- डॉ. अनघा कुकडे-लवळेकर सांग सांग भोलानाथ.. पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय.? अशी कविता लहानपणी फारच आवडते. ‘शाळेला सुटी नसती तर किती छान झालं असतं’ असं वाटवणार्या शाळा फारच कमी. आणि लौकिक अर्थाने शाळा सुटून गेली तरीही तितक्याच ओढीने शाळेत जावेसे वाटावे अशा शाळाही दुर्मीळच. ह्या दोन्हींचे सुंदर एकरूप म्हणजे ज्ञान प्रबोधिनी प्रशाला. पुण्यासारख्या शहरात अनेक थोर विभूतींनी स्थापन केलेल्या, दीर्घ परंपरा असलेल्या अनेक शाळा आहेत. त्यांची स्वत:ची एक समृद्ध ओळखही आहे. आणि तरीही अतिशय वेगळ्या हेतूने, हाती शून्य असताना अजून एका ध्येयवेड्या माणसाच्या चिंतनातून आणि अथक पर्शिमातून एक स्वप्न सार्थक झाले. कै. विनायक विश्वनाथ तथा आप्पा पेंडसे ह्यांनी पाहिलेल्या आणि प्रत्यक्षात उतरवलेल्या ‘ज्ञान प्रबोधिनी’ ह्या एका देखण्या स्वप्नाला प्रारंभ झाला तो 1962 मध्ये. प्रबोध शाळेच्या माध्यमातून सुरू झालेले काम 1968 मध्ये बुद्धिमान मुलांमधील नेतृत्वगुण फुलविणार्या पूर्ण वेळ शाळेच्या स्वरूपात सुरू झाले. ह्या वर्षी त्या ‘निरंतर चाललेल्या शैक्षणिक प्रयोगाला’ पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त काही आठवणींचा, काही अनुभवांचा आणि वाटचालीचा हा जागर.- एक विद्यार्थिनी, युवती कार्यकर्ती, अध्यापक, संशोधक आणि पालक म्हणूनही ह्या ‘छुं रूँ’ ’ची मला अनुभवाला आलेली ही काही स्मरणचित्नं आहेत. मला ह्या शाळेत प्रवेश मिळाला तोही गमतीशीर पद्धतीने. लातूरसारख्या तेव्हाच्या अतिमागास भागातून आलेली मी विद्यार्थिनी. आठवते एव्हढेच की कुठल्यातरी खोलीत, कुठल्यातरी मावशींनी कोणतीतरी कोडी सोडवायला दिले होती आणि ती सोडवताना फार म्हणजे फारच मज्जा आली होती. असले काही मी पूर्वी कधीच केले नव्हते. (नंतर अनेक वर्षांनी कळले की त्या मावशी म्हणजे प्रज्ञा मानस संशोधिकेतील ज्येष्ठ मानसज्ञ उषाताई आठवले होत्या आणि ती कोडी म्हणजे एक शास्त्नीय बुद्धिमत्ता कसोटी होती!!) त्यानंतर अचानक मला सांगण्यात आला की आता हीच तुझी शाळा. एकंदरीत विचित्नच होती ही शाळा. भले मोठे उपासना मंदिर, त्यातील मातृभूमीचे चित्न असलेली एक भिंत, आम्हा सकाळच्या वेळेतील कन्यका प्रशालेतील मुलींसाठी निम्मा वेळ वर्गात तर निम्मा वेळ प्रयोगशाळा कक्षात भरणारे वर्ग (कारण मुलांची दुपारची शाळा भरली की आम्ही तिथून बाहेर!!), दरवर्षी होणारी प्रकल्प शिबिरे आणि रोज संध्याकाळी भरणारे क्र ीडा दल!! असले काहीच आधीच्या शाळेत नव्हते. अध्यापकांना ‘ताई’ म्हणायचे आणि वर्गातील कुणालाच कधी आडनावाने हाक मारायची नाही हा अलिखित संकेत. दुसरे घरच जणू. वर्गातील मेज आणि खुच्र्याही सुट्या सुट्या. कधीही रचना बदलता येतील अशा. तर ह्या अशा आगळ्या वेगळ्या शाळेतील शिक्षणप्रवासही तेवढाच रोमांचकारक होता. त्यातील काही मोजक्याच आठवणी सांगते. दरवर्षी होणार्या प्रकल्प शिबिरांची आम्ही आतुरतेने वाट बघायचो. पाचवीच्याच वार्षिक परीक्षेनंतर मला रसायनशास्त्नातील प्रयोग करताना सर्व आम्ले