शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
2
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
3
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
4
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
5
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
6
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
11
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
16
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
17
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना
18
हेमंत सोरेन २८ ला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पत्नी कल्पना यांनाही बनविणार मंत्री
19
आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता?
20
दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही

असं आहे आजचं नाटक

By admin | Published: December 06, 2014 5:28 PM

आजचं मराठी नाटक हे नवीन विषयांचा शोध घेऊ पाहत आहे. मानवी मनाच्या अंतरंगाचा शोध, बदलती सामाजिक मूल्यं, स्त्री-पुरुषांच्या संबंधातली गुंतागुंत, स्त्रीच्या बदलत्या जाणिवा यांचा वेध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्नही करीत आहे. तरीही सारंच आलबेल नाही. प्रेक्षकांना आकर्षित करण्याचं मोठं आव्हान तर आहेच, त्याच्या जोडीला चांगल्या संहितांची वानवाही आहे. या वस्तुस्थितीची मीमांसा.

सुरेश खरे

 
मराठी रंगभूमीला मधूनमधून ‘मरगळ यायची’ सवय आहे. यथावकाश ही मरगळ झटकली जाते आणि मराठी नाटक पुन्हा एकदा जोम धरू लागतं. हे चक्र सतत चालू असतं. आजच्या मराठी रंगभूमीची स्थिती पहिली, तर तिला मरगळ आली आहे, असं निश्‍चित म्हणता येणार नाही. पण, म्हणून ती बहरात आहे, असंही म्हणता येणार नाही. मग आजची मराठी रंगभूमी नेमक्या कोणत्या अवस्थेत आहे?
मराठी  रंगभूमीच्या अवस्थेचा विचार करताना चार अंगांचा प्रामुख्यानं विचार करायला लागतो. (प्रस्तुत विवेचनात मुख्य धारेतल्या, व्यावसायिक रंगभूमीचा विचार केला आहे. समांतर किंवा प्रायोगिक रंगभूमी हा  स्वतंत्र लेखाचा विषय आहे.)
१) संहितांचा संख्यात्मक आणि गुणात्मक दर्जा, २) निर्मितीमूल्यं, ३) प्रेक्षकांची अभिरुची, ४) नाट्यव्यवसायाची स्थिती.
१) संहितांचा संख्यात्मक आणि गुणात्मक दर्जा : व्यावसायिक रंगभूमीवर वर्षाला साधारणपणे ४0-५0 नाटकं येत असतात. नुसता संख्येचाच विचार केला, तर सकृतदर्शनी ही संख्या खूप चांगली वाटते. पण संख्या आणि गुणात्मक दर्जा यांचं प्रमाण नेहमीच व्यस्त असतं. निम्म्याहून अधिक नाटकं अतिसामान्य किंवा सामान्य असतात, पंचवीस ते तीस टक्के बर्‍यापैकी असतात आणि दहा-बारा नाटकं दर्जेदार म्हणता येतील, अशी असतात. ही संख्या फार मोठी नसली, तरी निराशजनक आहे, असं मला वाटत नाही. कारण दर्जेदार नाटकांचं प्रमाण हे नेहमीच कमी असतं, कमी राहणार. 
आजचं मराठी नाटक हे नवीन विषयांचा शोध घेऊ पाहत आहे. मानवी मनाच्या अंतरंगाचा शोध, बदलती सामाजिक मूल्यं, स्त्री-पुरुषांच्या संबंधातली गुंतागुंत, स्त्रीच्या बदलत्या जाणिवा यांचा वेध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न नव्या पिढीचे नाटककार करताना दिसतात. गेल्या काही वर्षांत, ‘यू टर्न’, ‘प्रपोजल’, ‘गेट वेल सून’, ‘सुखाशी भांडतो आम्ही’, ‘मी रेवती देशपांडे’, ‘सुखान्त’, ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’, ‘छापा