मुंबईतील गोरेगावचा तबेला व डेअरी चुलत्यांना देऊन टाकली. खरेतर ती आमच्या कुटुंबाची मालमत्ता होती; त्यामुळे त्यात सर्वांचाच हक्क होता. चुलते रामनरेश सिंहही मालमत्ता घेऊन गप्प बसले नाहीत. पुढे चार-पाच वर्षांनी ते आजारी पडले. मुळचे उत्तर प्रदेशातील भदोई जिल्ह्यातील व बोरिवलीचे आमदार घनश्याम दुबे यांच्यामार्फत त्यांनी मला निरोप पाठवला. मुंबईला बोलवून घेतले. ते अंथरुणाला खिळून होते. मी भेटल्यावर माझा हात हातात घेऊन त्यांनी पुन्हा माझ्याकडे एक वचन मागितले. माझ्या मृत्यूनंतर तू मुंबईला येऊन माझ्या मुलाला त्रास देऊ नकोस. मी त्यांना माझ्या हातून तसे कधीच घडणार नाही, असे सांगितले. मुलाला त्रास द्यायचा असता, तर मी मुळातच माझा हिस्सा सोडला नसता. जी गोष्ट मी स्वत:हून मनाने केली आहे, त्याबद्दल तुम्ही कधीच मनात संशय बाळगू नका, असा विश्वास दिला. पुढे चुलत्यांचे निधन झाले.पुढे ही जागा चुलत्याच्या मुलानेही ठेवली नाही. ती त्याने विकली. त्या जागेला १९९० च्या सुमारास ४-५ कोटी रुपये मिळाल्याचे समजले. या मालमत्तेत आमच्या अन्य चुलत्यांचाही हक्क होता; परंतु त्यांनाही काही मिळाले नाही. त्यांनी मग मला धरले. तुला हिंदकेसरी एकट्या रामनरेश सिंह यांनी केले नाही. आम्हीही तुझ्या पाठीशी होतो. मग तू मुंबईतील मालमत्तेचा हक्क का सोडलास, असे त्यांचे म्हणणे होते. मी हिंदकेसरी झाल्यानंतर गावोगावी होत असलेल्या अनेक कुस्ती मैदानात मला सन्मानाने बोलविले जाई. तसे ते आजही बोलविले जाते.कुस्तीचा बक्षीस समारंभ माझ्या हस्ते होई व लोक हौसेखातर त्यावेळी पाचशे-हजार रुपये सन्मान म्हणून पाकिटात घालून देत असत. अशा पैशांतून मी कोल्हापुरात ३-४ प्लॉट घेऊन ठेवले होते. चुलत्यांचा पैशासाठी फारच रेटा वाढल्यावर हे प्लॉट मी विकले व चुलत्यांना पैसे दिले. मुंबईतील जागेतून हक्क सोडल्याबद्दल पत्नी किंवा मुलांकडून कधीही मला कुणी तुम्ही असे का केले म्हणून विचारले नाही. परंतु आईला तसे केलेले आवडले नाही. आई मला पाहून चिडून म्हणायची, ‘ये देखो आया धर्मराज...’ त्यावेळी मी आईला सांगितले होते, की केलेले चांगले कर्म कधी वाया जात नाही. याचे फळ मला कधी ना कधी मिळेल. आपण रोजच्या व्यवहारात जे पेरतो, तेच उगवते अशी माझी कायमच भावना राहिली आहे; त्यामुळे जेवढे आपल्या हातात आहे, तेवढे चांगलेच करायचे, असा प्रयत्न मी कायमच करत आलो आहे.मागच्या सहा महिन्यांपूर्वी एकदम आजारी पडलो. गेल्याच वर्षी मुलीचे लग्न झाले. त्यामध्ये मला बराच खर्च करावा लागला; त्यामुळे सुरुवातीच्या आजारपणात माझ्याकडील पुंजी संपली. आता पुढील उपचार कसे घ्यायचे, असा प्रश्न माझ्यासमोर होता. मदतीसाठी ‘लोकमत’ मधून आवाहन करावे, असा विचार पुढे आला. परंतु माझी त्यास तयारी नव्हती. कारण जळगावला १९६६ ला जेव्हा महाराष्ट्र केसरीसाठी मी अंतिम लढतीत पोहोचलो तेव्हा परराज्यातून आलेल्या पैलवानांस महाराष्ट्र केसरीचा किताब कसा देणार, असा प्रश्न उपस्थित झाला. कोल्हापूर महापालिका जेव्हा कोल्हापूरभूषण पूरस्कार देत होती, तेव्हाही माझ्याबाबतीत असेच घडले. मी कोल्हापूरवर, इथल्या लालमातीवर एकतर्फी प्रेम केले आहे. त्यामुळे बातमी दिली आणि कुणी मदतीला आले नाही, तर त्यासारखे वाईट काही नाही. त्यामुळे पुन्हा परीक्षा नको, असे मला वाटायचे. परंतु मुलांशी बोलून ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध केली आणि चमत्कारच घडला. ‘लोकमत’ परमेश्वराच्या रूपात माझ्या मागे उभा राहिला. कोल्हापूरने माझ्या बाबतीतील परकेपणाची भावना पुसून टाकली आणि भरभरून मदत केली. कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुण्यासह राज्यांतून अनेक ठिकाणांहून रोख मदत झाली.शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व शाहू महाराजांचे वारसदार समरजित घाटगे हे स्वत: माझ्या घरी आले. त्यांनी मी हयात असेपर्यंत औषधोपचाराची जबाबदारी घेतली. शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके हे दोनवेळा बघायला आले व शासनाकडून मदत मिळवून देतो, असे आश्वासन दिले. मी काय त्यांच्या मतदारसंघात नाही. त्यामुळे या मदतीबद्दल सुरुवातीला मीदेखील साशंक होतो; परंतु भेटून गेल्यानंतर पाचव्या दिवशी त्यांनी शासनाच्या मदतीचा धनादेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मला दिला. स्वत:ची प्रकृती बरी नसतानाही ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे हे रात्री १0 वाजता घरी येऊन मदत देऊन गेले.आयुष्यभर कुस्तीवर जीवापाड प्रेम करणारे पुण्याचे अण्णासाहेब पठारे, पुण्यातील गोकुळ तालमीचे वस्ताद शामराव यादव यांनीही लाख-लाख रुपये आणून दिले. मदतीसाठी महाराष्ट्र धावून आला. मी कोल्हापूरवर जेवढे मनापासून प्रेम केले, त्याची सव्याज परतफेड झाली. कोल्हापूर हे असे शहर आहे, की ते तुमच्या कर्तृत्वाला सलाम करते. मदतीला धावून जाण्याची या शहराची संस्कृतीच आहे, त्याचाही अनुभव आला. आपण आयुष्यात जे काही चांगले वागलो, त्याची उतराई झाली.- शब्दांकन : विश्वास पाटील
पेरले तेच उगवते...! हिंदकेसरी दीनानाथसिंह यांची जीवन कहाणी- लाल माती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:51 AM