- प्रवीण दवणे
प्रकाशाचा उत्सव डोळ्यांत घेऊन तो निघून गेला. त्याच्या मनात नव्याने जागलेल्या जिद्दीच्या बिया मला जाणवल्या. घरी आला तेव्हा काहीसा उदास, आयुष्यात आता काहीही करायचं उरलं नाही, अशा आत्मतृप्ततेनं थांबलेला; पण निघताना, अरे, या अस्वस्थतेचीही एक संपत्ती होऊ शकते, या विश्वासाने थोडा उजळलेला! संवेदनशील व बुद्धिमान तरुणाईच जणू त्याच्या रूपाने बोलू पाहणारी, काहीशी आक्रमक, तर्काला धरू पाहणारी; पण भावनेच्या जगाला हळूच निरोप देणारी, प्रॅक्टिकलतेचाच एक टेंभा मिरविणारी; पण सावध. इमोशनल असावं का, या संभ्रमात असणारी..!
पुन्हा माझ्या एकट्याच्या जगात तो जणू नव्याने उतरला. त्याचे तिरसटलेले शब्द पुन्हा नादावले.
त्याचं स्वत:वरचं रागावणं, हे तेव्हाही स्वत:वरचं वाटलं नव्हतं. एवढय़ा ओतप्रोत भरलेल्या ऊज्रेचं करायचं काय, ही खोल खंत त्या रागावण्यात डोकावणारी. आताच लाखभर पगार. ‘आई-बाबांनी आधीच माझ्यासाठी डबल बेडरूम फ्लॅट घेऊन ठेवलेला. आता उरलं काय ते लग्न. बस्स, संपलं आयुष्य? खूप पगार, फोर व्हीलर, फ्लॅट, लग्न एवढय़ाचसाठी लाइफ- वयाची २२-२३ वर्षे. मार्कांच्या रॅट रेसमध्ये खूपदा जिंकलो. लगेच प्लेसमेंट, जॉब हजर, फॉरेन चान्स. सगळं एखाद्या जस्ट लाइफ फेरिटेल! इज धिस अ लाइफ? नो स्ट्रगल. कुछ नही अंकल, तुमची जनरेशन तरी आफ्टर सिक्स्टी रिटायर होतेय; पण माझी पंचविशीलाच.. फार तर थर्टी! १३-१४ तास जॉब! मार्केटिंग फंडा! खूप सारी सेव्हिंग. अंकल, ही हॅप्पी दिवाळी आहे ना, ती एक ड्रामा वाटते.’
‘दिवाळी.. नाटक?’
‘मग काय, स्वीच ऑन करावी, तशी दोन दिवस येते काय न् मग ऑफ होते काय. दिवाली का फिलिंग लगना चाहिये यार!’ त्याचं ते स्वत:शीच ‘यार’ बोलणं मजेशीर वाटलं. ते दिवाळीचं औपचारिक ‘ऑन-ऑफ’ हेही खास त्याच्या पिढीचं वाटणारं. थोडं निराशेचं, पण नवं काही तरी ‘थ्रिल’ आता सणासमारंभात हवंय, हे स्पष्टपणे सुनावणारं. पण अगदी नकळत दिवाळीवर नवं भाष्यच केले होतं की त्यानं! दिवाळी कशी थ्रिल वाटली पाहिजे! काही तरी हिमतीनं मिळवून आणल्यासारखी! रेडिमेड सुखाचं ताट म्हणजे दिवाळी नाही; कष्टातून-घामातून उगवणारी मोत्याची कणसं म्हणजे दिवाळी!
..तो म्हणालाही, ‘डॅड-ममाला दोन दिवसच सुटी. आणून ठेवलंय सगळं, चितळेकडनं. कधी वाटतं, चितळेकडं जन्माला यायला हवं होतं. निदान, रवा भाजतानाची, लाडू वळतानाची मजा तरी बघता आली असती. आता आमच्याकडे एक किलो चिवडा, करंजी, लाडू पार्सल तयार. ‘झी’वर पिक्चर बघत दिवाळी सेलिब्रेशन. एक एसएमएस ‘दिवाळी बेस्ट विशेस’ टाइप करून सेंड ऑल केलं, की मामला खतम. अंकल, कुछ तो बोलो, अँम आय राँग?’