काटा’, ‘मिस्टर आणि मिसेस’, ‘आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे’ अशी भिन्न विषयांवरची अनेक आशयघन नाटकं रंगमंचावर आली. त्यातील बहुतेकांना रसिकांची दाद मिळाली. विवेक बेळे, शफाअत खान, अभिराम भडकमकर, संजय पवार, जयंत पवार यांच्या बरोबरीनं मधुगंधा कुलकर्णी, इरावती कर्णिकसारख्या स्त्री लेखिका आणि विविध नाट्यस्पर्धांतून उदयाला आलेले, व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश मिळवू पाहणारे अन्य नाटककारही उद्याच्या रंगभूमीची आशास्थानं आहेत.
आजचं (चांगलं) मराठी नाटक प्रेक्षकांचा अनुनय करणारं, प्रेक्षकशरण नाही. वास्तवाला सामोरं जाणारं, प्रश्नाला थेट भिडू पाहणारं, निर्भय अभिव्यक्ती करणारं आहे. पण तरी ते अजूनही शहरी आणि मध्यमवर्गीय जीवन याच रिंगणात घोटाळताना दिसतं. ग्रामीण जीवन, तळागाळातील लोकांच्या समस्या, शोषित वर्गाचं जीवन याकडे मराठी नाटककार फारसे वळत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर संभाजी भगतसारखा नाटककार ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ आणि ‘बॉम्बे सेवन्टीन’ यासारखे विषय हाताळतो, हे लक्षणीय आहे. राजकीय विषयांचंही मराठी नाटककारांना वावडं असावं. ज्या संख्येनं राजकीय विषयांवर आणि ग्रामीण जीवनातील वास्तवतेवर मराठी चित्रपट येतात, त्या तुलनेत मराठी नाटक इतकं मागं का, हा प्रश्न पडतो.
निर्मळ, निखळ, दर्जेदार विनोद हा मराठी नाटकांतून हरवलेला दिसतो. त्याची जागा आता कमरेखालचे विनोद आणि आचरट अंगविक्षेप यांनी घेतली आहे, ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. प्रेक्षकांना चांगली विनोदी नाटकं हवी आहेत, पण आजची रंगभूमी ती देऊ शकत नाही, हे वास्तव आहे.
२) निर्मितीमूल्यं : मराठी नाटकांची निर्मिती जास्तीत जास्त देखणी करण्याकडे निर्मात्यांचा कल दिसून येतो. कित्येकदा सामान्य नाटकांचीही निर्मितीमूल्यं ही वरच्या दर्जाची असल्याचं दिसतं. व्यावसायिक रंगभूमीवर प्रदीप मुळ्ये, राजन भिसे यांच्यासारखे अनेक प्रतिभावान आणि कल्पक नेपथ्यकार नाटकाची मागणी पुरी करताना अनेक प्रयोगही करतात. त्याचा फार मोठा फायदा नाटककारांना झाला आहे. पूर्वीच्या नाटककारांना नाटकाची रचना करताना ‘लोकेशन्स’चं भान राखावं लागत असे. ‘लोकेशन्स’ची संख्या आणि नेपथ्यनिर्मितीतल्या अडचणी यांचा विचार केल्यामुळे कित्येक महत्त्वाचे प्रसंग निवेदनांतून आणावे लागत असत. आजच्या नाटककारांना याचा फारसा विचार करावा लागत नाही. नेपथ्यरचना, नेपथ्यबदल आणि प्रकाशयोजनेचं तंत्र याबाबतीत मराठी रंगभूमीनं लक्षणीय प्रगती केली आहे. त्याचा एक परिणाम म्हणून अनावश्यक ‘गिमिक्स’चा वापरही वाढला आहे. तसंच गरज नसताना नाटकात ‘ऑडिओ व्हिज्युअल्स’ आणि ‘व्हिडिओ फिल्म’ दाखवण्याची नवीन टूम म्हणजे तांत्रिक सुविधांचा दुरुपयोग आहे. याला जबाबदार दिग्दर्शक आहेत. तंत्राचा दुरुपयोग होऊ न देणं हे तेच करू शकतात.
