समाजातील विकृत जीव अनेकांच्या चारित्र्यावर, शीलावर घाला घालतात. त्याचे परिणाम मनावर आघात करून जातात. हे मनावरचं मळभ दूर करण्यासाठी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ‘मी टू’ मोहीम सफल व्हावी. गैरफायदा घेणाऱ्यांना जागीच रोखलं जावं. हे कितपत सफल होईल सांगता येत नाही.देशभरात ‘मी टू’ या मोहिमेचा जोर वाढत असताना या मोहिमेअंतर्गत कोणी ना कोणी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहे. ही यादी दिवसेंदिवस वाढत चालली असून मोठ-मोठी नावे समोर येत आहेत. त्याची सत्यता पडताळणे ही एक न्यायदेवतेला आव्हानात्मक बाब आहे. त्यांची शहानिशा होईल तेव्हा होईल. पण, मी एका ग्रामीण भागात वाढलेली. त्यामुळे सेलिब्रिटी किंवा नामवंतांपेक्षा ग्रामीण भागातील जनसामान्यांच्या अन्यायाला वाचा फुटेल का? हा मला पडलेला प्रश्न आहे.याच कारणही तसेच आहे. तीस वर्षांपूर्वीच माझं बालपण एका खेडेगावात गेले. म्हणजे त्यावळी पोलीस स्टेशन, पत्रकार अशी एखादी संघटना होती. सोशल मीडिया या खूप दूरच्या गोष्टी होत्या. गावच्या पंचांनीच न्यायनिवाडा करून गावातच त्या वादाचा सोक्षमोक्ष लावायचा. गाव प्रमुखांकडे या तक्रारी पहिल्यांदा जायच्या. गावचे सरपंच, पोलीस पाटील व अन्य पंच मंडळी ही सर्व कामे पहायची. मी पाच, सहा वर्षे वयाची असताना अशा तक्रारी आलेल्या मी पाहिल्या होत्या. पण त्यावेळी हे समजत नसायचे. वाढत्या वयाबरोबरच हे सर्व समजत गेलं. या गोष्टी ऐकून मनात भीतीनं घर केलं ते वेगळंच. सासºयाने सुनेचा छळ केला किंवा नवºयाचा भाऊ (दीर) आपल्याला छळत आहे. शेतमजूर महिलांसोबत शेतमालकाने असभ्य वर्तन केल्याची तक्रार, अशा अनेक तक्रारी मी त्यावेळी ऐकल्या आहेत. जुन्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. त्याचे फायदे तर खूप, पण अशा घटना घडलेले एखादं कुटुंब अपवादात्मक सापडायचं. मात्र त्या पीडितांना समाधानकारक न्याय मिळत नसायचा. आपला बाप किंवा भाऊ असे वागूच शकत नाही, हे त्या धिटाईने पुढे आलेल्या पीडितेचा पतीच सांगायचा. कारण तिने केलेल्या तक्रारी खोट्या आहेत हे तोच पटवून द्यायचा. त्यामुळे न्यायाला काही आधारच राहत नसे. तिची मात्र कुणीच साथ न दिल्याने तिची कुचंबना व्हायची. आई-वडिलांच्या नावासाठी आणि सासरची अब्रू सांभाळण्यासाठी तिला तो त्रास सहन करून सासरीच रहावं लागायचं.गावात एक इसम असा होता की, तो लहान मुलींना पकडून ठेवायचा. त्यांच्या मागे धावायचं, एव्हढेच नाही तर उन्हाळ्याच्या दिवसात अंगणात ओट्यावर-ओसरीवर आपल्या कुटुंबासोबत निजलेल्या बायकांंची छेड काढायचा. यामुळे कित्येक वेळा त्याने मार देखील खाल्ला.पण नंतर बायका मात्र भयानं अंगणात झोपत नसायच्या. तो हे कृत्य दारूच्या नशेत करायचा. मला तर वाटायचं हे कृत्य करण्यासाठीच तो नशा करायचा. अशा विकृतीस काय म्हणावं ..? त्या महिला अशिक्षित होत्या, अडाणी होत्या, पावित्र्य काय असतं हे त्यांना समजतंं होतं.एक नवविवाहिता तक्रार घेऊन आली. लग्नानंतर थोड्या दिवसात तिला तिची फसवणूक झाल्याचे समजले. तिचा पती कधीच पिता होऊ शकत नाही. हे त्याच्या आई-वडील व घरातील बहुतेक मंडळींना माहित असताना देखील तिचा विवाह लावून देण्यात आला. असे असताना देखील ती बाई पतीच्या नावाखातर नांदायला तयार झाली. पण घरच्या मंडळींची वेगळीच मागणी होती. त्यांचा वंश चालावा म्हणून त्या बाईनं दुसºया कोण्या पुरुषापासून मूल जन्माला घालावं. त्या नवविवाहितेची काय अवस्था असेल? त्यासाठी तिला सारे कुटुंब छळत होते. बरं त्यावेळी ‘टेस्ट ट्यूब बेबी’ किंवा आजच्यासारखं मेडिकल सायन्सची प्रगती नव्हती. झालीच असेल तर ती खेड्यापर्यंत पोहोचलीच नव्हती. त्या बाईनं काय करायचं? तिनं नवराच सोडला व सरळ माहेर धरलं. अशा धाडसी बायका क्वचितच होत्या.खरं तर आजच्या समस्या देखील खूप भयावह आणि मनाला, विचारांना, भावनेला सुन्न करणाºया आहेत. रोजच आपण भयानक, हिंसक बातम्या ऐकतो, वाचतो, बघतो. नवी जखम भळभळत असताना जुन्या जखमांवरच्या खपल्या काढण्याला अर्थ आहे का? हा एक स्वतंत्र विषय आहे. समाजातील विकृत जीव अनेकांच्या चारित्र्यावर, शीलावर घाला घालतात. त्याचे परिणाम मनावर आघात करून जातात. हे मनावरचं मळभ दूर करण्यासाठी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ‘मी टू’ मोहीम सफल व्हावी. गैरफायदा घेणाºयांना जागीच रोखलं जावं. हे कितपत सफल होईल सांगता येत नाही. पण त्यातून निव्वळ सत्य आणि सत्यच समोर यावं असं वाटतं.वंदना लगड
‘मी टू’ मोहीम सफल व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 3:53 PM