल्वे अशा चार माध्यमांचे जाळे जगभरात पसरलेले आहे आणि त्यात आता नवनवीन तंत्रज्ञानही आले आहे़ वेग वाढला आहे, इंधन कमी लागू लागले आहे आणि आधीच्या तुलनेत आता प्रदूषणही कमी होऊ लागले आहे़ पण रस्त्यावरून वाहन घेऊन प्रवास करायचा तर वेळ जातो़ ट्राफिकची कटकट़ शिवाय रस्ते जर खड्डेमय असतील तर तो त्रास वेगळाच़ शिवाय इंधन जाळल्याने होणारे वायूप्रदूषण आलेच़ त्यात इंधनाचा होणारा खर्चही खूप़ रस्ते मार्गावरून सुरक्षित प्रवासाचा वेग जास्तीत जास्त १२० किलोमीटर प्रतितास़ हे चित्र बदलायचे तर नवी पर्याय शोधण्याला पर्याय नाही’.एलॉन मस्कने ‘हायपरलूप’ची कल्पना मांडली २०१२ मध्ये. ही एक ‘ओपन सोर्स’ आयडिया असावी, असा मस्कचा आग्रह होता. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मस्कने २०१४ साली ‘हायपरलूप वन’ नावाने एक कंपनी स्थापन केली. २०१७ साली ख्यातनाम उद्योजक रिचर्ड ब्रॅन्सनने या कंपनीत मोठी गुंतवणूक केल्यावर त्या कंपनीचे नामकरण ‘व्हर्जिन हायपरलूप वन’ असे झाले. हीच कंपनी आता मध्यपूर्वेसह भारतात ‘हायपरलूप’चे जाळे उभे करण्यासाठी उत्सुक आहे.

हायपरलूप म्हणजे नेमके काय?- थोडे सोपे करून सांगायचे, तर हवेची निर्वात पोकळी असलेल्या मोठ्या-गोलाकार पाइपमधून जवळपास एक हजार किलोमीटर प्रतितास एवढ्या वेगाने प्रवासी आणि सामानाची वाहतूक करणे ! आजवर केवळ फॅण्टसीच्या रूपात असलेल्या या संकल्पनेला आता मूर्त रूप येऊ घातले असून, अनेक प्रयोगांनंतर या नव्या वाहतूक - प्रकाराच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरल्या प्रत्यक्ष चाचण्या सुरू झाल्या आहेत.एकूण घडामोडींचा अंदाज घेता पहिली व्यावसायिक आणि प्रत्यक्ष वापरातली ‘हायपरलूप’ कदाचित भारतातच प्रत्यक्षात येईल, अशी चिन्हे आहेत. कदाचित याची पहिली सुरुवात भारतातही होऊ शकणार आहे़. 

हवेचा दाब नसलेल्या एका (जवळपास) निर्वात गोलाकार पोकळीतून सुसाट वेगात कॅप्सूल घेऊन जाण्याची ही कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी गेल्या पाच-सहा वर्षांपासून शेकडो इंजिनिअर, शास्त्रज्ञ झपाट्याने काम करत आहेत़ हायपरलूप कॅप्सूलच्या अनेक प्रकारच्या डिझाइनवर सध्या काम सुरू आहे़.  ही कॅप्सूल म्हणजे एक प्रकारची कारच असेल. समोरचा भाग निमूळता (बुलेट ट्रेनसारखा) ठेवण्याबाबत आता जवळपास एकवाक्यता झालेली आहे़ पोकळीत पुढे थोड्याफार प्रमाणात असलेल्या हवेचा वेगावर परिणाम होऊ नये आणि ती हवा झटक्यात मागच्या बाजूला जावी यासाठी पुढचा भाग निमूळता ठेवला जात आहे़

इलॉन मस्क यांनी मांडलेल्या व्हाइटपेपरमध्ये हायपरलूपमधली ही कॅप्सूल कशी असावी, यासंबंधीची काही आरेखने मांडली होती. पुणे-मुंबई हायपरलूप वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी करार केलेल्या व्हर्जिन हायपरलूप या कंपनीनेही आपली काही डिझाइन्स तयार केली आहेत़ त्यानुसार कॅप्सूलच्या पुढील भागात बॅटरीज् असतील़ मधल्या भागात जवळपास ३० लोकांना बसता येईल एवढी बैठक व्यवस्था असेल़ मागच्या भागात एक्झॉस्ट फॅन आणि इतर तंत्रज्ञान असेल़ या कॅप्सूलचे दरवाजे वर उचलले जातील.