कानेटकर, तेंडुलकर, कालेलकर यांच्या काळात दिग्दर्शनाची जबाबदारी काही मोजक्या मंडळींकडे होती. यातील काही जुन्या पठडीतले होते, तर काही नव्या विचारांचे, नव्या ‘स्कूल’चे होते. विजया मेहता, दामू केंकरे, नंदकुमार रावते, अरविंद देशपांडे ही नवीन विचारांची, तर पुरुषोत्तम दारव्हेकर, मा. दत्ताराम यांच्यासारखे अन्य दिग्दर्शक जुन्या पठडीतले. त्यांच्या दिग्दर्शनाच्या पद्धतीत फरक असला, तरी दर्जा उत्कृष्टच असायचा. आज कार्यरत असलेले विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, कुमार सोहनी, मंगेश कदम, राजन ताम्हाणे यांच्यासारखे तरुण दिग्दर्शक आघाडीवर आहेत. यापैकी बहुतेकांनी एनएसडी किंवा अशाच अन्य संस्थांतून प्रशिक्षण घेतलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मंडळी फावल्या वेळात दिग्दर्शन करीत नाहीत, तर तो त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. आजच्या मराठी रंगभूमीला चांगल्या दिग्दर्शकांची वानवा नाही.
कलावंतांच्या बाबतीत मात्र असं म्हणता येत नाही. म्हणजे चांगले कलावंत उपलब्ध नाहीत, असं नाही. पण, नवीन पिढीतल्या कलावंतांविषयी निर्माते आणि दिग्दर्शक  यांच्या अनेक तक्रारी आहेत. एक म्हणजे त्यांचं भयंकर मराठी आणि अत्यंत सदोष शब्दोच्चार. शिवाय, नाटकाच्या तुलनेत सिरिअल्समध्ये भरपूर पैसा मिळत असल्यानं त्यांचा सगळा ओढा सिरिअल्सकडे असतो. ते पुरेशा तालमी देऊ शकत नाहीत आणि प्रयोगांसाठी तारखाही देऊ शकत नाहीत. कित्येक नाटकं योग्य ते सर्मथ कलाकार न मिळाल्यामुळे पडून राहतात किंवा तडजोड करून सादर केली जातात, ही परिस्थिती निराशजनक आहे.
३) प्रेक्षकांची अभिरुची : वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, मधुसूदन कालेलकर, बाळ कोल्हटकर या नाटककारांनी त्यांच्या काळात आपला स्वत:चा एक स्वतंत्र ठसा उमटवला. या प्रत्येक नाटककाराची शैली भिन्न होती, विषय वेगळे होते आणि त्यांचा प्रेक्षकवर्गही वेगळा होता. आजचा मराठी नाटकांचा प्रेक्षक नाटककाराचं नाव पाहून जात नाही. तर, कलाकारांची नावं पाहून जातो. बदलत्या जीवनशैलीबरोबर अभिरुची बदलणं अपरिहार्य आहे. वाहिन्यांवरच्या मालिकांनी सर्वसामान्य प्रेक्षकांची अभिरुची बदलली आहे. पण, नाटकाचा सुज्ञ प्रेक्षकवर्ग मात्र बदलला नाही. चांगल्या नाटकाला जी गर्दी होते ती पहिल्या दहा-बारा रांगांतल्या प्रेक्षकांची. मागील सर्व रांगांत तुरळक प्रेक्षक आणि बाल्कनी चक्क बंद. गंभीर, अंगावर येणारी नाटकं प्रेक्षकांना आवडत नाहीत. नाटकाच्या प्रेक्षकांत ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक, तरुण प्रेक्षक अगदी कमी, अशी स्थिती आहे.
४) नाट्यव्यवसायाची स्थिती : वर्तमानपत्रांतल्या पानं भरभरून जाहिराती पाहिल्या, की नाटकाचा धंदा फार जोरात चालला आहे, असं वाटतं. पण, वास्तव फार वेगळं आहे. हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकी नाटकं बर्‍यापैकी धंदा करतात. थिएटरची जबरदस्त भाडी, न परवडणारे जाहिरातींचे दर, कलावंतांचं वाढलेलं मानधन, स्पर्धेमुळे वाढलेला अवाढव्य निर्मिती खर्च आणि कमी झालेलं उत्पन्न याची तोंडमिळवणी करताना निर्माता मेटाकुटीस आलेला आहे. तरीही तो आपलं गाडं कसंबसं पुढे रेटतो आहे.
आज मराठी रंगभूमीला खरं आव्हान आहे ते  प्रेक्षक मिळवण्याचं, तरुणाईला आकर्षित करण्याचं. तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी त्यांचे विषय, त्यांच्या समस्या, त्यांना आपली वाटतील अशी नाटकं रंगभूमीवर यायला हवीत. हे आव्हान नाटककारांना आहे. चांगल्या, दर्जेदार संहितांची संख्या वाढली, नवीन तरुण प्रेक्षकांची संख्या वाढली, की मराठी नाटक पुन्हा जोम धरू लागेल. चांगल्या दर्जेदार संहितांचं दुर्भिक्ष हे मराठी रंगभूमीचं मूळ दुखणं आहे. उपाय त्यावर शोधायला हवा. वरवरच्या मलमपट्टय़ांनी काही फरक पडेल, असं वाटत नाही.
(लेखक ज्येष्ठ नाटककार आहेत.)