- समीर मराठे
भारतात सोनं म्हणजे अंगावर घालण्याचा केवळ एक दागिना नाही. ती संस्कृती आहे, संस्कार आहे, प्रतिष्ठा आहे, भावना आहे, विश्वास आहे, आपुलकी आहे, जवळीक आहे, सौभाग्यलेणं आहे, पैसा आणि संपत्ती आहे, अडीअडचणीच्या काळात कामाला येणारी हक्काची बॅँक आहे.सोनं म्हणजे भारतीयांसाठी इतकं सारं असूनही अजूनही बरंच काही आहे आणि तरीही सोन्याची ओळख इथेच संपत नाही. खाणीतून निघणार्या अशुद्ध सोन्यापासून तर त्याचे दागिने बनणं आणि आपल्या अंगावर ते मिरवणं. इथपर्यंतचा सारा प्रवास अत्यंत रंजक आहे. भारतात सोन्याचं उत्पादन जवळपास शून्य आहे. भारतातल्या मोजक्या सोन्याच्या खाण्ींमधून होणारं थोडंफार उत्पादन आज पूर्णत: बंद आहे. मात्र जगात जेवढय़ा सोन्याचं उत्पादन होतं, त्याच्या सुमारे 22 ते 25 टक्के मागणी एकट्या भारताची आहे, असते हा इतिहास आहे.जगात सर्वोच्च शुद्ध प्रतीचं सोनं वापरणारा देशही भारतच आहे. यानंतर दक्षिण आशिया, मध्य पूर्वेतील काही देश आणि थायलंड. भारतासारख्या देशांत सोन्याचं रिसायकलिंगही मोठय़ा प्रमाणावर होतं. जुने दागिने आटवले जातात. त्याचं शुद्ध सोनं तयार केलं जातं आणि ते पुन्हा मार्केटमध्ये येतं.पूर्वी सोन्याचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जात होतं ते दक्षिण आफ्रिकेत. दुसर्या क्रमांकावर होता चीन. अलीकडच्या काळात मात्र सोने उत्पादनात चीननं दक्षिण आफ्रिकेचा पहिला क्रमांक स्वत:कडे घेतला असून, दक्षिण आफ्रिका नवव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. सध्या सोने उत्पादनात रशिया तिसर्या क्रमांकावर आहे. मात्र चीन आणि रशियात नेमकं किती सोनं उत्पादन होतं, याची विश्वासार्ह माहिती जगाला फारशी समजत नाही. मात्र सोन्याचा हा प्रवास कायमच दक्षिण आफ्रिका, चीन, युरोप आणि त्यानंतर आशिया असा राहिलेला आहे.सोनं शुद्ध केल्यानंतर बनवल्या जाणार्या चिपा पहिल्यांदा युरोपच्या बाजारपेठेत जातात. या सोन्याच्या देवघेवीचं जगातलं सर्वात मोठं केंद्र लंडनमध्ये आहे. तिथून ते सगळ्या जगात पाठवलं जातं. स्क्रॅप गोल्डचं जगातलं सर्वात मोठं मार्केट मात्र स्वीत्झर्लंडमध्ये आहे. स्क्रॅप गोल्ड आधी स्वीत्झर्लंडला येतं आणि त्यानंतर मग ते परत जगातल्या इतर ठिकाणी जातं.भारतात पूर्वी सोन्याचा धूर निघत होता, म्हणतात. याचा अर्थ कसा लावायचा?भारत हा कायमचा सोन्याचा मोठा खरेदीदार असल्याचा इतिहास आहे. सिंधू संस्कृतीपासून, अगदी अडीच हजार वर्षांपूर्वीही भारतात सोन्याचा व्यापार होत होता. याचे पुरावे उपलब्ध आहेत.भारतातून सोन्याचा धूर निघत होता याचा अर्थ, भारतात त्याकाळी खूपच समृद्धी होती. भारताचा इतर देशांशी तेव्हा जो काही आंतरराष्ट्रीय व्यापार व्हायचा, तेव्हादेखील आपल्याकडचे व्यापारी आपल्या वस्तूंच्या बदल्यात सोन्यालाच सर्वाधिक पसंती द्यायचे. सोनं हे वस्तुविनिमय आणि चलनाचं सर्वात मोठं माध्यम होतं. भारतीयांची सोन्याची ही क्रेझ कधीच कमी झाली नाही. दिवसेंदिवस ती वाढतेच आहे. वेगवेगळ्या कारणांनी, भाववाढीमुळे, महागाईमुळे त्याची खरेदी कमी-अधिक होत असेल, पण भारतीयांच्या मनातलं सोन्याचं मोल आजवर कधीच कमी झालेलं नाही. पुढेही ते कमी होईल याची शक्यता नाहीच.सोनं हा कायमच आपल्या काळजाचा तुकडा राहिलेला आहे आणि त्यानं सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याची, मोलाची भर घातलेली आहे.आज लक्ष्मीपूजन! सोनेरूपी ही लक्ष्मी आपल्या सार्यांच्याच अंगणात, दारात कायम नांदो, ही शुभेच्छा!.
भारतीयांच्या अंगावरदहा लाख कोटींचं सोनं!भारत हा जगातला प्रमुख सोने खरेदीदार आहे. आपला देश दरवर्षी सरासरी तब्बल सातशे टन सोनं आयात करतो. दरवर्षी ही सोनेखरेदी साधारण सहाशे ते नऊशे टनापर्यंत असते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात; 1991 नंतर सोन्याच्या अधिकृत आयातीला प्रारंभ झाला. त्यावेळी सोन्याची इम्पोर्ट ड्यूटी होती एक टक्का. आज हीच इम्पोर्ट ड्यूटी तब्बल 12.5 टक्क्यांवर गेली आहे. यातून सरकारला दरवर्षी किमान 25 हजार कोटी रुपयांची मिळकत होते.एका अंदाजानुसार आजच्या घडीला तब्बल तीस हजार टन सोनं (पन्नास हजार टनापर्यंतही ते असू शकतं!) भारतीयांच्या अंगाखांद्यावर आहे. आजच्या घडीला त्याची किंमत किमान दहा लाख कोटी रुपये आहे!
