शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

परदेशात प्रवास करताना..

By aparna.velankar | Published: August 04, 2019 7:58 AM

परदेशात गेल्यावर (काही) भारतीय पर्यटकांचा बेजबाबदार उद्दामपणा आणि बेशिस्त व्यवहार!

-अपर्णा वेलणकर

याद वाशेमजेरुसलेममधलं होलोकॉस्ट म्युझियम.जर्मनीत हिटलरने केलेल्या ज्यू धर्मीयांच्या शिरकाणाच्या ओल्या जखमा सांभाळून ठेवणारं संग्रहालय. अस्वस्थ करणारं. जर्मनीतल्या ज्यू कुटुंबांना वेचून वेचून त्यांना कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये डांबून, गोळ्या घालून, जाळून, विषारी गॅस चेंबर्समध्ये गुदमरून मारल्याच्या इतिहासाचे भयानक अवशेष जतन करणा-या या संग्रहालयात मी सुन्न होऊन उभी आहे. आजूबाजूला असलेले इस्त्रायली नागरिक स्तब्ध आहेत. आपल्या पूर्वजांची अवस्था पाहून कोणी जमिनीला खिळे ठोकल्यासारखा सुन्न उभा. कुणाला हुंदका फुटलेला. अनेकांच्या नजरेत संतापाची ठिणगी.

.तेवढय़ात ‘डेड सी’मध्ये पोहून जेरुसलेमला सहज चक्कर टाकायला आलेला तरुण भारतीय ‘टुरिस्टां’चा एक ग्रुप हेडफोनमधून गाणी ऐकत, गप्पा मारत, समोरच्या फोटोत नाझींकडून नग्न केल्या गेलेल्या ज्यू स्त्रीच्या अवयवांवरून कॉमेन्ट करत तिथून भस्सकन निघून जातो.

माझ्या शेजारी उभा इयाल-माझा इस्त्रायली गाइड. त्याच्याकडे मान वर करून पहायची माझी हिंमत होत नाही. त्याच्या देशाच्या काळजावरची जखम सहज गंमत म्हणून उचकटून गेलेले माझे देशबांधव मला लाज आणतात.त्यांच्या वतीने मी इयालची मनापासून क्षमा मागते, तो नुसती मान हलवतो. आधीचा बडबडा इयाल नंतर दुखावून गप्पगप्पच होतो..पुढे अख्ख्या प्रवासात ती कडू चव जीभेवर येत राहाते.

- गेल्या आठवड्यात बालीच्या रिसॉर्टमध्ये  ‘पकडल्या’ गेलेल्या भारतीय पर्यटक कुटुंबाचा व्हायरल व्हिडीओ चर्चेचा विषय झाला, तो पहाताना पुन्हा एकदा जेरुसलेममध्ये लाज आणणा-या त्या अनुभवाची ठुसठुस जागी झाली.आणि वाटलं, हॉटेलातल्या चादरी, हेअर ड्रायर, फोटो फ्रेम्स, ब्रेकफास्ट टेबलवरची ड्रायफ्रुट्स लंपास करण्याची ‘चिंधीचोरी’ व्हायरल झाली म्हणजे निदान चर्चेचा विषय तरी होते;  पण आपण जिथे प्रवासाला जातो त्या देशातल्या स्थानिक लोकभावनांची कदर न करता खिशात खुळखुळणा-या पैशाच्या जोरावर उद्दामपणाने वागणं हा भारतीय पर्यटकांचा ‘स्वभाव’ बनत चालल्याची टीका सुरू झाली आहे; त्याचं काय?

पर्यटन हा जगातल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना  ‘आधार’ देणारा महत्त्वाचा उद्योग आहे. आजवर डॉलर्स खर्चणारे अमेरिकन्स, रुबल्सचा रुबाब दाखवणारे रशियन्स आणि जपानी पर्यटक हे या उद्योगासाठी ‘देवासमान अतिथी’ होते. नव्या सहस्त्रकाच्या सुरुवातीला  गाळात गेलेले रशियन्स आणि जपान्यांना हटवून चिनी पर्यटक या यादीत घुसले आणि आता भारतीयांचा दबदबा वाढतो आहे.

