- अनंत गाडगीळ
स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीकडे वाटचाल करीत असताना, संसदीय लोकशाही, गटनिरपेक्ष परराष्ट्र धोरण, संस्था व सार्वजनिक उद्योगांवर आधारित आर्थिक धोरण या स्तंभांवर भारताची निर्मिती करणाऱ्या अनेक शिल्पकारांमधे प्रामुख्याने कोण, या प्रश्नाचे उत्तर आहे पं. नेहरू. पं. नेहरूंचे एक महत्त्वाचे योगदान म्हणजे ‘समाजवाद-स्वीकार.’ महाराष्ट्रातील काही विरोधी नेते हल्ली ट्विटरवर ऊठसूट ज्या बर्नार्ड शॉ यांचा उल्लेख करतात त्याच बर्नार्ड शॉ व सहकाऱ्यांनी उभारलेल्या फेबियन सोसायटीच्या विचारसरणीने प्रभावित होऊन पं. नेहरू यांनी उदारमतवाद व समाजवाद याचा स्वीकार केला. किंबहुना, १९३१ साली कराची येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात मूलभूत हक्काचा ठराव समाजवादी तत्त्वानुसार मंजूर करीत काँग्रेसला पुरोगामी वळण देण्याची प्रेरणा ही सर्वस्वी नेहरूंची होती. आर्थिक समतेशिवाय समाजवाद, नियोजनाअभावी समाजवाद, आशयातून अर्थपूर्ण राष्ट्रनिर्मिती होणार नाही हा विचार पं. नेहरूंनी स्पष्टपणे रुजविला.
पं. नेहरूंचे दुसरे महत्त्वाचे योगदान म्हणजे काँग्रेस चळवळीला त्यांनी दिलेली आंतरराष्ट्रीय दृष्टी. आपल्या स्वातंत्र्याची चळवळ ही इंग्रज व् इतर तत्सम राज्यकर्त्यांच्या गुलामगिरीच्या जबड्यात अडकलेल्या अनेक राष्ट्रांच्या चळवळीचाच भाग, असे स्वरूप देत, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला आंतरराष्ट्रीय संदर्भ निर्माण केला. यामुळे जगातील अनेक राष्ट्रांची भारताबाबतची सहानुभूती वाढली व परिणामी इंग्रज राजवटीवर दबाव सुरू झाला.
लोकशाहीचे जसे चार स्तंभ संंबोधले जातात, तसेच आत्मनिर्भरता, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, नियोजन व गटनिरपेक्षता या सहा संदर्भित विचारसरणीवर स्वातंत्र्याची चळवळ व देशाची निर्मिती आधारित करणे हेही पं. नेहरूंचे आणखी एक सर्वांत मोठे योगदान आहे.
भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर. तथापि, राज्य, घटना, विधि व अर्थ या सर्व शास्त्रांमधील प्रवीण, सर्वश्री मुन्शी, राव, अयंगार यांच्यापासून ते काकासाहेबांपर्यंत साऱ्यांच्या सहकार्य व समन्वयातून घटनेतील तांत्रिक नियम, तसेच कायदे-कलमांना नैतिक अधिष्ठान देण्याचे काम जर कुणी केले असेल, तर ते पं. नेहरूंनी.
