- राहुल बनसोडे
आपल्याजवळ स्मार्टफोन असणारा जवळपास प्रत्येकजण व्हॉट्सअँप वापरतो. इतरांशी संपर्कात राहण्याचे, मनमोकळे बोलण्याचे आणि लहानसहान ग्रुप्समध्ये व्यक्त होण्याचे ते सर्वात उपयोगी माध्यम आहे. व्हॉट्सअँप वापरणार्यांमध्ये लहानथोर, स्री-पुरुष, गरीब-र्शीमंत सगळ्याच प्रकारचे आणि वयोगटातले लोक आहेत. त्यानंतर नंबर येतो तो फेसबुकचा. फेसबुकवर थोडेफार लोक लिहिणारे असतात, बरेचसे वाचणारे असतात आणि फेसबुकची पोस्ट तुम्हाला आवडल्यास तुम्ही त्याला लाइक देऊ शकतात, खाली कमेंटमध्ये प्रतिक्रिया देऊ शकता. याशिवाय फेसबुकवर येणारे निरनिराळे व्हिडीओज आणि लिंक्सही तुम्ही तुमच्या वॉलवर शेअर करू शकता. नियमित व्हॉट्सअँप वापरणारे लोक फेसबुक वापरतातच असे नाही. अनेकांना ते कसे वापरायचे याबद्दलही फारसे माहिती नाही. फेसबुकचे वापरकर्ते मुख्यत: वीस ते चाळीस वर्षांचे उच्चशिक्षित लोक आहेत, ज्यांना तंत्नज्ञानाचे नेहमीपेक्षा थोडे जास्त जुजबी ज्ञान आहे आणि व्हॉट्सअँपपेक्षा थोड्या चांगल्या गोष्टी फेसबुकमध्ये मिळतात असे त्यांचे मत असू शकेल. फेसबुक आणि व्हॉट्सअँपच्या पलीकडे तिसरे एक अँप आहे जे मुख्यत: तरुणांमध्ये लोकप्रिय असल्याचे दिसून येते आणि ते आहे इन्स्टाग्राम. तसे पाहता इन्स्टाग्राम बाजारात येऊन गेल्या महिन्यात नऊ वर्षे पूर्ण झाली असली तरी, भारतात त्याचा मोठय़ा प्रमाणावर वापर गेल्या चारेक वर्षांतच सुरू झालेला दिसतो. इन्स्टाग्रामच्या भारतीय वापरकर्त्यांची एकूण संख्या ही व्हॉट्सअँप किंवा फेसबुकच्या वापरकर्त्यांपेक्षाही कमी असून, अनेकांना ह्या अँपचा नेमका उपयोग तरी काय आहे हेही व्यवस्थित समजत नाही. इन्स्टाग्राम हे शब्दांचे माध्यम नसून ते दृश्यांचे माध्यम आहे. या अँपच्या मदतीने तुम्ही आपले फोटो इन्स्टाग्रामवर दाखवू शकतात जे इन्स्टाग्रामच्या तुमच्या फॉलोअर्सला दाखविले जातात आणि मग त्यावर तुम्ही ‘लव्ह’ हे बटन दाबून तो फोटो आवडला आहे अशी नोंद करू शकता आणि हवे असल्यास फोटोखाली कमेंट करू शकता. फोटो दाखविणे आणि फोटो पाहणे याशिवाय इन्स्टाग्रामचा तसा दुसरा काही विशेष उपयोग नाही, फारफार तर फोटोऐवजी तुम्ही व्हिडीओ टाकू शकता तसेच त्यालाही लाइक आणि कमेंट मिळवू शकता. मुळात भारतातले लोक आपल्या आरश्यातल्या छबीला बरेचसे ओळखून असल्याने आपले फोटो इन्स्टाग्रामवर टाकण्याइतपत आणि त्यावर लाइक मिळविण्याइतपत आग्रही नाहीत. अनेकांनी इन्स्टाग्राम डाउनलोड करून त्यात सुरुवातीला टाकलेल्या फोटोंना विशेष लाइक्स आल्यामुळे त्यात फोटो टाकण्याचा नाद