रोहित नाईक१- १९९९-२०००च्या दरम्यान तत्कालीन भारतीय कर्णधार मोहम्मद अझहरूद्दिन फिक्सिंगच्या जाळ्यात अडकला तेव्हा मोठे वादळ निर्माण झाले होते.२- याप्रकरणी बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदीची कारवाई केली.३- २०१२ मध्ये आंध्र प्रदेशने अझहरूद्दिनवरील बंदी हटविली. मात्र तोपर्यंत त्याची कारकीर्द संपुष्टात आली होती.४- यासोबतच अजय शर्मा, अजय जडेजा, मनोज प्रभाकर या तीन भारतीयांवरही बंदी लावण्यात आली. यापैकी अजय शर्मावर आजीवन, तर जडेजा व प्रभाकर यांच्यावर प्रत्येकी ५ वर्षांची बंदी लादली गेली.५- २०००च्या फिक्सिंगनंतर जागतिक क्रिकेटमध्ये फिक्सिंगचे काही प्रकार घडले. मात्र भारतीय क्रिकेट काही वर्षे शांत राहिले.६- २०१३ साली मात्र आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरण उघडकीस आल्याने भारतीय क्रिकेट पुन्हा ढवळून निघाले.७- वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतवर बीसीसीआयने आजीवन बंदीची कारवाई केली. यानंतर केरळ उच्च न्यायालयाने ही बंदी रद्द केली.८- याच प्रकरणामध्ये श्रीसंतसह अजित चंदिला आणि अंकित चव्हाण यांच्यावर फिक्सिंगचे आरोप झाले. पोलिसांनी या दोघांना अटकही केली. या दोघांवरही आजीवन बंदी लादण्यात आली आहे. या तिन्ही खेळाडूंची क्रिकेट कारकीर्द आता संपुष्टात आली आहे.९- २०१३ आयपीएल फिक्सिंग प्रकरण गाजले ते विविध पदाधिकारी आणि संघमालक यांच्या सहभागाने. क्रिकेटचाहत्यांना त्यामुळे मोठा धक्का लागला.१०- चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे प्रमुख आणि तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मय्यपन फिक्सिंगमध्ये अडकल्याचे आढळल्यानंतर भारतीय क्रिकेटची लक्तरे निघाली.११- या वादामध्ये बळी गेला तो चेन्नई संघाचा आणि दोन वर्षासाठी हा संघ आयपीएलमधून बाहेर गेला.१२- असाच प्रकार राजस्थान रॉयल्स संघाचे सहमालक राज कुंद्राबाबत झाला. दिल्ली पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार कुंद्रा आपल्या संघावरच आपल्या बुकी मित्राच्या साहाय्याने सट्टा लावत होता.१३- यानंतर राजस्थान रॉयल्स संघ व्यवस्थापनाने कुंद्रा यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.१४- याच प्रकरणामध्ये सुनील भाटिया, विनोद मुलचंदानी या बुकींनाही अटक झाली.१५- यामध्ये सर्वात मोठे नाव होते ते विंदू दारासिंग. दिवंगत अभिनेते दारासिंग यांचा मुलगा असलेल्या विंदूचा सट्टेबाजीतील सहभाग सर्वांसाठी धक्कादायक होता.१६- काही महिन्यांपासून अल जजीरा वृत्तवाहिनी क्रिकेटमधील भ्रष्टाचाराचे विशेष वृत्तांकन करत आहे. १५ आंतरराष्ट्रीय सामन्यांत २४हून अधिक स्पॉट फिक्सिंग झाल्याचा दावा या वृत्तवाहिनीने केला आहे.१७- अल जजीराने अनिल मुनावर या स्पॉट फिक्सरची मुलाखत आपल्या माहितीपटात घेतली असून, त्याने यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सट्टेबाजीची धक्कादायक माहिती दिली. अनेक वर्षांपासून आयसीसीही मुनावरच्या मागावर आहे.१८- अनिल मुनावर हा मूळचा मुंबईकर असून, त्याचे बहुतेकदा वास्तव्य दुबईत असते.१९- सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच मुनावरचे विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासोबतचे छायाचित्र मिळाल्याने मोठी चर्चा रंगत आहे.२०- मात्र अल जजीराने या दोन्ही खेळाडूंचा मुनावरशी कोणताही संबंध नसल्याचेही स्पष्टीकरण दिले आहे.(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत सहाय्यक उपसंपादक आहेत.)
rohitnaik7388@gmail.com