सोन्याचा भाव कसा ठरतो ?1. सोनं हा एक दुर्मीळ धातू आहे आणि तो र्मयादित प्रमाणात उपलब्ध आहे. मागणी आणि पुरवठय़ावर त्याचे दर अवलंबून असतात. मात्र सोन्याच्या दराच्या बाबतीत तेवढाच एक घटक जबाबदार असत नाही. 2. सोनं हे अतिशय संवेदनशील असं उत्पादन आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठेही अशांतता, अस्वस्थता निर्माण झाली, की सोन्याच्या भावावर त्याचा परिणाम होतो.3. सध्या सोन्याचे भाव जे वाढलेले दिसतात, त्याला इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कारणीभूत आहे. यंदा सोन्याची आयातही घटली आहे आणि भाव चढे असल्याने सोने व्यवसायातही जवळपास 33 टक्क्यांची घट झाली आहे. 4. जगात कुठेही तणाव वाढला की, राष्ट्रांना आपापली संपत्ती, व्यापार आणि चलनाची काळजी वाटू लागते. या भीतीपोटी सोन्यातली गुंतवणूक वाढते. जागतिक मानसिकतेशी याचा खूप जवळचा संबंध आहे. जसं, आपल्याकडे कांद्यावर नियंत्रण आणणार म्हटलं, की लगेच कांद्याचे भाव वाढतात, तसं!.5. सोन्याचे भाव मुख्यत: ठरतात, ते लंडन बुलियन मार्केटमध्ये. दिवसांतून दोनदा तिथे भाव ठरतात. जगातल्या सोनेबाजारातले दरही त्यानुसार ठरतात.
एक ग्रॅम सोन्यापासून 3.5 किमी रुंदीची तार!1. सोन्याचे प्रमुख वैशिष्ट म्हणजे त्याच्या अतिशय बारीक तारा काढता येतात. 1 ग्रॅम सोन्याची 3.5 कि.मी. लांबीची तार तयार करता येते. तसेच 0.0002 मि.मि. इतक्या पातळ जाडीचे त्याचे पत्रे तयार करता येतात. 2. उष्णता व विद्युत यांचा सोने हा धातू उत्तम वाहक आहे.3. रासायनिकदृष्ट्या हा धातू क्रियाशील आहे. आम्ल किंवा अल्क यांचा त्यावर काहीही परिणाम होत नाही. मात्र नायट्रिक अँसिड व हायड्रोक्लारिक अँसिड यांच्या संयुक्त द्रावात तो विरघळतो. त्यास अँक्वारेजिया असे म्हणतात.
दागिने 22 कॅरेटमध्येच का तयार करतात?सोने हा धातू ज्यावेळी शुद्ध स्वरूपात असतो त्यावेळी तो अतिशय मऊ व लवचीक असतो. त्यामुळे त्याचे दागिने तयार करणे सोयीचे नसते. अर्थात, शुद्ध सोन्याचे दागिने तयारच होऊ शकत नाही, असे नाही. पुतळ्यापान, चितांग, पोहेहार, गोफ, कडी इ. दागिने पूर्वापारपासून शुद्ध सोन्यामध्ये तयार करण्याची पद्धत आहे; परंतु कालमानानुसार ग्राहकांच्या आवडी-निवडी बदलत असतात. शुद्ध सोन्यामध्ये दागिने तयार केल्यास या गरजा (उदा. कलाकुसर केलेले नाजूक परंतु टिकाऊ असे दागिने) पूर्ण करू शकत नाही. कारण शुद्ध सोन्यावर उत्तम कलाकुसर करता येत नाही. तसेच त्यावर केलेले तासकाम लवकर झिजून जाते. शुद्ध सोन्याच्या वस्तूंचा दररोज वापर असल्यास घर्षणानेसुद्धा दागिन्यांची झीज होते. उदा. 100 ग्रॅमच्या 4 बांगड्या वर्षभर हातामध्ये वापरल्यास या बांगड्यांचे वजन वर्षअखेरीस 1 ग्रॅम किंवा त्याहून जास्त झीज होऊ शकते असा अनुभव आहे, म्हणून रोज किंवा सतत वापरात येणारे दागिने 22 कॅरेटमध्येच तयार करतात.कॅरेट हे सोन्याची शुद्धता मोजण्याचे मोजमाप आहे. सुवर्णकार किंवा दुकानदार सोन्याची शुद्धता कसोटीवर तपासतात. सर्वात शुद्ध सोने 24 कॅरेटचे समजले जाते. त्यामध्ये 1000 भागात 995 ते 999.9 इतकी शुद्धता असते. (सोन्याची शुद्धता 1 कॅरेट = 4.166 टक्के)कॅरेट हिर्याचे वजन मोजण्यासाठी वापरतात. सर्वात शुद्ध सोने 24 कॅरेट आहे, असे मानल्यास, कॅरेटची शुद्धता पुढीलप्रमाणे दाखवता येईल.24 कॅरेट - 99.9 टक्के23 कॅरेट - 95.8 टक्के22 कॅरेट - 91.66 टक्के21 कॅरेट - 87.5 टक्के18 कॅरेट - 75 टक्के
(पूर्वार्ध)संदर्भसहाय्य : गिरीश टकले(नाशिकच्या ‘टकले बंधू’ पेढीचे संचालक)