परदेशी फिरायला जाऊ इछिणा-या भारतीय पर्यटकांचे दरवर्षी 15 ते 18 टक्के गतीने वाढणारे आकडे आणि ते परभूमीवर खर्च करतात त्या एकूण रकमेचा सरासरी आवाका फारच मोठा आहे ( स्वतंत्र चौकट). तरी अजून भारतीय लोकसंख्येच्या जेमतेम 10 टक्के लोकांकडेच पासपोर्ट आहेत. म्हणजे साधारणत: 10 कोटी पासपोर्ट झाले. ही संख्या झपाट्याने वाढते आहे, म्हणजेच संभाव्य पर्यटकांचा आकडाही वाढतो आहे. जगभरातल्या पर्यटन उद्योगाने ‘डिस्पोजेबल इनकम’ वाढलेल्या भारतीय मध्यम-उच्च मध्यमवर्गासाठी पायघड्या अंथरल्यास नवल नव्हे.

..पण त्याबरोबरच परदेशी कपाळावरच्या आठय़ाही वाढीस लागल्या आहेत. आणि त्या आठय़ांमागची कारणं केवळ भारतीय पर्यटक हॉटेलातल्या वस्तू पळवतात एवढय़ापुरतीच मर्यादित नाहीत. एकूणच भारतीय पर्यटकांच्या वागण्यातला बेलगाम उद्दामपणा देशोदेशी खटकू लागला आहे.अर्थात, परदेशी गेल्यावर उद्दामपणे, अजागळपणे, अस्वच्छ-उर्मट वागणं ही काही भारतीयांची मक्तेदारी नव्हे. त्याबाबतीत आघाडीवर आहेत ते वारूळ फुटून मुंग्या बाहेर पडाव्यात तसे जगभर भुळभुळत सुटलेले चिनी पर्यटक. त्यांना ‘द वोर्स्ट  टुरिस्ट’ असा सन्मानच मिळालेला आहे.

विमानातलं टॉयलेट लहान म्हणून विमानातल्या  गॅँग-वेपासून पॅरिसच्या लूव्र म्युझियमबाहेरच्या चौकापर्यंत अक्षरश: कुठेही मुलांना ‘शी’ला बसवणं, चेरी ब्लॉसमचे फोटो काढण्यासाठी थेट झाडांवर चढणं, नेदरलॅण्ड मधल्या ट्यूलिपच्या बागांमधली फुलं ओरबाडून नेणं, रिफ्युएलिंगसाठी थांबलेल्या विमानाचं दार उघडून सिगरेट ओढू द्यावी म्हणून हंगामा करणं, विमानात चढताना वे-ब्रिजवरून विमानाच्या इंजिनाकडे (गुडलक चार्म म्हणून) नाणी फेकणं, ब्रेकफास्ट ‘फ्री’ म्हणून वचावचा खाऊन सगळं अन्न संपवणं, घोळक्याने कलकलाट करणं असे अनेकानेक गुन्हे चिनी पर्यटकांच्या नावावर नोंदलेले आहेत. ही बदनामी इतकी वाढली की अलीकडेच चिनी सरकारने नागरिकांसाठी  ‘परदेशात कसं वागावं’ याबाबत फर्मान काढलं आहे आणि परदेशात लाज आणणा-या देशी पर्यटकांवर प्रवास-बंदी लादणंही सुरू केलं आहे.