त्यानं थेटच विचारलं होतं आणि मला त्याचं उत्तर देणं भागच होतं; कारण त्याची दिवाळीला हरकत नव्हती. सणांचं जे सपाटीकरण झालंय, त्यावर तो नाराज होता. त्याच्या नजरेत दिवाळी म्हणजे काही तरी ग्रेट असं होतं; पण प्रत्यक्षात त्याला ती नुसती फॉर्मेलिटी वाटत होती आणि विशेष म्हणजे त्याला दिवाळीचा नवा थरार शोधायचा होता.
त्याला रेडिमेड फराळाची, छापील एसएमएसची दिवाळी नको होती. त्यापलीकडे काही शोधावं, ही त्याची ओढ जाणवत होती आणि त्यात मला नव्या तरुण समाजाच्या संवेदनांची प्रकाशरेषा जाणवत होती. त्याला फराळ होत असतानाचा अनुभव हवा होता. त्याला माणसं खरीखुरी भेटायला हवी होती. त्याला नुसती चार भिंतीतला सिनेमा बघत हरवणारी दिवाळी नको होती. त्यापलीकडे काही तरी नवं जाणवू देणारी म्हणजे दिवाळी, हे त्याच्या कल्पनेत होतं.
त्याच्या छेडण्यानं काही क्षणांचं स्मरणरंजन मी करून घेतलं.
बालपणी चाळीतल्या प्रत्येक घरातून वेगवेगळ्या पदार्थांच्या वासांच्या पायघड्यांवरून दरवळत येणारी दिवाळी, चव कशी झालीय म्हणून होण्याआधी तळहातावर गरम चकल्यांची खुसखुशीत दिवाळी, वडिलांच्या पगारातील बजेटमध्ये न परवडणारे फटाके पाहून कोमेजणारी दिवाळी, मग मामा खास फटाक्यांची पिशवी घेऊन येई, तेव्हा अनाराचं झाड होऊन उसळलेली दिवाळी..!
चटकन मी भूतकाळातून एक छोटी शतपावली घालून आलो न् समोर वर्तमानकाळासारखा तो!
इवल्या इवल्या गोष्टीतले आनंद आता मागे पडले; पण या तरुणाईचे वाट पाहण्यानंतर काही मिळण्याचे आनंदच नंतरच्या काळाने काढून घेतले. जस्ट लाइक फेरिटेल.. निव्वळ परिकथेतल्या स्वप्नासारखं आयुष्य आता विशी-पंचविशीची पिढी नाकारू पाहतेय. कशात हरवतेय त्यांची दिवाळी?
खोल तहानेनंतर पाण्याचा होणारा स्पर्श आत पूर्ण जाणवतो, पुलकित करतो. मधल्या पिढीनं नव्या पिढीची तहान काढून घेतली. त्यांच्यासाठी म्हणून आम्ही जे सुखवस्तू जग उभं केलं, ते झालं आमचं आयुष्य! त्या आयुष्यात पुढच्या पिढीसाठी आम्ही काही केले, या अहंकाराचा एक प्लॅस्टिकचा पुष्पगुच्छ!
पण, त्यांना याही पुढे वेगळा समाज आहे. शरीर, घर-वाहन- परदेश, पैसा याही पलीकडे पसरलेल्या समाजातली खूप वेगळ्या प्रकारची काही आयुष्ये आहेत आणि त्यासाठी तुमची उमेद आहे. हा नव्या सशक्त जाणिवांचा दीपोत्सव देण्यात आमची पिढी कमी पडली. आता ती कमतरता भरून काढणं, हे आमचं उद्दिष्ट व ते जाणून तकलादू नैराश्य झटकून नवं चॅलेंज स्वीकारणं हा घराघरांतल्या नव्या पिढीचा दीपोत्सव असणार आहे.
