रोहित नाईक
भारतात खेळ म्हणजे क्रिकेट... अशी टीका नेहमीच ऐकायला मिळते. बऱ्याच अंशी ते खरेही आहे, मात्र याच क्रिकेटच्या आकर्षक व सर्वात लोकप्रिय ‘इंडियन प्रीमियर लीग’ स्पर्धेने भारतातील इतर खेळांना वलय निर्माण करून दिले हेदेखील नाकारता येणार नाही. आयपीएलच्या भव्यदिव्य यशाकडे पाहून अनेक खेळांनी आपल्या लीग स्पर्धेला सुरुवात केली. सुरुवातीचे एक वर्ष सोडल्यास त्यानंतर प्रत्येक खेळाच्या लीग लोकप्रियतेच्या बाबतीत मार खाऊ लागल्या. यास अपवाद एका खेळाचा आणि तो खेळ म्हणजे कबड्डी...
कबड्डीला किती वलय निर्माण झाले आहे आणि कबड्डीचे भवितव्य चहूअंगांनी कसे विस्तारते आहे याचा नजराणा कालच संपलेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेतही पाहायला मिळाला.
रांगड्या कबड्डीला लोकप्रिय करणाऱ्या कबड्डी लीगचा यातला वाटा बराच मोठा आहे. आज हीच लीग आयपीएलची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी लीग म्हणून ओळखली जाते. प्रो कबड्डी लीगने या खेळाच्या सर्व परिसीमाच बदलून टाकल्या. पूर्वी सामान्य वर्गापर्यंत मर्यादित असलेल्या या खेळाने आज उच्चभ्रू लोकांनाही आपल्याकडे आकर्षित केले. इतकंच कशाला, रात्री ८ वाजता रिमोटवर कब्जा घेऊन घराघरात चालणारे ‘महिलाराज’देखील आपल्या सिरियल्स सोडून कबड्डी सामने पाहू लागल्या. याहून मोठे यश काय असेल कबड्डीचे!
महाराष्ट्राच्या मातीतला हा खेळ तसा रांगडाच. यातील आक्रमकता, ताकद याकडे पाहून हा खेळ म्हणजे ‘भाईगिरी’ करणाऱ्यांचाच असा एक समज होता. मात्र, आज कबड्डीपटूंकडे सन्मानाने पाहिले जाते. कबड्डी खेळणे आज प्रतिष्ठेचे बनले आहे. सहजासहजी आपल्या मुलांना कबड्डीसाठी न पाठवणारे पालक आज स्वत:हून मुलांना प्रोत्साहित करताना दिसत आहे. हे सर्व शक्य झाले ते लीग आणि त्यातील व्यावसायिकता तसेच लाभलेले प्रचंड ग्लॅमर यामुळे.
सर्वात मोठा बदल म्हणजे ‘करिअर’ म्हणून आज युवावर्गाकडून कबड्डीचा विचार अधिक होत आहे. इतर खेळांच्या तुलनेत सर्वात स्वस्त असलेल्या या खेळामध्ये यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत घेण्याची तयारीदेखील तितकीच महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच्या मातीतला खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाच्या राष्ट्रीय संघात उत्तर भारतीयांचे वर्चस्व या खेळातील तीव्र स्पर्धा दर्शवते.
खेळाडूंच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास, आज कबड्डीपटूंना क्रिकेटपटूंसारखेच ग्लॅमर मिळू लागले आहे. याआधी रेल्वे, एसटी यातून प्रवास करणारे आपले खेळाडू आज विमानातून दौऱ्यावर जातात. कबड्डीच्या अनेक बैठका पंचतारांकीत हॉटेलमध्ये घेतल्या जातात. इतकंच काय, तर लीगदरम्यान होणाऱ्या लिलावातून खेळाडू एका दिवसात लखपती होत आहेत. दखल घेण्याची बाब म्हणजे ही केवळ सुरुवात आहे. आता तर कबड्डीची घोडदौड सुरू झाली आहे.
सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतूनच कबड्डीची क्रेझ दिसून येत आहे. याआधी केवळ स्थानिक वर्तमानपत्र, मध्यमवर्गीय प्रेक्षक यापुरत्या मर्यादित असलेल्या कबड्डी खेळाला इंग्रजी माध्यमांमध्ये मानाची जागा मिळत आहेच, शिवाय सुटाबुटातले प्रेक्षकही कबड्डीच्या मैदानाकडे उत्साहाने येताना दिसत आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे असलेले वर्चस्व सध्या जरी एकहाती असले, तरी इराण, कोरिया, थायलंड, बांगलादेश, केनिया यांसारखे गुणवान संघ हळूहळू यामध्ये पारंगत होत आहेत. आज भारताकडून सर्वच संघ सपाटून मार खात असले तरी एक दिवस याच संघांकडून भारताला वचकून रहावे लागेल हे निश्चित.
भारतदेखील आपले वर्चस्व सहजासहजी गमावणार नाही. मात्र, गाफील राहिल्यास काय होऊ शकते याचा एक छोटा टे्रलर भारतीयांनी यंदाच्याच विश्वचषकात सलामीला कोरियाविरुद्ध पाहिला आहे. त्यामुळेच सध्या जगभरात ३०हून अधिक देशांमध्ये खेळला जाणारा कबड्डी भविष्यात आॅलिम्पिकची रेषाही पार करेल यात काहीच शंका नाही.
विश्वचषकातील कबड्डीची जादू
कालच संपलेल्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत या खेळाची जादू दिसून आली. कबड्डीला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे आंतरराष्ट्रीय कबड्डी संघटनेने दर दोन वर्षांनी विश्वचषक स्पर्धा घेण्याचे ठरविले आहे. यंदा आॅस्टे्रलिया, अर्जेंटिना, अमेरिका, इंग्लंड, पोलंड यांसारख्या देशांमध्ये कबड्डी शिबिराचे आयोजन करून त्यांना पुढील दोन वर्षांमध्ये पूर्णपणे तयार करण्याचे टार्गेटही ठेवले आहे. मुळात अशा देशांमध्ये कबड्डी प्रसारासाठी भारतातूनच प्रशिक्षक व संघटक विदेश दौऱ्यावर जात होते. आता आंतरराष्ट्रीय संघटनेने भारताच्या मदतीने त्या त्या देशांतच प्रशिक्षक घडविण्याचे लक्ष्य बाळगले आहे. यामुळे कबड्डीच्या प्रगतीचा वेग आणखीच वाढेल आणि जागतिक क्रीडा नकाशावर कबड्डीच्या यशाची सीमारेषा आणखी पुढे जाईल...
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत सहाय्यक उपसंपादक आहेत.)