सोडला आहे; पण इतरांचे अनेक प्रसिद्ध फोटो ते नियमित पाहत असतात, त्यावर व्यक्तही होत असतात. इन्स्टाग्रामवरचे फोटोग्राफर हा स्वतंत्न सामाजिक अभ्यासाचा विषय होऊ शकेल. निरनिराळ्या धार्मिक स्थळांच्या यात्नांचे फोटो, सूर्योदय-सूर्यास्त-पाऊस-झरे या नैसर्गिक घटनांचे, स्पिती-हंपी-लडाख-पुष्कर या स्थळांचे, दसरा-दिवाळी-रमजान-ख्रिसमस या सणांचे आणि आपल्याकडे असणार्या महागड्या लेन्सेसच्या फोटोंनी इन्स्टाग्राम फोटोग्राफर्सची टाइमलाइन भरून गेलेली असते. हे फोटो बरेचदा अँडोबी लाइटरूम या सॉफ्टवेअरचा वापर करून अतिशय आकर्षक पद्धतीने रंगविलेले असतात, त्यात एक प्रकारचा भडकपणा असतो आणि ते वास्तवापेक्षा खूप वेगळे असतात. स्थानिक भावनांना हात घालताना वापरलेला हा भडकपणा अधिकाधिक लाइक्स मिळवायला बराच उपयोगी ठरत असला तरी मुख्य धारेतले कितीतरी फोटोग्राफर्स इन्स्टाग्रामच्या फोटोग्राफर्सला फारसे गांभीर्याने घेत नाहीत. इन्स्टाग्रामच्या फोटोग्राफर्सचा मुख्य धंदा हा शक्यतो लग्नाचे फोटो काढण्याचा असला तरी, इन्स्टाग्रामवर लोकप्रिय असल्यास त्यांना नवीन गिर्हाईक मिळण्यास बराचसा उपयोग होतो. याशिवाय यातल्याच काही अतिलोकप्रिय लोकांना हाताशी धरून कॅमेरा व लेन्सेस विकणार्या अनेक कंपन्या आपली उत्पादने या धंद्यात येऊ पाहणार्या नवीन गिर्हाईकांना विकतात. इन्स्टाग्राम फोटोग्राफरच्या सांगण्यात येऊन हजारो रुपयांचा फोटोग्राफी ट्रेनिंग कोर्स करणारे, आईवडिलांकडून लाखो रुपये घेऊन त्या पैशाने डीएसएलआर कॅमेरे आणि लेन्सेस विकत घेणारेही महाभाग आहेत. यापैकी किती लोक नंतरच्या काळात गांभीर्याने फोटोग्राफी करतात, हा खरे तर अभ्यासाचा विषय होऊ शकेल; पण एकदा कोर्स व कॅमेरा विकला गेला तर कॅमेर्याच्या कंपन्यानांना त्याच्याशी काही घेणे-देणे नसते. इन्स्टाग्रामचा वापर हा असा बराचसा फॅशन, फिटनेस, ट्रॅव्हल, रेस्टॉरंट आणि वेडिंग फोटोग्राफीच्या इंडस्ट्रीशी निगडित आहे आणि त्याच्या इन्फ्लुएन्सर्सचा प्रभाव वा मोठेपणा ठरविण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मापदंड आहे तो म्हणजे त्यांच्या फोटोजला आणि व्हिडीओजला येणारी लाखो लाइक्सची संख्या. या लाइक्सच्या खेळात इन्स्टाग्रामवरच्या प्रसिद्ध स्रिया गरजेपेक्षा जास्त कसरत करतात, अनेकदा स्वत:ला अर्धपोटी ठेवतात. ज्याचा परिणाम त्यांच्या नैसर्गिक शरीरस्वास्थ्यावर होतो. प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणारे इन्स्टाग्रामचे वीर त्या स्थळांची नासधूस करतात, फिरायला आलेल्या इतर प्रवाशांचा