भारतीय कुटुंबाने बालीमध्ये जे प्रताप केले, तशा हातचलाख्या तर सगळेच करतात. त्याखेरीजची यादीही काही लहान नाही. एरवी मोठा नखरा मिरवणारे फ्रेंच नागरिक पर्यटक म्हणून अत्यंत गलिच्छ, ओंगळवाणे म्हणून प्रसिद्ध आहेत. ब्रिटिश लोक बाकी  ‘मॅनर्स’मध्ये चोख असतात; पण दारू प्याले की त्यांचं भान सुटतं. दारू पिऊन धिंगाणा घालण्यात ते भारतीयांच्याही पुढे आहेत ! जर्मन पर्यटक तिरसट. सगळ्यात खुस्पटं काढतील. विमानतळावरून हॉटेलात नेणा-या गाडीत चेहेरा पुसायला वेट टॉवेल्स नाहीत, हॉटेलच्या खोलीचा ‘व्ह्यू’ वेबसाईटवरल्या फोटोत दिसत होता तसा नाही असल्या कारणांवरून राडा घालतील. अमेरिकन लोक  ‘होस्ट’ म्हणून उत्तम; पण ‘गेस्ट’ बनून दुस-या देशात गेले की त्यांच्या नाकाचे शेंडे सदैव वर ! तडजोड, जमवून घेणं, जुळवून घेणं असा प्रसंग आला की बिथरलेच ते ! इस्त्रायली पर्यटक तर जगात बदनाम. कारण? - ड्रग्ज ! आता अर्थव्यवस्था गाळात गेल्याने भटक्या रशियनांची संख्या अगदीच घटली असली, तरी रशियन पर्यटक सगळ्यांना नकोसे. दारू असो, सेक्स असो वा खाणं; सगळ्याच भुकांचा अतिरेक हे रशियनांचं वैशिष्ट्य!

- अर्थात, हे सगळं ढोबळमानाने घ्यायचं. सरसकटीकरण करणं चूक. पण पर्यटन उद्योगात प्रत्येक देशाच्या कपाळावर असं एक सरसकट ‘लेबल’ आहे, हे नक्की! म्हणूनच तर युरोपातली रिसॉर्ट्स ‘फॉर इंडियन टुरिस्ट ओन्ली’ अशी फर्मानं आपल्या रिसेप्शनवर डकवतात आणि इस्रायली पासपोर्ट बघितला की जगातल्या सगळ्याच चेक-इन काउण्टरवरच्या नजरा संशयाने पाहातात.बालीच्या रिसॉर्टमधून टॉवेल, साबण, हेअर ड्रायर चोरणारं कुटुंब बिचारं (उच्च) मध्यमवर्गीय म्हणून  ‘कॅमे-यात कैद’ तरी झालं; पण ही घटना घडली त्याच दरम्यान स्वीत्झर्लण्डमधल्या गस्ताद या स्की-टाउनमधल्या ‘आर्क एन सिएल’ नावाच्या फाइव्ह स्टार रिसॉर्टने ‘डिअर गेस्टस फ्रॉम इंडिया’ असा थेट उल्लेख करून एक नोटीस लावल्याची बातमी आली, आणि भारतीय पर्यटकांना टोमणे मारल्याचा राग येऊन एकच गदारोळ झाला. इथे जाणारे भारतीय पर्यटक कोण आहेत? - तर बडे उद्योगपती, श्रीमंत खेळाडू आणि बॉलिवूड स्टार्स. कारण दिवसाला 25 हजारांच्या पुढे रेट असलेलं हे प्रकरण अतिश्रीमंतांनाच परवडू शकतं. एवढे पैसे भरण्याची ऐपत असलेल्यांनाही ‘ब्रेकफास्टसाठीचं अन्न ‘डॉगी बॅग्ज’मध्ये घेऊ नये. वेगळी लंच बॅग मागावी आणि त्याचे वेगळे पैसे भरावे’, असं सांगावं लागतं. का?- कारण स्वभावात मुरलेली फुकटेपणाची सवय! न्यू यॉर्कच्या महागड्या पॉश हॉटेलात राहाणं सहज परवडणारे भारतीय पर्यटक लॉण्ड्रीचा खर्च वाचावा म्हणून बाथरूममध्ये धुतलेल्या ओल्या कपड्यांचे पिळे महागड्या सोफ्यांवर वाळत घालतात यामागचं रहस्य आपल्याला अजून उलगडलेलं नाही, असं तिथले हॉटेल मॅनेर्जसही सांगतात. 