एलॉन मस्कच्या व्हाइट पेपरनुसार प्रवाशांची बसण्याची व्यवस्था असलेले ठिकाण आणि प्रवाशांचे सामान ठेवण्याचे ठिकाण वेगवेगळे असेल आणि दोन्ही विलगही होऊ शकतील़ विमान प्रवासाच्या वेळी आपण आपली बॅग लगेजमध्ये देतो तसेच इथेही आपल्याकडील सामान या लगेज कम्पार्टमेंटमध्ये ठेवण्यासाठी द्यावे लागेल़ त्यामुळे या कॅप्सूलमध्ये प्रवासी चढण्याचा आणि उतरण्याचा वेळ कमी होईल़ ही कॅप्सूल ज्या पाइपलाइनमधून प्रवास करणार, तिथे हवेचा दाब कमीच राहावा यासाठी तशा प्रकारच्या स्टेशन्सची निर्मिती केली जाणार आहे़

मस्कने आपल्या एका मुलाखतीत म्हटले होते, की हायपरलूपसाठी विमानतळांसारखी भलीमोठी व्यवस्था उभी करण्याची गरज लागणार नाही़ मुळातच कमी वेळात प्रवास होणार असल्याने प्रवाशांचा स्टेशनवर थांबण्याचा ‘वेटिंग कालावधी’ही कमी असेल़ एक कॅप्सूल स्टेशनहून निघाल्यानंतर पहिल्या ३ ते ५ सेकंदातच किलोमीटरभर प्रवास करून पुढे गेलेली असेल़ म्हणजे मिनिटभरात ती जवळपास १५ ते २० किमी अंतरावर असेल़ काही मिनिटांमध्ये लगेच दुसरी कॅप्सूल त्याच मार्गावर पाठवली जाणेही शक्य होणार आहे़ मुंबईत काही मिनिटांच्या अंतरावर धावणाºया लोकल असतात तशाच ह्या कॅप्सूलही एकापाठोपाठ एक धावत असतील़ त्यामुळे स्टेशनवर फार मोठी गर्दी खोळंबून राहण्याची शक्यता कमी असेल़ सुरक्षेचे उपाय मात्र विमानासारखेच अतिकडक-चोख असावे लागतील आणि चेक-इन वगैरेही काही प्रमाणात तसेच असण्याची शक्यता आहे़

एलॉन मस्क म्हणतो की, ही संपूर्ण यंत्रणा इको-फ्रेण्डली असेल आणि विमानाच्या वेगाच्या दुप्पट वेगाने प्रवासही होईल़ ऊर्जेचा तथा इंधनाचाही कमी वापर होईल़ आवाज फार होणार नाही आणि वायू प्रदूषणही फार होणार नाही़ पोकळ पाइपलाइनचा जो भाग जमिनीवरून जाईल, त्याच्या पृष्ठभागावर सौरपॅनल लावण्याचाही पर्याय आहे़ त्यातून विजेची मोठ्या प्रमाणात निर्मिती होईल आणि तीच वीज या संपूर्ण यंत्रणेसाठी वापरली जाऊ शकेल, अशी मस्क यांची कल्पना आहे़.  अशा सर्वच गोष्टींवर हायपरलूप वन ही कंपनी गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेतील नेवाडा या राज्यात प्रत्यक्ष टेस्टिंग करत आहे़ त्यासाठी जवळपास ५०० मीटरचा टेस्ट ट्रॅक अर्थात पाइपलाइन उभारण्यात आली आहे़.

