- अनघा दातार
क्यूबानं सुरुवातीपासूनच आपलं वेगळेपण जपलं असलं, पोलादी भिंतींच्या आत स्वत:ला बंदिस्त केलेलं असलं तरी काही बाबतीत हा देश भारताशीही साम्य दाखवतो. भारतासारखाच क्यूबादेखील उष्णकटिबंधीय देश असल्यामुळे जी फळं आपल्याकडे पाहायला मिळतात, तशीच ती तिथेही पाहायला मिळतात. हे बघून मलाही फार आनंद झाला. परक्या देशात आपण आलोय ही भावनाही त्यामुळे लगेच कमी झाली.
आंबा, केळी, अननस, पेरू, पपई, ऊस अशी सारी फळे तिकडे मिळतात. मी जूनमध्ये गेले होते तेव्हा तर आंब्याचा सीझन चालू होता. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मस्त आंब्यांनी लगडलेली झाडे बघायला मिळाली. फ्रेश फळे आणि त्यांचे ज्युस.. त्याची चव काही निराळीच होती. सुपर मार्केटमधल्या बेचव फळांशी त्याची तुलना होऊच शकत नाही. क्यूबात एक फारच वेगळी गोष्ट मला बघायला मिळाली. तिथल्या कॉफीशॉपमध्ये गेल्यावर बऱ्याचवेळा कॉफीबरोबर साखरेऐवजी एक उसाचा तुकडा दिला जायचा. मला हा प्रकार फारच आवडला. अनेक वर्षांनंतर असा ऊस खायला मिळाला आणि भारतातील लहानपणीच्या आठवणीही जाग्या झाल्या.क्यूबात बऱ्याच वेळा घरगुती जेवणाचा आस्वाद घेता आला. क्यूबन लोक रोजच्या जेवणात साधारणपणे बीन्स घातलेला किंवा साधा भात, चिकन अथवा पोर्कचा एखादा पदार्थ आणि उकडलेल्या भाज्या किंवा सलाड खातात. बीफ किंवा फिश, सीफूड फारसे कोणाला परवडत नाही. त्यामुळे एखाद्या सणाच्या किंवा स्पेशल दिवशीच हे पदार्थ तिथे खाल्ले जातात.
रेस्टॉरण्ट्समध्ये अनेकदा केळीचे फ्रेश चिप्स स्टार्टर म्हणून दिले जातात. तिथला माझा एक फेव्हरेट स्टार्टर-टॉस्टोनेस.. हा प्रकार म्हणजे कच्च्या मोठ्या केळीचे कपाच्या आकारात काप केले जातात. ते तळतात आणि मग त्यात मीठ, चीज श्रीम्स असे वेगवेगळे पदार्थ भरून परत एकदा तळतात. अतिशय रुचकर असा हा प्रकार असतो. गोडामध्ये राईस पुडिंग किंवा माझा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे ‘फलान’ मी इथे बऱ्याचवेळा खाल्ले.
१९५९च्या क्यूबन रिव्हॉल्युशननंतर क्यूबाच्या खाद्य संस्कृतीत खूपच बदल झाले. फूड शॉर्टेज ही नित्याची बाब बनली. अजूनही बऱ्याचवेळा बऱ्याच पदार्थांचे शॉर्ट्रेज असते. रस्त्यावर बऱ्याच वेळा खूप लोक अंड्यांचे २-३ डझनांचे क्रेट्स घेऊन जाताना दिसायचे. जेव्हा मी आमच्या गाइडला याबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली, लोकांना उद्या काय मिळेल याची खात्री नसते. त्यामुळे जेव्हा ज्या गोष्टी उपलब्ध आहेत तेव्हा ते घेऊन ठेवण्याची त्यांची सवय आहे. क्यूबामध्ये आता सरकारने प्रायव्हेट रेस्टॉरण्ट्सना परवानगी दिली आहे. त्यामुळे बºयाच लोकांनी अशा प्रायव्हेट रेस्टॉरण्ट्स किंवा कॉफी शॉप्ससाठी लायसेन्स मिळवले आहे. अशा प्रायव्हेट रेस्टॉरण्ट्सना ‘पलादारेस’ असं म्हणतात. इथे फूड खरंच खूप छान मिळतं आणि किंमतपण फार नसते. क्यूबातलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे आपल्यासारखी मोठाली सुपर मार्केट्स नाहीत. जी काही छोटी मार्केट्स आहेत तिथेसुद्धा वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सची व्हरायटी नाही. स्थानिक बाजारातूनच सगळे जर आपल्याला हवं ते खरेदी करतात. आपल्याकडे काही ठिकाणी जसं फेरीवाले वेगवेगळ्या भागात फिरतात, तसं इथे रोज दारावरून पाववाला सकाळ, संध्याकाळ ताजा ब्रेड विकायला घेऊन येतो. कांदा आणि लसणाच्या माळा गळ्यात घालून ते विकणारे लोक रस्त्यावर बऱ्याचवेळा दिसतात. ओल्ड हवानामध्ये मी एक गंमत बघितली आणि मलाही माझं बालपण आठवलं. वरच्या मजल्यावर राहणारी लोकं बाल्कनीतून किंवा खिडकीतून दोरीने एखादी टोपली किंवा पिशवी, पैसे घालून खाली सोडतात. मग पाववाला किंवा इतर पदार्थ विकणारा विक्रेता पैसे घेतो, तो पदार्थ टोपलीत घालतो आणि लोक ती टोपली, पिशवी दोरीने वर ओढतात. हा प्रकार मी माझ्या लहानपणी पुण्यात बºयाचवेळा बघितला होता. परत अनेक वर्षांनी तो सीन लाईव्ह बघताना खरंच गंमत वाटली.
(लेखिका जर्मनीत हायडलबर्ग येथे वास्तव्याला आहेत.)