- आनंद इंगोले
कोरोनासंग्रमात डॉक्टर, आरोग्यसेवक हे आघाडीचे सैनिक म्हणून गेल्या काही महिन्यांपासून अक्षरश: झटताहेत. त्यांच्यापुढे संकटं अनेक आहेत, आव्हानं अगणित आहेत. कोरोनाला बळी न पडता, स्वत:ला सांभाळून त्यांना हे युद्ध लढायचं आहे. स्वत:ची योग्य ती काळजी घेतली, तरच या युद्धात ते शर्थीची झुंज देऊ शकणार आहेत. मात्र त्यांच्यापुढील पहिली प्रमुख अडचण आहे, ती म्हणजे पीपीइ किट्सची कमतरता आणि दुसरी अडचण आहे, ती म्हणजे खुद्द पीपीइ किट्सशीच त्यांना रोज द्यावा लागणारा लढा! कारण हे पीपीइ किट्स फार काळ परिधान करता येत नाहीत. नखशिखान्त बंदिस्त असल्यानं त्यात जीव गुदमरतो. अंगात अक्षरश: घामाच्या धारा लागतात. काम करणं अशक्य होतं, पण याही परिस्थितीत त्यांना रुग्णांच्या बचावासाठी आघाडीवर येऊन लढावं लागतं. हे पीपीइ किट्स सलगपणे जास्त वेळ वापरणं शक्य नसलं, तरी बर्याचदा ते वापरावे लागतात. कारण त्यांची कमतरता. ते काढून ठेवता येत नाहीत आणि एकदा वापरल्यानंतर त्यांचा पुनर्वापरही शक्य नाही. त्यांच्या प्रचंड किंमतीचाही प्रo्न आहेच.केवळ भारतातलेच नाही, जगभरातले डॉक्टर आणि आरोग्यसैनिक या समस्येनं हैराण झाले आहेत.मग काय करायचं? कशी मात करायची या समस्येवर? वध्र्याच्या सेवाग्राम या संस्थेनं ही समस्या नेमकी हेरली. त्यासाठी काय करता येईल यादृष्टीनं विचार, प्रय} करायला सुरुवात केली आणि या लढय़ात स्वत:हून उडी घेतली!सेवाग्रामचे देशातील ऐतिहासिक घडामोडींमध्ये नेहमीच मोलाचे योगदान राहिले आहे. येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या मायक्रोबायोलॉजी लॅबनं संशोधन करून महागड्या पीपीई किटला स्वस्त, पुनर्वापर करता येण्याजोगा मल्टिपर्पज गाऊनचा पर्याय शोधून काढला. पीपीई किटला पर्याय शोधण्याकरिता मायक्रोबायोलॉजी विभागाचे अधिव्याख्याता डॉ. राहुल नारंग यांनी डिफेन्स रिसर्च अँण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) या संस्थेच्या मदतीने संशोधन सुरू केलं. डीआरओशी विस्तृत चर्चा झाली. या चर्चेची प्रमुख अट आणि आव्हानं होतं ते म्हणजे हे किट घाम आणि गुदमरण्याच्या समस्येपासून मुक्त असावं, त्याचा फार त्रास वापरकर्त्याला होऊ नये. आणखी इतर उद्दिष्टे त्यांनी ठरवली ती म्हणजे, हे किट वापरुन झाल्यानंतर त्यापासून प्रदुषणाचा वेगळाच प्रo्न उद्भवू नये, त्यासाठी हे किट पुनर्वापर करता येण्याजोगं असावं, त्याची किंमत कमीत कमी असावी, वजनालाही ते फार असू नये, शिवाय ते वारंवार निर्जंतुकही करता यायला हवं!.हे पीपीइ किट पुनर्वापरयुक्त बनविण्यासाठी वॉटरप्रुफ आणि वजनानं हलक्या कापडाची आवश्यकता होती. ते आणि त्यासोबतचे इतर साहित्य निर्जंतुक करता यावे, हे आव्हान होतं.यासाठी आवश्यक असलेलं कापड गुजरात येथून मागविण्यात आलं. सुरतच्या एका व्यापार्याकडून पॉलीयुरेथिनचे आवरण असलेले कापड 100 रुपये मीटरप्रमाणे विकत घेण्यात आले. त्यावर निरनिराळे परीक्षण, प्रयोग करून ते वॉटरप्रुफ आणि निर्जंतुक करण्यासाठी पाणी, हायप्रोक्लोराईड, हायड्रोजन पॅरॉक्साईड, अल्कोहोल, हिट, बॉईल आणि ऑटोक्लेव्हिंग करण्यात आले. त्यानंतर त्यापासून एक प्रकारचा गाऊन (किट) तयार करायला सुरुवात झाली. पॉलिस्टरला पॉलीयुरेथिनचे आवरण असलेल्या कापडापासून