जगभरातील प्रस्तावित हायपरलूप मार्गहायपरलूप-वन कंपनीचे प्रकल्प :

  • इस्टोनिया-फिनलंड ९० किमी
  • व्हिएन्ना-बुडापेस्ट २४१ किमी
  • नेदरलँडमध्ये ४२८ किमी
  • कोर्सिका-सर्दिनिया ४५० किमी
  • हेलसिंकी-स्टॉकहोम ४८२ किमी
  • लिव्हरपूल-ग्लासगो ५४५ किमी
  • स्पेन-मोरक्को ६३० किमी
  • लंडन-इडिनबर्ग ६६६ किमी
  • पोलंड ६६७ किमी
  • कार्डिफ-ग्लास्गो १०५७ किमी
  • संपूर्ण जर्मनी १९९० किमी

हायपरलूप ट्रान्स्पोर्ट टेक्नॉलॉजीया कंपनीचे प्रस्तावित हायपरलूप मार्गब्रनो-ब्रतिस्लावा १२८ किमीअबुधाबी-अल अईन १७२ किमी

तासाला १००० किलोमीटर१. कोणत्याही वाहनाला वेग घेताना वातावरणातील हवेच्या दाबाचा सामना करावा लागतो़ म्हणजे एखादी कार जर १०० किमी प्रतितास या वेगाने पुढे जात असेल तर तेवढ्याच हवेच्या दाबातून मार्ग काढावा लागतो़२. विमानाचेही तसेच़ म्हणूनच जमिनीवर असतानाच्या अवस्थेतून टेकआॅफ घेण्यासाठी विमानाला लागणारी प्रचंड शक्ती, त्याकरता खर्च होणारे इंधन आणि त्यानंतर हवेत उडताना लागणारे इंधन आणि गाठता येणारा वेग यात फरक असतो़३. विमान ३०-३५ हजार फुटांवरून उडताना हवेचा दाब कमी असतो आणि त्यामुळे प्रतितास वेग १००० किमीपर्यंत जाऊ शकतो़४. हायपरलूप तंत्रज्ञान हे याच्या पुढचा भाग आहे़ हायपरलूप ट्रेन किंवा हायपरलूप कॅप्सूल म्हणजेच या ट्रेनची बोगी ज्या पाइपलाइनमधून जाणार, त्या पोकळीत हवेचा दाब अत्यंत कमी असेल़ पृथ्वीपासून दीड लाख फुटांवर जसे वातावरण असेल आणि जितका हवेचा दाब कमी असेल तसे वातावरण या पाइपमध्ये असेल़५. कमीत कमी इंधन-खर्चात जास्तीत जास्त वेग गाठण्याची जादू साधण्यामागचे कारणही हेच आहे !६. हवेच्या दाबाचा सामना करावा न लागता हायपरलूप कॅप्सूल पाइपमधून झपाट्याने जवळपास १००० किलोमीटर प्रतितास एवढ्या वेगात प्रवास करू शकते, ती याचमुळे.

विसाव्या शतकात रेल्वेमार्ग उभारले गेल्याने भारताच्या आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक चित्रात जे बदल जेवढ्या झपाट्याने झाले, तीच जादू एकविसाव्या शतकात ‘हायपरलूप’मुळे या देशात घडेल, असे मला वाटते.मुंबई-पुणे मार्गावरल्या प्रस्तावित हायपरलूपमुळे जवळपास दोन कोटी ६० लाख लोक परस्परांशी जोडले जातील आणि पहिल्या तीस वर्षात सुमारे ८६,००० टन हरितगृह वायूंचे उत्सर्जन रोखणे शक्य होईल.- रिचर्ड ब्रॅन्सन,चेअरमन, ‘व्हर्जिन हायपरलूप वन’