आणि अल्कली हाताळायला मिळाली. ‘स्वतंत्न विचार करा आणि टोक गाठा’ असेच त्या प्रकल्पातून जणू बाळकडू मिळाले. माझ्या एका मैत्रिणीने रक्तगट ओळखण्याचा प्रकल्प केला, तर दुसरीने रेशीम किड्याचा जीवनप्रवास किड्याला प्रत्यक्ष पाळून अनुभवला. आणि हे सर्व आम्हीही एकमेकांसोबत अनुभवले. आज शास्त्न शाखा सुटून 35 वर्षे झाली तरीही त्या प्रकल्पातून शिकलेले सर्व जसेच्या तसे आठवते. भौतिकशास्त्न शिकताना विद्युतशक्तीवरील धडा स्वत: स्वत:साठीचा अभ्यासाला लागणारा विद्युतदीप बनवून करायचा प्रयोग पूर्ण वर्गाने केला. काय बिशाद आहे त्यातील तत्त्वे आणि रचना कुणी विसरून जाईल! इतिहासाच्या अध्ययनात फाळणीचा इतिहास अभ्यासण्यासाठी आमच्या सर्व सातवीच्या वर्गाने वृत्तपत्ने, पुस्तके, मुलाखती ह्यातून संदर्भ मिळवून जोडी जोडीने एक पुस्तिका तयार करायची होती. त्यानिमित्ताने (गुगलविरहित जमान्यात) सकाळ, केसरी ह्यासारख्या वृत्तपत्नीय कचेर्यात जाऊन, परवानग्या मिळवून संदर्भ कसे बघायचे ते शिकता आले. गतिवचन- प्रतिभाविकासन हे विषय पुस्तकातील न राहता आमच्या वर्गातील अत्यंत आनंदाचे गमतीत शिकण्याचे विषय होते; पण त्यातून किती कौशल्य नकळत रु जली हे मोजता येणार नाही. रोज संध्याकाळी भरणारे क्र ीडा दल हे शाळेच्या आकर्षणाचा परमोच्च बिंदू. आपल्यापेक्षा 4-5 वर्षांनीच मोठय़ा असलेल्या महाविद्यालयीन मैत्रिणींच्या नेतृत्वाखाली मुक्तपणे खेळायचे, पंढरीच्या वारीत भजने म्हणत सहभागी व्हायचे, सर्व क्र ीडा दलांच्या एकत्न क्र ीडांगणात सायकलवरील थरारक कसरतींपासून ते डौलदार सामूहिक बरची नृत्यापर्यंत अनेक दमवणारे खेळ खेळायचे, खेड शिवापूरच्या मुलींसाठी आपण आठवीतली चिल्ली पिल्ली असताना निवासी शिबिरे योजायची आणि न घाबरता परक्या ठिकाणी राहायचे, गड-किल्ल्यांवर मुक्त भटकंती करायचे, तायांनी हौसेने सुरू केलेल्या ‘रसमयी’ उद्योगातील सरबते-जाम उत्पादनाची, राखी तिळगूळ विक्र ी करायला घरघरात, कारखाने-कार्यालयात पायपीट करायची. सारे काही शिक्षणच!! आज वयाच्या पन्नाशीत जागोजागी त्या शिक्षणाचे झरे उसळून वर येतात आणि नवीन आव्हाने स्वीकारायला लावतात हे पदोपदी जाणवते आहे. ह्यातून आमची मने घडली- शरीरे घडली आणि बुद्धी तर घडलीच घडली असे प्रकर्षाने वाटते. नंतर युवती विभागाचे, अध्यापनाचे, संशोधनाचे काम करायला लागल्यावर त्या शिक्षण प्रक्रि येतील एकेक गोष्ट वेगवेगळ्या कोनातून अधिकाधिक उमगत गेली. विद्याव्रत संस्कार हा प्रबोधिनीचा गाभ्याचा उपक्र म का आहे हे जास्त जवळून कळले. मुलांना सर्वांगीण विकसनाची व्याख्याने देताना आपणच किती आतून बदलत जातो हे प्रत्ययाला आले. आणि बदलत्या पिढीच्या गरजांसोबत प्रबोधिनीही किती लवचीकपणे सर्व उपक्र मांचा विचार करते हे आतून पाहता आले. मग ते प्रयोग विषय अध्ययनातील असोत किंवा अनुभव शिक्षणातील. देशापुढचे प्रश्न सोडविण्यासाठी विचारांची आणि कृतीची ताकद यायची असेल तर ‘अभ्यास देशस्थितीचा समतोल चलो’ हे बाराव्या वर्षापासून रु जायला हवे म्हणून परिस्थिती ज्ञानाच्या