हे का? - तर गाठीशी पैसे आले; पण समृद्ध जगातल्या संकेतांची ओळख करून घेणं राहूनच गेलं म्हणून ! आयुष्याच्या प्रारंभी घेतलेल्या अभावाच्या अनुभवाचे व्रण अजून ताजे आहेत. त्यामुळे  पैसे फेकून विकत घेतलेल्या गोष्टीचा पूर्ण उपभोग पिळून घ्यायचा आग्रह भारतीय मन धरतं. खिशात खर्च करायला बक्कळ पैसे आहेत खरे; पण  एकदा ते दिले की त्या बदल्यात जास्तीत जास्त परतफेड पिळून घेण्याचा ‘स्वभाव’च भारतीय पर्यटकांना किरकोळ ‘चो-या ’ करायला प्रवृत्त करत असावा. ‘त्या’ बालीच्या व्हायरल व्हिडीओमधला भारतीय पुरुष आपल्या बायकोने रिसॉर्टमधून चोरलेले टॉवेल, शाम्पू, हेअर ड्रायर बघून हतबुद्ध होतो आणि म्हणतो, ‘मी तुला 50 लाखांच्या वस्तू इथे विकत घेऊन देऊ शकलो असतो, हे करायची काय गरज होती?’- आपण भारतीय परदेशात इतके विचित्र का वागतो? याची मेख या हतबुद्धतेत आहे, हे नक्की!

परदेशी सुट्टीवर असतानाची एकूण वर्तणूक,  सार्वजनिक ठिकाणची सभ्यता, स्थानिक भाषा शिकण्या-समजण्याचा प्रयत्न, स्थानिक अन्नाबाबतची उत्सुकता आणि स्थानिक लोकभावना-परंपरांचा आदर या निकषांवर परदेशी पर्यटकांची एकूण ‘गुणवत्ता’ मोजली जाते. त्या आधाराने मोजमाप करणा-या  अनेक  अभ्यासकांनी आणि पर्यटन व्यावसायिकांनी केलेली  ‘रिपोर्ट कार्ड्स’ उपलब्ध आहेत. त्यात भारतीय पर्यटकांना काही फार बरे गुण नाहीत.आपण भारतीय हे असं का वागतो?कारण आपल्या देशात एकूणच सार्वजनिक ठिकाणी वावराबाबत असलेले गोंधळाचे संकेत. सार्वजनिक-संस्कृतीचा बराचसा अभाव. गटाने, सामूहिक विचाराची सवय. व्यक्तिगत विचार-वावर-स्पेस-सभ्यता याबाबतची उदासीनता.- आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुक्त्या नुक्त्या आलेल्या आर्थिक सार्मथ्याची ताजी ताजी रग. आधीच आपल्याकडे प्रवासाची संस्कृती नाही. पैसा आल्यावर लोक बाहेर पडू लागले ते चैन करायचा नवा पर्याय म्हणून. मौजमजेसाठी प्रवास करणारी भारतीयांची ही पहिलीच पिढी आहे. त्यामुळे यातील बहुसंख्यांना परदेशी संस्कृतीची, वेगळेपणाची जाणीव/माहिती नसणं तसं स्वाभाविकच ! अचानक येऊन कोसळलेल्या आर्थिक संपन्नतेच्या घाईगर्दीत भारतातल्या या नवर्शीमंतांचं सांस्कृतिक पोषण होणं मागेच पडलं हे खरं आहे. आपल्यापेक्षा भिन्न माणसं, रीतीभाती, पद्धती यांच्या स्वीकारासाठी आवश्यक असलेली स्वागतशीलता या पिढीच्या संस्कारांचा भाग नव्हती, हेही खरं. भंबेरी उडाली आहे ती त्यामुळे. आत्मविश्वासाच्या अभावातून येतो तो बेमुरवत उद्दामपणा हा अनेक भारतीयांसाठी एक सोयीचा ‘शॉर्टकट’च होऊन बसला आहे. त्यामुळेच नको तिथे आवाज चढतात आणि आपल्याहून वेगळ्या माणसांना, रीतिभातींना ‘सामावून घेण्या’इतकी वृत्ती स्वागतशील राहात नाही.