रसभंग करतात आणि कित्येकदा लक्षवेधी फोटो काढण्याच्या नादात आपला जीव धोक्यात घालतात. फोटोग्राफी शिकविण्याच्या नावाखाली कितीतरी लहानमोठय़ा शहरांत आज मोठय़ा प्रमाणावर फसवणूक चालू असून, अनेकांनी अतिशय हौशीने घेतलेले महागडे कॅमेरे आज धूळ खात पडून आहेत. या समस्यांचे मूळ आहे ते इन्स्टाग्रामच्या लाइक्सच्या संख्येवरती. ज्याला जितके लाइक्स तितका तो जास्त थोर अशा भयंकर गैरसमजात अटकल्यामुळे इन्स्टाग्रामच्या वापरकर्त्यांच्या आयुष्यात चढाओढ आणि मत्सराची भावना वाढीस लागली आहे. यामुळे अनेक इन्फ्लुएन्सर्सला वैयक्तिक आयुष्यात नैराश्याचा सामना करावा लागत असून, ‘इन्ग्रीड गोज वेस्ट’ या 2017 साली आलेल्या सिनेमात इन्स्टाग्रामचे मानवी आयुष्यावर होणारे परिणाम अतिशय मार्मिकपणे दाखविण्यात आले आहेत. लाइक्सच्या या जंजाळातून इन्फ्लुएन्सर्स आणि साधारण वापरकर्ते या दोहोंची सुटका व्हावी म्हणून इन्स्टाग्रामची मालक कंपनी फेसबुकने हे फिचर लवकरच बंद करायचे ठरविले आहे. दोन महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियात याची प्रारंभिक चाचणी घेतल्यानंतर फेसबुकने आता जागतिक पातळीवरही ही चाचणी घेण्यास सुरु वात केली असून, त्यात भारताचाही समावेश होतो. इन्स्टाग्रामवर फोटो टाकणार्यांना त्या फोटोला किती लाइक्स आले हे समजणार असले तरी पाहणार्यांना तो आकडा दिसणार नाही. ज्यामुळे आपण इन्स्टाग्रामवर जे काही पाहतो आहे ते फक्त सौंदर्यात्मक वा आकर्षकतेच्या पातळीवर यूझर्स पाहतील असे फेसबुकला वाटते. भारतात अगदी सुरुवातीपासून इन्स्टाग्राम हा मोठय़ा प्रमाणावर लाइक्सचा आणि लव्हचा खेळ आहे, उद्या हा खेळ बंद झाल्यास त्याचा मुख्य परिणाम हा इन्फ्लुएन्सर्सची लोकप्रियता कमी होण्यात आणि त्यांचे उत्पन्न घटण्यात होऊ शकतो. यामुळेच की काय सध्या अनेक इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्स हे प्रचंड काळजीत असून, उद्या आपले हे व्हच्यरुअल दुकान उठले तर खर्या आयुष्यात काय करायचे या संभ्रमात आहे. शेवटी इन्स्टाग्राम हे मृगजळ आहे आणि त्या मृगजळाच्या मागे धावणार्यांच्या लाइक्सचा खेळ बंद झाला तर हे मृगजळ आटून गेल्यावर तिथे शिल्लक राहिलेल्या जागेचे वाळवंट होईल की इन्स्टाग्रामचे वापरकर्ते भानावर येऊन वास्तवाला सामोरे जातील हे पाहणे कुतूहलाचे असेल..