हायपरलूप म्हणजे नेमके काय?1.हायपरलूप म्हणजे साधारणत: तीन मीटर व्यासाच्या गोलाकार आणि हवेचा अतिशय कमी दाब असलेल्या (जवळपास निर्वात) पाइपमधून चुंबकीय शक्तीची ऊर्जा वापरून एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी पोहोचवणारी वाहतूक व्यवस्था.2.ज्याप्रमाणे रेल्वचे रूळ असतात आणि त्यावरून रेल्वे धावते तशाच प्रकारे या हायपरलूपची ‘कॅप्सूल’ हवेचा दाब नसलेल्या मोठ्या पाइपलाइनमधून (पाण्याच्या मोठ्या पाइपलाइनसारख्या) एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी सरकत जाते.3. बर्फावर स्कीइंग करावे तशी ही कॅप्सूल कमी वेग असताना पाइपमध्ये अंथरलेल्या पट्ट्यांवर सरपटत पुढे धावते.4.मागच्या बाजूने प्रेशर वाढवले गेले की वेग वाढत जातो आणि पुढे चुंबकीय शक्तीच्या जोरावर ही कॅप्सूल पट्ट्यांपासून वर उचलली जाते. वायू वेगाने पुढे सरकताना खाली अंंथरलेल्या पट्ट्यांच्या थोडी वर तरंगत १ हजार किलोमीटर प्रतितास एवढा वेग घेऊ शकते.

आपल्या देशात अजूनही हायस्पीड रेल्वे आणि बुलेट ट्रेनची चर्चा आहे़ या दोन्ही व्यवस्था निर्माण करण्यासाठी झपाट्याने पावले उचलली जात आहेत़ पण, मस्कच्या म्हणण्यानुसार वेगवान वाहतुकीसाठीचे हे दोन्ही आधुनिक पर्याय अधिक खर्चिक आणि अधिक ‘स्लो’ आहेत.- आता प्रश्न उरतो की हे सर्व तंत्रज्ञान उभे करण्यासाठी येणारा खर्च किती असेल?अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को ते लॉस एंजेलीस या ३८० किमीच्या मार्गावर हायपरलूप उभारण्यासाठीच्या खर्चाचे गणित एलॉन मस्क याने काही वर्षांपूर्वी मांडून ठेवलेले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार यासाठी ६ अब्ज डॉलर एवढा खर्च येईल़ याची तुलना याच मार्गावरील हायस्पीड रेल लिंकशी केली तर हा खर्च रेल लिंकपेक्षा दहा पटीने कमी आहे़ कारण यातील तंत्रज्ञानाने खर्चाचे ओझे कमी झाले आहे़ शिवाय या वाहतूक मार्गाला जमीन कमी प्रमाणात लागते़ वाहतुकीसाठी ऊर्जाही कमी लागते. पण हायपरलूप वन या कंपनीच्या अंदाजानुसार १७० किमीच्या मार्गासाठी जवळपास १३ अब्ज डॉलर एवढा खर्च येतो़ मस्क यांच्या अंदाजापेक्षा हायपरलूप वनचा खर्चाचा अंदाज जवळपास चौपट असला तरी तो हायस्पीड रेल्वेला येणाºया खर्चापेक्षा बराच कमी आहे़ हायपरलूपसाठी उभारली जाणारी पाइपलाइन काही ठिकाणी जमिनीच्या वर असेल आणि काही ठिकाणी जमिनीच्या खालूनही असेल़ ही व्यवस्था निर्माण करण्यासाठी जमिनीचे अल्प प्रमाणात अधिग्रहण करावे लागेल. दुपदरी रस्त्याला लागणाºया जमिनीपेक्षाही कमी जमीन या पाइपलाइनसाठी लागेल़ काही ठिकाणी या पाइपलाइनसाठी पूलही बांधावा लागतील; पण शेतातून जाणाºया हाय व्होल्टेजच्या इलेक्ट्रिक लाइनचे पोल ज्या प्रकारे उभारले जातात तसेच कमी जागेत हे पोल उभे राहू शकतात़ त्या पोलच्या आजू-बाजूला शेतीही होऊ शकते़ म्हणूनच कोणत्याही प्रकल्पाच्या आड येणारी जमीन अधिग्रहणाची पहिली अडचण कदाचित या प्रकल्पात येणार नाही़ भारतात पुणे-मुंबई या हायपरलूप मार्गासाठी व्हर्जिन कंपनीने ४० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार केला आहे़ मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी घाट चढावा लागतो़ ही एक अडचण हायपरलूपसमोर असू शकते़ समुद्रसपाटीपासून ५०० फुटांपेक्षा अधिक उंचीवर असणाºया पुण्यात जाण्यासाठी डोंगररांगांचा सामना हायपरलूपला करावा लागणार आहे़ अडचणीचा हा डोंगर कसा पार करायचा यासाठी पुढील सहा महिने अभ्यास केला जाणार आहे़ हा मार्ग शक्य आहे का, याबाबत नोव्हेंबर महिन्यापासून अभ्यास सुरू होता़ त्यात या शक्यतेबद्दल आशादायी चित्र दिसल्याने हायपरलूप वन ही कंपनी हा मार्ग निर्माण करण्यास तयार झाली आहे़ मुख्यमंत्री कार्यालयात पायाभूत सुविधा प्रकल्पांची जबाबदारी सांभाळणारे ओएसडी कौस्तुभ धवसे यांनी पुढाकार घेतला. आता पुढील सहा महिने या मार्गाच्या प्रत्यक्ष व्यावहारिकतेचा अभ्यास केला जाणार आहे़ सुरुवातीचे काही दिवस पुण्यात हिंजेवाडी येथे ट्रायल ट्रॅकही टाकला जाणार आहे तोच ट्रॅक म्हणजेच ‘पाइपलाइन’ पुढे प्रत्यक्ष मार्ग सुरू होईल त्याचाच भाग असणार आहे़ येत्या तीन वर्षांत कदाचित मुंबई-पुणेदरम्यात अशी पाइपलाइन उभी राहिलेली दिसेल... हेच हायपरलूपचे भारतातले पहिले पाऊल असेल आणि त्यानंतर हाच मार्ग पुणेकर आणि मुंबईकरांसाठी आयुष्यातील दररोजचे अमूल्य तास वाचवण्यासाठी कामास येऊ शकेल.नजीकच्या भविष्यात हे शक्य होईल अशी सध्या तरी आशा आहे़ ते जर यशस्वी झाले, तर पुढे हाच मार्ग कोल्हापूरमार्गे चेन्नईला जोडला जाणार आहे़ म्हणजेच मुंबई-पुणे १५ ते २१ मिनिटांत आणि मुंबई ते चेन्नई हा प्रवास तासाभरात होईल, अशी अपेक्षा आहे़