- पण या सगळ्या कलकलाटात अजून व्हायरल न झालेलं एक शुभवर्तमानही आहे. ते असं, की भारतातल्या आजी-आजोबा, आई-बाबा पर्यटकांना बाजूला सारून आता तरुण पर्यटकांची नवी पिढी जग पाहायला बाहेर पडते आहे. त्यांना नवे अनुभव हवे आहेत. नवे मित्र हवे आहेत. नवी संस्कृती, नव्या चवी, नवे रंग हवे आहेत. ही मुलं एकेकटी फिरायला जाऊ लागली आहेत. कलकलाट करणा-या  घोळक्याने नाही. ही मुलं वेगळं, अधिक जबाबदारीने वागतील, अशी अशा करायला वाव आहे.- म्हणजे आता परिस्थिती बदलते आहे.प्रत्येक सुबुद्ध भारतीयाने या बदलाला हातभार लावला पाहिजे.

-----------------------------------------------------------

येत्या दहा वर्षात जागतिक पर्यटन उद्योगाचा मोठा आधार होणार भारतीय पर्यटक 

1.भारतातून प्रवासासाठी देशाबाहेर पडणा-या  पर्यटकांची संख्या दरवर्षी 15 ते 18 टक्क्यांनी  वाढते आहे.

2. 2020 मध्ये तब्बल पाच कोटी भारतीय परदेशात प्रवासाला जातील. 

3. 2030 मध्ये भारतीय पर्यटन उद्योग परदेशात 93 बिलियन डॉलर्सच्या उलाढालीचा टप्पा गाठेल.

4. भारतात सध्या दहा कोटींच्या आसपास पासपोर्टधारक आहेत आणि त्यांची संख्या वेगाने वाढते आहे. यांच्यावर परदेशी पर्यटन उद्योगाचं ‘लक्ष’ असेल.

5. भारतीय पर्यटक एका परदेश प्रवासात दरडोई सरासरी 1200 डॉलर्स खर्च करतो. हे प्रमाण चिनी प्रवाशांच्या चौपट आहे.

(संदर्भ : संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन’चा अहवाल)

-----------------------------------------------------------------------------

आधुनिक सभ्यतेचे  जागतिक वर्तन-संच

रांगेची शिस्त न पाळता सर्वत्र रेटारेटी करणं, अतिरिक्त मद्यपान करून गोंधळ घालणं, कचरा करणं, हॉटेलातल्या वस्तू-अन्न चोरणं हे ‘गुन्हे’ तसे किरकोळ; परभूमीत प्रवासाला गेल्यावर आपल्या सुसंस्कृतपणाची खरी परीक्षा करणारे अनेक नवे वर्तन-संच कालानुरूप तयार झाले आहेत. त्याची जाणीव असणं हा खरा कळीचा मुद्दा आहे :

1. प्रत्येक देशाच्या इतिहासातल्या काही जखमा स्थानिकांसाठी ताज्या असतात. त्याचा अभ्यास नसेल, तर किमान जाण असावी. तिथल्या ऐतिहासिक वास्तू, संग्रहालयं इथे वावरताना आपल्या ‘बोलण्या’वर ताबा हवा.

2. सेल्फीच्या नादात ऐतिहासिक वास्तू, स्मारकं इथे हुंदडू नये. राजगडावरच्या महाराजांच्या सिंहासनापाशी येऊन कुण्या  ‘परक्या’ने बेमुर्वत हैदोस घालणं आपल्याला रुचेल का? 

3. वेगवेगळ्या समाजात ‘नग्नते’कडे पाहण्याची दृष्टी निरनिराळी असते. आपण कपडे घालताना आणि इतरांच्या उघड्या/अर्धउघड्या शरीरांकडे ‘पाहताना’ स्थानिक संदर्भांचं भान असावं.