फोटो टाकणारे आणि फक्त ‘लाइक’ देणारे!इन्स्टाग्रामवर फोटो टाकून व्यक्त होणार्यांची एकूण संख्या आणि अशा फोटोंना लाइक देणार्यांची एकूण संख्या यात प्रचंड तफावत आहे. त्याचवेळी ज्यांच्या फोटोंना मोठय़ा प्रमाणावर लाइक्स येतात त्यांच्यासाठी प्रसिद्धी आणि पैशांच्या अनेक संधीही उपलब्ध आहेत. व्यक्तिपूजकांच्या आपल्या देशात इन्स्टाग्रामवर हजारोंनी लाइक्स घेणारी एखादी व्यक्ती ही सिनेमाच्या एखाद्या स्टारप्रमाणेच सेलिब्रिटी असते आणि अशा सेलिब्रिटीच्या आवतीभोवती गोंडा घोळणार्या लाखो लोकांचा एक मोठा समूह असतो. अशा समूहाला मग या सेलिब्रिटींच्या फोटोज आणि व्हिडीओजच्या मदतीने वैयक्तिक जाहिराती दाखवून मोठय़ा प्रमाणावर पैसे कमाविणार्या कंपन्या आणि व्यक्तीही अस्तित्वात आहेत. इन्स्टाग्रामच्या या सेलिब्रिटींना इन्फ्लुएन्सर्स असे म्हटले जाते. हे इन्फ्लुएन्सर्स इन्स्टाग्रामच्या बाहेरच्या जगात सिनेमा, सिरिअल्स, क्रिकेट, फिटनेस आणि मॉडेलिंग क्षेत्नात कार्यरत असू शकतात तर काही इन्फ्लुएन्सर्सचे अवघे विश्व फक्त इन्स्टाग्रामपुरतेच अस्तित्वात असते. हे इन्फ्लुएन्सर्स काय खातात, काय पितात, कुठल्या प्रकारचे कपडे घालतात, कुठल्या ठिकाणी फिरायला जातात आणि त्यांच्या लाइफ स्टाइलमधल्या इतर असंख्य लहान-मोठय़ा गोष्टींचे फोटोज इन्स्टाग्रामवर टाकीत असतात. कुठले फोटो होतात इन्स्टाग्रामवर शेअर?वरवर पाहता इन्स्टाग्रामचा उद्देश हा फोटोज शेअर करण्यासाठी असला तरी त्यात सरसकट कुठलेही फोटो शेअर केले जात नाहीत. शेअर केले गेले तरी ते लोकप्रिय होतीलच असेही नाही. बरेचसे फोटो मुख्यत्वे फॅशन, हेल्थ अँण्ड फिटनेस, ट्रॅव्हल, फूड आणि फोटोग्राफीशीच संदर्भात असतात आणि ती टिपण्यासाठी मुख्यत्वे मोबाइलमधल्या कॅमेर्याचा वापर केलेला असतो. यापैकी फॅशनच्या नेटवर्कमध्ये फोटो टाकण्यात तरु णींचा सहभाग मोठा असतो. इन्स्टाग्रामवर आपली छबी लोकप्रिय होण्यासाठी महागडे आउटफिट्स, उच्चकोटीचा मेकअप आणि बरेचदा अंगप्रदर्शनाचा आधार घेतला जातो. हे अंगप्रदर्शन अनेकदा आपल्या फॅन्सच्या लैंगिक भावना चाळविण्याकरिता वापरले जाते, तरीही ते अश्लील न होऊ देता त्यात कलात्मकता साधण्याचा इन्फ्लुएन्सर्सचा प्रयत्न असतो. एरव्ही टीव्ही आणि सिरिअल्समध्ये काम करताना पारंपरिक आणि शालीन भूमिका करणार्या कितीतरी स्रिया इन्स्टाग्रामवर मात्न ग्लॅमरस आणि अत्याधुनिक पेहरावात वावरतात. कित्येकदा आपल्या घरंदाज रोलसाठी प्रसिद्ध असणार्या स्रियांच्या इन्स्टाग्रामवरील हॉट फोटोंची माध्यमात चर्चा होते ती याचमुळे. फिट आणि आकर्षक दिसण्यासाठीचे फंडे!