तासिका प्रत्येक वर्गासाठी नियमाने व्हायला हव्यात (त्यातूनच माझा सामाजिक जाणीव संवर्धन हा पीएचडीचा विषय मला सापडला). मग त्यातही पुस्तकी वाचनापेक्षा प्रत्यक्ष अनुभव घेणे महत्त्वाचे. त्यातून देशाच्या अनेक भागात झालेले अनेक अभ्यास आणि कृती दौरे! मग तो उसळता पंजाब (1984) असो, सती रु प्कुन्वरचा आक्र ोश (1986) असो, गुरखा प्रश्न असो (1987), पूरग्रस्त बिहार- ओरिसा (ं1990) असो, अयोध्येतील राम मंदिर (1990) असो किंवा पथदर्शक अरविंद- विवेकानंद- ह्यांचे कार्य समजून घेण्याचा पुद्दुचेरी आणि कन्याकुमारी येथील प्रवास असो- विद्यार्थाचे भावविश्व समृद्ध आणि समाजातील वस्तुस्थितीला अभिमुख करण्याचेच हे सारे प्रयत्न म्हणजे ज्ञान प्रबोधिनीतील शिक्षण!! बुद्धीला धार आलीच पाहिजे म्हणून प्रश्न विचारण्याची, उपस्थित करण्याची आणि त्याला भिडण्याची संपूर्ण मुभा म्हणजे इथले शिक्षण. संस्काराचा मूळ पाया- तत्त्वज्ञान आणि तार्किकता ह्यांच्या एकजिनसीपणाने रु जवणे हे इथले शिक्षण. परब्रrा शक्तीची उपासना करताना अंध परंपरेतून आलेल्या निर्थक कर्मकांडांना बाजूला सारून कालानुरूप नवीन आचारांची रु जवात करण्याची प्रेरणा मुलांमध्ये जागी करणे हे इथले शिक्षण. मनात पेरल्या गेलेल्या समाजाभिमुख मूल्यांची आणि जाणिवेची पाठराखण शासन/सेना/शिक्षण/उद्योग/ सेवा/ अशा कोणत्याही कार्यक्षेत्नात गेल्यावरही निकराने करत राहण्याची वृत्ती घडवणे हे इथले शिक्षण! कुठल्याच विचार, प्रभावांचे अंध अनुयायी न बनता सर्व प्रवाहातील निके सत्त्व ओळखण्याची दृष्टी मिळण्याची सुरुवात होणे हे इथले शिक्षण. ज्ञान प्रबोधिनी प्रशाला ही एका व्यापक अशा तत्त्वज्ञानाची-कृतिप्रवाहाची दृश्य असणारी एक अभिव्यक्ती आहे. आज ह्या प्रशालेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी जसे प्रबोधीनीतील अनेक महत्त्वाच्या विभागांचे प्रमुख म्हणून काम करत आहेत तसेच जीवनाच्या सर्व क्षेत्नात आपापल्या प्रबोधिनीपणाचा ठसा उमटविणारे, उत्तमतेचे नवे मानदंड निर्माण करणारे, समाजाला दिशा देण्यात अग्रेसर असणारे असंख्य जण आहेत. त्यांचे ‘प्रबोधिनीपण’ हा त्यांच्यातील दुवा आहे. पन्नास वर्षांच्या दीर्घकाळात अभ्यासक्र म बदलले असतील, शिक्षक संच बदलले असतील, प्रबोधिनीच्या वास्तूतील प्रत्येकाच्या स्मरणखुणा बदलल्या असतील, काहीजण मध्येच काही कारणास्तव लौकिक अर्थाने प्रशालेतून लौकर बाहेर पडले असतील, पण दोन ते सहा वर्षे असा कुठलाही काळ ज्या विद्यार्थ्याने किंवा विद्यार्थिनीने प्रशालेत काढला असेल त्या सर्वांना ‘प्रबोधिनीपणाची’ जी झळाळी मिळाली आहे ती त्यांच्या आयुष्यावरचा एक न मिटणारा ठसा असेल ह्याबद्दल मला खात्नी वाटते.***
अमीट ठसा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 3:44 PM
ज्ञान प्रबोधिनी प्रशाला या शैक्षणिक प्रयोगाला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त..
ठळक मुद्देज्ञान प्रबोधिनी प्रशाला ही एका व्यापक अशा तत्त्वज्ञानाची-कृतिप्रवाहाची दृश्य असणारी एक अभिव्यक्ती आहे.