4. टक लावून पाहणं, अकारण व्यक्तिगत चौकशा करणं, नुसत्या तोंडओळखीवर सहज शारीरिक सलगी करणं, रांगेत आपल्यापुढे उभ्या व्यक्तीला ‘पुढे व्हा’ असा इशारा करताना खांद्यावर टपली देणं, हॉटेलमध्ये वेटरला बोटांनी इशारे करून बोलावणं, आमंत्रणांचा/खाद्यपदार्थांचा अतिआग्रह करणं या भारतीयांना सहज सवयीच्या असलेल्या गोष्टी परदेशी अ-संस्कृत ठरतात.

5. आल्प्समध्ये फिरताना ‘आपला हिमालय काय वाईट आहे?’ असं जाहीरपणे म्हणणं जितकं चूक; तितकीच सतत परदेशाशी तुलना करून परदेशी सहप्रवाशांदेखत भारताला नावं ठेवणंही चूकच ! प्रत्येक देशाचं सामाजिक-राजकीय-आर्थिक वास्तव भिन्न आणि गुंतागुंतीचंही असतं, याची -निदान-जाण हवीच.

6. आपण नात्यांची, अधिकारांची पक्की उतरंड असलेल्या समाजरचनेत वाढलो आहोत. सेवा देणार्‍यांना, शारीरिक श्रम करणा-याना सतत ‘नोकर’ म्हणून दुय्यम वागणूक देण्याची सवय रक्तात मुरलेली असते. परदेशात बस/टॅक्सी ड्रायव्हर्स, वेटर्सशी वागताना भारतीय पर्यटक ‘उद्धट’ ठरतात, ते म्हणूनच ! ‘प्लीज’ आणि ‘थॅँक्यू’ हे जादुई शब्द वापरायला प्लीज विसरू नका, थॅँक्यू !

7. प्रवासात भेटलेल्या  ‘आपल्याहून श्रीमंत’ लोकांकडे विस्मयाने न पाहणं आणि  ‘आपल्याहून गरिबां’ना अकारण दयाद्रतेने न वागवणं सारखंच महत्त्वाचं आहे.

8. पॅरिसमध्ये आयफेल टॉवरच्या खाली बसून झुणका-भाकरी नाहीतर भाजणीचं थालीपीठ खाण्यात ग्रेट काय असतं? स्थानिक अन्नाची चव, रस-रंग-गंध यांचा अनुभव ही मोठी मौज असते. चव आवडली नाही तरीही स्थानिक अन्नाला नावं ठेवणं, तोंड वेंगाळणं टाळावं. भारतीयांच्या अंगाला, तोंडाला, कपड्यांना, सामानाला येणारा कांदा-लसणीचा, मसाल्यांचा वास निम्म्याहून अधिक जगाला आवडत नाही बरं!

9. जाऊ त्या प्रत्येक ठिकाणची स्थानिक भाषा शिकणं अशक्य. पण निदान रोजच्या व्यवहाराला लागणारे काही मोजके शब्द, वाक्यं यांची एक यादी सोबत ठेवली, गूगलमावशीची मदत घेतली तर अगदी खडूस फ्रेंच माणसाच्या हृदयाची कुलुपंसुद्धा उघडता येतात. मुख्य म्हणजे ‘डू यू स्पीक इंग्लिश?’ असं ओरडत लोकांच्या मागे जाऊ नये. नम्र विनंती करावी.

10. रस्त्यावर घासाघीस करणं, हॉटेलात डिस्काउण्ट आणि एअरलाइन काउण्टरवर अपग्रेड मागणं, मॉलमध्ये ‘कमी करा की’ म्हणणं हा आपला स्वभाव. अनेक देशांच्या संस्कृतीत ही ‘घासाघीस’ अनोळखी आहे. तेव्हा, करण्याआधी माहिती घ्या!

11. आणि सगळ्यात महत्त्वाचं : आधुनिक सभ्यतेचे हे संकेत आपल्याही देशात फिरताना अवश्य पाळावेत आणि अन्य परदेशी पाहुणे ते पाळतील यासाठी जरूर आग्रह धरावा.

aparna.velankar@lokmat.com(लेखिका लोकमत वृत्तसमूहात फीचर एडिटर आहेत.)