- सचिन जवळकोटेध्यानीमनी नसताना भरल्या संसाराकडं पाठ फिरवून घरचा कर्ता पुरुष निघून गेला. सुरुवातीला धाय मोकलून घरची धनीण रडली; परंतु गालावरचे अश्रू वाळल्यानंतर नवऱ्याच्या प्राक्तनातलं कर्ज तिच्या कोऱ्या ललाटी ठाण मांडून बसलेलं दिसलं.. तेव्हा ही माउली दचकली. भानावर आली. वास्तवाला तोंड देण्यासाठी तयार झाली.संकटाला तोंड देण्यासाठी अशा अनेक जणी पदर खोचून कामाला लागल्यात. मात्र काही जणी पुरत्या हतबल झाल्यात. कर्जाच्या तणावाखाली आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पत्नींचा हा संघर्ष म्हणजे वादळातला लुकलुकता दिवाच.नाव : उल्पा नंदकुमार गाजरे. राहणार शेळवे, ता. पंढरपूर.. पोटी तीन पोरं. दोन मुलं अन् एक मुलगी. तिन्ही पोरं अभ्यासात हुशार. घरची चार एकर शेती. पोट भागेल एवढं पिकायचं. बाकी निसर्गाच्या हवाली. काही वर्षांपूर्वी सासूबाईला कॅन्सर झाल्याचं निदान झालं. नवरा जिद्दीला पेटला. पिकासाठी शेतीवर कर्ज काढून आईला दवाखान्यात नेऊ लागला.. परंतु कॅन्सरची गाठ अन् कर्जाचं व्याज काही थांबेना. व्याजासाठी पुन्हा नवं कर्ज काढलं गेलं.अखेर एक दिवस सासू गेली. तिच्यासाठी बारा लाखांचं कर्ज डोक्यावर घेतलेलं, ते मागे उरलं. नवरा रोज तणावाखाली जगू लागला. शिवारात तर नुसती ढेकळं. इकडं वसुलीसाठी तगादे वाढले, तसं एक दिवस लेकीला सांगून नवरा रानात गेला आणि थेट फासावरच चढला... ‘गेले ते तिकडंच गेले. तीन पोरांची जबाबदारी हाय माज्यावर. आता कोन हाय ह्या पोरास्नी माज्याबिगर?’ अशी खंत व्यक्त करणाºया उल्पाचा सवाल काळीज पिळवटून टाकणारा होता.कर्जापोटी नवऱ्याने आत्महत्या केली म्हणून तिला शासनाकडून एक लाखाची मदत मिळाली. डोक्यावर कर्ज बारा लाखाचं. व्याज तर दिवसागणिक वाढतच चाललेलं. यावर्षी तिनं सासऱ्याच्या मदतीनं शेतात ऊस लावण्याची हिंमतही केली. मात्र, हुमणीनं दगा दिला. उभा फड आडवा झाला. तरीही उल्पा जिद्द सोडायला तयार नाही.नवरा हरला म्हणून काय झालं? तिन्ही पोरांना भरपूर शिकवायचंच ठरवून कामाला लागलीय. प्रत्येक वर्षाला नवं-जुनं करत काही वर्षे तशीच काढायची. नंतर टप्प्या-टप्प्यानं कर्ज फेडत राहायचं. ही उल्पाची मानसिकता असली तरी व्याज अन् चक्रवाढ व्याजाचा भस्मासुर कदाचित तिला माहिती नसावा.हीच अवस्था कुरनूरच्या मीराबाईची. अक्कलकोट तालुक्यातल्या श्रीशैल काळेंनी बोअर मारण्यासाठी काढलेल्या कर्जाच्या धास्तीतून विष पिऊन आत्महत्या केलेली. पोटी दोन पोरं. मोठा मुलगा संतोष पित्याच्या अकाली जाण्यामुळं गावात आईसोबतच राहू लागलाय. सध्या तो शेती करतोय.सध्या मीराबाई दुसऱ्याच्या शेतात जाऊन मोलमजुरी करते. लोकांच्या रानातलं तण काढताना तणनाशक औषधानंच आपल्या पतीचा घात केला, या आठवणीनं रोज रडते. तिला रोज मिळतातच किती? सव्वाशे रुपये ! त्यावर सोसायटीचं कर्ज फेडायची धडपड चालू आहे.नाव : विजयालक्ष्मी सूर्यकांत पाटील, रा. मुस्ती, ता. दक्षिण सोलापूर. सोसायटीचं कर्ज काढून नवऱ्यानं शेतात ऊस लावलेला. बारा महिने जिवापाड जपला. कशीतरी अखेर ऊसतोडीची चिठ्ठी आली. ऊस गेला; परंतु कारखान्याकडून पूर्ण बिल काही मिळालंच नाही. इकडं व्याजासोबत नवऱ्याची घालमेलही वाढू लागली. अखेर टेन्शन सहन न झाल्यानं त्यानं आत्महत्या केली.विष पिण्यापूर्वी ‘कारखान्यानं बिल थकविलं म्हणून मी जीव देतोय, अशी चिठ्ठीही लिहिली. परंतु, लालफितीचा कारभार नेहमीप्रमाणं चाकोरीबद्ध. केवळ ‘चिठ्ठीत कर्जाचा उल्लेख नाही,’ या कारणापायी या आत्महत्येची नोंद सरकारी यादीत झाली नाही. मदतही मिळाली नाही. तेव्हापासून विजयालक्ष्मी पुरती अंथरुणाला खिळलीय. घराबाहेर पडायलाच तयार नाही. नवरा गेला, याहीपेक्षा जास्त नवऱ्याचं कर्ज आता मी कसं फेडू, या विवंचनेनं तिचं जगणं मुश्कील झालंय...जगाच्या दृष्टीनं तिला शारीरिक आजार जडलाय. मात्र, तिच्या मनातल्या उद्वेगाची घालमेल कुणाला समजणार? अशा कितीतरी महिला रोज या तणावाचं वादळ उशाला घेऊन सांगताहेत नवऱ्याचं देणं आपण एकट्यानं कसं फेडायचं?‘जिवंत असतानाच जोडीदारानं आपल्याला त्याची सारी दु:खं आपल्या पदरात घातली असती तर हातात हात घालून जोडीनं साऱ्या संकटांशी सामना केला असता. का असा त्यानं आत्मघातकी निर्णय घेतला?’- हा सवाल त्यांच्या नजरेत दिसतो. तो उघड कुणी विचारत नाही एवढेच!सोपस्कारांचा विळखाआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी मदतीची सरकारी प्रक्रिया अतिशय किचकट आहे. मागे राहिलेल्या बहुतेक स्रिया अशिक्षित. त्यांच्या वाट्याला सगळे सोपस्कार पूर्ण करणे येते.शेतकऱ्यांच्या मृत्यूचा दाखला, पोलिसांचा पंचनामा, डॉक्टरांचा शवविच्छेदन अहवाल, उत्पन्नाचा दाखला अन् कर्जाची कागदपत्रं तिनं द्यायची. नवऱ्यानं कर्जापोटीच आत्महत्या केली, हे तिनंच सिद्ध करायचं. तसे पुरावे द्यायचे.या प्रक्रियेत मदत मिळणे दूरच, कागदपत्रांच्या जंजाळात फसवणूक वाट्याला येण्याचे अनुभवच अनेकींच्या गाठीशी आहेत.
(लेखक ‘लोकमत’च्या सोलापूर आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.)Sachin.javalkote@lokamat.com