प्रवास कसा असेल?1 एखाद्या वेगवान लिफ्टमधून अगर विमानातून प्रवास करावा, तसा अनुभव प्रवाशांना येईल.2 प्रारंभी वेग घेताना आणि प्रवास संपताना वेग कमी करून थांबताना विमानाच्या टेक-आॅफ आणि लॅण्डिंगवेळच्या ‘हिसक्यां’सदृश्य अनुभव येईल.3 प्रवासी वाहतुकीसाठीची हायपरलूप प्रतितास १०८० इतका उच्चतम वेग गाठू शकेल.4 सौरऊर्जा अगर पवनऊर्जेचा वापर करता येईल. अशाप्रसंगी पूर्णत: ‘कार्बन फ्री’ असेल.5 इतर हायस्पीड पर्यायांच्या तुलनेत या तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक कमी लागेल, निर्मिती आणि परिचालना’चा खर्चही कमी असेल. शिवाय यातून निर्माण करता येणारी सौर आणि पवनऊर्जा ही कदाचित इंधनाची गरज भागवून शिल्लक राहील.6 प्रवाशांच्या खिशाला ही वाहतूक परवडेल का, याचे कोणतेही गणित अद्याप समोर आले नसले, तरी हा प्रवासखर्च विमान प्रवासाच्या तुलनेत कमीच असण्याचे संकेत आहेत.