इन्स्टाग्रामवर आकर्षक दिसण्यासाठी कॅमेर्यासमोर पोझ करण्याच्या आणि फिल्टर्स वापरण्याच्या अनेक युक्त्या उपलब्ध आहेतच, याशिवाय मेहनतीचे व्यायामप्रकार आणि कसरती करून स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जिवापाड मेहनत घेणारे जीवही इथे आहेत. काही स्रिया इतक्या जास्त शारीरिक मेहनत करीत असतात की त्यांच्या फोटोंचा मूळ उद्देशच मुळी फिट आणि हेल्दी दिसण्याचा असतो. अशा स्रिया मुख्यत्वे जीम ट्रेनर वा फिटनेस एक्स्पर्ट असतात आणि वजन कमी करण्यासाठी व आकर्षक दिसण्यासाठी इतर वापरकर्त्यांना प्रेरणा देत असतात. सोबत प्रोटीन पावडर, डाएट सप्लिमेंट्स आणि फिटनेसची निरनिराळी प्रॉडक्ट्स प्रमोट करीत असतात.मोठय़ा शहरांतली हॉटेल्सही चटावली इन्स्टाग्रामला!इन्स्टाग्रामचा दुसरा एक मोठा वर्ग निरनिराळ्या अन्नपदार्थांचे फोटो टाकण्यात धन्यता मानतो. यात आधी कधीही न ऐकलेले वा पाहिलेले पदार्थ फोटोंेतून तुमच्या समोर येऊ शकतात. या अन्नाची मांडणी ही मुख्यत्वे फोटोंकरिता केलेली असून, त्याची सजावट हा स्वतंत्न अभ्यासाचा विषय आहे. यातले कितीतरी पदार्थ सेलिब्रिटीजला आवडतीलच असे नाही; पण त्याच्या फोटोजला लाखो लाइक्स येत असल्याने असे महागडे पदार्थ आवर्जून ऑर्डर केले जातात आणि फोटो काढून झाल्यानंतर घास, दोन घास खाऊन कित्येकदा तसेच उष्टे टाकून दिले जातात. मोठय़ा शहरांमधली कितीतरी हॉटेल्स आता इन्स्टाग्रामला सरसावली असून, फक्त वेगळ्या चवीचेच नाही तर इन्स्टाग्रामवर आकर्षक दिसतील असे पदार्थच तिथे बनविले जातात, ज्याची किंमत अर्थात नेहमीच्या अन्नापेक्षा कितीतरी पटींनी जास्त असते. ‘लाइक’साठी धडपडणारे फोटोमग्न लोक!जे फूड फोटोग्राफीच्या बाबतीत घडताना दिसते, तेच ट्रॅव्हल्स आणि प्रेक्षणीय स्थळांच्या बाबतीतही. आजकाल सुटीमध्ये कुठे फिरायला गेल्यास प्रेक्षणीय स्थळांचा मनमुराद आनंद घेण्याऐवजी अनेक लोक त्या स्थळांभोवती आपले निरनिराळे फोटो काढण्यात व्यग्र असतात, आपल्याला मनाजोगे फोटो मिळाल्यानंतर त्या स्थळाशी कुठलेही विशेष नाते न ठेवता इन्स्टाग्रामची मंडळी पुढच्या स्थळांकडे वळतात, कुठेही फिरायला गेल्यानंतर जास्तीत जास्त जागांवरती जाऊन जास्तीत जास्त फोटो काढणे हा या लोकांचा अंतिम उद्देश असतो. अर्थात, इन्स्टाग्रामच्या पलीकडेही असे फोटोमग्न लोक प्रचंड प्रमाणावर वाढले आहेत. ज्यामुळे प्रवासातून निखळ आनंद आणि माहिती शोधू पहाणार्या अल्पसंख्य लोकांची चिडचिड होऊ शकते. इन्स्टाग्राम ट्रॅव्हल इन्फ्ल्युएन्सर निरनिराळी टूर पॅकेजेस, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे प्रमोशन्स करतात, ज्यातून त्यांना भरगच्च मोबदलाही मिळतो.rahulbaba@gmail.com(लेखक समाजमाध्यमांचे अभ्यासक आहेत.)