दुसऱ्या महायुद्धापर्यंत युरोपात इतर राष्ट्र प्रबळ न ठरणे, केवळ याच विचारसरणीवर ब्रिटिशांचे परराष्ट्रीय धोरण त्या काळात आधारित होते. दुसरीकडे, जगातील सर्व कम्युनिस्ट राजवटीचा नायनाट करणे या विचारसरणीवर अमेरिकेचे परराष्ट्रीय धोरण त्या काळात आधारित होते. मात्र, प्रबळ राष्ट्रगटांकडे न झुकलेल्या राष्ट्रांना एकत्र करणे ही काळाची गरज ओळखून त्याला
‘नॉन-अलाइन’ चळवळीचे खरे स्वरूप दिले ते पं. नेहरू यांनी. भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आशियाई राष्ट्रांनी एकत्र आले पाहिजे, नाहीतर अशी राष्ट्रे बड्या राष्ट्रांच्या संघर्षात होरपळून निघतील, हा धोक्याचा इशारा व विचार सर्वप्रथम पं. नेहरूंनी मांडला. किंबहुना, १९२९ मधे अफगाणिस्तानच्या जनतेला सर्वप्रथम खरा पाठिंबा जर कुणी दिला असेल, तर तो काँग्रेसने. यामागची प्रेरणा नेहरूंची. या विविध उदाहरणांवरून परराष्ट्र धोरणातील त्यांच्या कमालीच्या दूरदर्शीपणाचे प्रत्यंतर येते. याउलट, आज काय परिस्थिती आहे? १९७१ च्या युद्धापूर्वी ज्यांनी त्या वेळच्या पूर्व पाकिस्तानावर अत्याचार केले त्या पाकिस्तानला आजच्या बांगलादेशच्या पंतप्रधान भेट देणार आहेत. दुसरीकडे, श्रीलंकेला अमाप कर्जाच्या आमिषात अडकविणाऱ्या चीनने भूतानशीही सीमेबाबत बोलणी सुरू केली आहेत, तर नेपाळमध्ये चीन प्रचंड राजकीय घुसखोरी करीत आहे. पं. नेहरूंचे टीकाकार मात्र आज यावर मुग गिळून आहेत.
सार्वजनिक उद्योग उभारणीचे जाळे विणण्याची किमया पं. नेहरूंची. उद्योगपती टाटांची विनंती क्षणात मान्य करीत मुंबईत ‘टीआयएएस’ची उभारणी असो वा भारताची पहिली अणुभट्टी असो वा केरळातील थुंबा अग्निबाण उड्डाण केंद्र निर्मिती असो- साऱ्यामागची प्रेरणा पं. नेहरूंची.
कवी इकबाल यांचे ‘सारे जहां से अच्छा हिन्दोस्तान हमारा’ हे गीत शालेय अभ्यासक्रमाचा भाग बनविला नेहरूंनी. १५ ऑगस्टला राष्ट्रध्वज न फडकवणारे नेहरूंचे टीकाकार यांना नेमका याचाच कसा विसर पडतो! ज्या नेहरूंना मुस्लीमधार्जिणे म्हणून हिणविले त्याच नेहरूंनी कुंभमेळ्यादरम्यान स्नानासाठी सर्वप्रथम घाट बांधले हे उत्तर प्रदेश सरकार आपल्या जाहिरातीतून का दाखवत नाही?
निवृत्तीनंतर राजसत्तेची वस्त्रे काकासाहेबांनी (गाडगीळ) उतरवल्यावर, रस्त्यातून चालत जाणाऱ्या काकांना पाहून नेहरूंना राहवले नाही. घरी बोलावून, काका तुमच्याकडे गाडी नाही का, हा प्रश्न केला. आता मंत्री नसल्यामुळे सरकारी गाडी नाही आणि स्वतःची जुनी गाडी मुलगा विठ्ठल याला इंग्लंडला शिकायला पाठवायला पैसे हवे होते म्हणून विकली, असे काकांनी नेहरूंना सांगताच नेहरूंनी काकांच्या हातात एक कागद देत तुमची घराची व गाडीची सोय मी केली आहे, असे उद्गार काढले. काकांना स्टेट बँकेचे चेअरमन नेमले असल्याची केंद्र सरकारची ती अधिसूचना होती. संवेदनशील मन, सहकाऱ्याला अंतर न देणे ही नेहरूंची मानसिकता यातून दिसून आली.
सरदार पटेल जेव्हा अखेरीस आजारी पडले तेव्हा त्यांनी काकांना अहमदबादला बोलावले. काका, माझे आयुष्य आता काही दिवसांचेच उरले आहे, कितीही मतभेद झाले तरीही जवाहरच्या मागे तुम्ही शेवटपर्यंत उभे राहाल हा शब्द मला द्या, असे भावनात्मक आवाहन त्यांनी काकांना केले. पोलादी पुरुषाच्या डोळ्यांतील आसवांमधे काकांना देशाचे खंबीर, संयमी, परिपक्व नेतृत्व पं. नेहरू दिसत होते!
(माजी आमदार)
anantvsgadgil@gmail.com