- मनीषा म्हात्रे मुंबईतील कामाठीपुरा हा ‘रेडलाईट एरिया’ म्हणून ओळखला जातो. रस्त्याच्या दुतर्फा रंगीबेरंगी कपड्यांत नटूनथटून ग्राहकांना इशाऱ्याने स्वतःकडे ओढणाऱ्या ‘सेक्स वर्कर’ महिला नजरेसमोर येतात. गेल्या काही वर्षांत येथील सेक्स वर्कर महिलांचे प्रमाण कमी झाले असले तरी आजही काही गल्ल्यांमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी सेक्स वर्कर महिलांची लगबग दिसून येते. मोडक्यातोडक्या इमारतींच्या खुराड्यांमध्ये सौदा होतो. या सौद्यात भावनांना थारा नाही. दक्षिण मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या कामाठीपुरात राज्य शासनाने समूह पुनर्विकास प्रकल्पांतर्गत (क्लस्टर डेव्हलपमेंट) म्हाडा प्रशासनास नोडल एजन्सी म्हणून नेमून येथील ८०० हून अधिक जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईतून हद्दपार होण्याची वेळ येणार असल्याने ‘हमारी गलियां सूनी हो जाएगी,’ असे येथील सेक्स वर्करचे म्हणणे आहे.
कामाठीपुरातील गल्ली नंबर १४ मध्ये राहणाऱ्या ५८ वर्षीय रेश्मा सांगतात (नावात बदल), माझे संपूर्ण आयुष्य येथे सेक्स वर्कर म्हणून काम करण्यात गेले. मी तरुण असताना मला अनेक हॉटेल्समध्ये पाठविले जात होते. सध्या माझे कुटुंब आहे. याच धंद्यावर माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. अशावेळी येथून जायचे कुठे? येथील घरे खुराड्यासारखी असली तरी आमच्यासाठी हक्काची वर्क प्लेस आहे. ट्रान्सजेंडर म्हणून जन्म झाला म्हणून घरच्यांनी नाकारले. बलात्कार आणि अत्याचाराच्या धमक्यांनंतर इथे जागा मिळाली. येथील कोठीने सामावून घेतले. हे काम आवडत नाही; पण मनाला समजवावे लागले. पण, आता मी इथे सुरक्षित आहे.
असे पडले कामाठीपुरा नाव...बांधकामाच्या ठिकाणचे कामगार म्हणजेच कामठी. या नावावरून या भागाला ‘कामाठीपुरा’ नाव पडले. पोलिस कारवाई तसेच एड्स जनजागृती व सरकारच्या पुनर्विकास धोरणामुळे सेक्स वर्कर्सना या व्यवसायातून बाहेर पडण्यास मदत झाली.१९९२ मध्ये महानगर पालिकेने येथे ४५ हजार सेक्स वर्कर्स असल्याची नोंद केली होती.
२००९ मध्ये १,६०० आणि २०१८ मध्ये ५०० इतकी संख्या कमी झाली होती. सध्या दोन हजारांच्या आसपास सेक्स वर्कर येथे आहेत.
८०० इमारती, १६ गल्ल्यायेथे ८० ते १०० वर्षांपूर्वीच्या ८०० हून अधिक इमारती व १६ गल्ल्या आहे. ८ ते ९ हजार नागरिक येथील चिंचोळ्या आणि कोंदट वातावरणात राहतात. सर्वांना पुनर्विकास हवा आहे. माझी पाचवी पिढी येथे राहते. आम्ही केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे पुनर्विकासाचे वारे येथे वाहू लागले आहेत. म्हाडा नोडल एजन्सी म्हणून या इमारतींचा पुनर्विकास करणार आहे. लवकरच बैठक होऊन कामाला गती येईल.- सुनील कदम, कार्याध्यक्ष, कामाठीपुरा पुनर्विकास समिती
असे उभे राहिले कामाठीपुरा...कामाठीपुरा पुनर्विकास समितीचे कार्याध्यक्ष सुनील कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटिश काळात मुंबईतील प्रमुख बांधकामांसाठी आंध्र प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात कामगार आले. त्यांना राहण्यासाठी छोटीछोटी घरे उभी करत येथे वसाहत उभी राहिली. यात ब्रिटिशांनी समुद्रमार्गे येणाऱ्या खलाशांसाठी मनोरंजनासाठी व्यवस्था केली होती. अँग्लो इंडियन सेक्स वर्कर खलाशांच्या मनोरंजनासाठी येत होत्या. पुढे ब्रिटिश भारतातून गेल्यानंतर अँग्लो इंडियन सेक्स वर्करची जागा कन्नड देवदासी महिलांनी घेतली. पुढे नेपाळी, बांगलादेशी महिलांसह बंगाली व उत्तर प्रदेशातून सेक्स वर्कर येथे आल्या. मात्र, आता त्यांचीही संख्या कमी आहे. गल्ली क्रमांक ११, १२, १३ आणि १४ मध्ये देहविक्री व्यवसाय सुरू असताना संपूर्ण कामाठीपुऱ्याकडे बघण्याची नजर नकारात्मक झाली.