शंका-कुशंकाहायपरलूप तंत्रज्ञानाबद्दल जगभरात सुरू असलेल्या चर्चेत या तंत्रज्ञानाच्या व्यवहार्यतेपासून सुरक्षेपर्यंतचे अनेक प्रश्न तज्ज्ञ मंडळी उपस्थित करीत आहेत. कॉर्नेल विद्यापीठातील संशोधक डॉ. फील लॉसन यांनी उपस्थित केलेले मुद्दे असे :1 आणीबाणीच्या प्रसंगी, अपघात झाल्यास हायपरलूपच्या ट्यूबचे बाहेरील आवरण फाटून, त्याला भेगा पडल्यास ध्वनीच्या वेगाने आत शिरलेला हवेचा प्रचंड दाब प्रवाशांच्या तत्काळ मृत्यूस कारणीभूत होईल. निर्वात पोकळीतील अपघाताच्या शक्यता आण्विक शस्त्राएवढ्याच स्फोटक ठरू शकतात.2 हायपरलूप मार्गावर पसरलेल्या लांबचलांब पाइपमधून हवा बाहेर काढून टाकणे हे अशक्यप्राय काम असेल. त्याखेरीज या ट्यूबमधून अचाट वेगाने सरकणाºया कॅप्सूल्समुळे तयार होणारे घर्षणही या ट्यूबला सोसावे लागेल, हे तांत्रिकदृष्ट्या कसोटी पाहणारे असेल.3 तापमानातील तीव्र बदलांमुळे रेल्वेचे रूळही आकुंचन पावतात, कधी कधी त्यांना तडाही जातो़ हायपरलूप तंत्रज्ञानाला हा धोका मोठा असेल. वातावरणातले बदल सहन करणारे ‘जोड’ (जॉइंट्स) निर्वात पोकळीसाठी तयार करणे अशक्यप्राय आहे.4 वेगवान वाहतुकीसाठीचा हा पर्याय दहशतवाद्यांसाठी नवे आमंत्रणठरू शकेल. हायपरलूपच्या बाहेरील आवरणावर एका ठिकाणीहल्ला झाल्यास परिणामस्वरूप आख्खी व्यवस्थाच तत्काळ उद्ध्वस्तहोऊ शकेल.5 या प्रकल्पांच्या उभारणीचा प्रत्यक्ष खर्च आत्ताच्या अंदाजांपेक्षा कित्येक पट जास्त असू शकेल. त्यामुळे त्यांची व्यवहार्यता शंकास्पद आहे.

स्वप्नवत... पण अशक्य नाही! - मुख्यमंत्रीवर्षानुवर्षां त्याचअवस्थेत वापरात असलेल्या रेल्वेगाड्या, अनेक वर्षांनंतर आलेल्या मेट्रो, मोनोमुळे आलेला नवा लूक इथपर्यंतच रेल्वे प्रवासाची आपली कल्पना मर्यादित असली तरी ती यापुढच्या काळात पार बदलून टाकणारी हायपरलूप सेवा आता आपल्याकडे येऊ घातली आहे.राज्याच्या सांस्कृतिक राजधानीतून राज्याच्या राजधानीदरम्यानचे १५० किलोमीटरचे अंतर केवळ २१ मिनिटात पार करणार असलेली ही हायपरलूप म्हणजे वेगाचा चमत्कार असेल. तिचा वापर करणारे महाराष्ट्र हे जगातील पहिले राज्य असेल. तिच्या राज्यातील आगमनाची चाहूल लागली ती आठ महिन्यांपूर्वी. व्हर्जिन हायपरलूप वन कंपनीकडून मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला आणि व्यवहार्यता तपासण्याचे प्रयत्न, अभ्यास सुरू झाला. पुणे मेट्रो रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीचे आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गिते, त्यांचे सहकारी आणि व्हर्जिन हायपरलूप कंपनीने एकत्रितपणे या प्रकल्पाचा पूर्व व्यवहार्यता अहवाल तयार केला. त्यात या प्रकल्पासाठी अत्यंत अनुकूल अशी परिस्थिती असल्याचा निष्कर्ष समोर आला. आर्थिकदृष्ट्या तो व्यवहार्य ठरेल आणि सर्व बाजूंनी विचार करता हायपरलूपसाठी हा देशातील सर्वात आदर्श असा मार्ग असेल या निष्कर्षामुळे सर्वांचाच उत्साह वाढला. हायपरलूपच्या उभारणीला मेट्रो रेल्वेच्या उभारणीपेक्षा कमी खर्च येतो. मेट्रोसाठी साधारणत: ३०० कोटी रुपये प्रति किलोमीटर आणि भूमिगत मेट्रोसाठी ९०० कोटी रुपये प्रति किलोमीटर इतका खर्च येतो. हायपरलूपसाठी हा खर्च २१० कोटी रुपये इतका असेल. कंपनीचे संस्थापक रिचर्ड बॅन्सन, संचालक सुलतान सुलेमान आणि झिया हे तिघेही मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या निमित्ताने मुंबईत आले होते. हायपरलूपचे उत्पादन आणि त्यासाठीची पूरक उत्पादनेही भारतात सुरू करण्याचा त्यांचा इरादा आहे. हा प्रकल्प मार्गी लागला तर महाराष्ट्राने जगाला हायपरलूप हा सर्वात वेगवान वाहतूक पर्याय दिला अशी ऐतिहासिक नोंद होईल.प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १० किलोमीटर लांबीची मार्गिका तयार केली जाणार असून ती पुणे शहरात असेल. पुणे-मुंबई हायपरलूपचाच तो एक भाग राहील.पुणे-मुंबई हे अंतर केवळ २१ मिनिटात कापणारी हायपरलूप सद्यस्थितीत स्वप्नवत वाटत असली तरी अशक्य मुळीच नाही. हा प्रकल्प हे महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीचे एक प्रतीकच असेल.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