कमी किमतीमध्ये हे किट तयार करण्यात आले आहे. कुठलेही पीपीई किट घातल्यानंतर उष्णता वाढून गरम वातावरण तयार होते. त्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात. शरीर घामाघूम झाल्यानंतर जास्त काळ किट वापरणे शक्य होत नाही. मात्र, संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागातील कोरोना योद्ध्यांना अशा परिस्थितीतही किट जास्त काळ वापरावे लागते. ही समस्या कशी सोडविता येईल, याचाही विचार हे किट तयार करताना केला गेला. पुनर्वापर करता येण्याजोग्या पीपीई किटच्या आत घालण्यासाठी खादीची एक बंडी तयार करण्यात आली आहे. त्यासोबतच मास्क आणि टोपीलाही खादीच्या कापडाचे आवरण लावण्यात आले आहे. शरीराचा घाम खादीची ही बंडी शोषून घेते. बंडीला सहा खिसे शिवण्यात आले असून या खिशांमध्ये आईसजेल पॅकेट (जलपॅक) ठेवून शरीराचे तापमान कमी करण्यात यश आले आहे. हे जलपॅक रात्रभर फ्रिजरमध्ये ठेवल्यानंतर त्याचा बर्फ होतो आणि नंतर बांडीतील खिशात ठेवले तर त्याचे पाणी होण्यासाठी पाच ते सहा तास लागत असल्याने ते शरिराला थंड ठेवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. अशा प्रकारचे हे देशातले पहिलेच किट आहे.
वीस वेळा पुनर्वापर!महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगणे यांच्या मार्गदर्शनात मायक्रोबायोलॉजीचे अधिव्याख्याता डॉ. राहुल नारंग याच्या नेतृत्वात विभाग प्रमुख डॉ. विजयर्शी देवतळे, सहअधिव्याख्याता डॉ. रुचिता अट्टल लोहिया, प्रियंका शहाणे-कापसे, मीनाक्षी शहाणे, अंजली पातोंड, देवार्शी शहा, दीपार्शी मरसकोल्हे, तांत्रिक सहाय्यक रमेश खाजोने आणि राजीक शेख हे गेल्या तीन महिन्यांपासून पर्शिम घेत आहेत. संस्थेने तयार केलेल्या किटचे वजन 100 ते 200 ग्रॅमपर्यंत आहे. सुरुवातीचे किट बनविण्यासाठी 250 रुपये खर्च आला. त्यानंतर नवे कापड मगविण्यात आले. नवीन किटची किंमत 600 रुपये असली हे किट वीस वेळा वापरले तर त्याचा खर्च एका वेळेसाठी अवघा 30 रुपयेच राहणार आहे!किटसोबतचा डोळ्यांचा चष्मासुद्धा चांगल्या प्रतीचा आहे. डोक्यावरील टोपी आणि मास्कही याच कापडापासून तयार करण्यात आल्याने तेही पुनर्वापर करण्यायोग्य आहे. आज बाजारात उपलब्ध असलेले पीपीई किट साधारण एक हजार रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे सेवाग्रामचे हे पीपीई किट उपयुक्त ठरणार आहे शिवाय घामाच्या समस्येपासूनही बर्याच अंशी मुक्तता मिळणार आहे.
‘देशसेवा म्हणून सोपविणार’संस्थेने तयार केलेले, तब्बल वीसवेळा वापरता येणारे पीपीई किट रिसर्च लॅब, रेडिओलॉजी किंवा अन्य आरोग्य विभागातही उपयोगी पडणार आहे. आमचेच संशोधन आम्हालाच विकण्याचा प्रकार विदेशींकडून होऊ नये म्हणून संस्थेने पेटंट घेतले तरी संस्था स्वत: उत्पादन मात्र करणार नाही. संस्थेचा कोणताही व्यावसायिक दृष्टिकोन नाही. इतर संस्था किंवा कंपनी जर हे किट तयार करु लागली तर ग्राहकांच्या ईच्छेनुसार आमच्या मार्गदर्शनाखाली त्यांना या पद्धतीने गाऊन शर्ट, पॅण्ट देखील तयार करता येईल.- डॉ. राहुल नारंग, महात्मा गांधी आयुविज्ञान संस्थेच्या मायक्रोबॉयोलॉजी विभागाचे अधिव्याख्याता
anand.ingole2012@gmail.com(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीत उपसंपादक आहेत.)