‘तू एका वातानुकूलित शाळेत शिकतोस; पण इथे जरा- मुंबई सोडल्यावर आसनगाव, कसार्यातल्या आश्रमशाळेतल्या मुलांना भेटून मग त्यांचं आयुष्य बघ. हे सांगणं म्हणजे एक नवी पणती उजळणं आहे. तुझ्या आई-बाबांना वेळ नाही म्हणून त्यांनी फराळाचं पाकीट रेडिमेड आणणं ही वेळेशी तडजोड झाली; पण आणखी एक-दोन पाकिटं घेऊन जवळच्या ‘आधार’मधील एकाकी आजी-आजोबांनाही घेऊन जा. त्यांच्याजवळ तासभर बस. त्या अनोळखी आजीचे न् एका डोळ्यातल्या मोतीबिंदूने अगतिक झालेल्या आजोबांचे हात हातात घे, त्यांना फराळ दे! हे सांगणारं नवं पालकत्व नुसतं सुखवस्तू नसेल, सुजाण-जागृत असेल. मनापासून सांगितलं, तर ऐकणारी मूल आणि तरुण आज किती तरी आहेत. वर्गात शिक्षकांनी एखाद्या सामाजिक संस्थेसाठी पावती पुस्तक दिलं, तर न लाजता सोसायटीभर बेल वाजवून सरळ आत येऊन ‘अमुक-अमुक’ अपंग पुनर्वसन केंद्रासाठी मदत हवीय. काका, कितीची पावती करू? असं म्हणणारी खूप मुलं माझ्या-तुमच्याभोवती आहेत. आपण फुलणार्या पंखांना स्पर्धेचे चाप लावतो, उथळ अपेक्षांचा पाटा-वरवंटा डोक्यावर देतो, सारा नवांकुरी काळ कुरतडतो आणि पुन्हा म्हणतो, हो समृद्ध माणूस!
माझ्यासमोरील त्या मुलाला का वाटलं, मी पंचविशीलाच रिटायर झालोय की काय? एकीकडे कांचनसंध्येच्या तीरावरही सतत काम करणारे रवींद्रनाथ टागोर आम्हाला माहीत असतात. कुसुमाग्रज, बोरकर आम्हाला आनंदयात्री वाटतात. पंचाऐंशीच्या लतादीदीही अजूनही नव्या गीतांचे सूर आळवतात. अनुताई वाघांना कोसबाड टेकडीवर मी त्यांच्या वयाच्या पंचाहत्तरीत श्रमताना पाहिलंय. सितारादेवींचं नृत्य वयाच्या ऐंशीनंतर थिरकताना अनुभवलंय.
मग या पंचविशीच्या तरण्याबांड मुलाला आत्ताच ‘रिटायर’ झालोय, असं का वाटतंय? कारण, जाणिवांचा दीपोत्सव त्यांच्यात नीट रुजवलाच गेला नाही. या पिढीचं सेलिब्रेशन फिल्मी केलंय, ते भोवतीच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक पर्यावरणानं. त्याची उमेद नव्यानं जागवणं ही मधल्या पिढीची प्रकाशपूजा! आणि तरी ‘मोडला नाही कणा’ म्हणत, ‘पैसे नकोत सर’ असं म्हणत पुन्हा जगण्याची भरारी घेणं, हा नव्या पिढीचा प्रकाशोत्सव.’
हेच सारं त्याला गप्पांतून सांगितलं आणि त्याच्या डोळ्यांत ते चमकलं. हे चमकणं, ही माझी दीपपूजा होती. आयुष्य म्हणजे केवळ एक गुळगुळीत संगमरवर नाही. तो एक खडबडीत खडकाचा, पण सार्मथ्याचा बुरूज असलेला किल्ला आहे हेही सांगितलं. ‘वेळ मिळालाच तर यंदाच्या दिवाळीत एक पणती रायगडावर छत्रपतींच्या सिंहासनापाशी उजळ. बघ कसं वाटतं ते..? अन् जमलं तर कळव, निदान कसं वाटलं याचा एसएमएस तरी कर,’ असं सांगताच त्याला काही तरी वेगळी पाऊलवाट गवसल्याचा आनंद मला स्पष्ट दिसला. त्याच्या अस्वस्थतेतली श्रीमंती अशी अचानक उजळलेली जाणवणं हा माझ्यातल्या लेखकाचा आनंद होता. त्याच्या मनगटातल्या जिद्दीच्या बिया भविष्यात अर्थ देणार्या असतील, तर माझ्या लेखणीतली आशा वर्तमानाला आकार देणारी असेल!
प्रकाशसंगमाच्या या घाटावर आपण सारे आज एकत्र भेटलो.. जाणिवांच्या समृद्ध दीपोत्सवासाठी..
(लेखक साहित्यिक आहेत.)