 

उद्याच्या आधी ‘आजचा’ विचार करा !हायपरलूप हे स्वप्नवत तंत्रज्ञान आहे; मात्र अजून त्याचा कोणत्याच देशाने प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नाही. आधी हे तंत्रज्ञान अन्यत्र उभं राहू द्यावं आणि त्या अनुभवानंतर भारताने त्यात गुंतवणुकीचा विचार करावा. कारण प्रायोगिक अवस्थेतल्या तंत्रज्ञानासाठी मोठी गुंतवणूक आत्ता भारताला परवडणारी नाही. ज्या मार्गावर आपण बुलेट ट्रेन निर्माण करण्याची तयारी चालवली आहे तो मार्ग पुणे-मुंबई मार्गापेक्षा सपाट आणि सरळही आहे. त्यामुळे पुणे-मुंबई या घाटाच्या-पर्वतांच्या मार्गापेक्षा मुंबई-अहमदाबाद अशा सपाट मार्गावर हायपरलूप वापरून बघण्यास हरकत नाही. पण हे करतानाच सध्याच्या वाहतूक कोंडीच्या समस्या, सध्याचे अपघातांचे प्रमाण आणि मोठ्या शहरांतील पार्किंगच्या समस्या सोडवण्यावर मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज आहे.- अशोक दातार, वाहतूकतज्ज्ञ

अर्थात या शंका आणि प्रश्नांना उत्तरे देणारे तज्ज्ञही आहेत. या क्षेत्रातली दुसरी कंपनी ‘हायपरलूप ट्रान्सपोर्टेशन टेक्नॉलॉजी’च्या बर्क अहलबर्न यांच्या म्हणण्यानुसार, हायपरलूपच्या पाइपलाइनला तीन अतिकठीण स्तर असतील़ सर्वांत वरच्या स्तराला धोका झाला तरी आतील दोन स्तर सुरक्षेसाठी पुरेसे असतील.दहशतवादाचा धोका मात्र कायम असणारच आहे आणि तो कोणत्याही वाहतुकीला आहेच.काही प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत़ कारण आतापर्यंत झालेल्या चाचण्या कमी लांबीच्या पाइपलाइनमध्ये घेण्यात आल्या आहेत. अर्थात प्रश्न आणि शंका आहेत म्हणून हे तंत्रज्ञान कमी महत्त्वाचे ठरत नाही, कारण समस्यांच्या सोडवणुकीतूनच तंत्रज्ञान उन्नत होत असते, असे हायपरलूपचे समर्थक म्हणतात.

(लेखक ‘लोकमत’मध्ये मुख्य उपसंपादक आहेत.)

टॅग्स :Hyperloopहायपर लूप